२०२० वर्ष आपल्यासाठी…

मेष (Aries)

आपली ह्या वर्षाची सुरवात चांगली होईल. व्यावसायिक आघाडीवर प्रगतीची अपेक्षा आपण बाळगू शकता. आपली बहुतांश कार्ये हि कारकिर्दीच्या प्रगतीशी संबंधितच असतील. आपण भविष्य विषयक अनेक योजना सुद्धा तयार कराल. ह्या वर्षात आपण स्वतःच्या कार्यात स्थैर्य राखण्याचा प्रयत्न कराल. जर कोणाशी व्यावसायिक संबंधात तणाव असेल किंवा कामात काही कायदेशीर किंवा शासकीय समस्या असतील तर त्या दूर करण्यास आपण प्राधान्य द्याल. सुरवातीस देशांतर्गत कार्ये व संपर्कात वाढ होईल. ह्या वर्षी आपण व्यक्तिगत व व्यावसायिक आघाडीवर सामाजिक माध्यमांचा उपयोग अधिक प्रमाणात कराल. आपण संबंधात उत्तम प्रगती साधू शकाल. ह्या वर्षात मित्रांचा संपर्क व सहवास कमी लाभला तरी वैवाहिक जोडीदार किंवा प्रियव्यक्तीशी जवळीक राहील. एप्रिल ते जुलै दरम्यान आपल्या वाणीत कलात्मकता वाढेल. अनेकदा आपल्या वाक्चातुर्याने भिन्नलिंगी व्यक्ती आकर्षित होतील. ह्या दरम्यान संबंधाचा उपयोग योग्य प्रकारे कसा करावा हे आपणास समजू शकेल. सप्टेंबर महिन्या नंतर आपल्या प्राप्तीत थोडी अनिश्चितता निर्माण होण्याची शक्यता असल्याने वर्षाच्या उत्तरार्धात आपणास आर्थिक बाबीत काळजी घ्यावी लागेल. विशेषतः कोठून पैसे येणार असतील तर वसुलीवर आधीपासूनच लक्ष देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. गुंतवणुकीसाठी शेवटचे तीन महिने उत्तम आहेत. मे महिन्याच्या जवळपास शासकीय लाभ किंवा वरिष्ठांकडून लाभ किंवा पैतृक संपत्तीतून प्राप्ती संभवते. जर भावंडांशी पैतृक संपत्तीमुळे तणाव निर्माण झाला असेल तर वडिलधार्यांच्या मध्यस्थीने त्याचे सुखद निराकरण होऊ शकेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वर्ष चांगले असले तरी अखेरच्या तीन महिन्यात नाक – कान – घसा ह्यांच्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे. ह्या दरम्यान विशेषतः श्वसनाचे विकार, कफ, खोकला ह्यांचा त्रास वरचेवर होण्याची शक्यता असल्याने आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.

 वृषभ (Taurus)

