नक्षलवाद्यांचे प्राबल्य असलेल्या क्षेत्रात राहून आदिवासींच्या उत्थानासाठी काम करणे हे आव्हान मोठेच. मात्र, डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख या ध्येयवादी दाम्पत्याने गडचिरोलीत आदिवासींमध्ये आत्मभानाची ज्योत पेटविली आणि त्यांच्या सक्षमीकरणाचा मार्ग सुकर केला. आदिवासींच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था स्थापन करणाऱ्या या दाम्पत्याचा कुपोषणाविरोधातील लढा शहरी भागापर्यंत पोहोचला आहे.
महाविद्यालयीन काळात इतर विद्यार्थ्यांप्रमाणे सतीश आणि शुभदा हेसुध्दा तेव्हा जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाने भारावून गेले होते. जयप्रकाशजींच्या नेतृत्वाखालील आंदोलनात तरुणाई मोठय़ा संख्येने सहभागी झाली. मात्र, आंदोलन विघटित होत गेले आणि त्यात सहभागी झालेल्यांनी नव्या दिशा शोधण्यास सुरुवात केली. डॉ. सतीश गोगुलवार यांनी त्यांचे कार्यक्षेत्र म्हणून गडचिरोली जिल्ह्य़ाची निवड केली आणि शुभदा देशमुख यांनी त्यांना सहकार्याचा हात दिला. त्यातून ‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ ही संस्था जन्माला आली.
गडचिरोली जिल्ह्य़ात नक्षलवाद्यांची प्रचंड दहशत होती. ज्या भागात स्थानिकांची भाषा समजत नाही, शहरी माणसांशी त्यांची नाळ जुळत नाही, अशा ठिकाणाहून कामाची सुरुवात खरेतर कठीण होती. गावकऱ्यांशी चर्चा, चर्चेतून त्यांना आपलेसे करणे हा एकमेव पर्याय होता. सुरुवातीला खाणाखुणांच्या आणि मग मोडक्यातोडक्या भाषेतून गावात रात्री गप्पांचे फड रंगायला लागले. त्यातून रोजगार हमी कायद्याचीही त्यांना माहिती नसल्याचे गोगुलवार यांच्या लक्षात आले. पुढे त्यांनी जनप्रबोधन केले. त्यामुळे शेतकरी, शेतमजुरांनाही त्यांच्या हक्काची जाणीव झाली आणि आपले हक्क मिळवण्यासाठी त्यांनी शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले. त्यामुळे डॉक्टरांवर त्यांचा विश्वास बसू लागला. तीच बाब शुभदा देशमुख यांच्याबाबतही. त्यावेळी आदिवासी महिलांनी घराबाहेर पडणे तर दूरच, पण त्यांच्याशी संवाद साधणेसुद्धा कठीण होते. गावांमध्ये महिला मंडळे होती, पण ती नावापुरतीच. त्या महिला मंडळांचा संबंध राजकीय पक्षाशी होता. त्यामुळे त्यांना काहीही कार्यक्रम नव्हते. मग महिलांना एकत्र आणण्यासाठी सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचे निमित्त साधले गेले. हळूहळू त्यांच्याशी कधी मोडक्यातोडक्या भाषेत तर कधी दुभाषीच्या मदतीने संवाद साधला गेला. डॉ. गोगुलवार यांनी जसा पुरुषांच्या रोजगाराचा विषय हाताळत त्यांच्याशी जवळीक निर्माण केली तशीच शुभदा यांनी महिलांना बचतीचे महत्त्व पटवून देण्यास सुरुवात केली. ८०-९० च्या त्या दशकात महाराष्ट्रात फारसे बचत गट नव्हते. पण या ठिकाणी अनेक महिला बचत गट स्थापन झाले. कामाची सुरुवात चांगली झाली, पण खरी कसोटी यानंतर होती.
