छत्रपति शिवाजी

महाराष्ट्रातील मराठ्यांच्या राज्याचे संस्थापक आणि पहिले अभिषिक्त छत्रपती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील भोसले या वतनदार घराण्यातील मालोजींचे पुत्र शहाजी आणि सिंदखेडकर जाधवराव यांच्या कन्या जिजाबाई या दांपत्यापोटी ,शिवनेरी किल्ल्यावर (जुन्नर तालुका – पुणे जिल्हा) झाला. त्यांच्या जन्म-तिथीविषयी एकमत नाही. मराठी बखरींच्या आधारावरून त्यांचा जन्म १६२७ मध्ये झाला; पण जेधे शकावली, कवींद्र परमानंद याचे शिवभारत आणि राजस्थानात उपलब्ध झालेल्या जन्मपत्रिका, या विश्वसनीय साधनांवरून फाल्गुन वद्य तृतीया, शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० ही तारीख बहुतेक इतिहाससंशोधकांनी आणि आता महाराष्ट्र शासनानेही निश्चित केली आहे.(१९ फेब्रुबारी १६३० – ३ एप्रिल १६८०)

शिवाजी महाराजांचे पूर्वज चितोडच्या सिसोदिया घराण्यातील होते, अशी लौकिक समजूत आहे. हे घराणे दक्षिणेतील होयसळ वंशातील आहे, असेही संशोधन पुढे आले आहे. मालोजी हे या घराण्यातील पहिले कर्तबगार पुरुष. त्यांना शहाजी व शरीफजी असे दोन मुलगे होते. मालोजी हे निजामशाहीतील एक कर्तबगार सरदार होते. मालोजी व त्यांचे बंधू विठोजी यांच्याकडे औरंगाबादजवळचे वेरुळ, कन्नड व देऱ्हाडी (देरडा) हे परगणे मुकासा (जहागीर) म्हणून होते. शहाजी पाच वर्षांचे असताना मालोजी मरण पावले. त्यांच्या नावाची जहागीर शहाजींच्या नावाने राहिली. निजामशाहीच्या दरबारातील खंडागळेच्या हत्तीच्या प्रकरणावरून शहाजी व लखूजी जाधव यांच्यात वितुष्ट आले, ते पुढे कायम राहिले. शहाजींनी १६२० पासून निजामशाहीच्या बाजूने आदिलशाहीविरुध्द लढण्यास सुरुवात केली होती; पण १६२४ मध्ये भातवडीच्या लढाईत पराक्रम करूनही त्यांचा सन्मान झाला नाही, म्हणून ते आदिलशाहीस मिळाले; पण इब्राहिम आदिलशहाच्या मृत्युनंतर ते पुन्हा निजामशाहीत आले.

निजामशाहीतील दरबारी कारस्थानात शहाजींचे सासरे लखूजी जाधव मारले गेले (१६२९). त्यामुळे नाराज होऊन त्यांनी निजामशाहीची नोकरी सोडली. त्या सुमारास त्यांचा मोठा मुलगा संभाजी यांचा विवाह शिवनेरीचा किल्लेदार विश्वासराव यांच्या मुलीशी झाला होता. त्या निमित्ताने शहाजींनी जिजाबाईस शिवनेरीवर ठेवले होते. विजापूर सोडून गेल्यामुळे मुहंमद आदिलशहा (कार. १६२७–५६) हा शहाजींवर रुष्ट झाला होता. आदिलशाही विरुध्द गेलेली आणि लखुजींच्या मृत्युमुळे निजामशाही सुटलेली अशा अवस्थेत शहाजींना परागंदा होण्याची वेळ आली. अखेर आदिलशहाच्या बोलावण्यावरून ते १६३६ मध्ये त्याच्या नोकरीत शिरले. आदिलशहाने त्यांच्याकडे पुण्याची जहागीर बहाल केली व मोठा हुद्दा देऊन कर्नाटकाच्या मोहिमेवर पाठविले. विजापूरच्या सैन्याने १६३८ च्या अखेरीस बंगलोर काबीज केले. तेव्हा बंगलोर, कोलार इ. प्रदेशांची जहागीर शहाजींना मिळाली आणि ते बंगलोर येथे कायमचे राहू लागले.

बालपण, शिक्षण ………..

स्वराज्याचा श्रीगणेशा

शिवाजी महाराजांचे बालपण शिवनेरी, माहुली (ठाणे जिल्हा) व पुणे येथे गेलेले दिसते. बंगलोरलाही ते काही काळ राहिले. शिवाजी आणि जिजाबाई यांच्याकडे महाराष्ट्रातील जहागिरीची व्यवस्था सोपवून शहाजीराजांनी त्यांची पुण्याला रवानगी केली. जहागिरीची प्रत्यक्ष व्यवस्था पाहण्यासाठी शहाजींनी दादोजी तथा दादाजी कोंडदेव आणि आपले काही विश्वासू सरदार यांची नेमणूक केली. जिजाबाईंचा देशाभिमान, करारीपणा आणि कठीण प्रसंगांतून निभाऊन जाण्यासाठी लागणारे धैर्य, या त्यांच्या गुणांच्या तालमीत शिवाजीराजे तयार झाले. त्यांच्या या शिकवणीतून शिवाजीराजांना स्वराज्यस्थापनेची स्फूर्ती मिळाली. आपल्या जहागिरीच्या संरक्षणासाठी गड, किल्ले आपल्या ताब्यात असले पाहिजेत, ही जाणीव त्यांना बालवयापासून झाली. दादोजी कोंडदेव यांच्या मृत्युनंतर (१६४६-४७) शिवाजीराजांनी प्रत्यक्ष कारभार हाती घेतला. त्यांनी गड आणि किल्ले आपल्या ताब्यात घेण्यासाठी अनेक मोहिमा आखून यशस्वी रीत्या पार पाडल्या. या कामात त्यांना आपल्या मातोश्रींचे आशीर्वाद होतेच.

शिवाजी महाराजांनी आपल्या उपक्रमाची सुरुवात सावधपणे केली. आपल्याशी सहमत होणारे समवयस्क तरुण त्यांनी जमविले आणि देशमुख, देशपांडे, वतनदार इत्यादींशी त्यांनी निरनिराळ्या प्रकारे संबंध जोडले. शिवाजी महाराजांना आठ पत्नी असल्याचे उल्लेख मिळतात. त्यांपैकी सईबाई (निंबाळकर) हिच्याशी त्यांचा प्रथम विवाह झाला. त्यानंतर सोयराबाई (मोहिते), पुतळाबाई (पालकर), सकवारबाई (गायकवाड), काशीबाई (जाधव) व सगुणाबाई (शिर्के) यांच्याशी त्यांचा विवाह झाला. यांशिवाय इंगळे व आणखी एका घरण्यातील मुलीबरोबरही त्यांचा विवाहसंबंध झाला. महाराजांना सईबाईपासून संभाजी (१६५७ –८९) व सोयराबाईपासून राजाराम (१६७०–१७००) असे दोन मुलगे झाले. याशिवाय त्यांना सहा कन्याही होत्या. सईबाई १६५९ मध्ये मरण पावल्या आणि काशीबाई राज्याभिषेकापूर्वी मरण पावल्या (१६७४). पुतळाबाई महाराजांबरोबर सती गेल्या. सोयराबाई संभाजींच्या कारकीर्दीत १६८१ मध्ये आणि सकवारबाई शाहूंच्या कारकीर्दीत मरण पावल्या. महाराजांनी पुण्याच्या परिसरातील मोकळ्या टेकड्या, पडके किल्ले, दुर्गम स्थळे हळूहळू आपल्या ताब्यात आणली. राजगड आणि तोरणा किल्ला (प्रचंडगड) महाराजांनी हस्तगत केला. महाराजांना येऊन मिळालेल्या अनुयायांत पुढे प्रसिध्दीस आलेली कान्होजी जेधे, नेताजी पालकर (समकालीन कागदपत्रांनुसार नेतोजी पालकर), तानाजी मालुसरे, येसाजी कंक, बाजीप्रभू देशपांडे, बाजी पासलकर इ. नावे आढळून येतात. भोरजवळ रोहिडेश्वरासमोर स्वराज्यनिष्ठेची शपथ घेतल्याची कथा ही याच सुमारास असावी. जी स्थळे आपण घेतली, ती विजापूर राज्यातील सुरक्षितता कायम रहावी या हेतूनेच, अशी भूमिका महाराजांनी घेतली. विजापूर दरबारनेही सुरुवातीस महाराजांच्या या चळवळीकडे फारसे लक्ष दिले नाही; पण महाराजांनी कोंडाण्याच्या (सिंहगडच्या) किल्लेदाराला आपलेसे करून तो आपल्या ताब्यात घेतला. त्यावेळी मुहंमद आदिलशहाचे डोळे उघडले. महाराजांच्या विरुध्द विजापूरचे सैन्य चालून गेले. दक्षिणेत विजापूरच्या सैन्यात शहाजीराजे हे अधिकारी म्हणून जिंजीच्या किल्ल्यासमोर तळ देऊन होते. त्यांच्यावर फितुरीचा आरोप ठेवण्यात येऊन त्यांना कैद करण्यात आले (१६४८) आणि त्यांना विजापूरला आणण्यात आले. या काळात पुरंदरच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी निकराचा लढा देऊन विजापूरचे सैन्य उधळून लावले (१६४८ अखेर). सैन्याची इतर भागांतील आक्रमणेही परतवण्यात आली. शहाजी राजांना काय शिक्षा होईल, याची काळजी महाराज आणि जिजाबाई यांना पडली. त्यावेळी दक्षिणेचा मोगल सुभेदार म्हणून शाहजहानचा मुलगा मुरादबख्श हा औरंगाबाद येथे कारभार पहात होता. त्याच्याशी संपर्क साधण्याचा आणि त्याच्या मार्फत विजापूरवर दडपण आणण्याचा प्रयत्न महाराजांनी केला. कोंडाण्याचा किल्ला परत द्यावा, ही अट आदिलशहाने घातली. किल्ला परत देण्यास महाराज नाखूष होते; तथापि सोनोपंत डबीर याने शिवाजी महाराजांची समजूत घातली. सिंहगडचा किल्ला आदिलशहाकडे परत करण्यात आला. त्यानंतर शहाजींची सुटका होऊन (१६४९) त्यांची बंगलोरला सन्मानाने रवानगी करण्यात आली.