आपल्यासाठी वर्षाची सुरवात सामान्यच असली तरी जस जसे दिवस पुढे सरकतील तस तसे वातावरण अनुकूल होत जाईल. सुरवातीच्या दिवसात व्यावसायिक व व्यक्तिगत संबंधांच्या बाबतीत आपण अधिक उत्साह दाखवाल. आपल्यात कितीही उत्साह असला तरी तो इतरांसाठी त्रासदायी ठरणार नाही ह्याची आपणास काळजी घ्यावी लागेल. आपण जर जीवनातील काही तथ्य समजून घेऊन ते अमलात आणलेत तर हे वर्ष आनंदात घालवू शकाल. सुरवाती पासूनच संबंधांचे उत्तम सौख्य मिळाल्याने आपले विचार सकारात्मक होऊन त्याचा परिणाम आपल्या व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनावर होत असल्याचे दिसून येईल. जीवनात चढ – उतार तर येतच राहतील परंतु त्यांना सामोरे जाऊन आनंदाचे क्षण कसे घालवावे हे जर आपण शिकून घेतलेत तर त्याहून कोणतेही यश मोठे असणार नाही. आपल्या मनात हा सिद्धांत केंद्रस्थानी असेल. व्यावसायिक भागीदारांशी संवाद साधताना थोडे सावध राहावे. विशेषतः शेवटच्या तीन महिन्यात नवीन करार टाळावेत. महत्वाचे निर्णय घेताना सुद्धा वैवाहिक जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून त्यांच्या मुद्द्यांना महत्व द्यावे. ह्या दरम्यान प्रियव्यक्ती किंवा वैवाहिक जोडीदाराशी व्यवहारातसुद्धा बदल होऊ शकतो. एप्रिल ते जुलै दरम्यान आपल्या भिन्नलिंगी संबंधातील जवळीक वाढेल. ह्या दरम्यान वस्त्रालंकार, हौसमौज करण्याच्या वस्तू इत्यादीसाठी खर्चाची किंवा खरेदीची शक्यता आहे. आपल्या जवळ आर्थिक सुबत्ता असली तरी खर्चावर नियंत्रण ठेवल्यास उर्वरित रक्कम गुंतवणूक करून किंवा अन्य मार्गाने खर्च करून आपल्या फायद्यात वाढ करू शकाल. मार्च – एप्रिल दरम्यान आपल्या प्राप्तीच्या साधनात बदल होण्याची शक्यता आहे. सुरवातीच्या चार महिन्यात विद्यार्थ्यांना गंभीरतापुर्वक अभ्यास करावा लागेल. शिक्षणासाठी किंवा व्यवसायासाठी परदेशात जाण्याच्या प्रयत्नात तसेच देशांतर्गत कार्यात अखेरच्या तीन महिन्यात विलंब होण्याची शक्यता आहे. संपत्तीसह आरोग्य सुद्धा महत्वाचे आहे. हे ध्यानात ठेवून वर्षाच्या पूर्वार्धात आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. ज्यांना नाक – कान – घसा ह्यांच्याशी संबंधित त्रास आहे त्यांनी ऑगस्ट महिन्या पर्यंत उपचारात हेळसांड करू नये. शेवटच्या महिन्यात व्यावसायिक व व्यक्तिगत संबंधात पारदर्शकता वाढवावी लागेल. शेवटच्या तीन महिन्यात प्रत्यक्ष शत्रूंचा जोर वाढेल तेव्हा काळजी घ्यावी.

मिथून (Gemini)

ह्या वर्षात आपण आर्थिक, कारकीर्द, संबंध इत्यादी बाबतीत चुकीच्या भ्रमात, अनावश्यक विचारात गुंतून राहिल्याने वास्तविकता स्थिती आपणास समजू शकणार नसल्याने हे वर्ष विशेष आशास्पद ठरू शकणार नाही. त्यामुळे शक्य तितकी जास्त पारदर्शकता व स्पष्टता असावी. काहीवेळा हाती आलेली संधी निसटून गेल्याने स्वतःला किंवा नशिबास दोष देण्या ऐवजी नव्या जोमाने, नव्या आशेने व नवीन व्यूहरचना करून मार्गक्रमण करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. असे करण्यात आपणास काही त्रास होईल, परंतु त्याने आपल्या जीवनात दीर्घकाळ टिकणारे सकारात्मक परिवर्तन घडून येईल ज्यामुळे प्रतिकूल परिस्थितीचा सामना करण्याचे बळ आपल्यात येईल. हे वर्ष व्यावसायिक आघाडीवर भागीदारी कार्यासाठी आशास्पद नाही. भागीदारांशी आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावेत. सांघिक कार्यात व आपल्या वैयक्तिक कार्यात विलंब होईल. उत्तरार्धात आपल्या कामांना गती येईल. सारासार विचार करूनच नवीन कार्याची सुरवात करावी. अखेरच्या दोन महिन्यात शक्य असल्यास कर्ज किंवा उधारी करणे टाळावे. काही अनपेक्षित खर्च उदभवल्याने आपणास कर्ज किंवा उधारी करावी लागण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी किंवा सरकारी विभागात शक्यतो अधिकारी वर्गाशी व प्रतिष्ठित व्यक्तींशी वाद टाळावेत. कायद्या विरुद्ध असलेली कामे टाळावीत. संबंधात काळजी करण्या सारखे काही नाही. कुटुंबियांशी जवळीक साधू शकाल. शक्यतो कोणत्याही व्यक्तीशी वाद टाळण्याचा सल्ला देण्यात येत आहे. संपर्क साधताना सुद्धा पारदर्शकपणा व विनम्रपणा असण्याची गरज आहे. विशेषतः ऑगस्ट महिन्या नंतर ह्याची आपणास काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात परिश्रम वाढवावे लागतील. आपण एखाद्या विषयाचा खोलवर अभ्यास करण्याचा विचार केलात तरी त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य संधी न मिळाल्याने आपणास नैराश्य येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अभ्यासा विषयी आपली दृढ इच्छाशक्तीच मदतरूप ठरेल. ह्या वर्षाच्या मध्यास आपण वैभवी जीवनशैलीप्रती अधिक आकर्षित व्हाल ज्यात खूप खर्च होण्याची शक्यता असल्याने खर्च नियंत्रणात ठेवावेत. अनैतिक संबंधांपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या वर्षात आपल्या चेहेऱ्यावरील तेज काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोणते ना कोणते आजारपण आपणास त्रास देत राहील, त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे गरजेचे ठरेल.

