बाबासाहेब पुरंदरे


बळवंत मोरेश्वर ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे (जन्म: जुलै २९, इ.स. १९२२ (श्रावण शुद्ध चतुर्थी, शके १८४४)हे मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहासकार आणि वक्ते आहेत.

याचं बहुतांश कार्य हे शिव छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित आहे, यामुळेच त्यांना शिवशाहीर असेही संबोधले जाते. बाबासाहेब जनमानसांना ओळखीचे झाले ते त्यांच्या “जाणता राजा” या शिवरायांच्या आयुष्यावर आधारित नाटका मुळे. जे फक्त महाराष्ट्रातच नाही तर आंध्र प्रदेश व गोवा येथेही प्रसिद्ध आहे. बाबासाहेबांनी शिवरायांसोबतच पुण्याच्या पेशव्यांचाहि गहन अभ्यास केला आहे. बाबासाहेबांनी १९७० च्या काळात माधव देशपांडे व माधव मेहेरे व बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत शिवसेनेचे वरिष्ठ नेत्याच्या भूमिकेत मार्गदर्शन केले. ऑगस्ट १९, २०१५ रोजी बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला.

बाबासाहेब पुरंदरे यांची ‘राजा शिवछत्रपती’ ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आहे. शिवचरित्र म्हणजे पुरंदरे आणि पुरंदरे म्हणजे शिवचरित्र असे एक समिकरणच बनून गेले आहे. अगदी लहान वयातच बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर कथा लिहायला सुरवात केली होती, नंतर या सर्व कथा एकत्रित करून त्या “ठिणग्या” या पुस्तकाच्या रुपात प्रसिद्ध करण्यात आल्या. राजा शिव-छत्रपती, केसरी व नारायणराव पेशवे यांच्या आयुष्यावर लेहिलेले पुस्तक हे त्यांच्या आयुष्यातील प्रसिद्ध लिखाणे आहेत. परंतु १९८५ साली प्रसिद्ध झालेला “जाणता राजा” हा सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय असे नाटक होत, जे शिव-छत्रपतींच्या आयुष्यावर आधारित होत. तेव्हापासून हे नाटक महाराष्ट्रातील १६ जिल्ह्यांमध्ये तसेच आग्रा, दिल्ली, भोपाळ तसेच अमेरिकेतही ८६४ वेळा प्रयोग केला गेला आहे. मूळ प्रत मराठी व नंतर हिंदी मध्येही याचे भाषांतर करण्यात आले. हे नाटक २०० पेक्षा जास्त कलाकारांकारून रंगवले गेले आहे, तसेच यात हत्ती, उंट व घोड्यांचा सुद्धा समावेश होता. दरवषी दिवाळीच्या सुरवातीला याचे प्रयोग केले जातात.नाटक क्षेत्रातील त्यांच्या कारकिर्दीसाठी त्यांना मध्य-प्रदेश सरकार कडून २००७-०८ साली “कालिदास सन्मान” हा पुरस्कार दिला गेला होता

’इतिहास माजघरापर्यंत गेला पाहिजे, पाळणाघरापर्यंत गेला पाहिजे, इतकंच नव्हे तर आमच्या बहिणी, भावजया आणि लेकीसुना गरोदर असतील, तर त्यांच्या गर्भापर्यंत गेला पाहिजे,’ असे म्हणणारे बाबासाहेब हे एकमेवाद्वितीयच! त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. पण तरुणपणापासूनच ते पुण्यातच स्थायिक झाले. पुढे भारत इतिहास संशोधन मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहाससंशोधक ग.ह. खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले व इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली.