या मोहिमेत महाराजांच्या विरुध्द लढणाऱ्या विजापूरच्या सैन्यात फलटणकर, निंबाळकर, घाटगे, बल्लाळ हैबतराव ही मंडळी होती. त्यावेळी महाराजांच्या सैन्यात गोदाजी जगताप, भीमाजी वाघ, संभाजी काटे, शिवाजी इंगळे, भिकाजी चोर व त्याचा भाऊ भैरव चोर इ. निष्ठावान मंडळी होती. पुरंदरच्या पायथ्याशी झालेल्या लढाईत बाजी कान्होजी जेधे याने पराक्रमाची शर्थ केली; म्हणून शिवाजी महाराजांनी त्याला ‘सर्जेराव’ ही पदवी दिली. याच लढाईत मुसे खोऱ्याचा देशमुख बाजी पासलकर हा कामी आला. मावळातील वतनदार मंडळी ही महाराजांच्या कार्याकडे कशी ओढली जाऊ लागली, हे या मोहिमेवरून दिसून येते.

राज्यविस्तार

पुढील सहा वर्षांत शिवाजी महाराजांनी जहागिरीचा सगळा बंदोबस्त आपल्याकडे घेतला. पुणे, सुपे, इंदापूर, चाकण ही या जहागिरीतील प्रमुख स्थळे. १६५४ च्या सुमारास महाराजांनी पुरंदरचा किल्ला महादजी नीळकंठराव किल्लेदार याच्या मुलांकडून हस्तगत केला आणि पुणे प्रांताची सुरक्षितता मजबूत केली.

पुढे महाराजांनी जावळीवर स्वारी केली. सहा महिन्यांच्या या मोहिमेत चंद्रराव मोरे आणि त्यांचे भाऊबंद मारले गेले आणि जावळीचा मुलूख त्यातील रायरीच्या किल्ल्यासकट महाराजांच्या ताब्यात आला (१६५६). विजापूरहून कोकणपट्टीकडे जाणाऱ्या मार्गावरील ही महत्त्वाची ठिकाणे. जावळी खोरे ताब्यात आल्याबरोबर महाराजांनी मोरो त्रिंबक पिंगळे यास प्रतापगड किल्ला बांधून घेण्यास आज्ञा दिली (१६५६).

“राष्ट्राचे संरक्षण दुर्गाकडून, राज्य गेले तरी दुर्ग आपल्याकडे असल्यास राज्य परत मिळविता येते, दुर्ग नसल्यास हातचे राज्य जाते, हे महाराजांचे धोरण. त्यांनी अनेक किल्ले बांधले, अनेकांची डागडुजी केली. प्रतापगडचा किल्ला म्हणजे कोकणच्या वाटेवरचा पहारेकरी. त्यामुळे आदिलशहाचे कोकणातील अधिकारी आणि लहानमोठे जमीनदार या सर्वांनाच मोठा शह बसला. तसेच विजापूरशी संपर्कही कमी होऊ लागला. पोर्तुगीज अंमलाखाली असलेला ठाणे, वसई हा भाग वगळता जव्हारपासून गोव्यापर्यंतचा बहुतेक कोकण प्रदेश विजापूरच्या आदिलशाहीकडे होता.

मुहंमद आदिलशहाच्या मृत्युनंतर (४ नोव्हेंबर १६५६) त्याचा मुलगा दुसरा अली आदिलशहा गादीवर आला. तो औरस पुत्र नाही किंवा त्याचे कुल अज्ञात आहे, अशी सबब पुढे करून मोगलांच्या सैन्याने विजापूरच्या ईशान्येकडील कल्याणी आणि बीदर ही स्थळे काबीज केली (१६५७). शिवाजी महाराजांनीही मोगलांचे जुन्नर शहर लुटले आणि अहमदनगरच्या पेठेवर हल्ला केला. ही धावपळीची लढाई चालू असतानाच महाराजांनी औरंगजेबाशी संपर्क ठेवला होता. विजापुरातील बदलती परिस्थिती लक्षात घेऊन कोकणात आपल्या पदरात काय पडेल, ते मोगलांकडून मिळवावे, असा विचार महाराजांनी केला होता. विजापूरशी लवकर तह करावा, अशी मोगल बादशहा शाहजहानने आज्ञा केली.

१६५७ मध्ये मोगलांनी घेतलेले बीदर, कल्याणी हे प्रदेश आपल्याकडे ठेवून घ्यावेत, मागच्या तहात मोगलांनी दिलेले कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांत हे विजापूरने परत करावेत, शिवाय खंडणी देत जावी, या अटींवर हे युद्ध संपले. या सुमारास शाहजहान हा अतिशय आजारी पडला (१६५७). हे वृत्त विजापूरलाही कळले होते. त्यामुळे विजापूरने हा तह संपूर्णपणे पाळण्यास टाळाटाळ केली. शाहजहानचा आजार आणि औरंगजेबाचे उत्तरेकडे लागलेले लक्ष, हे पाहून महाराजांनी सरळ कल्याण व भिवंडी ही स्थळे हस्तगत केली (२४ ऑक्टोबर १६५७).

पुढे १६५८ मध्ये माहुलीचा किल्लाही काबीज केला. नंतर औरंगजेबाकडे आपला दूत पाठवून त्याच्याशी सलोख्याचे बोलणे सुरू केले. “मोगल मुलुखावर आपण हल्ला करीत नाही; पण कोकणातील आपले हक्क सुरक्षित ठेवावेत, म्हणून मी हे करीत आहे”, असे त्यास कळविले. फेब्रुवारी १६५८ मध्ये औरंगजेब औरंगाबादेहून आगऱ्याकडे जाण्यास निघाला आणि २१ जुलै १६५८ मध्ये तो दिल्लीच्या तख्तावर बसला.

अफझलखान-शिवाजी भेट व प्रतापगडचे युद्ध

याच सुमारास, आम्हाला परत केलेल्या कल्याण, भिवंडी आणि पुणे प्रांतातून शिवाजीला हाकलून लावा, असे दडपण मोगलांकडून विजापूरवर येऊ लागले. विजापूर दरबारने शिवाजी महाराजांविरुध्द अफझलखानाची रवानगी केली. इ.स. १६४९ पासून वाई परगणा अफझलखानाकडे मुकासा (जहागीर) म्हणून होता. त्यामुळे त्याला या प्रदेशाची माहिती होती. अफझलखान हा विजापूरहून एप्रिल १६५९ मध्ये निघाला आणि वाईस पोहोचला. वाटेत त्याने पंढरपूर येथे अत्याचार केले, अशा कथा पुढे प्रचारात आल्या. पंढरपूला त्याने जबर रकमा वसूल केल्या असाव्यात आणि धमकी व दहशतीचे वातावरण पसरून दिले असावे. यापूर्वी केव्हा तरी त्याने अशाच प्रकारे उपद्रव तुळजापूर येथेही दिला होता. बजाजी निंबाळकराची कैद आणि जबर दंड ही प्रकरणे याच काळातील होत.

विजापूरच्या सैन्यात पांढरे, खराटे, जाधव इ. मराठे सरदार होते. वाईला आल्यानंतर अफझलखानाने पुणे, कल्याण आणि भिवंडी प्रांतांचा ताबा घेण्यासाठी वरील मराठी सरदार आणि सिद्दी हिलाल यांना त्या प्रांतांत पाठवून दिले. त्या प्रांतांतील मराठे वतनदार, देशमुख, देशपांडे इत्यादींना महाराजांच्या विरुध्द उठविण्याचाही अफझलखानाने प्रयत्न केला.

महाराज या अडचणीत असतानाच सईबाई वारल्या (१६५९); तथापि ते विचलित झाले नाहीत. अफझलखानाच्या सैनिकी बलाची व कर्तृत्वाची त्यांना कल्पना होती. शिवाजीला कैद करावे किंवा जमल्यास ठार मारावे, असा आदेश घेऊनच अफझलखान हा विजापूरहून आला आहे, हेही त्यांना माहीत होते. हे लक्षात ठेवूनच त्यांनी आपला तळ प्रतापगडसारख्या दुर्गम स्थळी ठेवला आणि अफझलखानाचा प्रतिकार करण्याची भक्कम तयारी केली.

अफझलखानाचे बरेच सैन्य पुणे, कल्याण व भिवंडी प्रांतांत पसरले होते. त्यामुळे त्याच्या सैन्याची साहजिकच विभागणी झाली. वाईला आपल्याजवळ असलेले सैन्य पुरे पडेल, याची त्याला खात्री वाटत नसावी. प्रतापगडसारख्या तळावर जाऊन लढा द्यावा, तर तो यशस्वी होईल किंवा नाही आणि ही मोहीम लवकर आटोपेल की नाही, याची त्याला खात्री वाटेना; म्हणून त्याने महाराजांच्याकडे निर्वाणीचा खलिता पाठवून त्यांच्यावर दडपण आणण्याचे प्रयत्न केले.

अफझलखानाने पाठविलेले पत्र आणि त्याला महाराजांनी दिलेले उत्तर ही दोन्ही कवींद्र परमानंदाने आपल्याशिवभारत काव्यात संस्कृतमध्ये अनुवाद करून दिली आहेत. पत्रांवरून विजापूरचे शासन हे मोगलांच्या आदेशाप्रमाणे वागत असावे, याबद्दल संशय रहात नाही. अफझलखानाने महाराजांना कळविले, “तुम्ही राजचिन्हे धारण करीत आहात. तुम्ही शत्रूला अगदी अजिंक्य अशा चंद्रराव मोऱ्यांच्या जावळी या विस्तीर्ण राज्यावर हल्ला करून ते बलाने काबीज केलेत आणि जावळी घेऊन मोऱ्यांना सत्ताहीन केले. निजामशाहीच्या अस्तानंतर आमच्या आदिलशहांनी निजामशाहीच्या ताब्यातील मुलूख हस्तगत केला होता, तोही तुम्ही आपल्या अखत्यारित आणला आहे.