१९९६ मध्ये महिलांप्रमाणे पुरुषांचेही बचत गट स्थापन करण्यास सुरुवात झाली. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शुक्ला यांनी गटांचे काम पाहिले आणि ‘डॉकरा’ योजना राबवण्याचे ठरवले. जिल्ह्यत ‘डॉकरा’चे गट बनवण्यास त्यांनी सांगितले. १९९६ मध्ये गडचिरोलीत आठ तालुके होते. त्यावेळी एका वर्षांत या ठिकाणी सुमारे १२०० हून अधिक बचत गट तयार झाले. या १२०० पैकी ९० ‘डॉकरा’ बचत गट होते. दरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची बदली झाली आणि नव्या अधिकाऱ्यांनी त्यात फार रुची दाखवली नाही. मात्र, डॉ. सतीश यांनी काम सुरूच ठेवले. तब्बल ६०० बचत गटांशी संस्था जोडली गेली आहे आणि हे गट बँकेशीही जोडलेले आहेत. १९९६ पासून आतापर्यंत या आदिवासींच्या बचतगटांनी चार ते पाच कोटी रुपयांचे कर्ज बँकेतून उचलले आहे आणि त्यातील ९० टक्के कर्ज फेडलेसुद्धा आहे. याआधी कधी बँकेची पायरी न चढलेले, बचत गट म्हणजे काय हे न समजलेले आदिवासी आता इमानेइतबारे हे व्यवहार हाताळू लागले आहेत.
या सर्व घडामोडींमागील उद्देश एकच होता आणि तो म्हणजे आदिवासींचे आर्थिक स्वावलंबनच नव्हे तर त्यांचे आणि विशेषत: महिलांचे सक्षमीकरण. बचत गटांपासून सुरू झालेली ही प्रक्रिया जिल्हा संघटनांपर्यंत जाऊन पोहोचली आहे. बचत गटाच्या माध्यमातून दहा ते बारा वनौषधींची निवड करून त्या वनस्पतीची ओळख, त्याच्या गुणधर्माचे शिक्षण देऊन दहा ते बारा औषधे तयार करण्यात आली आहेत. जंगलातून वनस्पती आणणाऱ्या आदिवासींना त्याचे महत्त्व कळल्याने त्यांनी घराच्या अंगणातच या औषधी वनस्पती लावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकवण्यात आला. प्रत्येक रविवारी असे तब्बल पाच वष्रे हा उपक्रम तिथे चालवला गेला. त्यानंतर वध्र्यातील जमनालाल बजाज महाविद्यालयातसुद्धा हा उपक्रम चालवण्यात आला.
पेसा आणि वनहक्क कायद्याअंतर्गत पहिल्यांदा आदिवासींना त्यांच्या जंगलावरील हक्क मिळाला. गेल्या दहा वर्षांपासून त्यावर काम सुरू आहे. कोरची तालुक्यातील ७० ते ८० टक्के गावांना जंगलाचे मालकी हक्क मिळाले. गेल्या तीन-चार वर्षांत गावकऱ्यांनीच बांबू लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे, तर ८७ ग्रामसभांनी तेंदूपत्ता लिलाव केला आहे. २००० साली त्यांनी कोरची व कुरखेडा तालुक्यात सर्वेक्षण केले तेव्हा जवळजवळ ९५ टक्के अपंगांकडे अपंगत्वाचे प्रमाणपत्र नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. अडचणी, समस्या तर अनेक होत्या आणि हे प्रमाणपत्र नसल्यामुळे कोणत्या सुविधांपासून आपण वंचित आहोत, याची साधी जाण त्यांना नव्हती. त्यामुळे आधी त्यांच्या समस्यांविषयी चर्चा करून डॉ. गोगुलवार यांनी त्यांना एकत्र आणले. गडचिरोली जिल्ह्य़ापासून सुरू झालेले अपंगांसाठीचे काम नंतर चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नागपूर या जिल्ह्यंपर्यंत पोहोचले. गडचिरोली जिल्ह्य़ातील प्रत्येक ग्रामपंचायतीत तीन टक्के विकलांगांसाठीचा निधी आता वापरात येऊ लागला आहे. डॉ. सतीश गोगुलवार व शुभदा देशमुख यांनी त्यांचे परिचय मेळावे घेतले. या मेळाव्यादरम्यान अनेक अपंग बरेच शिकलेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सरकारी नोकरीतील तीन टक्के जागांचा लाभ त्यांना मिळवून देण्यात आला. २०१५ मध्ये त्यांच्यासाठी विविध विषयांचे प्रशिक्षण सुरू केले. आतापर्यंत २७० अपंगांना प्रशिक्षण देण्यात आले असून, १५० जण वेगवेगळ्या उद्योगांत नोकरीला आहेत. काहींना स्वयंरोजगारासाठी सक्षम करण्यात आले आहे. नागपुरातील म्यूर मेमोरियलमध्ये त्यांना दोन महिन्याचे निवासी प्रशिक्षण दिले जाते. इंग्रजी भाषा शिकवण्यापासून तर संगणक तसेच इतर कौशल्यावर आधारित प्रशिक्षण त्यांना दिले जाते. विदर्भासह नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर आदी ठिकाणीही ते चांगल्या नोकऱ्यांवर आहेत. हे काम आणखी पुढे न्यायचे आहे, पण शेवटी प्रश्न पैशाचा आहे. जशीजशी मदत मिळेल तसेतसे काम पुढे जाईल, असे डॉ. गोगुलवार सांगतात.