कर्क(Cancer)

हे वर्ष संघर्षांसह सुखद अनुभव देणारे आहे. जीवनाप्रती सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपण मार्गक्रमण कराल. मात्र वर्षभर सतत आपल्या भावनात चढ – उतार होत असल्याचे दिसून आल्याने अधून मधून आप्तांपासून दूर जाल. मात्र, अशा परिस्थितीत जर आपल्या ऐवजी त्यांच्या दृष्टिकोनातून परिस्थितीचा अभ्यास केलात तर त्याचे उत्तम परिणाम मिळवू शकाल. नोकरी करणाऱ्यांच्या कामात किंवा जागेत बदल होण्याची शक्यता असून त्याचा कालांतराने आपणास फायदा होईल. जर आपल्यावर कामाचे ओझे असेल किंवा प्रकल्प पूर्ण करण्यात विलंब होत असेल तर फेब्रुवारी पासून त्यात सुधारणा होऊ लागेल. फेब्रुवारीच्या मध्या पासून नोकरीत आपला उत्साह वाढल्याने सहकाऱ्यांशी काही कटुता निर्माण होणार नाही ह्याची काळजी घ्यावी लागेल. आजवर व्यावसायिक आघाडीवर होत असलेला विलंब जानेवारी नंतर ओसरताना व कामाचे ओझे सुद्धा कमी होताना दिसू लागेल. भागीदारी कार्यात किंवा नवीन करारात फेब्रुवारी नंतर विलंबाची शक्यता असल्याने त्यापूर्वीच त्यांची पूर्तता करावी. संबंधात सानिध्य टिकून राहील. वर्षाच्या मध्यास आपण प्रणयी जीवनात अधिक मग्न राहाल. फेब्रुवारी नंतर संबंधात वैविध्य राखण्यात व जोडीदारास खुश ठेवण्यात आपणास कष्ट करावे लागतील. अशा परिस्थितीत प्रसंगानुसार भेटवस्तू देऊन आपल्या जोडीदाराशी जवळीक साधू शकाल. धार्मिक कारणांसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. शक्यतो सप्टेंबर महिन्या पर्यंत कोणाशीही उधार उसनवारी करणे टाळावे. ह्या दरम्यान काही ना काही कारणांनी अनेकदा प्रवास करावे लागतील. वर्षाच्या अखेरच्या तीन महिन्यात एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून किंवा स्रोता कडून आर्थिक किंवा अन्य लाभ मिळवू शकाल. मात्र, शेअर्स किंवा तत्सम काम करणाऱ्याना सप्टेंबर महिन्या नंतर खूपच सावध राहावे लागेल, अन्यथा मोठ्या नुकसानास सामोरे जावे लागेल. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी चांगले असले तरी प्रवेश परीक्षा किंवा नेहमीच्या परिक्षां व्यतिरिक्त इतर अभ्यासक्रमात थोडी जास्त मेहनत करावी लागेल. सप्टेंबर महिन्या नंतर आपणास अभ्यासात खूप मेहनत वाढवावी लागेल. ह्या वर्षात आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल, अन्यथा आजारपण बळावण्याची शक्यता आहे. मेदवृद्धी, मधुमेह इत्यादींशी संबंधित विविध समस्या होण्याची जास्त शक्यता ह्या वर्षात आहे.

सिंह (Leo)