कल्याण, भिवंडीचा प्रांत आम्ही मोगलांकडे परत केला होता, तो हे शहाजी राजांच्या पुत्रा, तुम्ही बळकाविला आहे आणि तेथील मुस्लिम धर्माशास्त्री आणि प्रतिष्ठित लोक यांना तुम्ही त्रास देत आहात. त्यांच्या धर्मस्थळांनाही तुम्ही नष्ट केले, असेही म्हटले जाते. आम्ही मोगलांना दिलेला पुणे प्रांत हाही तुम्ही अद्याप ताब्यात ठेवला आहे. तेव्हा हा बंडखोरपणा सोडून द्यावा. मोगालांना पुणे, कल्याण, भिवंडी आदी प्रदेश देऊन टाकावेत. चंद्रराव मोऱ्यांकडून जबरदस्तीने घेतलेली जावळी मोऱ्यांना परत करावी आणि आदिलशहाला शरण यावे. आदिलशहा तुम्हाला अभय देऊन तुमच्यावर कृपा करतील तेव्हा हे राजा, माझ्या आज्ञेप्रमाणे संधीच कर आणि सिंहगड व लोहगड हे मोठे किल्ले, तसेच प्रबळगड, पुरंदर, चाकण नगरी आणि भीमा व नीरा यांच्यामधला प्रदेश महाबलाढ्य अशा दिल्लीच्या बादशहास शरण जाऊन किल्ले व मुलूखही देऊन टाक.”

पुढे अफझलखानाने आपल्या लष्करी बलाची क्षमता व प्रौढी सांगताना त्यात लिहिले होते, “आदिलशहाच्या आज्ञेवरून माझ्याबरोबर आलेले सहा प्रकारचे सैन्य मला ताबडतोब (युद्धास) उद्युक्त करीत आहे. तुझ्याशी युद्ध करण्यास उत्सुक असलेले व जावळी काबीज करू इच्छिणारे मूसाखान इत्यादी (सरदार) मला या कामी प्रोत्साहन देत आहेत.”

या पत्राची ही भाषा विजयाची खात्री असणाऱ्या माणसाची (योद्ध्याची) वाटत नाही.

महाराजांनी खानाला प्रतापगडाकडे आणण्यासाठी मोठ्या मुत्सद्दीपणाने त्याला कळविले, की “आपण प्रतापी, आपला पराक्रम थोर, आपण माझ्या वडिलांचे ऋणानुबंधी; त्यामुळे आपणही माझे हितचिंतक आहात. आपल्या तळावर येऊन आपल्याला भेटणे हे सध्याच्या वातावरणात मला सुरक्षितपणाचे वाटत नाही. उलट आपण प्रतापगडास यावे. माझा पाहुणचार स्वीकारावा. मी आपले सर्व काही, माझा खंजीरसुद्धा आपल्यापाशी ठेवून देईन.”

महाराजांचा हा डावपेच अफझलखानाला कळला नाही. युद्धावाचूनच शिवाजी आपल्या हातात येणार, या भ्रमात तो राहिला. प्रत्यक्षात महाराजांना कैद करून अगर ठार मारून ही मोहीम निकालात काढावी, असा त्याचा हेतू होता. महाराज आणि अफझलखान हे दोघेही परस्परांच्या हेतूंविषयी साशंक होते, असे विविध साधनांवरून दिसते. महाराजांनी सैन्याची मोठी तयारी केली होती.

घोडदळ अधिकारी नेताजी पालकर आणि पायदळ अधिकारी मोरोपंत पिंगळे हे जय्यत तयारीनिशी येऊन महाराजांना मिळाले. प्रतापगडाभोवतालच्या डोंगरांत मराठ्यांची पथके ठिकठिकाणी मोक्यावर ठेवण्यात आली. वाईहून प्रतापगडकडे जाताना महाराजांनी अफझलखान आणि त्याचा सरंजाम यांची मोठी बडदास्त राखली. अफझलखानाने जड सामान वाईला ठेवले होते. प्रतापगडाजवळ येऊन पोहोचल्यावर भेटीबाबत वाटाघाटी झाल्या आणि प्रतागडाजवळ ठरलेल्या स्थळी शामियाने उभारून उभयतांच्या

भेटी व्हाव्यात असे ठरले. दोघांनीही बरोबर दहा शरीररक्षक आणावेत, त्यांना शामियानाच्या बाहेर ठेवावे, प्रत्यक्ष शामियान्यात दोघांचे वकील आणि दोन रक्षक असावेत असा करार झाला. भेटीपूर्वी भेट अयशस्वी झाली, तर काय करावे यासंबंधी शिवाजी महाराजांनी सर्वांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. परमानंदाने शिवभारतात महाराजांना अंबाबाईची कृपादृष्टी लाभली आणि त्यांचा आत्मविश्वास वाढला इ. वर्णन केले आहे.

भवानी देवीची प्रेरणा व आशीर्वाद महाराजांना यश मिळवून देते, ही समजूत तत्कालीन श्रध्देमुळे मराठ्यांची सुप्तशक्ती जागृत करण्यास समर्थ ठरली. १० नोव्हेंबर १६५९ रोजी शिवाजी महाराज आणि अफझलखान यांची भेट झाली. महाराजांच्या शरीरक्षकांत गायकवाड, सिद्दी इब्राहीम, जिवाजी महाले (सकपाळ) इ. मंडळी होती, तर अफझलखानाच्या शरीररक्षकांत सय्यद बंडा, शंकराजी मोहिते, पिलाजी मोहिते इ. मंडळी होती. महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ तर खानातर्फे कृष्णाजी भास्कर हेही बरोबर होते. भेटीपूर्वी दोघांनीही आपल्या तलवारी रक्षकांच्या हाती दिल्या होत्या. दोघांपाशी खंजीरी होत्या. अफझलखानाने शिवाजी महाराजांना घट्ट आलिंगन दिले. शत्रू हाती आला आहे, त्याचा निकाल लावावा असे खानाला वाटले असावे. त्याक्षणी महाराजांनी वाघनख त्याच्या पोटात खुपसले आणि त्याच्या मिठीतून सुटका करून घेतली आणि नंतर कट्यारीने वार केला. परमानंदाने कृपाण म्हणजे लांब खंजीर महाराजांपाशी असल्याचा उल्लेख केला आहे.

संभाजींच्या दानपत्रात शिवाजी महाराजांनी बिचवा खुपसल्याचा उल्लेख आढळतो. या भेटीत अफझलखान मारला गेला आणि त्याच्या शरीररक्षकांनी केलेला प्रतिकारही महाराजांच्या शरीररक्षकांनी मोडून काढला. भेटीपूर्वी ठरल्याप्रमाणे महाराजांनी पुढील हालचालींसाठी सैन्याला इशारा दिला. त्यांनी अफझलखाच्या बेसावध सैन्यावर चाल केली. त्यावेळी झालेल्या युद्धात खानाच्या सैन्याची लांडगेतोड झाली. महाराजांना या युद्धात हत्ती, घोडे, उंट, मूल्यवान वस्त्रे, अलंकार इ. संपत्तीची मोठी लूट प्राप्त झाली. अफझलखानाचे बरेच अधिकारी कैद  झाले. काहीजण पळून गेले.

शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अफझलखान भेटीचा प्रंसग हा मोठा आणीबाणीचा समजला जातो. प्रतापगडच्या युद्धात लष्करी डावपेच, सैन्याची हालचाल आणि व्यूहरचना तसेच अनुकूल रणांगणाची निवड आणि प्रसंगावधान हे शिवाजी महाराजांच्या युद्धकौशल्याचे महत्त्वाचे विशेष आढळतात. या प्रसंगी महाराजांचे धैर्य, सावधानपणा आणि धाडस हे गुण प्रकर्षाने प्रत्ययास आले. अफझलखानाचा वध ही महाराजांच्या शौर्यसाहसाची गाथा आहे; पण खानाच्या सैन्याचा धुव्वा उडविणे, हा त्यांच्या रणनीतीचा असामान्य विजय होय. अफझलखानाच्या मृत्यूने सगळा दक्षिण भारत हादरून गेला. [⟶ प्रतापगड].

पन्हाळ्याचा वेढा व शायिस्तेखानाशी संग्राम

अफझलखानाच्या मृत्यूनंतर विजापूर राज्यात उडालेल्या गोंधळाचा महाराजांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांच्या सैन्याच्या एका तुकडीने कोकणात राजापूर, वेंगुर्ल्यापर्यंत धडक मारली, तर दुसऱ्या तुकडीने घाटावर कोल्हापुरापर्यंत आक्रमण केले. नोव्हेंबर १६५९ च्या अखेरीस पन्हाळगडचा दुर्गम किल्ला महाराजांच्या हातात आला. अशा परिस्थितीत विजापूर दरबार स्वस्थ बसून राहणे शक्य नव्हते. पन्हाळगड परत जिंकून घेण्याच्या उद्देशाने सिद्दी जौहरच्या नेतृत्वाखाली विजापूरहून प्रबळ सैन्य चालून आले आणि त्याने पन्हाळागडाला वेढा घातला. यावेळी आदिलशहाने मोगलांची मदत मागितली. शायिस्तेखान हा जानेवारी १६६० मध्ये औरंगाबादेस पोहचला.

शायिस्तेखानाच्या पत्रांवरून मोगल आणि विजापूर हे दोघे परस्परांशी किती एकमताने वागत होते, याची कल्पना येते. विजापूरने मोगलांची मदत मागितल्याचा उल्लेख परमानंदानेही केला आहे. महाराज पन्हाळगड लढवीत होते. त्याच सुमारास शायिस्तेखान हा मोठ्या सैन्यानिशी औरंगाबादेहून कूच करून निघाला. अहमदनगर, सुपे या मार्गाने तो ९ मे १६६० रोजी पुण्यात दाखल झाला. शिवाजीचे पारिपत्य करून त्याच्या मुलखातील किल्ले घेऊन या भागास बंडातून मुक्त करावे, अशी औरंगजेबाची आज्ञा होती. म्हणून शायिस्तेखानाने पुण्यातच तळ ठोकला. पुढील तीन वर्षे तो औरंगाबादेच्या ऐवजी पुण्याहूनच सुभ्याचा कारभार पाहत होता. इकडे महाराज पन्हाळ्यात राहून वेढा लढवीत असता शायिस्तेखानाने उत्तरेकडे कूच करून चाकणच्या गढीला वेढा घातला. मराठे मोगलांशी निकराने लढत होते. किल्लेदार फिरंगोजी नरसाळे याने चाकणचा किल्ला शर्थीने लढविला.

