उपेक्षितांच्या जगण्यासाठी धडपडणारा फळणीकरांचा ‘आपलं घर’ हा प्रकल्प पुण्यात वारजे व डोणजे अशा दोन ठिकाणी समर्थपणे उभा आहे. डोणज्याची जागा तर हिरव्यागार डोंगररांगांच्या मधोमध अगदी निसर्गाच्या कुशीत आहे. इथे अनाथाश्रम, वृद्धाश्रम, ग्रामीण भागातील दहावी व बारावी नापास मुलांसाठी औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, हॉस्पिटल व फिरता दवाखाना असे एकूण पाच उपक्रम (सर्व विनामूल्य) चालतात. सगळ्या कौलारू बैठय़ा इमारती, पाठच्या उतारावर आंबा, नारळ, चिकू, डाळींब यांसह फुलझाडं, भाजीपाला यांची निगुतीने केलेली लागवड. प्रवेशद्वाराशी गणपतीचं लहानसं देऊळ. मागच्या बाजूला भरभक्कम विहीर ज्यामध्ये सर्व छतांवर पडणारं पावसाचं पाणी गाळून सोडण्याची व्यवस्था. धुण्याभांडयाचे पाणीही प्रक्रिया करून बागेला घालण्याची सोय. बोअरचं पाणी पिण्यायोग्य करण्यासाठी फिल्टरेशन युनिट. हा देखणा आराखडा केवळ मॅटिकपर्यंत शिकलेल्या फळणीकरांनी बनवलाय यावर विश्वासच बसत नाही.
गोरगरिबांसाठी एक पैसाही न घेता (जेवणासह) चालवल्या जाणाऱ्या इथल्या रुग्णालयामधील सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, स्त्री- पुरुष रुग्णांसाठी वेगवेगळे वार्ड्स, प्रसूतिगृह, ईसीजी व डिजिटल एक्स-रेची सोय, दंत विभाग व नेत्र चिकित्सा अशा सुविधा अचंबित करणाऱ्या आहेत. शिवाय ‘आपलं घर’ची अद्ययावत मोबाइल मेडिकल व्हॅन डोक्यावर सोलर पॅनल घेऊन दररोज अतिदुर्गम खेडय़ांमध्ये जात असते. सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे हा संपूर्ण परिसर त्यांनी कमालीचा स्वच्छ राखलाय. इथल्या मुलांची आनंदी व निरोगी देहबोली पाहून यांना अनाथ म्हणून कमनशिबी म्हणावं की इथे राहतात म्हणून भाग्यवान, असा मला प्रश्न पडला! केवळ तिथे राहणाऱ्यांनाच नव्हे तर भेटायला येणाऱ्या प्रत्येकाला आपलंसं वाटावं असंच हे ‘आपलं घर’ आहे.आपलं सर्वस्व पणाला लावून अनाथांसाठी आपलं घर उभारणाऱ्या फळणीकरांच्या जीवनावर एखादा चित्रपट सहज निघू शकेल! खरं तर नागपूरच्या एका संपन्न घरात त्यांचा जन्म झाला, पण वडिलांच्या आकस्मिक मृत्यूने नशिबाचे फासे फिरले आणि न शिकलेल्या आईवर चार घरची भांडी घासून कुटुंबाचं पोट भरण्याची पाळी आली. गरिबीला त्रासलेल्या नऊ-दहा वर्षांच्या विजयला, शाळेतील मित्रांच्या गप्पांतून कधी तरी ऐकलेली झगमगती मुंबई खुणावू लागली आणि एक दिवस त्याने हिय्या करून घर सोडलं. खिशात एकुलती एक दहा रुपयांची नोट घेऊन हा मुलगा दादरला उतरला आणि चौपाटीवरील भयानक अनुभव घेत भिरभिरत मुंबादेवीच्या आश्रयाला आला. पहिला दिवस सार्वजनिक नळावरचं पाणी पिऊन ढकलला, पण नंतर प्रबळ भुकेने सदसद्विवेकबुद्धीवर मात केली आणि देवळाच्या पायरीवर भीक मागत त्याचं नवं आयुष्य सुरू झालं. दीड वर्षांत तो पक्का भिकारी बनला, परंतु परमेश्वराच्या मनात काही वेगळंच होतं म्हणून