हे वर्ष आपल्यासाठी उत्साह घेऊन आले आहे. मागील काही दिवसांपासून संबंधातील नीरसता व अनिश्चिततेचा सामना आपण करत असलात तर आता काळजी करणे सोडा, कारण जानेवारी अखेर पासून बहुतांश बाबतीत आपण सुनिश्चित होऊ शकाल. ह्या वर्षी आपल्या कामातून आपण बऱ्याच नवीन गोष्टी शिकू शकाल. जीवनशैली उंचावण्यासाठी सुद्धा खर्च होण्याची शक्यता आहे. ह्या वर्षी संबंधातील अनिश्चिततेमुळे वर्तमान संबंध तोडून नवे संबंध जोडण्यावर आपण अधिक भर द्याल. मात्र ह्या बाबतीत निर्णय घेताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा अन्यथा आपल्यावर पश्चाताप करण्याची पाळी येईल. जोडीदाराची निवड करताना सुद्धा घाई करू नये अन्यथा वैचारिक मतभेदामुळे संबंधात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. विवाहा विषयी कोणताही निर्णय घेण्यास सप्टेंबर नंतर अनुकूलता लाभेल. मात्र, वर्षातील अखेरच्या तीन महिन्यात कौटुंबिक संबंधात काळजी घ्यावी लागेल. व्यावसायिक कारणांसाठी मालमत्ता खरेदी करू शकाल. जर आपण व्यवसाय वृद्धीसाठी मालमत्ता, मशिनरी इत्यादी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी वर्षाचा पूर्वार्ध अनुकूल आहे. ह्या व्यतिरिक्त एप्रिल ते जुलै च्या मध्या पर्यंतचे दिवस सुद्धा अनुकूल आहेत. शक्यतो जुलै मध्य ते ऑगस्ट मध्या पर्यंत आपली प्रतिष्ठा मलीन होणार नाही किंवा एखाद्या कायदेशीर कार्यवाहीस आपणास सामोरे जावे लागणार नाही ह्याची काळजी घ्यावी. वर्षाच्या मध्यास नवीन विचारसरणीने आपण कामात मार्गक्रमण कराल. वर्षाच्या सुरवातीस विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीसाठी तयार राहावे लागेल. मागील काही दिवसांपासून आपला अभ्यास संथ गतीने होत असेल जो फेब्रुवारी पासून योग्य गती साधू शकेल. असे असले तरी आपला मार्ग सोपा नसेल. सप्टेंबर महिन्या नंतर आपल्या स्थितीत सुधारणा होऊ लागेल. जानेवारीच्या अखेरीस आरोग्य विषयक काही त्रास होण्याची शक्यता आहे, ज्यात जुने विकार बळावण्याची शक्यता अधिक आहे. कामाच्या ताणामुळे अनेकदा आपणास थकवा येऊ शकतो.

कन्या (Virgo)

हे वर्ष आपल्यासाठी खूपच आशास्पद आहे. आर्थिक प्रगतीची शक्यता असली तरी कौटुंबिक संबंधांची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही बाबतीत कुटुंबियांशी चर्चा करताना आपल्या शब्दात स्पष्टता असण्याची गरज आहे. ह्या व्यतिरिक्त प्रत्येकवेळी आपलेच म्हणणे खरे असल्याचा हट्ट धरू नये. मागील काही दिवसांपासून कौटुंबिक कार्यात विलंब होत असल्यास फेब्रुवारी पासून त्यास गती प्राप्त होईल. ह्या दरम्यान प्रेम संबंध टिकविण्यासाठी सुद्धा आपणास अधिक प्रयत्न करावे लागतील. विशेषतः फेब्रुवारी मध्या पासून संबंध संथ गतीने वाटचाल करत असल्याचे आपणास जाणवेल. विवाहितांना मात्र काहीसे बरे वाटेल. ज्यांना नवीन प्रेम संबंधांची सुरवात करावयाची आहे त्यांना प्रेमाचा प्रस्ताव मांडण्यात काही अडचणी येऊ शकतात. कार्यस्थळी स्पर्धेस सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. कुटुंबियांशी चर्चेतून किंवा वागणुकीतून गैरसमज उदभवणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक आघाडीवर विशेष त्रास होणार नसला तरी वर्षभर कुटुंबियांसाठी केलेल्या खर्चात आपणास यश मिळण्याची आशा आपण बाळगू नये. संतती कडून होणाऱ्या प्राप्तीत फेब्रुवारी मध्या पासून कपात होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला होईल. आपणास अभ्यासाची गोडी कमी असून सुद्धा किंवा काही अनिश्चितता आली तरी आपण प्रगती साधू शकाल. असे असले तरी फेब्रुवारी पासून ते वर्ष अखेर पर्यंत अधिक परिश्रम करावे लागतील. सप्टेंबर महिन्या नंतर मित्र वर्तुळात अधिक वेळ वाया दवडू नये अन्यथा त्यांच्यामुळे आपल्या अभ्यासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना वर्षातील शेवटच्या तिमाहीत यशप्राप्ती होईल. परदेशी जाण्यात काही अडचणी येत असल्यास त्या दूर होतील. ह्या वर्षी आरोग्य चांगले राहिले तरी कामाच्या व्यापा बरोबरच योग्य विश्रांती व समतोल आहाराचा आग्रह असावा. आध्यात्मिक साधना व व्यायामातील नियमितता आपल्यासाठी योग्य ठरेल.

