मुंबई चे शांघाय

चीन सारख्या भव्यदिव्य देशात माझा नवऱ्याला नोकरी मिळाली. परदेशी नोकरी म्हटलं की सगळे US UK Europe चा विचार करतात. पण आम्हाला एका वेगळ्या देशात मिळाली. सुरवातीला थोडी भीती म्हणा किंवा  उत्सुकता दोन्ही ही खूप होतं. नातेवाईकांच्या तर वेगवेगळ्या प्रतिक्रिया. चिनमध्येच का नोकरी घेतली दुसरीकडे जायचं असत शत्रु राष्ट्र आहे म्हणे, मांसाहारी आहेत, आपला काही मिळत नाही, सगळंच वेगळ वगैरे वगैरे. असो तर या सगळ्याला न जुमानता आम्ही आपली तयारी केली नि निघालो. तयारी करतांना बरेच प्रश्न पडले. काय समान न्यावं आणि काय मिळेल तिथे. ऐकून माहीत होता की आपला किराणा, मसाले, भाज्या, आपल्या मापाचे कपडे, आपली भारतीय भांडी, आपले कुकर, वगैरे मिळत नाही. थोडा फार गूगल दादांच्या कृपेने कळलं की ऑनलाईन बऱ्याच वस्तू मिळतात. मग जमेल तेवढे कपडे आणि थोडा किराणा, गरजेची भांडी आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे हल्दीराम चे रेडी टू ईट चे पाकिट्स आठवणीने घेऊन आणि मनात बरेच प्रश्न घेऊन निघालो.

दिल्ली ते शांघाय सहा तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो. चीनमधील शांघाय या शहरातील एका मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये माझ्या नवऱ्याला नोकरी मिळाली तीच नाव शांघाय जिओ तोंग युनिव्हर्सिटी. त्यांनी च आमची राहायची सोया युनिव्हर्सिटीच्या हॉटेलमध्ये केली होती. त्यामुळे काही दिवस राहण्याचा प्रश्न नव्हता. पोहोचलो आणि एअरपोर्ट बाहेर पडलो तर भाषेचा मोठा प्रश्न उभा राहिला. आम्हाला हे माहीत होता म्हणून आम्ही तश्या तयारीने च गेलो होतो जसे की युनिव्हर्सिटी चा पत्ता, अजून कुठे कुठे जायचंय त्यासगळ्या ठिकाणांचं पत्ता प्रिंट करून घेऊन गेली दोन भाषेत चिनी अआणि इंग्लिश. एअरपोर्ट बाहेर पडताच टॅक्सी तयार होत्या त्यांचे नंबर्स  लागले होते आणि एका मागोमाग लोक येऊन बसत होते. सेक्युरिटी गार्ड नि आम्हाला टॅक्सी दाखवली आम्ही त्यात बसलो काही न बोलता . मग त्याला पत्याची प्रिंट दाखवली. आणि राम भरोसे निघालो कारण पहिल्यांदा नवीन देशात नवीन भाषा आणि नवीन लोक तो नेईल तिथे जायचं होतं. पण ऐकून माहिती होता की चीनी लोक फसवणूक करत नाही. आणि खरच फसवणूक नाही करत याचा अनुभव आम्हाला नंतर बऱ्याच वेळा आला. टॅक्सी मध्ये बसल्यावर पाहिले फरक जाणवला तो हा की ड्राइवर सीट डावी कडे होती आपल्याकडे उजवी कडे असते. आणि म्हणजेच रस्त्याने पण उजवीकडून चालवायचं असतं  चालायचं असतं. हे आपल्या साठी खूप वेगळ होतं. मोठमोठे तीन तीन पदरी रस्ते. सगळं एकदम भव्यदिव्य होत. इतक सुंदर एअरपोर्ट , इतक सुंदर शहर आणि रस्ते मी तर सगळं बघून अवाक झाले. आम्ही रात्री पोहचलो त्यामुळे रात्रीचा शांघाय शहराचा तो देखावा मला भारावून गेला. ती झगमगाहट सगळीकडे लायटिंग मस्त वाटत होती. आम्ही new year दरम्यान गेलो म्हणून लावली असा माझा समज होता पण नंतर मला कळलं की तस काही नव्हत इथे वर्षभर लाईट ची सजावट केली असते.

भारतात असा म्हटलं जातं की “मुंबई ला शांघाय बनवायचंय” ते का? याचा प्रत्यय मला त्या रात्री शांघाय ला पोचल्यावरच  आला सुंदर, स्वच्छ, आणि दैदीप्यमान शहर बघून…..

सौ. स्नेहल देशपांडे देशमुख, शांघाय, चीन

YouTube Channel name – Sneha’s Creations

(साभार- Being Women newspaper)