पटावरील खेळ

(बोर्ड गेम्स). विविध आकार-प्रकारांच्या पटांवर सोंगट्या, फासे तसेच इतर साधनांनी खैळण्यात येणारे बैठे खेळ. प्राचीन काळापासून रूढ असलेल्या या खेळांत अनेक प्रकारच्या सुधारणा होत होत आजचे खेळ तयार झाले आहेत. प्राचीन काळी जमिनीवरच पट आखून आणि हाडे, गोट्या, फळांची कवचे वापरून असे खेळ खेळत. अत्यंत प्राचीन खेळांचे पट सर लेनर्ड वुली यांना अर येथील उत्खननात (इ.स.पू.सु. ३००० वर्षे), राजांच्या थडम्यांत आढळेले.

पटावरील खेळाचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नशिबाच्या भरवशावर आणि कवड्या फाशांच्या आकड्यांवर अबलबूंन असणारे क्रीडाप्रकार आणि दुसरा म्हणचे बौद्धिक कौशल्याला वाव असलेले क्रीडाप्रकार. बुद्धिचातुर्यावर अधिष्ठित असलेल्या खेळांमध्ये खेळाडूचा चाणाक्षपणा, दूरदर्शित्त्व, स्मरणशक्ती व कौशल्या हे गुणच जिंकण्याच्या दृष्टीने निर्णायक ठरतात.