तूळ (Libra)

ह्या वर्षात आपले कष्ट बहरून येतील. कारकीर्द, अभ्यास, आर्थिक उन्नती, संबंध, सामाजिक अशा कोणत्याही क्षेत्रात आजवर प्रगती साधण्यासाठी किंवा स्वतःची नवीन ओळख बनविण्यासाठी जे काही प्रयत्न आपण केले असतील त्याचे फळ आता मिळू शकेल. सुरवातीच्या तिमाहीत प्रवासात त्रास होण्याची शक्यता असल्याने शक्यतो तो टाळण्याचा प्रयत्न करावा. फेब्रुवारीच्या मध्या नंतर स्थितीत सुधारणा होऊ लागेल. संपूर्ण वर्षभरात प्रवासाच्या आयोजनात शेवटच्या क्षणा पर्यंत अनिश्चितता राहण्याची शक्यता अधिक आहे. वर्षाच्या सुरवातीस पैतृक संपत्ती संबंधित कामात यशस्वी होऊ शकाल. ह्या व्यतिरिक्त वडीलां कडून काही लाभ होण्याची अपेक्षा बाळगू शकाल. आर्थिक आघाडीवर काळजी करण्या सारखे काही नाही. बहुदा प्राप्तीत वाढ होण्यासाठी आपण योग्य नियोजन करून भरघोस फायदा मिळवू शकाल. मात्र, सप्टेंबर महिन्या नंतर आपल्या प्राप्तीतील अनिश्चितता वाढेल. वर्ष अखेरीस पैश्यांच्या अभावी आपला खोळंबा होऊ नये म्हणून आगाऊ नियोजन करणे गरजेचे ठरेल. जानेवारीत होणारे काही खर्च वगळल्यास बहुतांश वेळी पैसे शिल्लक पडू शकतील. वर्षाच्या सुरवातीस प्राप्ती वाढ होण्यासाठी केलेले प्रयत्न वर्ष अखेरीस फलद्रुप होतील. संबंधात गोडवा राहील. मात्र मित्रांचा सहवास घडण्याची शक्यता धूसरच राहील. कदाचित मित्रांचे सहकार्य न लाभल्याने त्यांच्याप्रती आपल्या मनात नाराजीचे सूर उमटतील, मात्र तसे करण्यात त्यांचा काही दोष नसून परिस्थितीच तशी असेल हे ध्यानात ठेवावे. एप्रिल महिन्या नंतर ह्या स्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुलै अखेर पर्यंत प्रियव्यक्ती संबंधित काही चिंता निर्माण झाली तरी उर्वरित काळ अनुकूल असल्याने प्रियव्यक्ती किंवा वैवाहिक जोडीदाराशी आपण जवळीक साधू शकाल. प्रणयी जीवनात व दांपत्य जीवनात सानिध्याची जाणीव होईल. ह्या वर्षात विद्यार्थी उत्तम प्रगती करू शकणार असले तरी त्याना वाईट संगत सोडण्याचा सल्ला देण्यात येत आहे. ह्या वर्षात दूरवर किंवा परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची आपली इच्छा फलद्रुप होऊ शकेल. वर्ष अखेरीस आपणास गूढ विषयांची गोडी लागेल. एकंदरीत ह्या वर्षी आपले आरोग्य चांगले राहिले तरी प्रवासात, साहस करण्या योग्य स्थळी प्रवास करताना दुखापत होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल.

वृष्चिक (Scorpio)

