टिपरी नृत्य
महाराष्ट्रातील नागरी समाजात टिपरी आणि गोफ नृत्ये लोकप्रिय आहेत. ही नृत्ये विदर्भात कोजागिरी पौर्णिमेला, तर कोकणात गोकुळ – अष्टमीला करतात. या नृत्य-गीतांना कृष्णाच्या रासक्रीडांचा पौराणिक संदर्भ आहे. दक्षिणेकडील ‘पिनल कोलाट्टम्’ आणि गुजरातमधील ‘गोफगुंफन’ या नृत्यप्रकारांशी त्याचे साधर्म्य आढळते. टिपरी नृत्यात नर्तकाच्या हातांत टिपऱ्या आणि पायात चाळ असतात. या नृत्यात सामान्यपणे नर्तकांच्या चार, सहा किंवा आठ अशा जोड्या भाग घेतात. तबल्याच्या व झांजांच्या तालावर ते टिपऱ्या वाजवून गोलाकार फेर धरीत नृत्य करतात. नर्तक गोलाकार फिरत असता आपली टिपरी जोडीदाराच्या टिपरीवर वाजवितो. नृत्याच्या लयीत नर्तक टिपऱ्या कधी डोक्यावर घेऊन, तर कधी गुडघ्याखाली घेऊन वाजवितात. टिपऱ्याचं ठेके व आघात यांत वारंवार फेरबदल करून तसेच गतिमानता साधून नृत्य आकर्षक करता येते. गोफ नृत्यात नर्तकाच्या शिरोभागी, आढ्याच्या केंद्रस्थानापासून रंगीबेरंगी गोफ अधांतरी सोडलेले असतात व प्रत्येक नर्तक आपल्या डाव्या हातात टिपरीबरोबरच गोफाचे एक टोकही धरतो. नृत्याच्या हालचालींमध्ये गोफाची गुंफण आणि सोडवण या क्रिया साधल्या जातात. या नृत्यात पदन्यासांना अधिक प्राधान्य असते. हातातील टिपरीचा ठेका आणि पायातील चाळांचा पदन्यासांबरोबर होणाराध्वनी यांच्यात समयोचित एकात्मता व सुसंवादित्व साधणे आवश्यक असते. या नृत्याला झांजा व ढोलके यांची साथ असते. टिपऱ्यांचा खेळ हा रासक्रीडेतलाच एक प्रकार आहे.
खेळसी टिपऱ्या घाई रे | वाचे हरीनाम गाई रे |
टिपरीस टिपरी चुंकू जाता बाई |
पडसी यमाच्या घाई रे ||१||
सहा चार अठरा गड्यांचा मेळा रे |
एका खेळा दोन्ही गुंतला | यमाजी घालील डोळा रे |2||
वाया खेळ खेळतोसी बाळा रे | सावध होईपाहे डोळा रे |
एका जनार्दनी शरण जाता |
चूकशील कळी काळा रे ||३||
या खेळात दहा – बारा माणसे फेर धरून नाचतात व नाचताना आपल्या डाव्या – उजव्या बाजूच्या नर्तकांच्या टिपरीवर आळीपाळीने आपल्या टिपरीचा आघात करतात. काही ठिकाणी खेळाच्या आरंभी दोन-दोन नर्तक एकमेकांकडे तोंड करून उभे राहतात व परस्परांच्या टिपरीवर आघात करून नाचू लागतात.
१) एक टिपरी घे दुसरीस मार गे,तिसरी घेऊन चौथीला |
पाचवी घेऊन साहवी फिर गे,सातवी बदल ||
२) राधाकृष्ण गे कुंजविहारी, मुरलीधर गोवर्धनधारी |
३) हरीस खेळता आनंद चित्ता हरिगुण गाता,
अघटित रे | धावता धरणी न पुरे ||