एकदा राजा कृष्णदेव यांच्या आमंत्रणानुसार भक्त पुरंदरदास राजवाड्यात गेले होते. परत जातांना राजाने दोन मुठी भरून तांदूळ त्यांच्या झोळीत टाकत म्हटले, महाराज, या लहानशा भेटीचा स्वीकार करून माझ्यावर कृपा करावी. राजाने त्या तांदळात थोडे हिरे मिसळले होते.
पुरंदरदासांच्या पत्नीने घरी तांदूळ निवडतांना त्यांत काही मौल्यवान रत्ने असल्याचे पाहिले. तिने ती तांदळातून निवडून काढून कचरापेटीत फेकून दिली.
भक्त पुरंदरदास प्रतिदिन राजसभेत जात होते. राजा प्रतिदिन त्यांना हिरे दोन मुठी तांदळात मिसळून द्यायचा; परंतु त्याच्या मनात विचार यायचा, पुरंदरदास धनाच्या लोभापासून मुक्त नाहीत. जर ते मुक्त असते, तर ते पुन्हा भिक्षेसाठी राजसभेत आले नसते.
एके दिवशी राजा पुरंदरदासांना म्हणाला, भक्तराज, लोभ मनुष्याला आध्यात्मिक प्राप्तीपासून दूर करतो. आता तुम्ही स्वतःच स्वतःविषयी विचार करावा.
राजाच्या तोंडून असे ऐकल्यावर भक्त पुरंदरदासांना अतिशय वाईट वाटले. ते दुसर्या दिवशी राजाला आपले घर दाखवायला घेऊन गेले. त्या वेळी पुरंदरदासाची पत्नी थाळीत तांदूळ घेऊन ते निवडत होती. त्या वेळी राजा आणि पुरंदरदासांची पत्नी यांच्यात पुढील संभाषण झाले.
राजा : देवी, तुम्ही काय करत आहात ?
ती (पुरंदरदासाची पत्नी) : महाराज, कोणीतरी भिक्षेत तांदळासह काही मौल्यवान रत्नेही मिसळून आम्हाला देतो. मी त्या दगडांना निवडून वेगळे करत आहे.
राजा : तुम्ही त्यांचे काय करणार ?
ती : घराबाहेरील कचरापेटीत फेकून देईन. आमच्यासाठी या दगडांचे काही मूल्य (किंमत) नाही.
राजाने त्यांना दिलेली ती सर्वच मौल्यवान रत्ने कचरापेटीत पडलेली पाहिली. तेव्हा तो आश्चर्यचकीत झाला आणि त्याने त्या भक्त-दांपत्याच्या चरणी लोटांगण घातले.