भरपेट आणि मनही तृप्त करणारी…”महिष्मती थाळी”

‘अरे जागा आहेस, की झाला तुझा अजगर…’ या सुप्रसिद्ध साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या एका वाक्याची आम्हाला राहून राहून आठवण येत होती. कारण गुरुवारी दुपारी जेवल्यानंतर आमचा अजगर व्हायची वेळ आली होती. आमचा म्हणजे माझ्यासह आणखी सात जणांचा. (खरं सांगायचं तर माझा अजगर झालाच होता.)  निमित्त होतं ‘हाउसफुल पराठा’ला दिलेल्या भेटीचं. तुम्हालाही हा अनुभव घ्यायचा असेल तर जंगली महाराज रस्त्यावरच्या ‘हाउसफुल पराठा’ इथं एकदा नक्की जावं आणि ‘महिष्मती थाळी’चा आस्वाद घ्यावा. तडस लागेपर्यंत जेवणं म्हणजे काय हे आपल्याला तिथं अनुभवायला मिळतं. स्टार्टर्स, भात, रायता, सॅलड, पापड, अनेक प्रकारचे पराठे, नान, रोट्या, पंजाबी स्वादाच्या भाज्या, भाताचे दोन प्रकार, दोन-तीन प्रकारचे गोड पदार्थ, पतियाळा लस्सी आणि लेमन मोईतो हा ‘महिष्मती’च्या साम्राज्यातील तुफान मेन्यू.

अनेकदा भव्यदिव्य, जम्बो किंवा आकारानं मोठ्ठं असलं म्हणजे उत्तम आणि स्वादिष्ट असतंच असं नाही. पुण्यात किंवा इतरत्र फिरतानाही आपल्याला तसा अनुभव येतो. पण ‘महिष्मती थाळी’ त्याला अपवाद आहे. या थाळीला हाउसफुल पराठा इथं नुकताच प्रारंभ झाला आहे. पूर्वी ‘हाउसफुल’च्या बाहुबली आणि मिनी बाहुबली थाळीनं प्रचंड धुमाकूळ घातला आहे. आता त्या पुढं जाऊन मालक समीर सुर्वे आणि मुख्य शेफ राजू उस्ताद यांनी ‘महिष्मती थाळी’ची निर्मिती केली असून, खवय्यांच्या सेवेसाठी ही थाळी रुजू झाली आहे. अस्मादिकांचे मित्र आणि ‘लवंगी मिरची’ या यूट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा विश्वनाथ अनंत गरूड यांच्या पुढाकारातून आम्हाला महिष्मती साम्राज्याच्या सफरीवर जाण्याची संधी मिळाली.

फक्त मी एकटाच नाही, तर माझ्यासह एकूण आठ जणांनी महिष्मती साम्राज्याची सफर केली. ‘लवंगी मिरची’चे सर्वेसर्वा आणि सोशल मीडिया विषयातील तज्ज्ञ विश्वनाथ गरूड, खाद्यउद्योजक नि खवय्ये निकेत देसाई, साने गुरुजी तरुण मंडळाची शान विजय शामराव गायकवाड, सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि बाळूमामाचे भक्त सुमीत पांढरे, ‘भारत दुग्धालय’चे भागीदार नि अस्मादिकांचे चुलत बंधू शिरीष चांदोरकर, माझा जिवलग मित्र नि करसल्लागार कमलेश पाठक आणि एमआयटीमधील प्राध्यापक तसेच राजकीय विश्लेषक प्रा. महेश साने अशी आगळीवेगळी मैफल या निमित्ताने जमून आली. खरं तर त्यासाठी विश्वनाथचे आभारच मानायला हवेत. गणेश फडके आणि अमित पांढरे यांना आम्ही खरंच मिस केलं.

