अष्टविनायक

!! अष्टविनायक गणपती स्तोत्र !!
स्वस्ति श्री गणनायाकम गजमुखं मोरेश्वारम सिद्धीदम ।
बल्लाळं मुरुडं विनायक मढं चिंतामणी थेवरम ।।
लेण्यान्द्री गिरीजात्माजम सुवरदम विघ्नेश्वारम ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम ।।

महाराष्ट्रातील ओझर, थेऊर, पाली, महड, मोरगाव, रांजणगाव, लेण्याद्री, सिद्धटेक ही आठ श्रीगणेशाची स्थाने अष्टविनायक म्हणून प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रात गणेशपूजा ही परंपरागत चालत आलेली प्रथा असून अनेक कुटुंबात तो कुलाचार म्हणूनही पाळला जातो. गणेशभक्त जसा गणेशोत्सव पाळतात तसेच माघ महिन्यातील गणेश जन्मोत्सवही अनेक घरात साजरा केला जातो. अष्टविनायकाची यात्रा नियमितपणे करणारे अनेक गणेशभक्त महाराष्ट्रात आहेत. कोणत्याही कार्याच्या प्रारंभी गणेशपूजा करण्याचा महाराष्ट्रात प्रघात आहे. अनेकांचे ते आराध्यदैवत आहे.

अष्टविनायकापैकी ओझर, थेऊर, मोरगाव, रांजणगाव, लेण्याद्री ही गणेशस्थाने पुणे जिल्ह्यात आहेत. पाली व महड ही दोन स्थाने रायगड जिल्ह्यात आहेत तर सिद्धटेक गणेशस्थान अहमदनगर जिल्ह्यात आहे. पर्यटकांसाठी या गणेशस्थानांची थोडक्यात माहिती पुढे दिली आहे.

  • ओझर
विघ्नहर

विघ्नहर

ओझर येथील गणपती ’विघ्नहर’ या नावाने ओळखला जातो. येथील गणेशमूर्ती स्वयंभू व डाव्या सोंडेची असून ती पूर्णाकृती व आसन मांडी घालून बसलेली आहे. गणेश मंदिर पूर्वाभिमुख आहे व त्यासमोर ओळीने तीन सभामंडप आहेत. गाभाऱ्यात पंचायतनातील इतर चार मूर्त्या कोनाड्यात स्थापलेल्या आहेत. देवळाच्या आवारात दीपमाळ आहे.

हे मंदिर अठराव्या शतकातील असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. चिमाजी अप्पाने वसईचा किल्ला जिंकल्यावर या मंदिरावर सोन्याचा कळस चढवला असे म्हणतात. अलीकडेच या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. श्रीमंत बाजीराव पेशवे ये या विघ्नहराचे निस्सीम भक्त होते. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील हे देवस्थान नारायणगावापासून ८ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या काठी आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे
मुंबई-पुणे : १९२ कि.मी. (रेल्वेने) , पुणे-ओझर अंतर ८५ कि.मी.

  • थेऊर
श्रीचिंतामणी

श्रीचिंतामणी

पुणे जिल्ह्यातील व पुणे शहरापासून अगदी नजीक असलेल्या या देवस्थानी असलेला गणपती “श्रीचिंतामणी” या नावाने ओळखला जातो.
थेऊर येथील गणेशमूर्ती स्वयंभू व उजव्या सोंडेची आहे. मंदिराचे महाद्वार उत्तराभिमुख आहे, पण मूर्ती मात्र पूर्वाभिमुख आहे. मंदिराचे आवार प्रशस्त असून सभामंडपही मोठा आहे. देवळाच्या तिन्ही बाजूंना मुळा व मुठा या दोन नद्यांचा वेढा आहे.
पुणे नजीकच्या चिंचवड येथील मोरया गोसावी य तपस्वी पुरुषाने या ठिकाणी गणपतीची उपासना करून सिद्धी प्राप्त केली होती, असा ऐतिहासिक दाखला असून थेऊर येथील मंदिर मात्र मोरया गोसावी यांचे सुपुत्र चिंतामणी देव यांनी बांधले आहे. श्रीमंत माधवराव पेशवे यांना या गणेशस्थानाबद्दल अखेरपावेतो प्रेम वाटत होते. त्यांचा मृत्यूही या मंदिराच्या आसमंतातच झाला.
पुणे-सोलापूर मार्गावर हे स्थान असून पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील लोणी स्टेशनपासून हे स्थान जवळ आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे व लोणी (पुणे-कोल्हापूर रेल्वे मार्गावर)
पुणे-थेऊर अंतर २२.५ कि.मी.,
लोणी-थेऊर अंतर ५ कि.मी.

