प्राचीन शिल्पकलेची अपूर्वाई

डोंगर पहाडातील कातळ कोरून त्यात गुंफा तयार करणे, विविध शिल्पाकृती साकार करणे ही एक स्थापत्य कलाच होय. या स्थापत्य कलेला कल्पक शिल्पकलेची जोड देऊन फार मोठा कलात्मक वारसा आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवला आहे. या कलेचा विकास भारतात मुख्यतः बौध्द काळात झाला. बौध्द परंपरेतील अशा एक हजार गुंफाची नोंद भारतात झाली असली तरीही अशा असंख्य लेण्या अजून उजेडात यावयाच्या आहेत. महाराष्ट्र या वारशाच्या बाबतील खरोखरीच भाग्यशाली होय. कारण ज्ञात असलेल्या सुमारे १००० गुंफांपैकी बहुतांश म्हणजे आठ-नऊशे गुंफा एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राच्या पर्वतीय प्रदेशातील कातळ दगड कोरीव कामासाठी उत्तम असल्यामुळे ही कला महाराष्ट्रात प्रगतावस्थेत गेली असावी.

महाराष्ट्रात ज्या काही गुंफा आहेत तेथील शिल्पकलेतून शैव, वैष्णव तसेच जैन या तीन धर्म-पंथातील तत्त्वज्ञान व प्रतिमांचा प्रकर्षाने उपयोग केलेला आढळतो. या गुंफांद्वारे धर्मप्रसाराची चळवळ पुढे नेण्यात येत असावी. या कलेचा एवढा उत्कर्ष झाला याचे कारण म्हणजे या कलेला मिळालेला राजाश्रय. धनिक वर्गानेही या कलेला उदार आश्रय दिला. या प्रोत्साहनाने ही कला महाराष्ट्रात कळसाला पोहोचलेली दिसते. घारापुरी, कान्हेरी, अजंठा-एलोरा या गुंफांतील अजोड शिल्पकला हे या अपूर्वाईचे द्योतक आहे. एलोरा येथील कैलास लेणे तर सर्व जगात मशहूर आहे. महाराष्ट्रातील अशा काही प्रमुख लेण्यांचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने पुढे दिलेला आहे. अर्थात या शिल्पकलेचं सौंदर्य शब्दातीत असल्याने तिचा आस्वाद प्रत्यक्ष पाहूनच घेणे अधिक समाधानाचे ठरेल.

  • घारापुरी (एलिफंटा) येथील लेण्या

मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून दहा कि.मी. अंतरावर भर समुद्रात असलेल्या घारापुरी बेटावरील या लेण्या म्हणजे अजोड शिल्पकलेचा नमुना होय. म्हणूनच या लेण्या जगप्रसिध्द आहेत. गेटवे ऑफ इंडियापासून तेथे मोटरबोटीने जाता येते. पाशुपात शैव-वैष्णव परंपरेतील या गुंफा सहाव्या किंवा सातव्या शतकात कोरल्या गेल्या असाव्यात. घारापुरी हे प्राचीन काळी एक उत्कृष्ट बंदर असावे व या ठिकाणी सागरी व्यापाराचे मोठे केंद्र असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकात व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांना पश्चिम सागरी किनाऱ्यावरील या बेटाचा माग लागला असावा. त्यांनी या बेटावर जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांनी तेथील कातळात कोरलेला प्रचंड हत्ती प्रथम पहिला व विस्मयचकित होऊन त्यांनी ‘एलिफंटा-एलिफंटा’ असे उद्गार काढले. तेव्हापासून पोर्तुगीजांनी घारापुरीचा उल्लेख एलिफंटा या नावाने सुरू केला व नंतरच्या काळात येथील लेण्यांना ‘एलिफंटा केव्हज’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. या बेटावरील शिल्पकलेत शैव परंपरेच्या प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. गुप्त व चालुक्य काळातील स्थापत्यकलेचा सर्वोच्च आविष्कार येथील लेण्यांमध्ये आढळतो.
घारापुरी बेटावरील विस्तीर्ण परिसरात मुख्यतः नऊ लेण्या आहेत. त्यात योगमुद्रेतील शिवप्रतिमा, शिवतांडव, दैत्य संहारक शिव, शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, अर्धनारी नटेश्वर, महेशावतार, कैलास पर्वतावरील पार्वती, कैलास उचलून धरणारे शिव-कैलासराणा अशा भव्य प्रतिमांचा समावेश आहे. गंगावतरण, अर्धनारी नटेश्वर आणि त्रिमूर्ती ही शिल्पे जगातील अप्रतिम शिल्पे होत.
घारापुरीचा परिसर निसर्गरम्य असून सहलीसाठी उत्तम आहे. अलीकडे या परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे संगीत नृत्य महोत्सव साजरा केला जातो व देशातील मान्यवर कलाकार आपली कला सादर करतात. या महोत्सवासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