img-20181122-wa0023.jpg

साधारण दीडच्या सुमारास आम्ही महिष्मती साम्राज्यात पोहोचलो. महिष्मती थाळीचा आस्वाद घेतल्यानंतर मन प्रसन्न होतंच. पण ते साम्राज्य उभं राहताना म्हणजेच थाळी सजविताना पाहणं देखील मनाला मोहून घेतं. एका भव्य थाळीमध्ये अनेक पदार्थ एकाचवेळी पद्धतशीरपणे ठेवले जात असतात. थाळी सजविलेली असेल आणि पदार्थांची मांडणी उत्तम असेल तर ते दृष्य पाहूनच माणूस क्षुधाशांतीच्या वाटेवर मार्गस्थ होतो. याची या ठिकाणी पक्की जाणीव होते. सर्व थाळी तयार करायला साधारण अर्धा तास आणि त्याची मांडणी करायला पंधरा मिनिटं असा साधारण चाळीस-पंचेचाळीस मिनिटांचा कालावधी धरून चालायचा. कारण इथं काहीही तयार करून ठेवलेलं नसतं. सर्व काही ऑर्डर दिल्यानंतर तयार होतं. त्यामुळं थाळीतील सर्व पदार्थ गर्रमागर्रम असेच असतात.

‘हाउसफुल पराठा’चे मुख्य शेफ राजू उस्ताद यांनी अनेक वर्षे शाहजीज पराठा हाऊस येथे काम केलं आहे. त्यामुळं पदार्थ स्वादिष्ट असणार हे ओघानं आलंच. एकेका पदार्थांचा आस्वाद घेऊ लागल्यानंतर राजू उस्ताद हे फक्त नावाचे नाही तर खरोखरचे उस्ताद आहेत, हे मनोमन पटतं. सध्या आपण नंतर जेवतो आणि आपल्या मोबाईलला सर्वप्रथम शांत करतो. इथंही तसंच होतं. थाळी समोर आल्यानंतर सर्व जण पहिले फोटो काढण्यात मग्न होतात. फोटो काढून मन भरल्यानंतर मग वेटर्स प्रत्येकाच्या थाळीमध्ये भाज्या, पराठे, रोटी आणि नान यांचं वाढप सुरू करतात. ते थाळी संपेपर्यंत सुरू राहतं.

‘महिष्मती’च्या साम्राज्यात पाच प्रकारचे पराठे आहेत. पाच प्रकारच्या तंदूर रोटी आहेत. नान आहेत. आठ प्रकारच्या भाज्या आहेत. जेवताना त्यांचं वैविध्य जाणवतं आणि लक्ष देऊन खाल्लं तर प्रत्येकाचा स्वाद आणि प्रिपरेशन देखील समजून येतं. स्वीट कॉर्न, मटार (नसेल तर हिरवा वाटाणा), काजू आणि काबुली चणे यांच्यापासून बनविलेला ‘देवसेना पराठा’, गाजर, फ्लॉवर, मटार आणि राजमा यांच्यापासून तयार केलेला ‘व्हेज दिल्लीवाला’, स्वीटकॉर्न-चीज पराठा, आलू मेथी पराठा आणि तंदूरमध्ये रोस्ट केलेला पनीर टिक्का मसाला पराठा.

IMG_20181122_134946215

तंदूर रोटी आणि नानचंही वैविध्य थाळीमध्ये पहायला मिळतं. पहिली मिस्सी रोटी. गव्हाचं पीठ, बेसन, मेथी, कांदा, लसूण आणि कोथिंबीर यांच्यापासून ही रोटी बनवितात. प्लेन रोटी, बटर रोटी, बटर नान, पालक रोटी, तंदुरी पराठा आणि चुरचूर नान. सर्व पराठे आणि रोट्या गरमगरम सर्व्ह करण्यात येतात. शिवाय पराठ्यांमधील स्टफिंग अगदी शेवटपर्यंत पोहोचलेलं असतं. त्यामुळं संपूर्ण पराठा पाहाता पाहता फस्त होतो.

‘हाऊसफुल पराठा’मध्ये पंजाबी भाज्या आणि पराठे ‘आला कार्ड’ नुसारही मिळतात. त्यामुळं तिथं मिळणाऱ्या वेगवेगळ्या पंजाबी भाज्यांचा ‘महिष्मती थाळी’मध्ये समावेश असतो. आम्ही गेलो तेव्हा लाल ग्रेव्हीमधील पनीर चटाकेदार, व्हेज बेबीसाल, ग्रीनपीज, मेथी मटर मलई, दाल मखनी, काला चना अर्थात, मसाला छोले, मिक्स व्हेज अशा भाज्या थाळीमध्ये होत्या. शिवाय बूंदी रायता, सॅलड, पापड वगैरे ऐवज अर्थातच होता.

