चित्रकथी

सिंधुदुर्गातील ठाकर समाजामध्ये ११ लोककलांची परंपरा होती. यामध्ये चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या, चामड्याच्या बाहुल्या, पिंगळी, पोतराजा, पांगुळ बैल असे प्रकार होते. चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या या लोककलेला सुमारे तीनशे वर्षांची परंपरा आहे. संपूर्ण राज्यामध्ये केवळ सिंधुदुर्गातच या लोककला सादर व्हायच्या

खेळाच्या आधी तंबोरा पूजन केले जाई. लग्नसमारंभातही चित्रकथी, कळसूत्री बाहुल्या आणि पारंपरिक गाणी असे कार्यक्रम केले

जातात.

चित्रकथी म्हणजे कागदावर पौराणिक कथांची चित्रे काढून ती चित्रे समोर धरून त्यावरून कथा सांगणे. कधी कधी त्या चित्राला खाली काठी लावून ती एकाशेजारी एक अशी चित्रे लावून त्याव

रून कथा सांगणे. जसजशी कथा पुढे सरकत जाते, तसतसे त्या कथेच्या अनुषंगाने विविध चित्रे एकामागोमाग प्रेक्षकांच्या समोर येत राहतात. कलाकार ती चित्रे हातात धरून त्यानुसार कथा रंगवत असतो. चित्रे दाखवून कथाकथन करणारे ते चित्रकथी. हरदास, गोंधळी जशी कथा सादर करतो व रात्र जागवतो अथवा हरदासी कीर्तनकार जसे उत्तररंगात आख्यान लावतात तसाच पूर्वी चित्रकथी समाज रात्रभर रामायण, महाभारत आणि पुराणे यांतील कथांवर तयार केलेल्या चित्रांनुसार निरुपण करत असे. हुबेहूब चित्रांमधून आणि प्रभावी संवाद कौशल्यातून कथा जिवंत करण्‍यात त्‍या समाजाचा हातखंडा असे. महाराष्ट्रात चित्रकथींच्‍या पैठणशैली आणि पिंगुळीशैली अशा दोन शैली प्रसिद्ध आहेत. मानवाला जेव्हा लिखित भाषा अवगत नव्हती, त्याकाळी चित्रभाषेचा जन्म झाला. विविध प्रकारची चित्रे काढून त्याद्वारे कथाकथन करण्याची कला मानवाने निर्माण केली. रामायण, महाभारत यांसारखे धार्मिक ग्रंथ हे प्रथम चित्रांच्या भाषेत प्रकाशित झाले व चित्रांच्या भाषेतूनच त्या ग्रंथांचे वाचन सुरू झाले. गावोगावी भटकंती करून मंदिरे, धमर्शाळा यांमधून चित्ररूपी ग्रंथांचे वाचन करणारा एक समाजही निर्माण झाला. तो चित्रकथी समाज होय.