पुरंदर्‍यांची दौलत, पुरंदर्‍यांची नौबत, गड-किल्ल्यांची ऐतिहासिक माहिती देणारे साहित्य (गडसंच), शेलारखिंड, व राजा शिवछत्रपती हे बाबासाहेबांचे आजवर प्रकाशित झालेले साहित्य होय. शिवचरित्र हे घरोघरी पोहोचावे हे ध्येय ठेवून बाबासाहेबांनी अथक संशोधनातून व परिश्रमांतून राजा शिवछत्रपती हा ग्रंथ साकार केला. या ग्रंथाच्या १६ आवृत्ती आजपर्यंत सुमारे ५ लाख घरांमध्ये पोहोचल्या आहेत. याचबरोबर फुलवंती व जाणता राजा ही नाटके त्यांनी लिहिली, दिग्दर्शित केली. ‘जाणता राजा’ या महानाट्याचे गेल्या २३ वर्षांत ८०० हून अधिक प्रयोग झाले आहेत व या प्रयोगांच्या माध्यमातून लाखो रुपयांची मदत बाबासाहेबांनी अनेक संस्थांना केली आहे. हे नाटक ५ अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. त्या काळातच ते आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन करीत. शिवाय आपले मेहूणे श्री. ग. माजगावकर यांच्याबरोबर ते ‘माणूस’ मध्येही काम करत होते. ज्येष्ठ इतिहासकार व कादंबरीकार गो. नी. दांडेकरांशी पुढे त्यांची भेट झाली. बाबासाहेब-गोनीदा ही जोडी म्हणजे शिवचरित्राचा वारसा आजच्या पिढीपर्यंत पोहोचवणारे दूतच झाले. ते नेहमी गडांवर एकत्र भटकंती करीत. महाराष्ट्रातील एकही असा किल्ला नाही, जिथे बाबासाहेब पोहोचले नाहीत आणि एकही असे सरदार घराणे नाही, ज्यांच्याशी त्यांचा संपर्क झालेला नाही! शिवचरित्र अभ्यासणारे अनेक अभ्यासक असतात परंतु शिवचरित्र अनुभवणारे, अक्षरश: जगणारे बाबासाहेब एकच! स्वातंत्र्यानंतर लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्ती संग्रामात बाबासाहेब सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सहभागी होते.

आचार्य अत्रे, गो. नी. दांडेकर, पु.ल. देशपांडे, अटलबिहारी वाजपेयी, मंगेशकर कुटुंबीय, ठाकरे कुटुंबीय यांसारख्या दिग्गजांचा सहवास त्यांना लाभला, लाभतो आहे. या सर्वांच्या माध्यमातून,सहकार्यातून त्यांनी शिवचरित्रप्रसारासाठी अनेक उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानांतून, जाणता राजा या महानाट्यातून आजही शिवचरित्र जिवंत होते. ’शिवचरित्र हे व्यक्तिचारित्र्य निर्मितीचा अभ्यासक्रम आहे’ हे त्यांनी आपल्या व्याख्यानांमधून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक पैलू उलगडून दाखवत पटवून दिले.

इतिहासाविषयी अभिमान, सत्यासत्यता तपासण्यासाठीची संशोधक वृत्ती, संयम, चिकाटी, एक प्रकारचा भारावलेपणा -वेडेपणा, स्मरणशक्ती आदी गुणांचा समुच्चय बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये असल्याचे स्पष्टपणे जाणवते. या गुणांसह प्रखर बुद्धिमत्ता, विश्र्लेषण क्षमता आणि प्रेरक इतिहास अभिव्यक्त करण्यासाठीची विलक्षण लेखन-प्रतिभा व वक्तृत्वकला हे गुणविशेषही त्यांच्या व्यक्तिमत्त्वात दिसतात. तसेच सखोल अभ्यासासह, शिस्तबद्धता, वक्तशीरपणा हे त्यांच्या स्वभावाचे खास गुणधर्म. या सर्व गुणांमुळेच ते आज संपूर्ण महाराष्ट्रातील व भारतातील शिवभक्तांच्या गुरुस्थानी आहेत. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक अभ्यासकांची शिवचरित्र अभ्यासाची वाटचाल सुरू झाली आहे.