तीन महिन्यांच्या या वेढ्यात मोगलांचे सहाशेच्यावर सैनिक जखमी वा मृत झाले. शेवटी तो किल्ला मोगलांच्या ताब्यात आला. मराठ्यांना मोगल आणि आदिलशहा या दोन शत्रूंशी एकाच वेळी लढावे लागत आहे, हे ओळखून शिवाजी महाराजांनी सिद्दी जौहरशी वरपांगी सलोख्याचे बोलणे करून मोजक्या लोकांनिशी रात्री पन्हाळगड सोडला (१३ जुलै १६६०) आणि विशाळगडाकडे कूच केले. विजापूरच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. त्यावेळी गजापूरच्या खिंडीत सैन्याचा निकराने प्रतिकार करीत असता बाजीप्रभू देशपांडे हा जखमी होऊन मरण पावला. महाराज विशाळगडास पोहचले आणि तेथून राजगडास गेले. सिद्दी जौहरने शिवाजी महाराजांना पन्हाळगडातून जाऊ दिले, असा संशय अली आदिलशहाला आला. आपल्यावर हा नाहक ठपका ठेवण्यात आला, याचे वैषम्य वाटून सिद्दी जौहरने अली आदिलशहाच्या विरुद्ध बंड केले. अली आदिलशहाच्या वतीने जौहरने पन्हाळागडाला वेढा घातला, तेव्हा महाराजांनी पन्हाळगड मुत्सद्देगिरीने सोडून दिला.

चाकणच्या वेढ्यात आपली मोठी हानी झाली, हे पाहून शायिस्तेखानाने महाराजांच्या किल्ल्यांवर हल्ले करण्याचा नाद सोडला व मोगल सैन्य मैदानी प्रदेशांत पसरले आणि पुणे, कल्याण आणि भिवंडी हे मुलूख त्यांनी काबीज केले. महाराजांनी शायिस्तेखानाशी वाटाघाटी चालू ठेवून घाटावरील कोल्हापूरपर्यंतचा भाग, आदिलशहाच्या अखत्यारीतील कोकण हे प्रदेश मिळत असल्यास आपण विजापूरचे राज्य जिंकून घेण्याच्या कामात पूर्ण सहकार्य करू असे कळविले. शायिस्तेखानाने ही देऊ केलेली मदत झिडकारली. ही मोठी चूक होती, असे पुढे मिर्झा राजा जयसिंहाने औरंगजेबाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. मोगल मैदानी प्रदेशात दहशत निर्माण करीत होते; पण त्यांना शिवाजी महाराजांच्या ताब्यातील किल्ले घेता आले नाहीत. मोगलांनी १६६१ च्या प्रारंभी लोणावळ्याजवळून कोकणात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; पण मोगल सेनापती कारतलबखान यास उंबरखिंडीत गाठून महाराजांनी त्याला शरण येण्यास भाग पाडले.

उंबरखिंडीचे युद्ध (१६६१) हे शिवाजी महाराजांच्या गनिमी युद्धतंत्राचे एक वैशिष्ट्यपूर्ण उदाहरण होय. [⟶ गनिमी युद्धतंत्र]. नंतर मोगल आणि मराठे यांच्यात किरकोळ चकमकी झाल्या. शायिस्तेखान पुण्यास मोठे सैन्य घेऊन ठाण मांडून बसलेला होता. अखेर शिवाजी महाराजांनी शायिस्तेखानाचा समाचार घेण्याची एक धाडसी योजना आखली. ही योजना म्हणजे मोठ्या सैन्याने वेढलेल्या व शायिस्तेखान असलेल्या पुण्यातील लाल महालावर हल्ला करणे, ही होय. शायिस्तेखानाचा दुय्यम सेनापती जोधपूरचा राजा जसवंतसिंह हा होता. ५ एप्रिल १६६३ च्या रात्री महाराज निवडक सशस्त्र सहकाऱ्यांसह शायिस्तेखानाच्या लष्करात घुसले, किरकोळ चकमकीनंतर त्यांनी शायिस्तेखानाला महालात गाठले. शायिस्तेखान पळून जाण्याचा प्रयत्नात असता, त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राचे वार होऊन त्याला आपली बोटे गमवावी लागली. त्याचा एक मुलगा या हल्ल्यात ठार झाला. महाराज आणि त्यांचे सहकारी सुखरूपपणे सिंहगडाकडे निघून गेले.

शायिस्तेखानाच्या महालातील चाळीस-पन्नास स्त्री-पुरुष ठार अगर जखमी झाले होते. मोगलांच्या छावणीत एकच हाहाःकार उडाला. भीमसेन सक्सेना याने लिहून ठेवलेले आहे, की “यापूर्वी कधीही असे धाडस करणे कुणालाही शक्य झाले नव्हते. मोगल सेनापतीच्या छावणीत घुसून कुणी हिंदू जमीनदार अशा प्रकारे हल्ला करील, असे कुणालाही वाटले नाही.” या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव हिंदूस्थानात सर्वत्र पसरले. हल्ल्यापूर्वी त्यांनी मोगल छावणीची आणि शायिस्तेखानाच्या हालचालींची बारकाईने नोंद व तपासणी केली असली पाहिजे. या प्रकरणात जसवंतसिंहाकडून प्रत्यक्ष उत्तेजन जरी नसले, तरी कानाडोळा किंवा दुर्लक्ष झाले.

‘खरे-खोटे काय, ते परमेश्वर जाणे’, असे भीमसेन सक्सेना म्हणतो. औरंगजेबाच्या अधिकृत चरित्रात या हल्ल्याची हकीकत शबखून (रात्रीचा छापा) अशा शब्दांत त्रोटक देण्यात आली आहे. औरंगजेब त्यावेळी काश्मीरच्या दौऱ्यावर होता. त्याने शायिस्तेखानाला ताबडतोब बंगालच्या सुभ्यावर पाठविले आणि त्या जागी मोठा मुलगा मुअज्जम यास नेमले. शायिस्तेखानानंतर मोगल सैन्याचे नेतृत्व जसंतसिंहाच्या हाती देण्यात आले. त्याने सिंहगडावर हल्ला केला; पण मराठ्यांनी तो परतविला. त्यानंतर मोगली सैन्याच्या हालचाली थंडावल्या.

सुरतेची लूट

शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली सामान्यपणे पुणे जिल्हा, मध्य आणि दक्षिण कोकण आणि सातारा जिल्ह्यातील जावळी तालुका व प्रतापगड हे प्रदेश होते. मोगल महाराष्ट्रात सर्वत्र पसरलेले होते. त्यांना जबर धक्का द्यावा म्हणून शिवाजी महाराजांनी आणखी एक सुरत लुटीचा धाडसी उपक्रम योजला. त्याकाळी सुरत मोगल साम्राज्याचे महत्त्वाचे बंदर होते. मोगलांचा व्यापार प्रामुख्याने याच बंदरातून चाले. यूरोपीय तसेच इराणी, तुर्की व अरब यांच्या जहाजांची तेथे नेहमीच वर्दळ असे. मध्य आशियातून मक्केच्या यात्रेला जाणारे यात्रेकरू याच बंदरातून पुढे जात. सुरतेस लक्षाधीश धनिकांच्या मोठमोठ्या पेढ्या होत्या. महाराजांनी कल्याण, भिवंडी, डांग या भागांतून पोर्तुगीज हद्दीच्या बाजू-बाजूने सरकत सुरत गाठले. मराठे सुरतेच्या अगदी जवळ येईपर्यंत मोगल अधिकाऱ्याना त्यांचा पत्ता लागला नाही, हल्ला होताच तेथील मोगल अधिकारी किल्ल्यात जाऊन बसला, तो शेवटपर्यंत बाहेर आलाच नाही.

चार दिवस मराठ्यांनी सुरतेची लूट केली (६ ते ९ जानेवारी १६६४). मोगलांचा सगळा प्रतिकार त्यांनी हाणून पाडला. इंग्रज, डच इ. यूरोपीय व्यापाऱ्यांनी आपापल्या वखारींचे संरक्षण करण्याच प्रयत्न केला. मराठे त्यांच्या वाटेला गेले नाहीत. सुरतेच्या लुटीतील हाती सापडलेली संपत्ती रोकड, सोने, चांदी, मोती, रत्ने, वस्त्रे इ. मिळून एक कोटीच्या आसपास होती. अहमदाबाद आणि मोगल राज्यांतील इतर भागांतून सैन्य चालून येत आहे, अशी वार्ता लागताच महाराजांनी सुरत सोडले आणि संपत्ती घेऊन ते सुरक्षितपणे स्वराज्यात परतले.

या स्वारीनंतर शहाजीराजे कर्नाटकात घोड्यावरून पडून होदिगेरे येथे २३ जानेवारी १६६४ रोजी मरण पावले.

महाराजांच्या सुरतेवरील या स्वारीचे तपशीलवार वर्णन यूरोपीय वखारवाल्यांच्या कागदपत्रांतून आढळते. या हल्ल्यामुळे शिवाजी महाराजांचे नाव परदेशातही चर्चिले जाऊ लागले. सुरतेहून आणलेल्या लुटीतून त्यांनी दक्षिण कोकणातील सिंधूदुर्ग बांधला आणि मराठा आरमाराचा विस्तार केला. याची सुरवात त्यांनी कल्याण-भिवंडी घेऊन यापूर्वीच सुरू केली होती (१६५७). पश्चिम किनाऱ्याचे रक्षण आणि आरमाराला सुरक्षितता या हेतूने शिवाजी महाराजांनी ठिकठिकाणी जलदुर्ग बांधले. यूरोपीयांच्या राजकीय डावपेचावर महाराजांचे सतत लक्ष असे. जंजिऱ्याच्या सिद्दीला इंग्रज आणि पोर्तुगीज मदत करतात, हे ते जाणून होते. इंग्रजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यात (१६६०) सिद्दी जौहरला दारुगोळ्याची मदत केली होती. याबद्दल शिक्षा म्हणून महाराजांनी इंग्रजांच्या वखारीवर हल्ला करून त्यांचे काही अधिकारीही कैद केले होते.

