बीड शहराजवळील बिंदुसरा धरणासमोर पाली गावाजवळील डोंगरावर दत्ता बारगजे आणि संध्या बारगजे हे दाम्पत्य राहते. त्यांनी स्थापन केलेली ‘इन्फंट इंडिया’ ही संस्था म्हणजे ‘एचआयव्ही’बाधित ७५ मुलांचे कुटुंबच. गेली ११ वर्षे या सुरू असलेल्या या संस्थेचे काम नक्कीच प्रेरणादायी आहे.
दत्ता बारगजे हे शेतकरी कुटुंबातले. त्यांनी वैद्यकीय पदविका शिक्षण पूर्ण केले आणि ते गडचिरोली जिल्ह्यात भामरागडच्या ग्रामीण आरोग्य केंद्रात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून नियुक्त झाले. तेव्हा त्या भागात सामाजिक काम करणारे बाबा आमटे यांच्याशी दत्ता बारगजे यांचा संपर्क आला. सामाजिक कामाची कल्पना तेव्हा त्यांच्या मनात रुजली. वेगळे काम करायचे, ही इच्छा होतीच.
दरम्यान, एके दिवशी एक महिला आली आणि म्हणाली, ‘हा (एचआयव्ही) आजार नशिबी आला; पण त्यात माझा आणि या मुलाचा काय दोष? आता जगणं मुश्कील झालं आहे. या मुलाला शिकवू कोठे आणि कसे?’ दत्ता बारगजे यांनी ते मूल स्वत:च्या घरात आणले आणि सांभाळण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांनंतर दुसरे मूल आले. पुढे संख्या वाढत गेली आणि घरच भरून गेले. हा संसार कसा सांभाळायचा, असा प्रश्न आला आणि ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेचा जन्म झाला. आता स्थिती अशी आहे, की ही संस्था म्हणजे बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या आनंदवनाचा जणू नवा चेहराच झाला आहे.
बीड शहरापासून ११ किलोमीटरवर पाली नावाचे गाव आहे. तेथून दोन किलोमीटर डोंगरावर चढले, की ‘इन्फंट इंडिया’ या संस्थेची इमारत दिसते. दत्ता बारगजे यांना सरकारी नोकरी होती. त्यांच्या पत्नी संध्या यादेखील एका महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून तासिका तत्त्वावर काम करायच्या. सुखी संसारासाठी जे सामान्यपणे आवश्यक असते, ते सारे काही दत्ता बारगजेंकडे होते; पण बाबा आमटेंच्या सान्निध्याने त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. हेमलकसा येथे पाच वर्षे सेवा केल्यानंतर सामाजिक कामाची गरज आणि विचारांची परिपक्वता आली होती. उपेक्षितांसाठी काम करण्याची ऊर्मी आणि ‘बाबां’ना दिलेला शब्द पाळायचा, असे बारगजे यांनी ठरविले.
त्यांची भामरागडहून बीड जिल्हा रुग्णालयात बदली झाली. नव्याने काम उभे करायचे, हा विचार पक्का करूनच त्यांनी नोकरीच्या गावावरून बाडबिस्तरा हलविला. एचआयव्हीग्रस्त बालकांसाठी काम करण्याचे ठरले. संस्थेची नोंदणी करण्यासाठी कोणाला सदस्य करावे, याची शोधमोहीम हाती घ्यावी लागली. कारण नातेवाइकांनी सदस्य होण्यास नकार दिला. बऱ्याच जणांनी बजावले, की असले विचित्र काम करू नका; पण ते डगमगले नाहीत. पत्नी, आई आणि दोन मित्रांच्या मदतीने त्यांनी २००६ साली ‘इन्फंट इंडिया’ची स्थापना केली.
आजसुद्धा आपला समाज अशा मुलांचा स्वीकार करायला मनापासून तयार नाही. अशा मुलांना आवश्यक औषधे, अन्न, निवारा, शिक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे प्रेम आणि वात्सल्य देण्याचे काम ‘इन्फंट इंडिया’ संस्थेच्या माध्यामातून केले जाते.
पण या मुलांना नुसते सांभाळून चालणार नव्हते. त्यांना शिकवायचे कसे, हा प्रश्न उभा राहिला. या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत बसू देण्याला विरोध झाला. शेवटी जिल्हा परिषदेने या मुलांना शिकविण्यासाठी आश्रमातच दोन शिक्षकांची नियुक्ती केली.
‘इन्फंट इंडिया’अंतर्गत आनंदवन, आधार महिलाश्रम, नवजीवन असे प्रकल्प सुरू आहेत. २००६मध्ये ‘आनंदवन’ची सुरुवात झाली. सुरुवातीला आनंदवनात सहा मुले होती. आता त्यांची संख्या ७५पर्यंत गेली आहे. संस्थेत त्यांची काळजी घेतली जाते. त्याद्वारे त्यांना सकस आहार, आवश्यक औषधे, शिक्षण, तसेच उत्तम वातावरण उपलब्ध करून दिले जाते, जेणेकरून त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होऊ शकेल. आधार महिलाश्रमात एड्सग्रस्त मुली आणि महिलांचीही काळजी घेतली जाते. या संस्थेमधील चार मुलींचे कन्यादान योजनेअंतर्गत लग्न करून देण्यात आले आहे. एचआयव्हीग्रस्त महिलांवर ‘एआरटी’ उपचार करून त्यांचे बालक निरोगी जन्माला येण्यासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेत वाढलेली मुले १८ वर्षांची झाली, की त्यांना ‘आयटीआय’चे प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून दिला जातो. बाबा आमटे यांच्या कौशल्य विकास कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांनाही रोजगार निर्मितीचे साधन उपलब्ध करून दिले जाते. ‘एचआयव्ही’बाधित मुलांना योग्य ती औषधे पुरविणे; नियमितपणे ‘सीडी-४’ पेशींची तपासणी करणे आणि नियमितपणे ‘एआरटी’ची औषधे देणे; त्यांच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय करून त्यांच्या शालेय शिक्षणाची व्यवस्था करणे; त्यांच्यामध्ये विविध कौशल्यांचा विकास करणे; निसर्गोपचार आणि योगाच्या साह्याने त्यांच्या प्रकृतीत सुधारणा करणे अशी कितीतरी कार्य संस्थेला पार पाडावी लागतातदरम्यानच्या काळात वातावरण निवळत गेले आणि ज्या पाली गावातील लोकांनी यांना नाकारले होते, तेही आता मदतीसाठी हात पुढे करू लागले आहेत. या सगळ्या कामात दत्ता बारगजे यांच्या मातोश्री गयाबाई आणि संध्या यांचे वडीलही सहभागी झाले आहेत.
संस्थेचा पसारा आता वाढत आहे,. त्यामुळे अधिकाधिक मुलांची सोय करण्यासाठी संस्थेला आता देणाऱ्या हातांची गरज आहे. बारगजे दाम्पत्याला सलाम ठोकूया आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देऊया.