ह्या वर्षात आपली अपूर्ण राहिलेली कामे आपण पूर्ण करू शकाल. प्रलंबित कामे पूर्ण झाल्याने आपणास नवीन आयोजनाचा मार्ग सापडेल. आपण मागील काही दिवसांपासून कमी बोलत आहात किंवा संपर्क सुद्धा पूर्वीच्या मानाने कमी करत आहात. वर्षाच्या सुरवातीस हि स्थिती अशीच राहील, मात्र फेब्रुवारी मध्यापासून त्यात सुधारणा होऊ शकते. विशेषतः लोकांच्या भेटीगाठी किंवा इतरांशी चर्चा वाढतील. संपर्काची नवीन साधने व सामाजिक माध्यमात आपण अधिक सक्रिय राहाल. मात्र, आपल्या शब्दांचा चुकीचा अर्थ काढला जाणार नाही ह्याची काळजी आपणास घ्यावी लागेल, अन्यथा आपल्या संबंधात कटुता निर्माण होऊ शकते. आपणास अनेकदा वैभवी जीवनशैलीचा व महागड्या वस्तू खरेदी करण्याचा मोह होईल. नकारात्मकते कडून आपण सकारात्मकतेकडे आपण मार्गक्रमण कराल व त्यामुळे प्रत्येक कार्यात व जीवना विषयी आपला आत्मविश्वास वाढेल. मात्र अति आत्मविश्वास बाळगू नका, अन्यथा अडचणीत सापडावे लागेल. ह्या वर्षात आपण आपली हौसमौज सढळहस्ते पूर्ण कराल, मात्र तसे करताना आपल्या मर्यादित प्राप्तीचा विचार करूनच खर्च करावा. व्यावसायिक आघाडीवर आपण उत्तम प्रगती साधू शकाल व बहुतांश वेळा आपली कार्ये प्रगतिलक्षीच असतील. अखेरच्या तिमाहीत भागीदारी कार्यात काळजी घ्यावी. संबंध उत्तम राहतील. व्यक्तिगत व व्यावसायिक जीवनात प्रियव्यक्तीचा सहवास व सहकार्य मिळवू शकाल. बहुतेक वेळा प्रियव्यक्तीशी किंवा वैवाहिक जोडीदाराशी सलोखा राहील. एप्रिल ते जुलै दरम्यान संबंधांचे उत्तम सौख्य लाभेल. आर्थिक बाबतीत सावध राहण्याचा सल्ला देण्यात येत आहे. वर्ष अखेरीस स्थितीत थोडी सुधारणा झाली तरी खर्चावर नियंत्रण न ठेवल्यास इतरांकडून आर्थिक मदत घ्यावी लागेल. विशेषतः आपल्या प्राप्तीत अनिश्चितता राहिल्याने खर्चाचे पूर्व नियोजन करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम असले तरी भविष्यातील शिक्षणासाठी प्रवेश घेण्याच्या कार्याच्या किंवा वाटाघाटीच्या दरम्यान काळजी घ्यावी लागेल. सप्टेंबर महिन्या नंतर आपल्या अभ्यासात अजाणतेपणाने काही अडचणी येण्याची शक्यता आहे. आरोग्यास विशेष त्रास होणार नसला तरी नाक – कान – घसा ह्यांच्याशी संबंधित त्रास होण्याची शक्यता आहे.

धनू (Sagittarius)

हे वर्ष आपल्यासाठी मिश्रफलदायी आहे. सतत चढ – उताराचे वातावरण राहिल्याने आपणास प्रत्येक क्षेत्रात समतोल साधून मार्गक्रमण करावे लागेल. कामात आपणास नीरसता किंवा थकवा जाणवेल. मागील अनेक दिवसांपासून आपले जीवनचक्र संथ गतीने चालत असल्याच्या आपल्या तक्रारीसह आपण मार्गक्रमण करत आलात. वर्षाच्या सुरवातीस हि तक्रार राहिली तरी फेब्रुवारी मध्या पासून त्यात सुधारणा होऊ लागेल. आपले विचार सकारात्मक होऊ लागतील. मात्र, फेब्रुवारीच्या मध्या नंतर प्राप्तीची गती संथ झाल्याने आपल्या स्थितीत बदल होईल. एकूणच मानसिक त्रास तर राहणार आहे. अशावेळी मनोबल दृढ ठेवून आपणास कोणत्याही परिस्थितीस सामोरे जाण्यास सज्ज राहावे लागेल. संबंधात एकमेकांवर विश्वास ठेवावा लागेल, इतकेच नव्हे तर कधीकधी नमते सुद्धा घ्यावे लागेल. सुरवातीस अनावश्यक किंवा चैनीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे. विशेषतः भिन्नलिंगी संबंधात आपल्या जोडीदारास अधिक वेळ द्यावा लागेल तसेच त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल. सप्टेंबर नंतर संबंधात सलोखा राहील. व्यावसायिक आघाडीवर भागीदारी कार्ये संथ गतीने मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. करार करण्यात कदाचित विलंब होऊ शकतो. फेब्रुवारी मध्यापासून आपली प्राप्ती संथ गतीने होण्याची शक्यता असल्याने आपणास आवश्यक खर्चाची तरतूद अगोदर पासूनच करून ठेवावी लागेल. पैसे जेथून येणार असतील तेथून येण्यास विलंब होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना कष्ट करण्याची तयारी ठेवावी लागेल. आपला कामातील उत्साह वाढू शकेल असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. व्यावसायिकांना इतरांवर अवलंबून राहून केलेल्या कार्यात पश्चातापाची वेळ येण्याची शक्यता आहे. सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. हे वर्ष विद्यार्थ्यांसाठी सामान्य असल्याने त्यांना सुरवाती पासूनच नियोजनपूर्वक अभ्यास करावा लागेल. ह्या वर्षात आरोग्य मध्यम राहील.