इंग्रजांनी मोठे प्रयत्न करून त्यांची सोडवणूक केली; तेव्हा आदिलशहाने दक्षिण कोकण घेण्यासाठी अझीझखानाच्या नेतृत्वाखाली मोठे सैन्य पाठवले. अझीझखान आणि वाडीचे सावंत एक झाले, परंतु अझीझखान मरण पावल्यामुळे (१० जुलै १६६४) आदिलशहाने खवासखान याला पाठविले. तेव्हा महाराजांनी वेंगुर्ल्यावर हल्ला केला आणि कुडाळ येथे ते खवासखानावर चालून गेले (ऑक्टोबर १६६४). खवासखानाने निकराने प्रतिकार केला आणि विजापूरकडे तातडीची मदत मागितली. ती मदत घेऊन मुधोळचा बाजी घोरपडे येत असता मराठ्यांनी त्याला गाठले. या लढाईत बाजी घोरपडे जखमी झाला आणि पुढे लवकरच मरण पावला. त्याजकडील खजिना मराठ्यांनी लुटला. बाजी घोरपड्याची सु. दोनशे माणसे ठार झाली. घोरपड्याच्या मृत्युनंतर खवासखानही पराभूत होऊन निघून गेला (डिसेंबर १६६४). विजापूरकरांची ही मोहीम म्हणजे कोकण ताब्यात ठेवण्यासाठी आदिलशहाने केलेला शेवटचा प्रयत्न होय. त्यानंतर कोकणात मराठ्यांची सत्ता निर्वेध चालू राहिली.

मिर्झा राजा जयसिंह आणि पुरंदरचा तह

औरंगजेबाने मुरब्बी व विश्वासू सेनापती मिर्झा राजा जयसिंह याची दक्षिणेत नेमणूक केली. शिवाजी महाराज त्यावेळी बिदनूर राज्यातील बसरुरच्या स्वारीवर गेले होते. त्यांनी हे समृध्द बंदर लुटले (फेब्रुवारी १६६५). परतताना गोकर्ण महाबळेश्वर, कारवार येथून ते दक्षिण कोकणात आले असताना जयसिंह हा मोठ्या सैन्यानिशी पुण्यात पोहोचला आहे (३ मार्च १६६५ रोजी), अशी बातमी त्यांना लागली.

जयसिंहाने महाराजांची पूर्णपणे नाकेबंदी करण्याचे धोरण आखले. मोहिमेची सूत्रे संपूर्णपणे आपल्या हाती ठेवली. यात कुणाकडूनही हस्तक्षेप होऊ नये, अशी त्याने औरंगजेबाला अट घातली. शिवाय किल्ले आणि किल्लेदार यांजवर आपले नियंत्रण राहावे आणि माणसे फोडण्यासाठी व मोहिमेसाठी लागणारा पैसा सुभ्याच्या खजिन्यातून काढण्याची परवानगी असावी, या अटी जयसिंहाने बादशहाकडून मान्य करून घेतल्या. जयसिंहाच्या मोहिमेविषयीचा फार्सी पत्रव्यवहार उपलब्ध आहे. त्यातून तत्कालीन घटनांचे तपशीलवार उल्लेख आढळतात. महाराजांचा मैदानी प्रदेश मोगलांच्या ताब्यात होता. मोगलांनी कल्याण-भिवंडीपासून पुरंदरपर्यंत सीमेवर चौक्या आणि ठाणी बसविली होती. जयसिंहाने ठिकठिकाणी प्रबळ लष्करी तुकड्या ठेवल्या आणि त्यांना जागरुक राहण्याचे आदेश दिले.

जयसिंहाचा दुय्यम सेनापती दिलेरखान याने पुरंदरला वेढा घातला. जयसिंहाने आदिलशहा, पोर्तुगीज आणि लहानमोठे जमीनदार यांना शिवाजीला मदत करू नये असे बजावले. आदिलशाहीतील अनेक सरंजामदार त्याने आपल्याकडे ओढले. दहा ते पंधरा हजार सैनिकांच्या स्वतंत्र तुकड्या करून त्यांनी शिवाजीचा प्रदेश उद्ध्वस्त करावा, अशा आज्ञा दिल्या. त्यामुळे प्रजा हैराण होऊन गावे सोडून कोकणात आणि अन्यत्र जाऊ लागली. महाराजांनी जयसिंहाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण शरणागती पत्करल्याशिवाय बोलणे नाही, ही भूमिका त्याने घेतली.

मोगलांनी निकराचा हल्ला करून पुरंदरजवळचा रुद्रमाळचा किल्ला ताब्यात घेतला (१४ एप्रिल १६६५). तो जाऊ देऊ नये आणि पुरंदर हाती यावा अशी त्यांची योजना होती. दिलेरखान सासवड येथे ठाण मांडून राहिला. मोगलांनी बुरुजांच्या उंचीचे दमदमे तयार केले (३० मे १६६५). त्यांवर तोफा चढवून किल्ल्यावर मारा करण्याचा त्यांचा हेतू होता. मराठे व मोगल यांच्या रोज चकमकी झडत. महाराजांनी किल्ल्यात मदत पाठविण्याचे प्रयत्न केले; पण ते पुरंदरच्या शिबंदीला कमी पडत होते. मोगल शेवटी पुरंदर घेणार अशी चिन्हे दिसू लागली. शिवाय जयसिंहाने प्रबळ लष्करी पथके मराठ्यांच्या मुलखात पाठवून तो बेचिराख करण्याचे सत्र सुरू केले. पुरंदरच्या युद्धात मुरारबाजी देशपांडेसारखा पराक्रमी सेनापती कामी आला. तेव्हा शिवाजी महाराजांनी एकदंर परिस्थितीचा विचार करून शेवटी चाणाक्षपणे व दूरदृष्टीने तह करण्याचे ठरविले. त्यांचा हेतू राज्य आणि शक्य तितके किल्ले वाचवावे, हा होता. ११ जून १६६५ रोजी शिवाजी महाराजांनी जयसिंहाची भेट घेतली. संपूर्ण शरणागती पत्करून मिळेल त्यावर समाधान मानावे, ही जयसिंहाची मागणी. कोणत्याही परिस्थितीत युद्ध थांबवावे, हा महाराजांचा हेतू. अखेर पुरंदरच्या तहाच्या वाटाघाटी होऊन अटी ठरल्या. त्या अशा :

(१) महाराजांनी मोगलांना २३ किल्ले आणि वार्षिक चार लाख होन उत्पन्नाचा किंवा महसुलाचा मुलूख द्याव.

(२) उरलेले १२ किल्ले आणि वार्षिक एक लाख होनाचा मुलूख बादशहाशी राजनिष्ठ राहण्याच्या अटीवर आपल्याकडे बाळगावा. (३) मुलगा संभाजी याला पाच हजाराची बादशाही मनसब देण्यात येईल.

(४) महाराजांना मनसबीची आणि दरबारात हजर राहण्याची माफी देण्यात येईल; पण दक्षिणेत मोगल सांगतील ती कामगिरी आपण करू, असे आश्वासन त्यांनी द्यावे.

(५) विजापूरच्या मोहिमेत सहकार्य करण्याची एक अट होती. त्या मोबदल्यात घाटावरचे विजापूरचे पाच लाख होनाचे प्रांत शिवाजींनी जिंकून घ्यावेत आणि कोकणातील मुलूख सांभाळावेत व त्या मोबदल्यात वर्षाला तीन लाख होन या हिशोबाने चाळीस लाख होनाच्या खंडणीचा बादशाही खजिन्यात भरणा करावा. आदिलशहाचा कोकणातील मुलूख आपल्या ताब्यात आहे. त्याचे उत्पन्न चार लाख होनाचे आहे, असे महाराजांनी कळविले.

शिवाजी महाराजांनी मोठय़ा नाखुशीने हा तह स्वीकारला. शिवाजींचा संपूर्ण कोंडमारा केला, तर ते विजापूरशी हातमिळवणी करतील, हा धोका जयसिंहाला दिसत होता. घाटावरचा मुलूख आम्ही तुम्हाला देऊ, अशी बोलणी विजापूरने शिवाजी महाराजांशी सुरू केली होती. म्हणून जयसिंहाने शिवाजी महाराजांना १२ किल्ले आणि आदिलशाही मुलूखाचे आश्वासन देऊन त्यांना गुंतवून ठेवले.

पुरंदरच्या अटींनी औरंगजेब संतुष्ट झाला नाही; कारण जयसिंहाने शिवाजीचा नाश करण्याची संधी घालविली, असे त्याचे मत होते. तहातील अटींनुसार मोगलांनी पुणे, कल्याण आणि भिवंडी हे प्रांत शिवाजी महाराजांकडून घेतले. त्याचे महाराजांना मनस्वी दुःख झाले; पण कोकणातील आणि घाटावरील काही किल्ले व प्रदेश महाराजांनी टिकवून ठेवण्यात यश मिळविले.

औरंगजेबाने विजापूरही जिंकून घ्यावे, अशी जयसिंहाला आज्ञा केली. शिवाजी महाराजांना बरोबर घेऊन तो विजापूरवर चालून गेला. मातब्बर प्रधान मुल्ला अहमद हा मोगलांकडे गेला असतानाही विजापूरकरांनी लढण्याची शर्थ केली (जानेवारी १६६६). निकराच्या लढायांत जयसिंहाला माघार घ्यावी लागली आणि भीमा ओलांडून सोलापूर गाठावे लागले.

या मोहिमेत शिवाजी महाराजांना कपटकारस्थानाने ठार मारण्याचा बेत दिलेरखानाने जयसिंहाला सांगितला, असे जयसिंहाच्या छावणीतील इटालियन प्रवासी निकोलाव मनुची (१६३९–१७१७) म्हणतो. तेव्हा जयसिंहाने ही सूचना फेटाळली आणि शिवाजी महाराजांनी पन्हाळगडावर हल्ला करावा असे सुचवले. नेताजी पालकर वेळेवर न आल्यामुळे महाराजांचा हा हल्ला अयशस्वी झाला (१६ जानेवारी १६६६). शिवाजी महाराजांच्या नाराजीमुळे नेताजी प्रथम विजापूरला मिळाला आणि जयसिंहाने त्याची मनसब वाढविल्यावर मोगलांकडे गेला व पुढे त्यास औरंजेबाने मुस्लिम करून (१७ मार्च १६६७) अफगाणिस्तानात पाठविले. त्याचे नाव मुहम्मद कुलीखान असे ठेवण्यात आले.

