• तिथी : पौष महिन्यात , हिंदूंच्या ‘संक्रांत’ या सणाच्या आदल्या दिवशी, म्हणजे १३ जानेवारीला भोगी हा सण दरवर्षी साजरा केला जातो.
  • पार्श्वभूमी

मकर संक्रांतीच्या आदल्या दिवसाला भोगी असे म्हणतात. भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. महिला नवीन अलंकार धारण करतात. सासरच्या मुली भोगीचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी या दिवशी माहेरी येतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन भोगीचा आनंदोत्सव साजरा करतात.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत

सकाळी आपले घर तसंच घरासभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंगस्नान करून नवीन कपडे परिधान करतात. स्त्रिया भोगीच्‍या दिवशी नवे अलंकार परिधान करतात. त्या दिवशी सासरी गेलेल्‍या स्त्रिया सणाकरता माहेरी येतात. देवाची व सूर्याची पूजा करुन नैवेद्य दाखवितात. या दिवशी सवाष्णीला जेवायला बोलवतात. तिला तेल, शिकेकाईने नहावयास घालतात. जेवणानंतर विडा, दक्षिणा दिली जाते. घरातील सर्व स्त्रियाही ह्या दिवशी डोक्यावरून पाणी घेऊन स्नान करतात. कुटुंबातील सर्वजण एकत्र येऊन तो सण साजरा करतात.

भोगीला सुगड पुजले जातात. त्‍याकरता सवाष्‍णी स्‍त्रीया बाजारातून पाच छोटी गाडगी व पाच मोठी गाडगी (मातीचे मडके) घेऊन येतात. त्‍यामध्‍ये खिंदाटात टाकलेल्‍या गोष्‍टी कापून भरल्‍या जातात. शहरांमध्‍ये जागेच्‍या अभावी कोणत्‍याही आकाराची केवळ पाच गाडगी आणण्‍याची पद्धत आहे. त्‍या कृतीला काही ठिकाणी ‘वाण पुजणे’ असे म्‍हटले जाते. भोगीला तयार केलेल्‍या सुगडांचा दुस-या दिवशी, मकरसंक्रांतीला ववसा असतो. त्‍यामध्‍ये सवाष्‍णींना घरी बोलावून सुगडामधील पदार्थांनी त्‍यांची ओटी भरली जाते. त्‍यांना हळदकुंकू लावून त्‍यांच्‍या डोक्‍यावरील भांगेत तीळ भरले जातात. महाराष्‍ट्रातील काही ठिकाणी ओटी भरणाचा कार्यक्रम भोगीच्‍या दिवशी पार पाडला जातो. ववसा किंवा ओटी भरणे ही पद्धत कोकणात आढळत नाही.

भोगीच्‍या दिवशी भारतात अनेक ठिकाणी इंद्रदेवाची पूजा केली जाते.

  • खाद्यपदार्थ व त्यामागील कारणे

दुपारच्‍या जेवणात तिळ लावलेल्‍या बाजरीच्‍या भाकर्‍या, लोणी, पापड, वांग्‍याचे भरीत, मूगाची डाळ, चटणी आणि तांदूळ घालून केलेली खिचडी असा खास भोगीचा बेत असतो. या दिवशी एक खास भाजी केली जाते. त्‍यात चाकवत, बोरे, गाजर, डहाळ्यावरील ओले हरभरे, ऊस, वांगे, घेवड्याच्‍या शेंगा आणि तीळ अशा विविध गोष्‍टी टाकल्‍या जातात. त्‍या भाजीस खिंदाट असे म्‍हटले जाते. बाजरीच्‍या भाकरीसोबत खिंदाट खाल्‍ले जाते. जोडीला राळ्याच्‍या तांदळाचा भात तयार केला जातो.

मकरसंक्रांतीच्‍या दुस-या दिवशी, किंक्रांतीला सुगडामधील उरलेले पदार्थ कााढून लहान मुलांना वाटतात. भोगीला तयार केलेली खिंदाटाची भाजी आणि बाजरीची भाकरी मकरसंक्रांतीला खाऊ नये अशी धारणा आहे. किंक्रांतीच्‍या दिवशी त्‍या दोन्‍ही पदार्थांचा किमान एकेक घास खाण्‍याची पद्धत आहे.

  • वैशिष्ट्य : भोगी देणे – भोगीच्या दिवशी वरील पदार्थ करून सवाष्णीला जेवावयास बोलावतात. तसे शक्य नसल्यास वरील पदार्थांचा शिधा तिच्या घरी पोहोचता केला जातो. यालाच भोगी देणे म्हणतात.