भुदरगड

कोल्हापूर पासून साधारणपणे ५०-५५ कि.मी. अंतरावर हा किल्ला आहे.आठशे मीटर लांब व सातशे मीटर रुंदी़चा हा किल्ला तेथील भैरवनाथाच्या जागृत देवस्थानामुळे प्रसिध्द आहे. किल्ल्याला दोन दरवाजे आहेत. तटाची मात्र खूप ठिकाणी पडझड झाली आहे. इथे दरवर्षी माघ कॄष्ण १ पासून १० पर्यंत मोठी यात्रा भरते.

इतिहास

इ.स. १६६७ मधे शिवाजी महाराजांनी भूदरगडाची नीट दुरूस्ती केली व त्यावर शिबंदी ठेवून ते एक प्रबळ लष्करी ठाणे बनवले. परंतु मोगलांनी हे ठाणे ताब्यात घेण्यास अल्पावधीतच यश मिळवले. पाच वर्षानी मराठ्यांनी भूदरगडावर अचानक ह्ल्ला करून तो जिंकून तर घेतलाच, पण मोगलांच्या प्रमुख सरदारास ठार मारले. मोगलांची निशाणे त्यांनी भैरवनाथास देउन टाकली ती अजूनही देवळात आहेत.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात परशुरामभाऊ पटवर्धनांनी किल्ल्यातील शिबंदी वश करुन त्यावर ताबा मिळवला. दहा वर्षे तो त्यांच्या ताब्यात राहिला.

इ.स. १८४४ मध्ये कोल्हापूरातील काहींनी बंड करून बरेचसे किल्ले ताब्यात मिळविले होते. त्यात सामानगड व भूदरगड प्रमुख होते. त्यांचा बिमोड करण्यास जनरल डीलामोटीने ससैन्य कूच केले. १३ ऑक्टोबर १८४४ रोजी इंग्रजांच्या सैन्याने भूदरगडावर पूर्ण ताबा प्रस्थापित केला. असे बंडाचे प्रयत्त्न वारंवार होऊ नयेत म्हणून तेथील तटबंदीची बरीच पाडापाड केली.

गडावरील ठिकाणे

गडावरील सर्वात सुस्थितीतील व प्रे़क्षणीय वास्तू म्हणजे श्री भैरवनाथाचे मंदिर. गडावर एक मोठा तलाव आहे. त्याच्याच काठी शंकराची दोन मंदिरे तसेच भैरवीचे मंदिर आहे. हिलाच जखुबाई म्हणून ओळखतात. गडावर थोडीशी झाडी आहे. गडावरुन दुधगंगा-वेदगंगा नद्यांची खोरी, राधानगरीचे दाट अरण्य व आंबोली घाटाचा परिसर दृष्टीस पडतो.

कसे जाल

कोल्हापूर पासून – गारगोटी पर्यंत बस आहे. नंतर गारगोटी पासून किल्ल्याच्या तटाखालपर्यंत एस टी महामंड्ळाची सोय आहे.