चातुर्मासाचे महत्त्व

वर्षाऋतूच्या चार मासांना ‘चातुर्मास’ म्हणतात. या चार मासांच्या काळामध्ये श्रीविष्णु शेषशय्येवर योगनिद्रा घेत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवसांमध्ये सूर्य कर्क राशीत स्थित असतो. श्रीविष्णूच्या उपासनेसाठी हा काळ उत्तम मानला जातो. सर्व तीर्थस्थाने, देवस्थाने, दान आणि पुण्य चातुर्मास आल्यावर श्रीविष्णूच्या चरणी अर्पण होतात. तसेच या काळात पडणार्‍या पावसाच्या पाण्यासह मातीतून नैसर्गिक शक्ती नदीत मिसळत असल्याने या काळात तीर्थक्षेत्री नदीमध्ये स्नान केल्याने पापक्षालन होते. वातावरणात रज-तमाचा प्रभाव वाढल्याने उपवास, व्रतवैकल्ये केल्यास ती अधिक फलद्रूप होऊन सात्त्विकता वाढवतात.

जो मनुष्य चातुर्मासात नदीत स्नान करतो, विशेषतः तीर्थस्थानावरील नदीत स्नान करतो, त्याच्या अनेक पापांचा नाश होतो; कारण पावसाचे पाणी ठिकठिकाणांहून मातीच्या माध्यमातून प्राकृतिक शक्तीला आपल्यासह वाहत आणत नदीच्या वाहत्या पाण्यासह समुद्राकडे घेऊन जाते. चातुर्मासात श्रीविष्णु जलावर शयन करतो; म्हणून जलामध्ये त्याचे तेज आणि शक्ती यांचा अंश असतो. त्यामुळे त्या तेजयुक्त जलात स्नान करणे सर्व तीर्थस्थानांपेक्षाही फलप्रद असते. चातुर्मासात एका बालदीत १ – २ बिल्वपत्रे टाकून ‘ॐ नमः शिवाय ।’ हा मंत्र चार-पाच वेळा जपून स्नान करणे विशेष लाभदायी असते. त्याने शरिराचा वायूदोष दूर होतो अन् आरोग्याचे रक्षण होते.

चातुर्मासातील विविध धारणा :

  • चातुर्मासात एकाच प्रकारच्या अन्नाचे भोजन करणारा मनुष्य निरोगी रहातो.
  • केवळ एकवेळ भोजन घेणार्‍याला बारा यज्ञांचे फळ मिळते.
  • जो केवळ पाणी पिऊन रहातो, त्याला प्रतिदिन अश्वमेघ यज्ञाचे फळ मिळते.
  • जो केवळ दूध किंवा फळ खाऊन रहातो, त्याची सहस्रो पापे तात्काळ नष्ट होतात.
  • जो पंधरा दिवसांतून एक दिवस उपवास करील, त्याच्या शरिरातील अनेक दोष नष्ट होतात आणि चौदा दिवसांमध्ये त्याच्या शरिरात भोजन केल्यानंतर जो रस निर्माण होतो, त्याचे शक्तीत रूपांतर होते; म्हणून एकादशीचा उपवास महत्त्वपूर्ण असतो. हे चार मास नामजप आणि तपस्या यांच्यासाठी अतीयोग्य आहेत.