मकर (Capricorn)

हे वर्ष आपल्यासाठी एकंदरीत चांगले आहे. आपणास प्रगतीच्या अनेक संधी मिळतील. व्यावसायिक आघाडीवर आपण मोठे ध्येय गाठू शकाल. ह्या वर्षी आपण प्रगतीसाठी नवीन ध्येय निर्धारित करून ते पूर्ण करण्याची व्यूहरचना आखण्याची शक्यता आहे. कामाप्रती अभिरुचीत व विचारसरणीत नाविन्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. फेब्रुवारी नंतर कामाप्रती आपणास आळस वाटू लागला तरी आपला उत्साह जर कमी केला नाहीत तर त्यात विशेष फरक पडणार नाही. नोकरीत वरिष्ठांचे उत्तम सहकार्य मिळून नवीन संधी प्राप्त होऊ शकतील. वर्षभर आपण आत्मप्रेरित राहण्यास विसरू नका. ह्या वर्षी नवीन काही करण्यास हरकत नसली तरी जर आपले कौशल्य व ज्ञान वृद्धीसाठी प्रयत्न केल्यास भविष्यात कारकिर्दीत खूप मोठा फायदा होऊ शकेल. व्यक्तिगत आयुष्यात अनेक चढ – उतार येतील परंतु समाधानी वृत्ती बाळगल्यास संबंधातील समतोल आपण साधू शकाल. सध्या आपले ज्यांच्याशी संबंध आहेत त्यांच्या बद्धल आपण अधिक भावनाशील होण्याची शक्यता आहे. एप्रिल ते जुलै दरम्यान आपल्या जीवनात प्रणयास अधिक महत्व असेल. ह्या दरम्यान आपण नवीन संबंधाची सुरवात करण्याचा किंवा असलेल्या संबंधास नवीन वळण देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्याची शक्यता आहे. ह्या वर्षात आपल्या जीवनात असे काही प्रसंग उदभवतील कि पैश्यापेक्षा संबंधास किती जास्त महत्व असते ह्याची आपणास जाणीव होईल. कारकिर्दीच्या बाबतीत वडिलधाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन आपण त्यांचे मन जिंकू शकाल. त्यांच्या मनात आपल्या विषयी आदर निर्माण होऊन त्यांचे आशीर्वाद जीवनात प्रगती साधण्यासाठी मदतरूप ठरतील. व्यावसायिक आघाडीवर मार्च ते मे महिन्या दरम्यान चांगली संधी मिळण्याची अपेक्षा आपण बाळगू शकता. प्रणयी जीवनासाठी वर्षाच्या सुरवातीचे दिवस अनुकूल असून फेब्रुवारीच्या मध्या नंतर आपल्या प्रिय व्यक्तीस खुश ठेवण्यासाठी आपणास अधिक सक्रिय राहावे लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात एकाग्रचित्त झाले तरी उत्तरार्धात त्यांना थोडी मेहनत वाढवावी लागेल. विशेषतः सप्टेंबर नंतरच्या काळात अभ्यासात आव्हानांचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे आधी पासूनच जर अभ्यासा बाबतीत अधिक जागरूक राहिलात तर फायदा होऊ शकेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून वर्षाची सुरवात चांगली असली तरी ऋतुमानातील बदलाचा संभाव्य त्रास टाळण्यासाठी व्यायामातील नियमितता व आहारावर विशेष लक्ष द्यावे लागेल.

कुंभ (Aquarius)