‘आम्ही आमच्या आरोग्यासाठी’ संस्थेने बालमृत्यू आणि कुपोषणावर २००० सालापासून काम सुरू केले. महिला बचत गटातील कार्यकर्त्यांना नवजात बाळ आणि आईचे संगोपन कसे करायचे, याविषयीचे प्रशिक्षण देण्यात आले. २००० ते २००५ यादरम्यान कोरची तालुक्यातील ३० गावांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. तिथला बालमृत्यूदर ७२ वर होता. प्रशिक्षित कार्यकर्त्यांनी केलेल्या जनजागृतीमुळे तो पाच वर्षांत ३६ वर आला आहे. नागपूरसारख्या शहरातही कुपोषण असल्याचे सर्वेक्षणात आढळले. तेथील बालमृत्यूदर रोखण्याचेही आव्हान आहे.
वनौषधी अभ्यासक्रम
वनौषधी आणायची म्हणजे आदल्या दिवशी झाडांची पूजा करायची आणि नंतर देवाची क्षमा मागून त्या झाडाचा पाला तोडायचा, अशी प्रथा होती. डॉ. सतीश यांनी या वनौषधींचे महत्त्व ओळखत वैदूंसोबत मैत्री केली. वनौषधीची ही परंपरा पुढे न्यायची, असे त्यांनी ठरवले. ते प्रयत्न सफलही ठरले आहेत. आदिवासींनी आता घराच्या अंगणातच या औषधी वनस्पती लावण्यास सुरुवात केली. सुरुवातीला १००० ते १५०० महिलांना वनौषधीचे ज्ञान देण्यात आले. आता भारतातल्या वेगवेगळ्या प्रांतात, राज्यात वनौषध तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. त्याचा एक अभ्यासक्रमसुद्धा तयार करण्यात आला आहे. सुरुवातीला आरमोरी येथील महात्मा गांधी महाविद्यालयात हा अभ्यासक्रम शिकवण्यात आला. प्रत्येक रविवारी असे तब्बल पाच वष्रे हा उपक्रम तिथे चालवला गेला. त्यानंतर वध्र्यातील जमनालाल बजाज महाविद्यालयातसुद्धा हा उपक्रम चालवण्यात आला. आता गडचिरोलीतीलच गोंडवाना विद्यापीठातसुद्धा हा अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधीचा प्रस्ताव आहे. डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख या दाम्पत्याने आदिवासींना जगण्याचा आधार तर मिळवून दिलाच, पण त्याचबरोबर आदिवासींच्या अधिकारासाठी लढाही दिलाविदेशात आयुर्वेदाचा प्रसार होत असताना या आदिवासींच्या पूर्वापार वनौषधांची सांगड त्याच्याशी घालता येऊ शकते, पण शेवटी आर्थिक गणित आड येत असल्याने पुढे जाता येत नाही, अशी खंत डॉ. गोगुलवार व्यक्त करतात.
कुपोषणाच्या समूळ उच्चाटनाची या दाम्पत्याची योजना असून त्यासाठी अर्थसाहाय्याची गरज आहे. या संस्थेने अपंगांनाही स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी उपक्रम आखले आहेत.