  • मोरगाव
मयुरेश्वर

मयुरेश्वर

पुणे जिल्ह्यातील मोरगाव या गावी असलेले हे गणेशस्थान मोरेश्वर अथवा ‘मयुरेश्वर’ या नावाने ओळखले जाते. या देवस्थानी असलेली श्रीगणपतीची मूर्तीसुद्धा स्वयंभूच आहे. मूर्ती उकीडवी बसलेली असून डोईवर नागफणा आहे. सोंड मात्र डावीकडची आहे. मंदिर उत्तराभिमुख असून बांधणी चांगली आहे. आवारात दीपमाळ आहे. या मंदिराच्या आवारातूनच कऱ्हा नदी वाहते. मंदिराच्या समोरच्या चौथऱ्यावर भव्य नंदी असून जवळच पाषाणाचा उंदीर आहे.
गाणपत्य संप्रदायाचे हे स्थान म्हणजे आद्यपीठ असून अष्टविनायकात या स्थानाला अग्रस्थान आहे. मोरया गोसावी यांनी या ठिकाणीही तपश्चर्या केली होती व या स्थानाच्या परिसरातील कऱ्हा नदीत त्यांना गणेशमूर्ती प्राप्त झाली होती. पुढे हीच मूर्ती चिंचवडला आणून त्यांनी तिची प्रतिष्ठापना केली.
मोरगाव हे पुणे-सातारा मार्गावर असून पुण्यापासून ते ६४ कि.मी. अंतरावर आहे.
नजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे
पुणे-मोरगाव अंतर ६४ कि.मी.

  • रांजणगाव
श्रीमहागणपती

श्रीमहागणपती

हे देवस्थानही पुणे जिल्ह्यातच असून पुणे-नगर रस्त्यावर आहे. येथील गणपती ’श्रीमहागणपती’ या नावाने प्रसिद्ध आहे. मंदिरात असलेली मूर्ती ही दर्शनी मूर्ती. मूळ मूर्ती मात्र तळघरात दडलेली आहे असा समज असून ती २० हात व १० सोंडी असलेली असावी असा तर्क आहे.

मंदिर पूर्वाभिमुख असून त्यास इंदूरचे सरदार किबे यांनी सभामंडप बांधलेला आहे. गाभारा श्रीमंत माधवराव पेशवे यांनी बांधलेला असून शिंदे, होळकर आदी सरदारांनीही बांधकाम तसेच इनामाच्या स्वरूपात मोठे सहाय्य दिले आहे. पुणे शहरापासून रांजणगाव येथे जाण्यासाठी एस.टी. बसेस उपलब्ध आहेत.

नजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे व उरळी
पुणे-रांजणगाव अंतर ५० कि.मी. , उरळी-रांजणगाव अंतर १६ कि.मी.

  • लेण्याद्री
गिरिजात्मक

गिरिजात्मक

लेण्याद्री हे जिल्ह्यातच असून येथील श्रीगणेशास ‘गिरिजात्मक’ या नावाने संबोधले जाते. येथील मूर्ती इतर स्थानी असलेल्या गणपतींप्रमाणे रेखीव नाही. मंदिरही छोटेखानी आहे.

पुणे-जुन्नर मार्गावर जुन्नरपासून अवघ्या ५-६ कि.मी. अंतरावर कुकडी नदीच्या परिसरात हे स्थान डोंगरावर आहे. हा डोंगर लेण्याद्री डोंगर म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी बौद्धकालीन गुंफा असून या गुफांतच हा गणपती आहे.
मूर्तीच्या दोन्ही बाजूस हनुमान, शंकर अशा काही देवांच्या मूर्त्या आहेत. या ठिकाणी गुंफा असल्याने मंदिराच्या उजव्या बाजूला डोंगरात कोरून काढलेल्या काही ओवऱ्या आहेत. कुकडी नदी ओलांडल्यानंतर मंदिर डोंगरात असल्याने जवळपास २८३ पायऱ्या चढून वर जावे लागते.

नजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे
पुणे-जुन्नर अंतर : ९७ कि.मी.

  • सिध्दटेक
सिद्धिविनायक

सिद्धिविनायक

हे गणेश स्थान अहमदनगर जिल्ह्यात आहे. परंतु ते सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत आहे. दौंड आणि श्रीगोंदा या ठिकाणापासूनही ते जवळ आहे. ‘सिद्धिविनायक’ नावाने येथील गणपती प्रसिद्ध आहे. येथील गणेशमूर्ती स्वयंभू असून ती उजव्या सोंडेची आहे. तिचे रूप गजमुख आहे. मंदिर उत्तराभिमुख असून गाभारा मात्र प्रशस्त आहे. जवळच भीमा नदी असल्याने या नदीच्या परिसरात सुंदर घाट बांधण्यात आले आहेत. जवळच विष्णू, शिवाई महादेव आदी देवांची मंदिरे आहेत.
चिंचवड येथील मोरया गोसावी यांनी या ठिकाणी काही काळ तपश्चर्या केली होती. इथूनच ते पुढे मोरगावास गेले. देवालयाचा गाभारा अहिल्याबाई होळकर यांनी बांधला असून पेशवाईच्या काळात या देवस्थानाची नित्य सेवा केली जात असे. कै. काकासाहेब गाडगीळ यांनी आपल्या मातेच्या स्मरणार्थ येथे एक धर्मशाळा बांधलेली आहे. केडगाव येथील नारायण महाराजांनी येथेच सिध्दी प्राप्त केली असे म्हटले जाते.