नजीकचे रेल्वे स्थानक : मुंबई – चर्चगेट, सी.एस.टी. (व्ही.टी.)

  • कान्हेरी लेण्या

मुंबईच्या उपनगरात पश्चिम रेल्वेवरील बोरीवली या स्थानकापासून पूर्वेकडे अगदी नजीकच्या अंतरावर असलेल्या विस्तीर्ण कृष्णगिरी उपवनातून (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) या लेण्यांकडे जाण्याचा मार्ग आहे. या उपवनात असलेल्या डोंगर मालिकेतील कातळात ख्रिस्तपूर्व २०० वर्षे ते सहाव्या शतकापर्यंतच्या काळात या लेण्या कोरण्यात आल्या असाव्या असा जाणकारांचा दावा आहे. बौध्द धर्माचा वाढता प्रभाव असताना या लेण्या खोदण्यात आल्या असून त्यातील काही कोरीव शिल्पे भव्य आणि सुंदर आहेत. या ठिकाणी १०९ बुध्द विहार असून या विहारातून साधना करणाऱ्या भिक्षूंसाठी पाण्याच्या भूमिगत टाक्या खोदण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाण्याचा व सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा म्हणून या परिसरात भूमिगत नाल्याही खोदण्यात आल्या आहेत.
लेण्यातील वास्तुशिल्प पुरातन असूनही ते अतिशय प्रशस्त आणि देखणे आहे. विशेषतः गुंफा क्रमांक १, २ व ३ तर अतिशय मनोरम आहेत. या लेण्यात कोरण्यात आलेली गौतम बुध्दाची शिल्पाकृती एक उत्कृष्ट कलाविष्कार म्हणून संपूर्ण देशात मशहूर आहे. बौध्द भिक्षूंना दैनंदिन साधना व सामूहिक प्रार्थना करता यावी यासाठी स्वतंत्र लहान-मोठी दालनं या ठिकाणी आहेत. बोरीवलीपासून या लेण्या सुमारे ८-९ कि.मी. अंतरावर आहेत.
बोरीवलीच्या पश्चिमेस रेल्वे स्थानकापासून अवघ्या दीड कि.मी. अंतरावर मंडपेश्वर लेण्या आहेत. या लेण्याही पुरातन असून सहाव्या शतकात खोदण्यात आल्या असाव्या. या गुंफांमध्ये एक भव्य शिवालय असून दरवर्षी शिवरात्री आणि त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी उत्सव साजरा केला जतो.