हे वर्ष आव्हाने, संघर्ष, मेहनत व यशाचे मिश्रण देणारे आहे. प्रणयी जीवनात आपल्याला वर्षभर काळजी घ्यावी लागणार आहे. अखेरच्या तिमाहीत आधीच्या तुलनेत परिस्थितीत सुधारणा झाली तरी कौटुंबिक संबंधात काही कटुता येण्याची शक्यता आहे. संबंधाच्या बाबतीत सतत अनिश्चितता जाणवेल. सप्टेंबर महिन्या पर्यंत प्रणयी जीवनात भावनेच्या भरात कोणताही निर्णय न घेता थोडा व्यावहारिक दृष्टिकोन बाळगावा. आता सुरु झालेल्या संबंधाच्या भविष्या विषयी काही सांगणे अशक्यप्राय वाटत असल्याने नवीन व्यक्तीशी संबंध जुळवताना किंवा वैवाहिक जोडीदाराच्या शोधात आपली फसवणूक होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणतेही नवीन संबंध न जुळवणे हितावह ठरेल. जे आधी पासूनच संबंधात आहेत त्यांना सुद्धा सध्या आपल्या जोडीदारास खुश ठेवण्यासाठी किंवा परस्पर आत्मीयता टिकविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील. आरोग्याच्या बाबतीत हयगय न करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. व्यावसायिक आघाडीवर काही आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. ह्या वर्षात शक्यतो सट्टाकीय कामे, वायदे बाजार इत्यादींपासून दूर राहावे, अन्यथा मोठे नुकसान होऊ शकते. सुरवातीच्या दिवसात तांत्रिक कार्यात आपण उत्तम प्राप्ती करू शकाल. फेब्रुवारीच्या मध्या नंतर आपल्या कामाच्या गतीस थोडी खीळ बसेल. सध्या आपणास मिळणाऱ्या लाभात थोडा विलंब झाला तरी उत्तरार्धात चांगले फळ मिळण्याची आशा आपण बाळगू शकता. ह्या वर्षात दीर्घ पल्ल्याच्या प्रवासाचे आयोजन करू शकाल. ज्यांना नोकरीत बदल करावयाचा आहे त्यांना योग्य संधी मिळू शकेल. ह्या वर्षात व्यावसायिक आघाडीवर आपले जाळे विस्तारण्यावर आपले लक्ष केंद्रित करू शकाल. नवीन ओळखी वाढविण्यासाठी आपण अनेकदा व्यावसायिक स्नेहसंमेलन किंवा बैठका, किंवा कार्यशाळा आयोजित करण्याची किंवा त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीतून सुद्धा फायदा होऊ शकेल.

मीन (Pisces)

हे वर्ष आपल्यासाठी विविध आघाड्यांवर महत्वपूर्ण ठरेल. नोकरी – व्यवसायात प्रगती झाली तरी संपूर्ण वर्षभर कामात मूळभूत बदल करण्याचे विचार आपल्या मनात येतील. मात्र त्याची अंमल बजावणी करताना काळजी घ्यावी. ह्या वर्षात सप्टेंबर महिन्या पर्यंत कोणतेही बदल किंवा नवीन सुरवात करताना दीर्घकालीन विचार करा, तसेच इतरांवर विसंबून न राहता स्वतःच परिस्थितीचे आकलन करून पाऊल उचलावे. लोखंड, सिमेंट, अवजड मशिनरीसाठी लागणाऱ्या वस्तू किंवा त्यांच्याशी संबंधित सेवा, अवजड वाहनांशी संबंधित कार्यात ह्या वर्षी आपण उत्तम प्रगती साधू शकाल. आपले ध्येय साध्य करण्यासाठी आपण अपार कष्ट करू शकाल. कौटुंबिक संबंधात त्यातही विशेषतः मातेशी व्यवहार करताना सावध राहावे लागेल. कुटुंबातील इतर महिलावर्गाशी सुद्धा क्षुल्लक कारणांवरून वाद होण्याची शक्यता असल्याने संवाद साधताना अधिक स्पष्टता व स्वभावात विनम्रता ठेवावी लागेल. आप्तांशी गैरसमज होण्याची शक्यता अधिक आहे. प्रणयी जीवनात विशेष त्रास जाणवत नसला तरी सुरवातीच्या दोन महिन्यात आपले संबंध मंदावण्याची शक्यता आहे. जर विवाहा विषयी निर्णय घ्यावयाचा असेल तर तो फेब्रुवारीच्या मध्या नंतर घ्यावा. वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत आपल्या संबंधातील सलोखा वाढेल. सध्या आपण कौटुंबिक गरजा भागविण्यासाठी खर्च कराल परंतु त्यात यशप्राप्तीची अपेक्षा बाळगू नका. अनेक दिवसांपासून कोणाशी मतभेद झाले असल्यास ह्या वर्षी त्याचे सुखद निराकरण होऊ शकेल. एप्रिल ते जुलै पर्यंत आपल्या मित्र – मंडळात वाढ होईल. विद्यार्थ्यांसाठी वर्षाची सुरवात चांगली असली तरी फेब्रुवारीच्या मध्या नंतर त्यांना मेहनत वाढवावी लागेल. एखादा विषय समजून घेण्यासाठी आपणास अधिक मेहनत करावी लागण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत ह्या वर्षी अनेक चढ – उतार येतील असे दिसते.

साभार,

लोकमत