दिवाळीचा सण म्हणजे सणांची मंदियाळी… लौकिकार्थाने सर्वात मोठ्या प्रमाणावर व अनेक दिवस साजरा केला जाणारा सण म्हणजे दिपावली. दिवाळीतील प्रत्येक दिवसाला स्वत:चे महत्त्व आहे. प्रत्येक दिवसाची एक स्वत:ची खासियत आहे. या दिवसात मराठी लोकांमध्ये उत्साह व चैतन्य भरलेले असते.

दीपावली –

  • धनत्रयोदशी

दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे धनत्रयोदशी.

  • तिथी : आश्विन वद्य त्रयोदशी)
  • पार्श्वभूमी : एकदा यमराजाने आपल्या दूतास प्रश्न केला की ,”लोकांचे प्राण हरण करण्याचे काम करीत असता तुम्हास कोणाची दया आली होती काय?” त्यावर दूतांनी उत्तर दिले ,”एकदा इंद्रप्रस्थ शहराचा राजा हंस हा मृगयेकरता रानात फिरत असता भूक, तहान व श्रम यांनी व्याकूळ झाला . अशी स्थिती आल्यावर शोध करीत तो हैम नावाच्या राजाकडे गेला. हैम राजाने त्याचे उत्तम स्वागत केले. हैम राजा त्यावेळेस पुत्रसंतती प्राप्त झाल्यामुळे आनंदात होता त्या दिवशी त्याच्या घरी षष्ठी पूजन असल्यामुळे षष्टी देवी स्त्री रूपाने प्रगट झाली व राजास म्हणाली की ” या मुलाचे लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी हा सर्प दंश होऊन मरण पावेल !” हे शब्द ऐकून राजास फार वाईट वाटले व आलेल्या हंस राजासही परम दु:ख झाले. त्याने त्या मुलाचा अपमृत्यू टाळण्याकरिता पुष्कळ प्रयत्न केले. शेवटी एका सरोवरात मधोमध एक खांब पुरून , त्यावर एक बंगला बांधून त्यात त्या मुलाला ठेवले ;परंतु देवीने सांगितल्याप्रमाणे त्या मुलाचे लग्न झाल्यानंतर चौथ्या दिवशी त्याला सर्पदंश होऊन तो मरण पावला. हे यमराज या वेळेस त्या मुलाचे प्राण हरण करते वेळी आम्हास दया आली. असा प्रसंग कोणावरही येऊ नये , असे जर आपण कराल तर लोकांवर फारच उपकार होतील.” हे दुतांचे भाषण श्रवण करून यमराजाने सांगितले की ” अश्विन वद्य १३ पासून पाच दिवस जो दिवे लावील त्यास केंव्हाही अपमृत्यू येणार नाही. त्यामुळेच धनत्रयोदशीपासून घरोघरी दिवे, पणत्या लावायला सुरूवात होते.
  • कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रमंथनापासून आयुर्वेदाचे जनक भगवान धन्वंतरी अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यांनी देवांना अमृत देऊन अमर केले. धनत्रयोदशीच्या दिवशी दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी धन्वंतरीची पूजा केली जाते. याच दिवशी यमाचीही पूजा केली जाते.
  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत : भगवान धन्वंतरीची पूजा केली जाते. घरात नवीन झाडू किंवा सूप खरेदी करून त्याची पूजा करण्याचा प्रघात आहे.
  • सायंकाळी दीप प्रज्वलन करून घर आणि दुकानाची पूजा करावी तसेच मंदिर, गोशाळा, घाट, विहीर, तलाव, बागेत दिवा लावावा.
  • तांबे, पितळ, चांदीच्या गृहोपयोगी वस्तू व आभूषणाची खरेदी धनत्रयोदशीस करण्याची पद्धत आहे.
  • आयुर्वेदाचा देव धन्वंतरी असल्याकारणे वैद्यांमध्ये या दिवसाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

दीपावली –

  • नरक चतुर्दशी
  • तिथी : अश्विन वद्य चतुर्दशी
  • पार्श्वभूमी : नरकासुर या नावाचा दैत्य फार बलिष्ठ झाला होता. त्याने सर्व मानव,राजांस जिंकले होते ;इतकेच नव्हे तर इंद्राची छत्रचामरेसुद्धा त्याने हिरावून घेतली होती. त्यामुळे तो सर्वांस अजिंक्य झाला होता. हे वर्तमान श्रीकृष्णाला समजताच त्याने आपली स्त्री सत्यभामा हिला बरोबर घेऊन, तिच्या हातांनी त्याचा अश्विन वद्य चतुर्दशीस तीन प्रहर रात्रीस चंद्रोदयी वध करविला. नंतर श्रीकृष्ण चतुर्दशीच्या दिवशी पहाटेस आपल्या स्त्री सह परत नगरास आला. त्या वेळेस सर्व लोकांनी त्याला स्नान घालून , स्त्रियांनी दिवे ओवाळले व जिकडे तिकडे आनंदी आनंद झाला. त्या युद्धाची आठवण म्हणून हा दिवस पाळण्यात येतो.

