‘वसुधैव कुटुम्बकम्’ या दोन शब्दांतच “मराठी ग्लोबल व्हिलेज” ह्या संकेतस्थळाच्या संकल्पनेचे सार सामावले आहे!

जगात मराठी भाषा ९,००,००,००० पेक्षा अधिक लोकांकडून भावना व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून वापरली जाते. लोकसंख्येतील क्रमवारीनुसार मायमराठी मातृभाषा जगात पंधरावी तर हिंदुस्तानातील चौथी भाषा होय.

‘माझा मराठीचा बोलू कौतुके, परि अमृतातेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळविन।’ या शब्दात अमृततुल्य मराठीचा गोडवा संत ज्ञानेश्वरांनी वर्णिला तर ‘लाभले आम्हांस भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्म, पंथ, जात एक ऐकतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी। अशा शब्दात माय मराठीची सुरेष भटांनी महती व्यक्त केलीय’

महाराष्ट्राची संस्कृती वैविध्याने नटलेली परंतु स्वत:ची ओळख राखणारी..(.. शौर्याचे प्रतिक म्हणजे महाराष्ट्र, कलेची ओळख म्हणजे महाराष्ट्र, साहित्याची खाण म्हणजे महाराष्ट्र… सौन्दर्याचे लेणे म्हणजे महाराष्ट्र, संस्कृतीचे वरदान लाभलेला महाराष्ट्र, आधुनिकतेचा साज ल्यायलेला महाराष्ट्र, परंपरेची शान म्हणजे महाराष्ट्र, आधुनिक तंत्रज्ञान अंगिकारलेला महाराष्ट्र. शेतीपासुन ते तंत्रज्ञानापर्यंत श्रेष्ठत्वाचे वरदान लाभलेला महाराष्ट्र. कला – साहित्य क्रीडा – विज्ञान – संस्कृती सर्वच बाबतीत आघाडीवरती असलेला ‘आपला महाराष्ट्र’!

महाराष्ट्रातील मराठी माणसाने आज अटकेपार झेंडा सर्वार्थाने रोवला आहे. जागतिक पातळीवर मराठी माणसाने स्वत:च्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे.

जगाच्या पाठीवर विविध देशांमध्ये वसलेल्या मराठी माणसाची नाळ आजही महाराष्ट्राशी, जन्मभूमीशी, मातृभूमीशी जोडलेली आहे! महाराष्ट्रातील लोकांना देखील स्वकर्तृत्वाने मराठीची पताका सातासमुद्रापार फडकवणा-या आपल्या ह्या कुटुंबातील दिग्गजांबद्दल अभिमानच आहे ! आज विज्ञान आणि तंत्रज्ञानात झालेल्या प्रगतीने “ग्लोबल व्हिलेज ” ही संकल्पना मूर्तस्वरुपात उतरली आहे. आपल्या ह्या सुंदर कुटुंबातला संवाद आता सहज शक्य झालाय. एक सशक्त मराठी कुटुंब म्हणून बंघूभावाने एकमेकांशी संवाद साघू. विकास घडवू. विविध देशातील आपल्या मराठी दूंतांचे कौतुक करु. आपलं मराठी कुटुंब फुलवूया.

एकमेकांच्या सहाय्यानेच ह्या विश्वात बलशाली मराठी समाज घडेल.

तेंव्हाच,माझ्या मराठीचा वेलू शोभे विश्वावरी! .. नाही का ?

रुजवात करतेय… पण आपल्या सहभागाशिवाय हे शक्य नाही…

– सौ. मृदुला (जोशी) अतुल पुरंदरे
(मराठी ग्लोबल व्हिलेज)