नजीकचे रेल्वे स्थानक : बोरिवली (प.रे.), मुंबई

  • कार्ले येथील लेण्या

लोणावळा-खंडाळा परिसरातील या लेण्या प्रसिध्द आहेत. कार्ला लेण्या लोणावळ्यापासून १२ कि.मी. अंतरावर आहेत. ख्रिस्ती पूर्वकाळात इ.स. पूर्वी पहिल्या शतकाच्या सुमारास या लेण्या खोदलेल्या असाव्यात. या लेण्या सह्याद्रीच्या एका डोंगरकड्यावर असून तेथे जाण्यासाठी थेटपर्यंत पायऱ्या आहेत. अलीकडेच लेण्यांच्या उजव्या अंगाने पक्का रस्ता करण्यात आलेला असल्याने बरेचसे अंतर वाहनाने जाता येते. त्यानंतर थोडेच अंतर चढून जावे लागते.
या गुंफात अनेक विहार, एक स्तुप व एक भव्य चैत्य आहे. हा चैत्य भारतातील सर्वात मोठा चैत्य म्हणून प्रसिध्द आहे. या चैत्यगृहाचा आकार १२५X४५ फूट असून उंची जवळपास ५० फूट आहे. चैत्यगृहात पाषाण कलेबरोबर लाकडी कामही केलेले आहे. प्रचंड आकाराच्या लाकडी तुळया व कमानी येथे पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे २००० वर्षे लोटली तरीही हे लाकूड अजूनही सुस्थितीत आहे. चैत्यगृहातील भिंती व खांब यावर शिल्पाकृती कोरल्या आहेत. ही शिल्पकला वेरुळ-अजिंठा येथील शिल्पकलेइतकीच सुंदर व देखणी आहे. गुंफांतील खांब आणि भिंती तसेच प्रवेशद्वार यावर अनेक शिल्पाकृती कोरलेल्या असून ही शिल्पकला थक्क करणारी आहे. गुंफेतील मिथुनयुग्म, प्रवेशद्वारावरील कोरीव सज्जे, चैत्यगृहाच्या महाद्वाराशी असलेल्या भव्य शिल्पाकृती अत्यंत रेखीव, प्रमाणशीर आकर्षक आणि जिवंत आहेत.
मुख्य लेण्याच्या बाहेरच्या परिसरात प्रसिध्द एकविरा देवीचे मंदिर आहे. येथे दर्शनार्थींची मंगळवारी व शुक्रवारी गर्दी असते. नवरात्रात येथे मोठी यात्रा असते. एम.टी.डी.सी. तर्फे नजीकच एक विश्रामधाम आहे. तेथे वॉटर स्पोर्टसची सुविधाही आहे.

  • भाजे लेण्या

कार्ले लेण्यांच्या अगदी विरुध्द दिशेला मुंबई-पुणे रेल्वे लाईनच्या पलीकडे एका लहान टेकडीवर या लेण्या आहेत. मळवली स्टेशनपासून अवघ्या ३-४ कि.मी. अंतरावर असलेल्या भाजे गावानजीकच्या एका डोंगरात या लेण्या खोदलेल्या आहेत. २५०-३०० फूट उंचीवर या लेण्या असल्याने व हे चढण्यासाठी पायऱ्या असल्याने तेथे जाणे सोपे आहे.
कार्ल्याच्या मानाने येथील गुंफांचा परिसर लहान आहे. या गुंफातही एक चैत्यगृह आहे. शिवाय दगडी स्तुपही आहेत. येथील गुंफा कार्ले गुंफांच्या मानाने साध्या आहेत. येथेही लाकडी काम आहे. चैत्यगृहातील खांबांवर कार्ला येथील चैत्यगृहाप्रमाणे कोरीव शिल्प नाही. चैत्यगृहात एका स्तुप आहे. छत व प्रवेशद्वार या ठिकाणी मोठमोठ्या लाकडी तुळयांचा वापर केलेला आहे.
या गुंफांतील सूर्य व इंद्र ही दोन शिल्पे भव्य आणि रेखीव आहेत. चैत्यगृहांचं प्रवेशद्वारही देखणं आणि भव्य आहे.

  • बेडसे

भाजे लेण्यापासून जवळच लोहगड-विसापूरचे किल्ले आहेत. तेथे जाण्यासाठी भाजेगावापासूनच वाट फुटते. वाटेतील गायमुख खिंडीतून एक वाट विसापूरला तर दुसरी लोहगडला जाते. विसापूरच्या वाटेने विसापूरला गेले की नजीकच्या बेडसे डोंगरात या गुंफा आहेत. या गुंफांतील शिल्पकामही अतिशय देखणे आहे. येथील चैत्यगृह व चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी जे खांब आहेत ते अतिशय उंच असून त्यांच्या शीर्षभागी वेगवेगळे पशू आणि त्यावर आरुढ झालेले स्वार अशा अनेक शिल्पाकृती आहेत. गुंफेचा दर्शनी भाग देखणा आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : लोणावळा-खंडाळा किंवा मळवली.