अधिकमास (पुरुषोत्तम महिना)
पृथ्वीच्या सूर्याभोवतीच्या भ्रमणामुळे, सूर्य हा बारा राशींमधून प्रवास करत कालचक्राचे एक वर्ष पूर्ण करतो असे भासते, त्यास ३६५ दिवस, ५ तास ४८ मिनिटे आणि साडे ४७ सेकंद लागतात. त्या काळात इंग्रजी(ग्रेगरी) कॅलेंडरवरचे बारा महिने पूर्ण होतात. मात्र, चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्यावर आधारलेले १२ हिंदू चांद्र मास(महिने) मात्र ३५४ दिवसातच म्हणजे ११ दिवस आधीच पूर्ण होतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश आणि कर्नाटकातील चांद्र मास हे अमान्त (अमावस्येला संपणारे) असतात. उत्तरेला ते पौर्णिमान्त असतात. ज्या हिंदू मासात सूर्य एकाही राशीचे संक्रमण करीत नाही, (रास बदलत नाही) तो अधिक मास होय. सौर मास व चांद्र मास यांची सांगड घालण्यासाठी व या अकरा दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात अधिक मासाची व क्षय मासाची योजना करण्यात आलेली आहे. तीन वर्षांत होणारा ३३ दिवसांचा फरक क्षय मास वा अधिक मास टाकून, ही कालगणना सूर्याधारित सौर वर्षाशी जुळवून घेण्यात येते.
सूर्य अश्विनी नक्षत्रापासून निघून नक्षत्र चक्रात भ्रमण करीत पुनश्च त्या ठिकाणी येतो, तेवढ्या काळाला सौर वर्ष असे म्हणतात.
क्रांतिवृत्तात सूर्याच्या पूर्ण प्रदक्षिणेला लागणारा काळ म्हणजे सौर वर्ष होय. हा काळ ३६५ दिवस १५ घटिका २३ पळे या गणिताप्रमाणे ३६५ दिवसांवर आणखी काही काळ असे आता सूक्ष्म वेधांनी सिद्ध झाले आहे.
सूर्य आणि चंद्र यांची एकदा युती होण्याच्या वेळे पासून म्हणजे एका अमावास्येपासून पुन: अशी युती होईपर्यंत म्हणजे त्यापुढच्या अमावास्येपर्यंतचा काळ तो चांद्रमास होय.
असे १२ चांद्रमास होण्याला होण्याला जो काळ लागतो ते चंद्रवर्ष. हा काळ ३५४ दिवसांचा असतो. पावणे तीन वर्षांनी एकदा अधीकमास येतो त्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात.
या अधीक महिन्यात सूर्याचे एका राशीतून दुसर्या राशीत भ्रमण होत नाही. ज्या महिन्यात सूर्य संक्रमण होत नाही त्याला अधीकमास अशी व्याख्या आहे. त्याला पुढच्या नाव देण्यात येते. सूर्याचे भ्रमण होत नसल्याने त्याला मलमास असे म्हणतात. विशिष्ट धार्मिक कृत्यासाठी हा अपवित्र मानतात.
त्या संदर्भात अशी कथा आहे आपल्या प्रत्येक मराठी महिन्यामध्ये एक तरी सण-उत्सव असतो परंतु अधीक महिन्यात काही नसते म्हणून तो महिना श्री विष्णूंना शरण गेला त्यावेळी विष्णूने त्याला श्रीकृष्णाकडे नेले तेव्हा श्रीकृष्णाने त्याला आपले पुरुषोत्तम हे नाव दिले तेव्हापासून अधिकमहिन्याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्याचे महत्व श्रीकृष्णांनी वाढवले तसेच त्याला वरदाने दिली ती अशी- या महिन्यात थोडे जरी तप केले, तरी त्याचे अनंत पुण्यफ़ळ मिळते. तसेच या मासात केलेले व्रत, दान , पूजा अधीक पुण्यदायक आहेत. भक्तांची मनोकामना पूर्ण करून त्याला मोक्षही देतो असा या महिन्याचा महिमा आहे.
पुरुषोत्तम पूजा ही या महिन्यात एक विशेष पूजा आहे. पुरुषोत्तम म्हणजे राधाकृष्ण यांची षोडशोपचार पूजा करावी.
या अधिकमहिन्यात दाने सांगितली आहेत. दीपदान, गोप्रदान इ. त्यामधे अनारशाचे दान हे फ़ारच पुण्यकारक मानलेले आहे.
*या महिन्यात जे पुण्यकर्म आपल्या हातून घडेल त्याला शतपटीने पुण्य मिळेल व सुख, ऎश्वर्य मिळेल असे श्रीकृष्णांनी वचन दिले आहे.
३३ अनारसे कासे धातूच्या भांड्यातून जावयाला देणे.
गाईला महिनाभर नित्य प्रदक्षिणा करावी.
या महिन्यात मीठ, मांसाहार, कांदा, लसूण हे पदार्थ पूर्ण वर्ज्य करावे.
हविष्यान्न सेवन करावे तांदूळ, गहू, साखर, मूग, जव, तीळ, वाटाणे, मुळा, काकडी, केळी, दही, तूप, दूध, चिंच व सुपारी हे हविष्यान्न पदार्थ आहेत.
नित्य श्रीकृष्णाचे पूजन करावे. असे अनेक प्रकार सांगितले आहेत.
या मासात मंगल कार्ये, काम्य व्रते इत्यादींचा त्याग करतात. त्यामुळे या मासास इहलोकात अनेक निर्भत्सनांना सामोरे जावे लागले. त्यामुळे व्यथित होऊन तो मास वैकुंठात विष्णूकडे गाऱ्हाणे घेऊन गेला. विष्णूने त्यास गोकुळात कृष्णाकडे पाठविले. तो कृष्णास शरण गेला. कृष्णाने त्या मासाचे नाव बदलून ‘पुरुषोत्तम मास’ असे ठेविले अशी कथा प्रचलित आहे. या मासात जे श्रद्धाभक्तियुक्त राहून उपासना, कर्मे, व्रते व दाने करतील त्यांना पुण्य मिळेल असेही त्यास वचन दिले.या काळात केलेल्या तीर्थयात्रांनाही हिंदु धर्मात विशेष महत्त्व आहे.