या दिवसाच्या संदर्भात अजुन एक अख्यायिका प्रचलित आहे ती अशी, श्रीविष्णूने वामनावतार घेऊन बळी राजास पाताळी दडपिले तो हाच दिवस होय. बळीराजाची निष्ठा व उदारपणा पाहून श्रीविष्णू प्रसन्न झाले व “वर माग!” असे म्हणाले. त्यावेळेस बळी राजाने ” तीन अहोरात्र माझे राज्य असो ” असा वर मागितला. शिवाय या दिवसात जे लोक आपल्या घरी दिवे लावतील त्यांच्या घरी लक्ष्मी नेहमी वास करो व नरकाचे ठिकाणी जे लोक दिवे लावतील त्यांच्या पितरांचा नरकापासून उद्धार होवो!” असेही वरदान मागून घेतले. तेंव्हा पासून हि चाल पडली असावी.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत : सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात. स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. डाव्या पायाने नरकासूर म्हणून कारंटे फोडावे स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी देवाची पूजा देखील सूर्योदयोपूर्वी करतात. देवपूजेत सुगंधी अत्तरांचा वापर करण्याचा प्रघात आहे. सर्वत्र समृध्दी व्हावी याकरितां पहाटेच पणत्या  लावण्याची प्रथा आहे. स्नानानंतर घरातील सर्व मंडळी फराळ करतात. फराळाच्या पदार्थांमध्ये चकली, चिवडा, लाडू, शंकरपाळे, अनरसे, चिरोटे इ. पदार्थ प्रामुख्याने असतात. दिवस आनंदात घालवुन सायंकाळी फटाके वाजविण्याची परंपरा आहे.

दीपावली –

  • लक्ष्मीपूजन
  • तिथी : अश्विन वद्य चतुर्दशी
  • पार्श्वभूमी : लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी पौराणिक कथा आहे. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्माfनष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.
  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत : प्रातःकाळी मंगलस्नान करून देवपूजा, दुपारी पार्वणश्राद्ध अन् ब्राह्मणभोजन आणि प्रदोषकाळी लतापल्लवींनी सुशोभित केलेल्या मंडपात लक्ष्मी, श्रीविष्णु इत्यादी देवता आणि कुबेर यांची पूजा करण्याची प्रथा आहे.

लक्ष्मीपूजन करतांना एका चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. काही ठिकाणी कलशावर ताम्हण ठेवून त्यावर लक्ष्मीच्या मूर्तीची स्थापना करतात. लक्ष्मीजवळच कलशावर कुबेराची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर लक्ष्मी आदी देवतांना लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाच्या खव्याचा नैवेद्य दाखवतात. धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर ते आप्तेष्टांना वाटतात. मग हातातील चुडीने पितृमार्गदर्शन करतात. ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात. आश्विन अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी योग्य असे स्थान शोधू लागते. जेथे चारित्र्यवान, कर्तव्यदक्ष, संयमी, धर्मानिष्ठ, देवभक्त आणि क्षमाशील पुरुष आणि गुणवती आणि पतीव्रता स्त्रिया असतात, त्या घरी वास्तव्य करणे लक्ष्मीला आवडते.

  • वैशिष्ट्य : सामान्यतः अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य !
  • लक्ष्मीपूजनास केर काढण्याची प्रथा आहे. मध्यरात्री नवीन केरसुणीने घरातील केर सुपात भरून तो बाहेर टाकावा, अशी प्रथा आहे. याला ‘अलक्ष्मी (कचरा, दारिद्र्य) निःसारण’ म्हणतात. एरव्ही कधीही रात्री घर झाडणे वा केर टाकणे करायचे नसते. फक्त या रात्री ते करायचे असते. कचरा काढतांना सुपे आणि दिमडी वाजवूनही अलक्ष्मीला हाकलून लावतात.
  • शुभेच्छापत्र