जंजिऱ्याचे सिद्दी हे मूळचे विजापूरचे चाकर; पण जयसिंहाने त्यांना १६६५ नंतर मोगलांच्या आश्रयाखाली आणले. कोकणातील आपल्या अधिकारावर ही आक्रमण आहे, असे शिवाजी महाराजांना वाटू लागले. शिवाय विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची फजिती झाली होती. तेव्हा शिवाजी महाराज विजापूरशी युती करतील, अशी शंका जयसिंहाला आली. शिवाजीला औरंगजेबाने आग्र्यास बोलावून घ्यावे, असे त्याने बादशहास सुचविले. त्याप्रमाणे औरंगजेबाचा हुकूम आला. आग्र्याला जाण्यास ते राजी नव्हते; पण जयसिंहाने त्यांची समजूत घातली आणि पुरंदरच्या तहातील काही अटी सैल होऊ शकतील, असे सूचित केले. शिवाय मुलगा रामसिंह तुमच्या सुरक्षिततेची आग्र्यामध्ये पूर्ण काळजी घेईल, अशीही हमी जयसिंहाने दिली. आग्र्याला जाऊन बादशाहाची भेट घ्यावी, असे महाराजांनी ठरविले. मोजका सरंजाम आणि संभाजी यास घेऊन महाराज आग्र्यास जाण्यास निघाले (५ मार्च १६६६).

आग्र्याची भेट व सुटका

महाराज १२ मे १६६६ रोजी दुपारी आग्र्यास पोहोचले. रामसिंहाने त्यांचे स्वागत केले. रामसिंहाचा तळ त्यावेळी खोजा फिरोजखान याची कबर असलेल्या बागेत होता. ही जागा ग्वाल्हेर-आग्रा रस्त्यावर आग्र्याच्या किल्ल्यापासून सु. अडीच किमी. अंतरावर आहे. रामसिंहाने आपल्या तळाशेजारीच त्यांना राहण्यास जागा दिली. पुढील सु. तीन महिने त्यांचे वास्तव्य येथेच होते. महाराज पोहोचताच त्यांना आपल्या भेटीस आणावे, अशी औरंगजेबाने आज्ञा केली होती. त्यावेळी बादशहाच्या वाढदिवसानिमित्त भरविलेला दरबार संपला होता व औरंगजेब मोजक्या अधिकाऱ्यांसह दिवाण-इ-खासमध्ये बसला होता. या ठिकाणी रामसिंह शिवाजी महाराजांसह गेला.

महाराज आणि संभाजी यांनी दरबारी पध्दतीप्रमाणे मोहरा आणि रुपये नजर केले. औरंगजेब स्वागताचा एकही शब्द बोलला नाही. त्यांना दरबारी अधिकाऱ्याच्या रांगेत अयोग्य जागी उभे करण्यात आले. आपला अपमान झाला, ह्या विचाराने शिवाजी महाराजांचा क्षोभ अनावर झाला. औरंगजेबाने रामसिंहाला विचारले शिवाजीला काय होत आहे? रामसिंह जवळ येताच शिवाजी महाराज कडाडून म्हणाले, “ मी कोणच्या प्रकारचा मनुष्य आहे, हे तुला, तुझ्या बापाला आणि बादशहाला ठाऊक आहे. असे असूनही मला अयोग्य ठिकाणी उभे करण्यात आले.

मला बादशाही मनसब नको, चाकरी नको”, असे मोठ्याने म्हणतच महाराज जाऊ लागले. रामसिंहाने त्यांना थांबवण्याकरिता त्यांचा हात धरला, तो झिडकारून महाराज एका बाजूला जाऊन बसले (एका बाजूला म्हणजे ‘दरबाराच्या बाहेर’ असे नव्हे)…… त्यांना खिल्अत (सन्मानाचा पोशाख) देण्यास औरंगजेबाने आकिलखान, मुख्लिसखान, मुल्तफतखान यांना पाठविले. औरंगजेबाच्या आज्ञेने महाराजांच्या तळाभोवती चौकी पहारे बसविण्यात आले. आपल्यावर विश्वास ठेवून महाराज आग्र्याला आले, याची रामसिंहाला जाणीव होती. त्याने आपण महाराजांच्याबद्दल जबाबदार राहू, अशा प्रकारचा जामीन बादशहाला लिहून दिला. त्यामुळे महाराजांना रामसिंहाच्या तळावरून हलविण्यात आले नाही.

पुढील तीन महिने महाराजांचे वास्तव्य आग्र्यात होते. हा त्यांच्या जीवनमरणाचा प्रसंग होता, असेच म्हणावे लागेल. औरंगजेबाने दगाफटका करावा, ठार मारावे वगैरे विचार व्यक्त केले; पण प्रत्येक वेळी अनपेक्षित घडत गेले आणि शिवाजी महाराजांवरील संकट टळत गेले. महाराजांना दगाफटका झाला, तर बादशहाच्या वचनावर इतःपर कोणाचाही विश्वास रहाणार नाही, असाही विचार औरंगजेबाची मोठे बहीण जहांआरा हिने बोलून दाखविला. महाराजांनीही मोगल वजीर जाफरखान, बख्शी मुहम्मद अमीन इत्यादींशी संपर्क साधून आपल्यावर एकाएकी प्राणसंकट येणार नाही, याबद्दल कसोशीने प्रयत्न केले.

आपल्या ताब्यात असलेले किल्ले आणि मुलूख महाराजांनी मोगलांना देऊन टाकावेत म्हणजे त्यांना इतरत्र मनसबी देण्यात येतील, हे औरंगजेबाचे धोरण होते. जयसिंहाने केलेल्या तहाने त्याचे समाधान झाले नव्हते. कुणीकडून का होईना, पण महाराजांना महाराष्ट्रातून बाहेर काढावे हा त्याचा हट्ट. उलट, “मी भक्कम रक्कम देतो, माझे किल्ले परत करा” असे महाराजांचे म्हणणे. महाराजांना आग्र्यासच काही दिवस ठेवावे ही जयसिंहाची इच्छा; पण त्यांच्या जीवास अपाय होऊ नये याची त्याला काळजी. आग्र्याच्या वास्तव्यात मोगल दरबारातील अधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्यात महाराजांनी पाण्यासारखा पैसा खर्च केला. महाराजांच्या बाणेदार वर्तनामुळे मोगल प्रजा स्तिमित झाली होती.

विजापूरच्या मोहिमेत जयसिंहाची नामुष्की झाली होती. इराणचा बादशहा भारतावर हल्ला करणार, अशी अफवा होती आणि महाराजांचा प्रश्न अद्यापि निकालात निघाला नव्हता. या परिस्थितीत औरंगजेब मोठ्या काळजीत होता. शिवाजी महाराजांकडून आपल्या मागण्या मान्य होत नाहीत, हे पाहून औरंगजेबाने महाराजांवरील पहारे कडक केले. रामसिंहावर पुढे वाईट प्रसंग येऊ नये, म्हणून शिवाजी महाराजांनी रामसिंहाची जामीनकी रद्द करविली आणि सोबतची बरीच माणसे दक्षिणेस परत पाठविण्याची परवानगी मागितली. याच सुमारास महाराजांना शहरातील दुसऱ्या एका हवेलीत हलविण्याचा बेत आखण्यात आला. तत्पूर्वीच निघून जाण्याचे महाराजांनी ठरविले.

१७ ऑगस्ट १६६६ रोजी संध्याकाळी शिवाजी महाराज पेटाऱ्यातून निसटले. महाराज कैदेतून पळून गेल्याचे पहारेकऱ्यांना दुसऱ्यां दिवशी समजले. औरंगजेबाला ही बातमी ताबडतोब कळविण्यात आली. रामसिंह, फौलादखान, तरबियतखान इत्यादींना तपासासाठी कडक आज्ञा देण्यात आल्या. आग्र्यात अनेक लोकांची धरपकड करण्यात आली. औरंगजेबाचा मोठा संशय रामसिंहावर होता; पण आरोप सिध्द झाला नाही. अंबरची जहागीरही त्याला देण्यात आली. औरंगजेबाने अधिकाऱ्यांना काही शिक्षा केली नाही. पुढे शिवाजी महाराज सुरक्षितपणे राजगडला पोहोचले (२० नोव्हेंबर १६६६). नंतर काही महिन्यांनी संभाजींना राजगडाला सुरक्षितपणे आणण्यात आले.

पोहोचल्यानंतर त्यांनी या गोष्टीचा फार गवगवा केला नाही. उलट वरकरणी आपण मोगलांशी एकनिष्ठ आहोत, असे दाखविले व बादशहाचा निरोपही घेता आला नाही, अशी दिलगिरी व्यक्त केली. शिवाजी महाराजांचा आपल्या मुलाला उपसर्ग होऊ नये, यासाठी औरंगजेबानेही सबुरीचे धोरण ठेवले. राजगडास पोहोचल्यानंतर महाराजांनी शहाजादा मुअज्जम यास पत्र लिहून संभाजीला दिलेली मनसब व जहागीर मिळावी, म्हणजे आपण त्याच्याबरोबर पथके देऊन सुभेदाराच्या चाकरीसाठी त्याला औरंगाबादेस पाठवू असे कळविले आणि सरदारांसहित संभाजी औरंगाबादेस गेले. तिथे संभाजी काही दिवस राहिले व पथके आणि सरदार यांना औरंगाबादेस ठेवून राजगडास परतले. त्यांना मनसब व जहागीर आणि शिवाजी महाराजांना ‘राजा’ ही पदवी या घटना १६६७ मधील होत.

महाराष्ट्रात परतल्यानंतरच्या हालचाली

महाराजांच्या आग्रा भेटीचा फायदा घेऊन आदिलशहाने कोकणात पुन्हा आक्रमण केले. शिवाजी महाराजांनी फोंडा किल्ला आणि इतर काही महाल वगळता मध्य व दक्षिण कोकण हे प्रदेश पुन्हा ताब्यात घेतले आणि सावंतवाडीच्या बंडखोर देसायांना आपल्या हवाली करावे, असे पोर्तुगीजांना सांगितले. पोर्तुगीजांच्या गोव्याच्या मुलखातील बारदेशावर तीन दिवस स्वारी केली (१० ते १२ नोव्हेंबर १६६७). पेडणे, कुडाळ, डिचोली इ. भागांतील बंडखोर देसायांना पकडावे, असा त्यांचा उद्देश होता; पण ते लोक गोव्याला पळून गेले. या स्वारीत पोर्तुगीजांचे नुकसान व मनुष्यहानी झाली. अखेर थोड्या दिवसांनी १६६७ मध्ये दोन्ही पक्षांत तह झाला. तहाप्रमाणे मराठ्यांनी कैदी आणि मालमत्ता परत केली. पोर्तुगीजांनीही बंडखोर देसायांना आवर घालू अशी हमी दिली. दाभोळला पोर्तुगीजांना वखार उघडण्यास शिवाजी महाराजांनी परवानगी दिली. पुढे नारवे येथील सप्तकोटीश्वर देवालयाचा त्यांनी जीर्णोद्धार केला (१६६८). याच वर्षी फ्रेंचांनाही राजापूर येथे वखार घालण्यास त्यांनी परवानगी दिली. सिद्दीचा निकाल लावण्यासाठी मराठ्यांनी एप्रिल १६६९ मध्ये जंजिऱ्याला वेढा दिला.

