- तिथी
सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी
- पार्श्वभूमी
सूर्य एका राशीतून दुस-या राशीत जाणे यालाच ‘संक्रमण’ म्हणतात. मकर राशीमध्ये सूर्य जाणे यालाच ‘मकर संक्रमण ‘ असे म्हणतात. ज्या दिवशी सूर्य धन राशीतून मकर राशीमध्ये जातो त्या संक्रमणाच्या दिवशी दरवर्षी हिंदू लोक ‘संक्रांत’ हा सण साजरा करतात. हा सण पौष महिन्यात येतो. हिंदू लोकांचे सण हे चांद्रवर्षानुसार असल्याने सध्या वापरल्या जाणा-या इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हिंदूंचा सण हा दरवर्षी विशिष्ट तारखेलाच येईल असे नसते. याला एकमेव अपवाद म्हणजे संक्रांत. संक्रांत हा सण प्रत्येक वर्षी जानेवारी महिन्याच्या १४ तारखेलाच साजरा केला जातो. यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते. दिवस हळू हळू मोठा होऊ लागतो.
- साजरा करण्याची पारंपारिक पद्धत
सुगडाचा वसा : संक्रांतीच्या वेळी थंडी असते. त्यामुळे शरीराला जास्त उष्मांक देणारे तीळ व गूळ या पदार्थांना या दिवशी फार महत्त्व असते. सूर्याला व देवाला तिळगुळाचा नैवेद्य दाखविला जातो.सुवासिनी ह्या दिवशी सवाष्णीला सुगडाचा वसा देतात. सुगडाचा वसा म्हणजे लहान मडक्यांतून गव्हाच्या ओंब्या, गाजर व ऊस यांचे तुकडे, पावटयाच्या शेंगा, भुईमुगाच्या शेंगा, बोरे, हरब-याचे घाटे, तिळगुळाच्या वडया, हलवा असे पदार्थ घालून त्या मडक्यांना हळदीकुंकू लावून ती सुवासिनींना देतात. भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतकरी आपल्या शेतात पिकविलेल्या भाज्या-धान्य वगैरे नमुन्यादाखल इतर शेतकऱ्यांना देऊन , चांगल्या वाणाची चर्चा व्हावी व अधिक चांगले उत्पन्न देणा-या बियाणांविषयी देव-घेव व्हावी हा सुगडाच्या वशामागचा हेतू आहे. संक्रांतीला जेवणात मिष्टान्न म्हणून गुळाची पोळी करतात. गुळाच्या पोळीबरोबर लोणकढे तूप वाढण्याची प्रथा आहे.
काळी वस्त्रे : संक्रांतीच्यावेळी काळया वस्त्रांना महत्त्व दिले जाते कारण काळी वस्त्रे उष्णता शोषून घेतात. म्हणून काळया साडया, काळी झबली अशी वस्त्रे संक्रांतीच्या सुमारास कापड बाजारात दिसू लागतात.
नवविवाहितांची प्रथम संक्रांत – हळदीकुंकू : नवविवाहित मुलींसाठी या सणाचे विशेष महत्त्व आहे. लग्नानंतरच्या प्रथम येणा-या संक्रांतीला नवविवाहित मुलींसाठी खास काळया रंगाच्या वस्त्रांची खरेदी केली जाते. या दिवशी महिला काळे वस्त्र परिधान करतात. मकर संक्रांतीचे दिवस हे थंडीचे असतात. काळ्या रंगाचे वस्त्र हे उबदार असते. काळ्या मोठ्या रात्रीला निरोप देण्याच्या उद्देशानेही असे काळ्या रंगाचे वस्त्र नेसण्याची प्रथा पडली असावी.त्यांना हलव्याचे दागिने घालतात व सुवासिनींना हळदीकुंकवासाठी बोलावतात. त्यांना तिळगुळाच्या वडया किंवा तीळ आणि साखरेपासून बनविलेला हलवा देतात. निरांजन, स्टीलच्या लहान डब्या, पिशव्या वगैरेंसारखी एखादी उपयुक्त वस्तू सुवासिनींना भेट म्हणून दिली जाते. त्याला ‘आवा लुटणे’ असे म्हणतात.
बोरनहाण : संक्रांतीपासून ते रथसप्तमी या तिथीपर्यंत कोणत्याही दिवशी एक वर्षाच्या आतील लहान मुलांचे आणि मुलींचे ‘बोरनहाण’ केले जाते. यावेळी मुलांची हौस म्हणून त्यांना हलव्याचे दागिने करतात. काळे झबले शिवतात. चुरमुरे, बत्तासे, बोरे, हलवा, तिळाच्या रेवडया वगैरे पदार्थ एकत्र करून लहान बाळाला मधे बसवून त्यावर या खाऊच्या पदार्थांचा वर्षाव केला जातो. घरातील व जवळपासची लहानमुलेही या वेळी उपस्थित असतात व खाऊ गोळा करून खातात.
- वैशिष्ट्य
सांस्कृतिकदृष्टया या सणाचे फार महत्त्व आहे. लोक एकमेकांना तिळगूळ देतात व ‘तिळगुळ घ्या – गोड बोला’ असे म्हणतात. आपली जुनी भांडणे-हेवेदावे विसरून, पुन्हा स्नेहाचे, सलोख्याचे संबंध निर्माण करण्यासाठी ही मोठीच संधी असते. ज्यांचे संबंध चांगलेच आहेत, त्यांचे संबंध अधिक दृढ होण्यासाठी याचा उपयोग होतो.
या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवीपुराणातील हा श्लोक पहा.
संक्रांतौ यानि दत्तानि दव्यकव्यानि मानवै:। तानि नित्यं ददात्यर्क: पुनर्जन्मनि जन्मनि।।
(मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसं दान देतात आणि हव्यकव्ये करतात, त्या-त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो)
- खाद्यपदार्थ
तीळ-गुळापासुन बनविलेले विविध पदार्थ – तिळ-गुळाच्या पोळ्या; तिळ-गुळाचे लाडू; तिळ-साखरेच्या रेवड्या; तीळ-साखरेपासुन बनविलेला हलवा
- शुभेच्छापत्र