बाहुबली थाळीमध्ये एकच मोठा पराठा असतो. आणि भाज्या लहानशा वाटीमध्ये येतात. मात्र, ‘महिष्मती थाळी’मध्ये पराठे, नान आणि रोट्या यांचं बरंच वैविध्य आहे. शिवाय सर्व भाज्या बऱ्यापैकी मोठ्या भांड्यांमध्ये असतात. म्हणजे आठ जणांना थोड्या प्रमाणात का होईना त्या निश्चितच सर्व्ह होतात. पराठे आणि भाज्या यांचा भरपेट आस्वाद घेतला. अर्थातच, आमची लढाई अजूनही संपलेली नव्हती. किटपीट राईस आणि कटप्पा बिर्याणी हे भाताचे प्रकार सर्वांची वाट पाहत होते. प्रत्येकाच्या वाट्याला भात येतो. अगदी थोडाच येतो. पण तो तेवढाच पुरेसा असतो. अधिक जाऊच शकत नाही. त्यानंतर ओढ असते ती गुलाबजाम, मूग हलवा आणि गाजर हलवा यांची. तीनही पदार्थ एकदम अप्रतिम. गुलाबजाम आणि मूग हलवा यांच्यात कदाचित पहिल्या क्रमांकासाठी स्पर्धा लागू शकते इतके जबरदस्त.

पतियाळा ग्लासमधील स्वीट लस्सी आणि लेमन मोईतो यांचा आस्वाद कसा आणि कधी घ्यायचा हे ज्याचं त्यानं ठरवायचं. पण लेमन मोईतो सर्व जेवण संपल्यानंतर घेतलं तर उत्तम. सोडा, पुदिना नि लिंबू असल्यामुळं पाचक म्हणून ते निश्चितच उपयुक्त ठरतं. लस्सी जेवण्यापूर्वी किंवा जेवताना घेणं उत्तम. अशा प्रकारे ‘महिष्मती थाळी’मधील ९९ टक्के पदार्थ आम्ही सर्वांनी संपविले. थोडीशी बिर्याणी उरली. त्याबद्दल थोडं वाईट वाटलं. पण पुढील वेळेपासून काळजी घेण्यात येईल.

आणखी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे ‘महिष्मती थाळी’ संपविणं हे खरोखर एकप्रकारचं चॅलेंज आहे. अस्मादिक आणि अस्मादिकांचे बहुतांश मित्र हे ‘खाऊन माजा पण टाकून माजू नका’ या संप्रदायातील असल्याने ‘महिष्मती थाळी’ संपविण्याची जबाबदारी आमच्यावर ओघानं आलीच होती. ती आम्ही सार्थपणे पार पाडली. सर्वच जण ‘वढ’ गँगचे सदस्य असल्यानं आठ जणांमध्येच थाळी साफसूफ झाली. पण मोजून मापून खाणारे (किंवा खाणाऱ्या) असतील तर दहा ते बारा जाणांनाही ही थाळी नक्की पुरेल. रेटून खाणारे असतील तर सात-आठ जणही चालतील.

ही थाळी घरपोच किंवा ऑफिसात पार्सल मिळण्याचीही सुविधा उपलब्ध आहेच. पण तिथं जाऊन तिथल्या माहोलमध्ये शांतपणे हळूहळू ‘महिष्मती साम्राज्या’ची सफर कऱणं कधीही उत्तम. घाईघाईत किंवा जाताजाता उरकण्याचे हे काम नाही. प्रत्येक पदार्थाला न्याय देता आला पाहिजे. तो तिथं गेल्यानंतरच देता येणं अधिक शक्य आहे. ‘हाउसफुल पराठा’चं व्यवस्थापन बाहेरच्या केटरिंगच्या ऑर्डर्स वगैरेही स्वीकारतात.

‘हाउसफुल्ल पराठा’च्या ‘महिष्मती साम्राज्या’ची सफर भरपेट आहेच. भरपेट म्हणजे एकदम हाउसफुल्ल… पोट तर भरतच पण मन देखील तृप्त होतं. अगदी मनोमन तृप्त… पोटाबरोबरच मन देखील हाउसफुल्ल तृप्त होण्याचा अनुभव हेच ‘हाउसफुल्ल पराठा’तील ‘महिष्मती साम्राज्या’चं यश म्हटलं पाहिजे.

             आशिष चांदोरकर, पत्रकार,ब्लॉगर

                http://ashishchandorkar.blogspot.com/

courtesy-House Full Paratha
J. M. Road, Pune
7775933577 / 7775999616