शेव भाजी

साहित्य:-

तुरकाटी शेव 1 वाटी
(ही शेव बाजारात मिळते किंवा घरी सोडा न टाकता ही शेव घरी बनवावी)
आलं-लसूण पेस्ट 4 चमचे
भाजलेल्या कांदयाची पेस्ट अर्धी वाटी
हळद, तिखट चवीनुसार
धणे-जीरे पावडर 1-1 चमचा
तमालपत्र 4-5
भाजून वाटलेले सुकं खोबरं पाव वाटी
भिजवलेली खसखस पाव वाटी
काळा मसाला 1 चमचा

कृती:-

खसखस, खोबरं, कांदयाची पेस्ट व आलं-लसूण पेस्ट एकत्र वाटून घ्या. पॅनमधे तेल घेवून त्यात तमालपत्र व वाटलेला मसाला घालून छान परतून घ्या. तेल सुटल्यावर हळद, तिखट, धणे-जीरे पावडर टाकून चांगले परता. थोडे पाणी घाला. चांगले तेल सुटल्यावर त्यात गरम मसाला व चवीनुसार मीठ घालून पुन्हा गरम पाणी घालून उकळा रस्सा थोडा पातळसर ठेवा. भाजी वाढताना त्यामधे वेळेवर शेव घालून वाढा.

यसर आमटी

साहित्य:-

गहू 1 पाव
हरभरा डाळ अर्धा पाव
उडीद डाळ अर्धा पाव
कलमी 10 ग्रॅम
मोठी विलायची 5 ग्रॅम
लवंग 5 ग्रॅम
काळी मिरी 5 ग्रॅम
स्टार फुल 5 ग्रॅम
जायपत्री 5 ग्रॅम
धने 10 ग्रॅम
जीरे 10 ग्रॅम
शहाजीरे 5 ग्रॅम
हळकुंड अर्धा नग
सुकं खोबरं 3 चमचे

कृती:-

गहू आणि हरभ-याची डाळ समप्रमाणात घेऊन मंद आचेवर भाजून दळून घ्या. सर्व मसाल्याचे साहित्य मंद आचेवर थोडया तेलात परतून मिक्सरमधे बारीक करुन घ्या. जेवढे पीठ तेवढा मसाला एकत्र करुन ठेवा. वेळेवर लसूणची फोडणी देऊन आमटी तयार करा.

गोडं वरण –

1 वाटी शिजवलेल्या तुरीच्या डाळीत दोन चमचे गुळ, पाव चमचा हिंग, चवीनुसार मीठ घालून उकळवा. काही लोकं यामध्ये उकळतांना तूप किंवा तेल सुद्धा घालतात.

 फोडणीचं वरण

4 चमचे तेल गरम करुन त्यामध्ये मोहरी घालून फुटल्यावर बारीक चिरलेली 1 चमचा हिरवी मिरची, बारीक चिरलेला अर्धी वाटी कांदा घालून परतून घ्या. नंतर यात पाव चमचा हिंग, चवीनुसार हळद, तिखट घालून पुन्हा परता. नंतर शिजवलेली 2 वाटया तुरीची डाळ, आवश्यकतेनुसार पाणी, आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर किंवा लिंबू घालून उकळी आणा. चवीनुसार मीठ घाला व वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

कळसलेलं गोळा वरण –

कळसलेलं वरण तयार करण्यासाठी थंड झालेलं गोळा वरण म्हणजे शिजवलेली घट्ट अशी तुरीची डाळ हवी. यामध्ये चवीनुसार मीठ घालून एकत्र करतात. त्यावर हिंग, मोहरी, बारीक चिरलेला लसूण, कोथिंबीर याची फोडणी घालतात व थंडच खायला देतात.

तव्यावरचं बेसन

साहित्य –

बेसन 1 वाटी
मोहरी 1 चमचा
हिरवी मिरची 4-5
लसूण 1 चमचा
हळद, तिखट, हिंग चवीनुसार
कोथिंबीर 4 चमचे

कृती –

तव्यावर तेल टाकून मोहरी, बारीक चिरलेली मिरची, लसूण, हळद, हिंग, तिखट घाला. नंतर यात पाणी घालून चवीनुसार मीठ घाला नंतर हळूहळू बेसन सोडा त्याच्या गुठळया झाल्या तरी चालेल. थोडे घट्ट झाल्यावर त्यात कोथिंबीर घालून सव्र्ह करा.

खमंग काकडी

साहित्य –

हिरव्या काकड्या 2 नग
हिरव्या मिरच्या 2 नग
लिंबाचा अर्धा नग
शेंगदाण्याचा कूट 2 टेबलस्पून
ओले खोबरे, खवलेले 2 टेबलस्पून
कोथिंबीर 4 चमचे
साजूक तूप 1 चमचा
जीरे अर्धा चमचा
हिंग पाव चमचा
साखर, मीठ चवीनुसार

कृती –

काकडी धुवून आणि सोलून घ्यावी. काकडीची टोके कापून टाकावी. काकडी थोडी चाखून पहावी, कधीकधी काकडी कडू असते. नंतर काकडी चोचवून घ्यावी किंव्हा बारीक चिरावी. चोचवलेल्या काकडीला थोडे मीठ चोळून ठेवावे. 2-3 मिनिटांनी काकडी पिळावी व त्यातील जास्तीचे पाणी काढून टाकावे. काकडी, शेंगदाण्याचा कूट, ओले खोबरे, कोथिंबीर, मिरची, साखर, लिंबाचा रस व थोडेसे मीठ (मीठ घालताना काळजीपूर्वक घालावे, कारण आधीच काकडीला मीठ लावून ठेवले होते) घालून छान एकत्र करावे. कढल्यात तूप गरम करून त्यात जीरे आणि हिंग घालून फोडणी करावी व काकडीत घालावी. झाली तयार खमंग काकडी.