मूल मतिमंद असले, तरी त्याच्यातही काही सुप्त गुण असतातच. मतिमंदत्वामुळे ‘निरुपयोगी’ असा शिक्का मारून अशा मुलांना दूर न ढकलता त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यातूनच त्यांचे नवे आत्मनिर्भर व्यक्तिमत्त्व तयार करणे हे ध्येय उराशी बाळगून रत्नागिरीतील आविष्कार’ संस्थेने गेल्या २५ वर्षांत अनेक ‘आविष्कार’ घडवले आहेत.

१४ जुलै १९९२ रोजी रत्नागिरी शहरातील शेरे नाका येथील डॉ. शेरे यांच्या घरात प्रौढ मतिमंदांच्या कार्यशाळेत व्यवसाय प्रशिक्षणाला सुरुवात झाली. सुरुवातीला केवळ १३ मुलांना घेऊन कार्यशाळा सुरू झाली. मुलांच्या कुवतीनुसार त्यांचा अभ्यासक्रम डॉ. शेरे आणि शमीन शेरे यांच्या मार्गदर्शनाने बनवण्यात आला. मुले हळूहळू कामात रस घेऊ लागली. मेणबत्त्या तयार करणे, कागदी पिशव्या, पाकिटे, रेक्झिनपासून सहज बनविता येण्यासारख्या पर्स, पिशव्या तयार करणे असे उपक्रम सुरू झाले. नॅशनल ऑलिंपिकसाठी रत्नागिरीतून प्रथमच कार्यशाळेतील विद्यार्थी हरियाणाला गेले. तेथे मुलांनी सुवर्णपदके मिळवली; तसेच सुमय्या पटेल ही विद्यार्थिनी स्पेशल ऑलिंपिकसाठी बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराचे प्रतिनिधित्व करण्यासाठी चीनला जाऊन आली. मूल मतिमंद आहे की नाही, एवढाच अर्थबोध बुद्ध्यांकाद्वारे होतो; पण त्याच्या प्रत्येक क्षमतेमध्ये ते कोणत्या पातळीवर आहे, हे समजून घेऊन त्याचे शिक्षण सुरू करण्याचे आव्हान असते. या विशेष शिक्षणामध्ये विशेष शिक्षक, आवश्यकता भासल्यास भौतिकोपचारतज्ज्ञ, वाचा उपचारतज्ज्ञ अशा सर्वांची मदत लागतेच; परंतु या सर्वांबरोबर पालकांचा सहभागही महत्त्वाचा असतो. पालकांच्या भक्कम पाठिंब्यामुळेच ‘आविष्कार’ची ही खडतर वाटचाल सुकर होण्यास मदत झाली आहे.

‘१४ जुलै १९९२ रोजी स्थापन झालेल्या आविष्कार कार्यशाळेचे २२ एप्रिल २००४ रोजी श्यामराव भिडे असे नामकरण करण्यात आले. गेल्या २५ वर्षांत कार्यशाळेने अनेक विद्यार्थ्यांचे यशस्वी व्यावसायिक पुनर्वसन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून समाजाचा एक उत्पादक घटक बनविले आहे. या प्रगतीच्या जोरावर काही पालकांनी एक पाऊल पुढे टाकून आपल्या पाल्याचा विवाहदेखील लावून दिला आहे आणि त्यांना झालेले अपत्य हे सर्वसामान्य आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण घेत असताना विद्यार्थी मोबाइलचा वापर अगदी सुलभपणे करताना दिसतात. व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियाचा वापर करतात. आपल्या मोबाइलवरून संपर्क साधतात.

‘मतिमंदत्वाच्या क्षेत्रातील संदिग्ध आणि ढोबळ संकल्पना जाऊन मतिमंदत्व असलेल्या व्यक्तीच्या मेंदूच्या विकासात अडथळा ठरणारा कमजोर दुवा शोधून त्यावर उपचारात्मक उपाय करून, त्यांना योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने योग्य वयात शिक्षण दिले, तर ही मुले अविश्वसनीय अशा क्षमतांचे प्रकटीकरण करू शकतात हे दिसून आले आहे.
सर्वांच्याच सामूहिक प्रयत्नांतून अधिक भरीव असे काहीतरी निश्चितपणे घडू शकते. मात्र देणाऱ्या हातांची संख्याही वाढणे तेवढेच गरजेचे आहे. ‘आविष्कार’ने गेली २५ वर्षे यशस्वीपणे चालविलेल्या या कार्याला समाजातील दानशूरांची आणखी साथ मिळणे आवश्यक आहे.

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    E-95, M.I.D.C.-Mirjole, Ratnagiri – 415639
    Maharashtra State, INDIA.

  • दूरध्वनी

    (+91) 02352 – 229517
    (+91) 02352 – 228852
    (+91) 02352 – 325309