बाजीराव, दुसरा

(७ जानेवारी १७७५-१४जानेवारी १८५१). मराठी राज्याचा शेवटचा पेशवा. रावबाजी व बाबासाहेब या नावांनीही तो प्रसिद्ध आहे. रघुनाथराव व आनंदीबाई यांचा ज्येष्ठ मुलगा. धार येथे जन्मला. लहानपणी हा हूड व विक्षिप्त होता. सवाई माधवरावाच्या मृत्यूनंतर नाना फडणीसाने पेशव्याच्या गादीवर इतर वारस बसविण्याची खटपट केली; पण ती अयशस्वी होऊन बाजीरावास पेशवेपदावर बसविणे त्यास क्रमप्राप्त झाले. बाजीराव व नाना फडणीस यांचे कधी जमले नाही. अखेर अंतर्गत कारस्थानात बाजीराव यशस्वी झाला. नाना फडणीस प्रथम कैदेत पडले व पुढे लवकरच मरण पावले (१८॰॰). बाजीरावावर शिंदे-होळकरांचे प्रथमपासून वर्चस्व होते. त्यातून सुटण्यासाठी त्याने इंग्रजांबरोबर मानहानीकारक तह केला (डिसेंबर १८॰२). त्यामुळे तो प्राय: परतंत्र झाला. त्याने तैनाती फौजेची अट मान्य केली. त्याला इंग्रजांच्या परवानगीशिवाय इतरांशी संबंध ठेवण्यास सक्त मनाई होती, शिवाय मराठी सरदारांचे संघटन करून त्यांस एकत्र आणणेही अशक्य झाले. या तहाची व इंग्रजांच्या धोरणाची जाण बाजीरावाला होती, असे दितस नाही. इंग्रजांच्या साहाय्याने पटवर्धन, रास्ते या आपल्या बलाढ्य सरदारांचा पाडाव करण्याचा व्यूह त्याने रचला; पण इंग्रज वकील एल्फिन्स्टन याने १८१२ च्या पंढरपूरच्या तहाने तो हाणून पाडला. पेशवा जळफळला आणि इंग्रजांविरुद्ध कटास सुरुवात झाली. बाजीरावाने साताऱ्याला छत्रपतींचा व त्या पदाचा उघड उघड अपमान करून त्या वेळचे छत्रपती प्रतापसिंह यांस प्राय: कैदेत टाकले. या परिस्थितीचा फायदा घेऊन एल्फिन्स्टनने पेशव्यांशी लढाई करताना छत्रपतिपदाची अवलेहलना करणाऱ्या पेशव्यांचे राज्य बुडवावयाचे आहे, असा पवित्रा घेतला. त्यामुळे मंडळावर योग्य तो परिणाम होऊन दुसरा बाजीराव एकाकी पडला आणि अष्टीच्या लढाईत त्याचा पराभव झाला (१८१८). बापू गोखले प्राणपणाने लढला व धारातीर्थी पडला. पुढे इंग्रजांनी बाजीरावास अटक करून ब्रह्मावर्त येथे नेऊन ठेवले. तेथेच तो पुढे मरण पावला (१८५१).दुसऱ्या बाजीरावामध्ये युद्धकौशल्य व धडाडी नव्हती. सुरुवातीपासून तो कारस्थानी व विषयलंपट होता. त्याने पुण्यास असताना सहा लग्ने व पुढे ब्रह्मावर्तास पाच अशी एकूण अकरा लग्ने केली. त्याला तीन मुली व एक मुलगा झाला; पण मुलगा लहानपणीच वारला. पेशवाई बुडाल्यानंतर उर्वरित आयुष्य त्याने धार्मिक कृत्यांत व्यतीत केले.