दीपावली –

  • बलिप्रतीपदा
  • तिथी : कार्तिक शुद्ध प्रतिपदा ( दिवाळी पाडवा )
  • पार्श्वभूमी : बलिराजा हा अत्यंत दानशूर होता. दारी येणारा अतिथी जे मागेल ते त्याला तो दान देत असे. दान देणे हा गुण आहे, पण गुणांचा अतिरेक हा दोषार्हच असतो. कोणाला काय, केव्हा व कोठे द्यावे याचा निश्चित विचार आहे व तो शास्त्रात व गीतेने सांगितला आहे. सत्पात्री दान द्यावे. अपात्री देऊ नये. पण बलिराजा कोणालाही केव्हाही जे मागेल ते देत असे. अपात्र माणसांच्या हाती संपत्ती गेल्याने ते मदोन्मत होऊन वाटेल तसे वागू लागतात. तेव्हा भगवान विष्णूने मुंजा मुलाचा अवतार घेतला. वामन म्हणजे लहान मुंजा मुलगा असतो व तो ओम भवति भिक्षां देही। म्हणजे भिक्षा द्या असे म्हणतो. विष्णूने वामनावतार घेतला व बलीराजाकडे जाऊन भिक्षा मागितल्यावर त्याने विचारले, काय हवे? तेव्हा वामनाने त्रिपाद भूमिदान मागितले. वामन कोण आहे व या दानामुळे काय होणार याचे ज्ञान नसल्याने बलिराजने त्रिपाद भूमी या वामनाला दान दिली. त्याबरोबर या वामनाने विराट रूप धारण करून एका पायाने सर्व पृथ्वी व्यापून टाकली. दुसर्‍या पायाने अं‍तरिक्ष व्यापले व तिसर्‍या पाय कोठे ठेवू असे बलिराजास विचारले, तिसरा पाया आपल्या मस्तकावर ठेवा असे ‍बलिराजा म्हणाला. तेव्हा तिसरा पाय त्याच्या मस्तकावर ठेवून त्याला पाताळात घालावयाचे असे ठरवून वामनाने ‘तुला काही वर मागावयाचा असेल तर माग असे बलिराजास सांगितले. तेव्हा ‘आता पृथ्वीवरील माझे सर्व राज्य संपणार आहे व आपण मला पाताळात घालविणार आहात, तेव्हा तीन पावले टाकण्याने जे सर्व घडले ते पृथ्वीवर प्रतिवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे असा त्याने वर मागितला. ते तीन दिवस म्हणजे आश्वीन कृष्ण चतुर्दशी, आमावस्या व कार्तिक शुद्ध प्रतिपदा याता बलिराज्य असे म्हणतात.
  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत : बलीप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. दुपारी ब्राह्मणभोजन घालतात. या दिवशी पक्वान्नांचे भोजन करतात.
  • या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.
  • वैशिष्ट्य : अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी (दसरा) हे पूर्ण मुहूर्त असून दिवाळी पाडवा हा अर्धा मुहूर्त आहे. साडेतीन मुहुर्तांना ईश्‍वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्त्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकर्मे केली जातात.
  • शुभेच्छापत्र

दीपावली –

  • भाऊबीज
  • तिथी : यमद्वितीया (कार्तिक शुध्द द्वितीया)
  • पार्श्वभूमी : यम हा सूर्यपुत्र आहे. या तिथीला यमामध्ये असणारा तमोगुण अल्प होऊन त्याच्यातील सत्त्व गुण वृद्धींगत होतो. त्यामुळे यमाचे उग्र आणि रौद्र रूप शांत होऊन तो सौम्य बनतो. यमाकडून लयकारी आणि विनाशकारी शक्ती प्रक्षेपित न होता स्थितीच्या कार्यासाठी पूरक असणारी धारिणी अन् पोषिणी या शक्तींचे प्रक्षेपण चालू होते.

या दिवशी यमाचे रूप सौम्य झाल्यामुळे त्याची तारक शक्ती कार्यरत असते. यम हा सूर्यपुत्र असून यमुना ही सूर्यपुत्री आहे. या तिथीला यम आणि यमुना हे भाऊ अन् बहीण एकमेकांना भेटून आनंद साजरा करतात. सूर्याच्या अंशापासून निर्माण झालेल्या यम आणि यमुना या दैवी शक्तींची सात्त्विक भेट प्रथम भूलोकात (पृथ्वीवर) होते अन् त्यानंतर ते माता-पिता सूर्यदेव आणि संध्या यांना भेटण्यासाठी सूर्यलोकात जातात. त्यामुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणार्‍या सूर्याच्या सत्त्वप्रधान तेजोलहरी आणि मंगलकारी शक्ती ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर भाऊबीज साजरी केली जाते.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत : भावाला तेल-उटणे लावून अंघोळ घालावी. बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. भाऊ आपल्या ऐपतीनुसार तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्रालाच भाऊ समजून ओवाळते.
  • वैशिष्ट्य : अपमृत्यू निवारणार्थ ‘श्री यमधर्मप्रीत्यर्थं यमतर्पणं करिष्ये ।’ असा संकल्प करून यमाच्या चौदा नावांनी तर्पण करण्याची प्रथा आहे. हा विधी पंचांगात दिलेला असतो. याच दिवशी यमाला दीपदान कराण्याची देखील पद्धत आहे. यम ही मृत्यू आणि धर्म यांची देवता आहे.
  • शुभेच्छापत्र

दिवाळीमध्ये रोज सणानुरुप मिष्टान्नाचे भोजन करण्याची प्रथा आहेच, परंतु दिवाळीचे वैशिष्ट्य म्हणजे फराळाचे मराठमोळे पदार्थ… बाजारात वर्षभर हे जिन्नस उपलब्ध असले तरी अस्सल मराठमोळ घर तेच जिथे या पदार्थांच्या तळणीचा वास येतो… घरी बनवलेला फराळ सकाळी अभ्यंगस्नान करुन एकत्र कुटुंबिय व मित्र-परिवारासमवेत गप्पा मारत खाण्याचा दिवाळसणाचा आनंदच हा सण ‘सणांचा राजा’ असल्याची जाणीव करून देतो..

  • खाद्यपदार्थ :

करंज्या; चकल्या; चिरोटे (पाकातले); अनारसे; कडबोळी; साटोर्‍या; शेव; चिवडा; शंकरपाळे ; लाडू