बल्लारपूर

चंद्रपूर हा विदर्भामधील एक जिल्हा आहे. पूर्वी चांदा म्हणूनही हा जिल्हा ओळखला जात असे. वर्धा नावाची नदी या जिल्ह्यामध्ये साधारण उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते. चंद्रपूरच्या दक्षिणेकडे बल्लारपूर स्टेशन आहे. तसेच बल्लारपूर गाडीमार्गानेही उत्तमपैकी जोडले गेले आहे.

 
चंद्रपूरकडून राजूरा अथवा अलापल्लीकडे जाणारा गाडीरस्ता बल्लारपूरमधून जातो. वर्धा नदीच्या काठावर वसलेले बल्लारपूर शहर कोळसा खाणीमुळेही प्रसिद्ध आहे. इतिहास प्रसिद्ध असलेल्या बल्लारपूर मधे वर्धा नदीच्या काठावर भुईकोट प्रकारचा किल्ला आहे.
 
शहरामधील वस्तीच्या एका बाजुला असलेला किल्ला मुख्य रस्त्यापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. किल्ल्याचे प्रवेश पूर्व दिशेला आहे. प्रवेशद्वारापासून जवळच केशवनाथाचे मंदिर आहे. या मंदिरात सोन्याचा मुलामा दिलेली पण मूळ शिशाची असलेली केशवनाथाची मुर्ती होती. इ. स. १८१८ च्या वेळी झालेल्या युद्धाच्या धामधुमीमध्ये ही मुर्ती चोरीला गेली. तेव्हा भोसल्यांनी तेथे नेमलेल्या कमाविसदार पुंजपाटील मोरे यांनी मंदिराचा जिर्णोद्धार करुन नवीन दगडी मुर्ती बसवली.
 
बल्लारपूर किल्ल्याच्या पहिल्या दारातून आत शिरल्यावर दुसरा दरवाजा लागतो. या दरवाजावर कमळ तसेच सिंहांची शिल्पे आहेत. या दरवाजामधून आत गेल्यावर तटबंदीवर चढण्यासाठी पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या मार्गाने दरवाजाच्या वरही जाता येते. येथील तटबंदीचे बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात येत आहे.
 
साधारण चौकोनी आकाराच्या या किल्ल्यामधील मुख्य वाड्याची वास्तू इंग्रजांनी पाडून टाकली असल्यामुळे हा भाग मातीच्या ढिगार्‍यामधे लुप्त झाला होता. तोही सध्या साफ करण्याचा प्रयत्न चालू आहे. या ढिगार्‍यामधे काही तळघरे दिसतात. तसेच नदीकाठाकडील बांधकाम सुस्थितीमधे असून नदीकडे जाणार्‍या दरवाजात पायर्‍यांचा मार्ग केलेला आहे. या पायर्‍यांनी नदीच्या पात्रापर्यंत जाता येते. या बाजुने तटबंदीची भक्कम बांधणी पहायला मिळते.
 
बल्लारपूरच्या किल्ल्याला तीन बाजुंना प्रवेश मार्ग आहेत. किल्ल्यामध्ये राजवाड्याचे अवशेष, तळघरे, भुयारे, तसेच निरीक्षणासाठी सज्जा अशा वास्तू पहायला मिळतात.
 
बल्लारपूरचा किल्ला आदिया उर्फ अंड्या बल्लाळसिंह या गौड राजाने बांधला. त्याने शिरपूरवरुन आपली राजधानी बल्लारपूर येथे आणल्याचा इतिहास आहे.