नजीकचे रेल्वे स्टेशन : बोरीब्याल (पुणे-सोलापूर रेल्वेमार्ग) , दौंड (पुणे-दौंड मार्ग)
बोरीब्याल-सिध्दटेक अंतर : १२ कि.मी.
दौंड-सिध्दटेक अंतर : १९ कि.मी.
श्रीगोंदा-सिध्दटेक अंतर : ४८ कि.मी.

  • महड
वरदविनायक

वरदविनायक

रायगड जिल्ह्यातील महड या ठिकाणी असलेले हे गणेशस्थान ’वरदविनायक’ या नावाने प्रसिद्ध आहे. मुंबई-पुणे महामार्गावर पनवेल-खोपोली रस्त्यावर खोपोलीच्या अलीकडे सुमारे २ कि.मी. अंतरावर हे देवस्थान आहे. ’मढ’ असेही या स्थानास संबोधले जाते.

दगडी सिंहासनावर बसलेली ही मूर्ती देवस्थानाजवळील तळ्यात तीनशे वर्षापूर्वी पौडकर नामक एका गणेशभक्तास सापडली. त्याने तिची एका दगडी कोनाड्यात स्थापना केली. पुढे बिवलकर नावाच्या भक्ताने या मूर्तीवर मंदिर बांधले (इ.स. १७२५).

मढ येथील मंदिर आता विस्तृत करण्यात आले आहे. सभोवतालचा परिसर सुधारण्यात आला आहे. देवळाला भव्य सभामंडप बांधण्यात आले आहेत. मंदिरात गेल्या शंभर वर्षाहूनही अधिक काळ अखंड नंदादीप तेवत ठेवला आहे. मुंबई-ठाणे या शहरापासून हे स्थान तसे नजीक असल्याने या ठिकाणी भक्तांची सदैव गर्दी असते.

नजीकचे रेल्वे स्टेशन : कर्जत, पनवेल
मुंबई महड अंतर : ८३ कि.मी.

  • पाली
बल्लाळेश्वर

बल्लाळेश्वर

रायगड जिल्ह्यातील खोपोली या शहरापासून हे स्थान जवळ आहे. येथील गणपती ‘बल्लाळेश्वर’ या नावाने प्रसिद्ध आहे.

देवस्थानातील डाव्या सोंडेची गणेशमूर्ती तीन फूट उंच आहे. तिचा आकार थोडा रुंद असून मस्तकाचा भाग थोडासा खोलगट आहे. मंदिराची बांधणी रेखीव असून ते पूर्वाभिमुख आहे. या देवस्थानाच्या मागेच एक स्वयंभू गणपतीचं मंदिर आहे व तेथील गणपती धुंडी विनायक म्हणून ओळखला जातो.

कल्याण श्रेष्ठींचा मुलगा बल्लाळ याच्या उपासनेतून प्रगट झालेला हा गणपती म्हणून त्यास बल्लाळेश्वर असे नाव पडले. सुरुवातीस येथील देऊळ लाकडी होते. १७७० च्या सुमारास मोरोबा दादा फडणीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करवून ते दंगडी बांधकामाने भक्कम केले. देवळातील घंटा पोर्तुगीज बनावटीची असून ती पेशव्यांनी इथे बांधली आहे. पालीपासून जवळच सुधागड आहे. उन्हेरेचे उष्ण पाण्याचे झरेही येथून नजीक आहेत.

नजीकचे रेल्वे स्टेशन : पनवेल, खोपोली
मुंबई-खोपोली अंतर : ९० कि.मी., खोपोली-पाली अंतर : ३८ कि.मी.
मुंबई-गोवा हायवेवरील नागोठणे या गावापासून पाली १३ कि.मी. अंतरावर आहे.

श्री सिद्धिविनायक, अष्टविनायक स्तोत्र

ॐ गं गणपतये नमः॥श्री सिद्धिविनायक नमो नमः॥अष्टविनायक नमो नमः॥
गजाननं भूत गणादिसेवितम्।कपित्थ जम्बूफल चारु भक्षणम्॥
उमासुतं शोकविनाशकारकं।नमामि विघ्नेश्वरपादपंकजम्॥
विघ्नेश्वराय वरदाय शुभप्रियाय।लम्बोदराय विकटाय गजाननाय॥
नागाननाय श्रुतियज्ञविभूषिताय।गौरीसुताय गणनाथ नमो नमस्ते॥
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः।निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
एकदन्तं महाकायं तप्तकाञ्चनसन्निभम्। लम्बोदरं विशालाक्षं वन्देऽहं गणनायकम्॥
सुमुखश्चैकदंतश्च कपिलो गज़कर्णकः।लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो विनायकः॥
धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः।द्वादशैतानि नामानि यः पठेच्छ्रणुयादपि॥
विद्यारंम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा।संग्रामें संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते॥