जंजिरा शिवाजी महाराजांच्या हाती जाणे मोगल, पोर्तुगीज आणि इंग्रज यांपैकी कुणालाच नको होते. ते सिद्दीला गुप्तपणे मदत करीत. या निमित्ताने सिद्दींना मदत करून मध्य कोकणात प्रवेश करावा, ही मोगलांची इच्छा होती. त्यामुळे शिवाजी महाराजांचा हा प्रयत्न असफल झाला; तथापि मोगलांवरच चढाई करण्याची धाडसी मोहीम महाराजांनी आखली (१६६९). औरंगजेबाने मूर्तिभंजनाचे धोरण जाहीर करून काशी येथील प्रसिध्द मंदिराची मोडतोड केली (सप्टेंबर १६६९). धर्मांतरालाही उत्तेजन देण्यात येऊ लागले. यामुळे सर्वसामान्य प्रजेत असंतोष वाढू लागला होता. महाराज योग्य संधीची वाट पहात होते. त्यांनी तत्काळ औरंगाबादेत तैनात असलेले मराठा लष्कर आणि अधिकारी प्रतापराव गुजर व आनंदराव यांना परत बोलाविले आणि मोगलांविरुध्द युद्ध पुकारले.

मोगल-मराठा संघर्ष

शिवाजी महाराजांनी मोगलांना दिलेले किल्ले परत घेण्यास सुरुवात केली. तानाजीने केलेला सिंहगडावरील अचानक हल्ला त्याच्या हौतात्म्यामुळे अविस्मरणीय ठरला (४ फेब्रुवारी १६७०). या लढाईत तानाजी आणि राजपूत किल्लेदार उदेभान हे दोघेही ठार झाले. पुढील सहा महिन्यांत मराठ्यांनी पुरंदर, रोहिडा, लोहगड, माहुली (शहापूरजवळ) इ. किल्ले घेतले. पुरंदरचा किल्लेदार रजीउद्दीन हा मराठ्यांच्या ताब्यात आला (८ मार्च १६७०). मराठ्यांनी चांदवड लुटले आणि मोगल खजिना हस्तगत केला. हत्ती व घोडे ही लूटही त्यावेळी त्यांना मिळाली. माहुलीच्या किल्ल्यावरील मराठ्यांचा पहिला हल्ला किल्लेदार मनोहरदास याच्या दक्षतेमुळे फसला; पण दुसऱ्या हल्ल्यात (जून १६७०) मराठ्यांनी किल्लेदार अल्लाहवीर्दीखान याला ठार मारून किल्ला ताब्यात घेतला.

माहुलीवरील पहिल्या हल्ल्यानंतर महाराजांनी कल्याण, भिवंडीवर हल्ला चढविला. तेथे निकराचा लढा होऊन कल्याण-भिवंडीचा प्रदेश महाराजांच्या हातात पडला. तसेच महाराजांचे सैन्य दक्षिणच्या सुभ्यात चहूकडे पसरले. त्यांनी वऱ्हाड आणि पूर्व महाराष्ट्र येथील प्रदेशांवर आक्रमणे केली. खेड्यापाड्यातून मराठे चौथाई वसूल करू लागले. याच वर्षाच्या शेवटी त्यांनी वऱ्हाडमधील कारंजा हे शहर लुटले (नोव्हेंवर १६७०). त्यापूर्वीच महाराजांनी आणखी एक मोठा धाडसी उपक्रम केला. तो म्हणजे बागलाण प्रांतावर (सध्याचा नाशिक जिल्ह्यातील तालुका) चढाई आणि सुरतेवर दुसऱ्यांदा हल्ला हा होय.

मुअज्जम या आक्रमणाने हतबुध्द झाला. दक्षिणेत मोगलांचा दाऊदखान कुरेशीव्यतिरिक्त दुसरा मातब्बर सरदार नव्हता. दिलेरखान हा नागपूर प्रांतात होता. त्याने दक्षिणेकडे जावे म्हणून बादशहाने आज्ञा केली. खानदेश सुभ्यात सटाणा, गाळणा किल्ला व मालेगाव इत्यादींचा समावेश होता.

नाशिक (गुलशनाबाद) हे तालुक्याचे ठिकाण असून संगमनेर जिल्ह्यात मोडत होते. महाराजांनी ठाणे जिल्ह्यातील जव्हारच्या मार्गाने पुढे सरकून नाशिक आणि बागलाणच्या मध्ये पसरलेल्या पूर्व–पश्चिम डोंगरावरील किल्ले हस्तगत करण्याचा सपाटा चालविला. इंद्राई, कांचन, मांचन, अचलगड, मार्कंडगड, अहिवंतगड हे किल्ले मराठ्यांच्या हातात पडले. शिवाजी महाराजांनी बागलाण आणि डांग वाटेने पुढे सुरतेवर हल्ला चढविला (३ ते ५ ऑक्टोबर १६७०). सुरतेतील समृध्द व्यापारी, पेढीवाले आणि सावकार यांची संपत्ती हरण करण्यात आली. या स्वारीत त्यांच्याबरोबर मकाजी आनंदराव, वेंकाजी दत्तो, प्रतापराव गुजर, मोरोपंत पिंगळे आदी होते.

हिरे, मोती, सोने-नाणे अशी सु. पन्नास लाखाची लूट या स्वारीत मिळाली. लुटीची बातमी ऐकून औरंगजेबाला मोठा धक्का बसला. मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी दाऊदखान कुरेशी चांदवडला गेला. मोगलांचे मुख्य जिल्ह्याचे ठिकाण मुल्हेर हे होते. मराठे-मोगल यांत लढाई झाली (१७ ऑक्टोबर १६७०). या लढाईत मोगलांचे अनेक सैनिक व सरदार ठार अगर जखमी झाले. मराठ्यांनी सुरतेचा खजिना नाशिक-त्रिंबक-मार्गे सुरक्षितपणे स्वराज्यात आणला. कोकणात या सुमारास शिवाजी महाराजांनी राजगडहून राजधानी रायगडला हलविली (१६७०). पुढील अल्पकाळातच मराठ्यांनी त्र्यंबकेश्वर, खळा, जवळा, औंढा, पट्टा इ. किल्ले जिंकून घेतले. ५ जानेवारी १६७१ रोजी मराठ्यांनी बागलाणातील साल्हेरचा मजबूत किल्लाही जिंकून घेतला. मराठ्यांच्या दुसऱ्या सैन्याने औसा, निलंगा, नांदेड, उमरखेड इ. भागांत धुमाकूळ घालून बऱ्हाणपूर लुटले. तेव्हा औरंगजेबाने काबूलचा सुभेदार महाबतखान याची दक्षिणेच्या मोहिमेवर नेमणूक केली, तो औरंगाबाद येथे १० जानेवारी १६७१ रोजी दाखल झाला. महाबतखानाच्या हाताखाली दाऊदखानाला देण्यात आले.

दाऊदखान आणि महाबतखान यांच्या भांडणामुळे औरंगजेबाने दाऊदखानाला खानदेशातून हलविले आणि महाबतखानाला बदलले (सप्टेंबर १६७१). त्याच्या जागेवर गुजरातचा सुभेदार बहादुरखान याची नेमणूक केली. पुन्हा मोगल सैन्याने साल्हेरला वेढा घातला. मोगल आणि मराठे यांत घनघोर युद्ध होऊन साल्हेरच्या युद्धात मोगल फौजेची वाताहात झाली. मराठ्यांचा शूर सरदार सूर्यराव काकडे या युद्धात मारला गेला. बहादुरखानाने भीमा नदीच्या काठी श्रीगोंद्याजवळ पेडगाव येथे छावणी घातली आणि औरंगजेबाच्या आज्ञेने तिथे एक किल्ला बांधला. हाच बहादुरगड होय. पुढे अनेक वर्षे याचा उपयोग मोगलांची छावणी म्हणून होत होता.

या सुमारास औरंगजेबाला सतनामी जमात आणि वायव्य प्रांतातील पठाण यांच्या प्रखर बंडाशी मुकाबला करावा लागला (१६७२). त्याने मुअज्जम आणि इतर अनुभवी सरदार यांना दक्षिणेतून बोलावून घेतले. आणि बहादुरखानाला सुभेदार आणि  लष्करी मोहिमेचा सूत्रधार नेमले. दक्षिणेतून सैन्य गेल्यामुळे त्याची कुचंबणा झाली. वायव्य प्रांतातील पठाणांचे बंड वाढले, बख्शी मुहम्मद अमीन याची पठाणांनी बेअब्रू केली. शिवाय मोगलांना सर्व प्रकारची हानीही सहन करावी लागली. तेव्हा औरंगजेब बंड शमविण्यासाठी स्वतः दिल्लीतून बाहेर पडला (एप्रिल १६७४).