ती घटना घडली. ४२ वर्षांपूर्वीचा तो प्रसंग फळणीकरांच्या डोळ्यांसमोर आजही जसाचा तसा उभा आहे. एका उंचापुऱ्या रुबाबदार गृहस्थांनी दर्शन करून परतताना अगदी अनपेक्षितपणे त्याचा हात पकडला आणि त्याला खेचतच आपल्या गाडीत बसवून पोलिसांमार्फत डोंगरीच्या बालसुधारगृहात नेलं. या देवदूताचं नाव यशवंत रामकृष्ण काळे. डोंगरीच्या बालसुधारगृहाचे ते त्या वेळी प्रमुख होते. त्यांचा परिसस्पर्श झाला आणि विजयच्या आयुष्याचं सोनं झालं. आजही दर गुरूपौर्णिमेला ते कुठेही असले तरी काळे गुरूजींच्या पाया पडायला जातातच.
सातवी पास झाल्यावर सुधारगृहाच्या नियमानुसार विजयला बाहेर पडावं लागलं. त्यानंतर त्याने नागपूरला दिवसा नोकरी आणि रात्री शाळा करत मॅट्रिकचा टप्पा गाठला. त्यानंतर पुणे येथील बालचित्रवाणीत मंच साहाय्यक म्हणून नियुक्ती, मग विवाह, मुलाचा जन्म, आकाशवाणीवरील जाहिरात क्षेत्र या नव्या दालनात प्रवेश आणि नंतर प्रतिमा कम्युनिकेशन नावाचं डॉक्युमेंटरी फिल्म्स, मालिका, जाहिराती इत्यादींची निर्मिती करणारं स्वत:चं ऑफिस अशा स्थैर्याच्या व समृद्धीच्या पायऱ्या तो भराभर चढत गेला. पण दुर्दैव दबा धरून होतंच. सुखाच्या ऐन शिखरावर असताना पुन्हा एकदा दु:खाने गळामिठी मारली. त्यांचा एकुलता एक मुलगा वैभव रक्ताच्या कर्करोगाने तडकाफडकी गेला आणि फळणीकर दाम्पत्य पुरतं कोलमडलं. इतकं की मनात आत्महत्येचे विचार प्रबळ होऊ लागले. त्या दरम्यान वैभवच्या विम्याचे पैसे आले. त्यांच्या मनात आलं या पैशातून रुग्णवाहिका घेतली तर वैभवच्या स्मृतीही चिरंतन राहतील आणि समाजालाही फायदा होईल. हा विचार फळणीकरांनी मित्रांजवळ बोलून दाखवताच तेरा जणांच्या विश्वस्त मंडळाची स्थापना झाली आणि ‘स्व. वैभव फळणीकर मेमोरिअल फाऊंडेशन’ हा ट्रस्ट आकाराला आला (एप्रिल २००२). फळणीकरांचे मित्र पं. सुरेश वाडकर यांनी आपला ‘सुरमयी शाम’ हा कार्यक्रम पुण्यात आयोजित करून ट्रस्टला सव्वापाच लाख रुपये मिळवून दिले आणि सुसज्ज रुग्णवाहिकेद्वारे कामाला सुरुवात झाली.
दिवसा नोकरी अन् रात्री रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर बनून जनतेची चाकरी अशी दुहेरी वाटचाल सुरू झाली तरी मन उदासच होतं. विचार करता करता अनाथ आश्रमाची प्रेरणा मिळाली आणि फळणीकर पती-पत्नींच्या आयुष्याला दिशा मिळाली. स्वत:चे दोन फ्लॅट्स विकून त्यात बायकोच्या दागिन्यांसह होती-नव्हती ती शिल्लक टाकून फळणीकरांनी वारजे येथे दोन गुंठे जमीन खरेदी केली आणि त्यावर बांधकाम होइपर्यंत लगतच छोटंसं घर भाडय़ाने घेऊन ३ ते १० वयोगटांतील १४ मुलांचं ‘आपलं घर’ सुरू झालं

 • पत्रव्यवहारासाठी पत्ता

  Behind Atul Nagar,
  GokulNagar, Varanashi Society,
  Mumbai-Banglore Highway,
  Warje Malwadi,
  Pune – 411058

 • दूरध्वनी

  91-020-20250739

  9922182989

 • ई-मेल

  apalaghar@yahoo.com