आदिलशहा, मराठे–इंग्रज

अली आदिलशहा २४ नोव्हेंवर १६७२ रोजी मरण पावला. त्याचा सात वर्षांचा मुलगा सिकंदर आदिलशहा गादीवर आला. तेव्हा विजापूरचा सरदार रुस्तुम जमान याने त्याच वर्षी बंड केले. विजापूरच्या अंतर्गत गोंधळाचा फायदा घेऊन महाराजांनी विजापूर राज्यावर १६७३ मध्ये आक्रमण केले. विजापूरच्या राज्यातील प्रमुख सरदार खवासखान, अब्दुल मुहम्मद, अब्दुलकरीम बहलोलखान, मुजफ्फरखान इत्यादींनी आपापल्या मर्जीप्रमाणे विजापूर राज्यातील महत्त्वाची स्थळे ताब्यात घेतली होती. खवासखानाकडे विजापूरचे मुख्यप्रधानपद आले होते. महाराजांचा डोळा पूर्वीपासूनच सातारा, कोल्हापूर भागांबर होता. संधी साधून त्यांनी पन्हाळगड घेतला (६ मार्च १६७३). सातारा, परळी, कोल्हापूर इत्यादी स्थळेही त्यांनी जिंकली. बहलोलखानाशी झालेल्या युद्धात (मार्च १६७३) उमरानी येथे सेनापती प्रतापराव गुजर याने खानाला कोंडले आणि नंतर मैदानातून जाऊ दिले. याचा बोल महाराजांनी लावला, तेव्हा २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरी येथे प्रतापरावाने बहलोलखानावर हल्ला केला. या लढाईत प्रतापराव ठार झाला.

मोगल सरदार दिलेरखान आणि विजापूरचा सरदार बहलोलखान यांनी युती करून मराठ्यांवर चाल केली; पण या युतीला न जुमानता बहलोलखानाचा मराठ्यांनी दणदणीत पराजय केला. मराठ्यांनी संपगाव, लक्ष्मेश्वर, बंकापूर, हुबळी इ. स्थळे लुटली. महाराजांनी कोकणात मोगल आणि सिद्दी यांचा आरमारी युद्धात पराजय केला; पण सिद्दींचा सरदार सुंबुल याच्याबरोबर मराठ्यांचा आरमारी अधिकारी दौलतखान हाही जखमी झाला.

इंग्रजांनी सिद्दी आणि महाराज यांत मध्यस्थी करण्याच प्रयत्न केला; परंतु सिद्दी आरमाराला इंग्रज मुंबईत आश्रय देतात, या सबबीवर ही मध्यस्थी शिवाजी महाराजांनी झिडकारली. इंग्रजांची मुख्य गाऱ्हाणी म्हणजे राजापूर आणि इतर स्थळांतील वखारींच्या लुटीबद्दल भरपाई मागण्यासंबंधी होती. मराठ्यांच्या हाती जंजिरा पडू नये, ही इंग्रजांची इच्छा असूनही, व्यापार-उदीम, जकात आणि मुक्त संचार यांसाठी मराठ्यांशी मिळते घेण्याचे धोरण त्यांना स्वीकारावे लागले. अखेर वाटाघाटी होऊन इंग्रज आणि महाराज यांच्यात तह करण्याचे ठरले (१६७४).

रामदास-शिवाजी संबंध

शिवाजी महाराजांच्या हाती सातारा-चाफळ १६७३ मध्ये पडले. त्यानंतर महाराजांनी चाफळच्या राममंदिराची सर्व व्यवस्था केली आणि परळी (सज्जनगड) हे समर्थ रामदासांचे वास्तव्य ठिकाण ठरवून त्यांच्यासाठी मठ बांधून दिला. शिवाजी महाराजांना समर्थांविषयी पूज्यभाव होता; तथापि महाराजांच्या स्वराज्यस्थापनेच्या कामात समर्थांचा प्रत्यक्ष संबंध किती होता, हे दाखविणारा पुरावा मिळत नाही. शिवराय-समर्थ भेट ही प्रथम राज्याभिषेकाच्या अवघी दोन वर्षे आधी म्हणजे १६७२ मध्ये झाली, असे पत्रव्यवहारावरून दिसते. शिवाजीराजांनी चाफळला दिलेल्या इनामाचे साल लक्षात घेता, हे दोन्ही थोर पुरुष परस्परांना ओळखत असावेत, हे निश्चित आहे. [⟶ रामदास].

राज्याभिषेक

मोगलांचे प्रभावी सैन्य उत्तरेत गुंतले आहे आणि दक्षिणेत त्यांचा कोणीच मातब्बर सेनापती नाही, शिवाय विजापूरही हतबल अवस्थेत आहे, ही संधी साधून शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचा घाट घातला आणि लवकरच राज्याभिषेकाचा अपूर्व सोहळा रायगडावर संपन्न झाला.

राज्याभिषेक वैदिक संस्कारांनीच संपन्न व्हावा, असे गागाभट्टादी विद्वानांनी ठरविले. राज्याभिषेक समारंभाचे तपशील समकालीन कागदपत्रांवरून उपलब्ध झाले आहेत. २९ मे १६७४ रोजी महाराजांचे उपनयन, तुलादान आणि तुलापुरुषदान हे समारंभ पार पडले. ३० मे १६७४ रोजी पत्नींशी वैदिक पध्दतीने पुन्हा विवाह करण्यात आले. पुढील सहा दिवस विविध समारंभ होत होते. ६ जून १६७४ ज्येष्ठ शुध्द द्वादशी, शुक्रवारी, शके १५७६, शिवाजी महाराजांनी राजसिंहासनावर बसून छत्रचामरे धारण केली. स्वराज्यातील सर्व किल्ल्यांवरही समारंभ झाले.

तोफांना सरबत्ती देण्यात आल्या. राज्याभिषेकापूर्वी महाराजांनी भवानी देवीला अनेक वस्तूंबरोबर सोन्याचे एक छत्र अर्पण केले. प्रतापगडावर दानधर्माचा मोठा सोहळा झाला. या प्रसंगी शिवाजी महाराजांनी ‘क्षत्रियकुलावतंस’ व ‘छत्रपती’ अशी दोन बिरुदे धारण केली. राज्याभिषेकाच्या नंतर १२ जून १६७४ रोजी इंग्रज आणि महाराज यांत तह झाला. तहाच्या अटीप्रमाणे इंग्रज हे मराठी राज्यात वखारी काढणे, व्यापार करणे इ. व्यवहार मोकळेपणाने करू लागले. मराठी राज्यात आपले नाणे चालावे किंवा मोगल राज्यातील वखारींच्या लुटीची भरपाई मराठ्यांनी करून द्यावी, अशा अवास्तव मागण्या शिवाजी महाराजांनी नाकारल्या.

राज्याभिषेकानंतर जिजाबाईंचा मृत्यु झाला (१७ जून १६७४). याशिवाय काही आकस्मिक मोडतोडीच्या घटना रायगडावर घडल्या. तेव्हा निश्चलपुरी या मांत्रिकाने पुन्हा एक अभिषेक करण्याचा सल्ला दिला व तो तांत्रिक अभिषेक शिवाजी महाराजांनी केला.

राज्याभिषेकानंतरच्या मोहिमा

राज्याभिषेक समारंभानंतर शिवाजी महाराजांनी पुन्हा वऱ्हाड, खानदेश या मोगल इलाख्यात चढाया केल्या (१६७४-७५). महाराजांनी जंजिऱ्याचे सिद्दी आणि मुंबईकर इंग्रज यांवर दडपण आणले आणि कारवारकडचा विजापूरच्या आधिपत्याखालील प्रदेश घेण्याची योजना आखली. विजापूरचा मुख्य प्रधान सिद्दी खवासखान आणि पठाण सेनापती बहलोलखान यांत तेढ होती आणि पठाणांचे पारडे जड होऊन दोन तट पडले. याचा फायदा घ्यावा म्हणून शांततेच्या तहाचे प्रलोभन दाखवून महाराजांनी मोगल सुभेदार बहादुरखान याला निष्प्रभ केले. विजापूरावर आक्रमण केले. या स्वारीत कारवार, अंकोला, सुपे ही स्थळे घेऊन अंकोल्यापर्यंत आपली हद्द कायम केली.

बहलोलखान याने त्यांना विरोध केला नाही. स्वारीत त्यांनी आदिलशाहीकडून फोंड्याचा किल्ला सर केला (मे १६७५). या वेळी महाराजांनी बहलोलखानाला भरपूर लाच देऊन स्वस्थ बसविले, अशी त्यावेळी वदंता प्रसृत झाली. खवासखानाने मोगल सुभेदार बहादुरखान याच्याशी सख्य करून विजापूरची अंतर्गत कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. ऑक्टोबर १६७५ मध्ये पंढरपूर येथे बहादुरखान आणि खवासखान यांत करार झाला. शिवाजी महाराजांनी पारतंत्र्यात असलेल्या महाराष्ट्र देशात स्वराज्याची स्थापना करुन त्यांच्या आयुष्याच्या शेवटपर्यंत त्यांनी बऱ्याच मोठ्या प्रमाणावर विस्तार केला. महाराजांनी महाराष्ट्राच्या ज्या भागात स्वराज्याची स्थापना केली त्या भागाचे सभोवताली विजापूरचा बादशाह, दिल्लीचे मोगल, पोर्तुगीज गोवळकोड्यांचे नवाब हे प्रबल राजसत्ताधारी असून त्यांच्यासमवेत लढा देऊन त्यांनी स्वराज्याचा विस्तार केला होता.

छत्रपतीची सत्ता तळकोकणापासून उत्तर कोकणापावेतो स्थापित झाल्यावर पश्चिम बाजूला लागून असलेल्या अरबी समुद्रावरुन वावरणाऱ्या त्यांच्या शत्रुराष्ट्रांपासून कोकण प्रांताचे रक्षणासाठी त्यांना गरज भासू लागली. परंतु या किनाऱ्यावर दंडाराजपुरी हा हबशाचा मजबुतीचा प्रसिद्ध “जंजिरा” किल्ला होता.

महाराजांचे आणि जंजिऱ्याच्या हबश्याचे भांडण होते. महाराजांनी राजधानी रायगड केली तेव्हा हा डोंगर त्यांनी इ.स. 1646 मध्ये हबशाकडून प्राप्त केला होता. त्यावेळेपासूनच त्यांचे संबंध शत्रुत्वाचे होते. गडावर नेमणूक केलेल्या लोकांना शिवाजी महाराजांनी कडक शिस्त लावली होती.

छत्रपतींच्या कारकिर्दीच्या अखेरपावेतो दुर्गाचे महत्व कायम होते. महाराज त्यांच्या राज्यातील किल्ल्याची स्वत: पाहणी करीत असत. युद्धातील कलेचे ज्ञान, शिक्षण, शिपायांना देण्याची खबरदारी महाराज घेत असत. परंतु नुसते शिक्षण न देता शिपायांची मनोरचना बनविण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले होते. अशा या पराक्रमी राजाला मानाचा मुजरा.