कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’

कर्करोगग्रस्तांना आणि त्यांच्या कुटुंबीायांना सर्वतोपरी आधार देण्याचे काम ‘कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’ ही संस्था करते. ‘आपण संपलो’ अशी भीती निर्माण करणाऱ्या कर्करोगग्रस्त रुग्णांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना स्वावलंबनाच्या वाटेवर आणण्याचा ध्यास या संस्थेने घेतला आहे. गरजूंना मदत आणि मदतीसाठी सदैव होकार हेच जणू संस्थेचे ब्रीदवाक्य ठरले आहे.गेली ४३ वर्षे सुरू असलेली कर्करोगासंबंधीची सीपीएएची मोहीम आता अधिकच तीव्र झाली आहे. महिन्याला तीन हजारांहून अधिक रुग्णांना आवश्यक ती मदत करणाऱ्या या संस्थेसाठी देणग्या येत असल्या तरी वाढती मागणी पाहता समाजातून अधिकाधिक दानशूरांनी पुढे येण्याची गरज आहे. आलेली मदत अपुरी पडत असली तरी मदतीसाठी आलेल्या रुग्णांना नकार देणे संस्थेच्या तत्त्वात बसत नाही, त्यामुळे काम पुढे सुरूच राहते.  ही संस्था कर्करोगाचे सर्वागीण व्यवस्थापन, या आजाराविषयी जनजागृती, प्राथमिक पातळीवर असतानाच आजाराचे निदान करणे, रुग्णांची शुश्रूषा तसेच त्यांचे सर्वागीण पुनर्वसन अशी विविध कामे करते. महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावरील संशोधनासाठी संस्थेने प्रयोगशाळाही सुरू केली आहे.महालक्ष्मीच्या वर्दळीच्या रस्त्यावर ई मोझेस रोडवरील आनंद निकेतन म्हणजे विविध क्षेत्रांत काम करतअसलेल्या सामाजिक संस्थांचे कार्यस्थळ. प्रवेशद्वारातून उजवीकडे वळून रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत चालत गेले की तेथे कॅन्सर पेशंट्स एड सोसायटीचे छोटेखानी कार्यालय दिसते. या कार्यालयाच्या मागच्या भागातच सामान घेऊन जाणारा ट्रक दिसत होता. वस्तूंनी भरलेली मोठमोठी खोकी बांधून ठेवलेली होती. मागच्या बाजूला पणत्यांचे कच्चे सामान रचून ठेवले होते. तिथेच मधल्या भागात लावलेल्या लांबच लांब टेबलाभोवती बसून १५-२० स्त्रिया पणत्या तयार करत होत्या. मॉल आणि ब्रॅण्डेड स्टोअरमध्ये दिसणाऱ्या चमचमत्या, अत्याकर्षक पणत्यांचा उगम येथे होतो आणि त्या तयार करणारे सुंदर हात हे कर्करोगावर मात करत असलेल्या महिला किंवा त्यांच्या नातेवाईक मुलींचे असतात. आयुष्यातून उठण्याची भीती निर्माण करणाऱ्या आजारातून आयुष्याला आकार देण्याचे काम करणाऱ्या या संस्थेचे नेमके चित्र या पुनर्वसन केंद्रातून आपसूक दिसते.
२५ हजार रुग्णांना मदत
संस्थेच्या कामाची सुरुवात सप्रू यांच्या घरातूनच झाली. त्यानंतर फोर्ट परिसरातील मल्होत्रा हाऊसमध्ये भाडय़ाने जागा घेण्यात आली. संस्थेचे आजही तेथे लहानसे कार्यालय आहे. १९७१ पासून सोफिया कॉलेज मेडिकल सेंटरमधून तपासणी शिबिरांना प्रारंभ झाला. १९७९ मध्ये संस्थेची दिल्ली येथे शाखा सुरू झाली. १९८४ मध्ये पुनर्वसन केद्रांची सुरुवात झाली. आतापर्यंत या केंद्रातून तब्बल २५ हजार रुग्णांना मदत मिळाली असून आता या केंद्राची वार्षिक उलाढाल एक कोटी रुपयांवर गेली आहे. सध्या जीप, व्हॅन, रुग्णवाहिका मिळून संस्थेकडे ११ वाहने आहेत. संस्थेचे काम आणि व्यापक जनहित लक्षात घेऊन टाटा स्मारकरुग्णालयाने कर्करोग प्रतिबंधात्मक विभाग सुरू करण्यासाठी सीपीएएची मदत मागितली. आज टाटाच्या विविध विभागांमध्ये संस्थेचे स्वयंसेवक काम करत आहेत. दरम्यानच्या काळात संस्थेच्या कार्यकर्त्यांनी परदेशातील आरोग्य परिषदांमध्ये कर्करोगावरील सर्वेक्षण, संस्थेचे काम मांडले. भारतातील बहुसंख्य रुग्णांच्या कर्करोगामागील कारण ठरलेला तंबाखू हद्दपार करण्यासाठी संस्थेने मोहीम हाती घेतली. गर्भाशय मुखाच्या कर्करोगासाठी अभ्यास सुरू केला, प्रयोगशाळा थाटली. यासाठी संस्थेला देशविदेशातून अनंत पुरस्कार मिळाले. १९९६ मध्ये महालक्ष्मीच्या आनंद निकेतनमध्ये संस्थेला कायमस्वरूपी जागा मिळाली. रुग्ण आमच्याकडे येण्याऐवजी आम्हीच रुग्णांपर्यंत पोहोचतो. राज्याच्या ग्रामीण भागात तसेच गुजरात, राजस्थान, दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये तसेच मुंबई-पुण्यातील कॉर्पोरेट कार्यालयांमध्येही सातत्याने शिबिरे सुरू असतात, जनजागृती करून लवकर निदान होण्याचे, उपचारांचे महत्त्व सांगणे हे संस्थेचे उद्दिष्ट आहे, असे संस्थेच्या कार्यकारी संचालक नीता मोरे म्हणाल्या.
कामाची पद्धत
*कर्करोगाचे सर्वागीण व्यवस्थापन : आजार होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या घटकांबाबत जागृती करण्यापासून आजारातून बरे होत असलेल्या रुग्णांना स्वावलंबी करण्यापर्यंत सर्व प्रकारची मदत संस्थेकडून केली जाते.
*जनजागृती : तंबाखूसेवनामुळे भारतातील सर्वाधिक रुग्ण हे मुखाच्या कर्करोगाचे असतात. याखेरीज सततच्या प्रसूती, शारीरिक अस्वच्छता यामुळेही या आजाराची शक्यता वाढते. या सवयी बदलण्याबाबत जागृती करण्यात येते.
*लवकर निदान : अनेकदा हा आजार सुप्त स्वरूपात असतो. त्याची कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने त्यावर उपचार होत नाही. त्यामुळे संस्थेकडून तपासणी केंद्र तसेच विविध ठिकाणी पार पडत असलेल्या शिबिरांमधून निदानासाठी प्राथमिक तपासणी करण्यात येते. या तपासणीतून संदिग्ध निकाल आल्यास रुग्णाच्या पुढील तपासणीही करण्यात येतात.
*विमा : कर्करोगाबाबत जागृती व्हावी, त्यासाठी तपासणी करण्यासाठी लोकांनी पुढे यावे असा हेतू ठेवून ही योजना १९९४ पासून राबवण्यात येत आहेत. आठ हजार रुपये भरून पुढील १५ वर्षांसाठी विमा उतरवता येतो. या कालावधीत कर्करोगाचे निदान झाल्यास दोन लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते. १९९४ ते २०१३ या काळात १२,३३२ जणांनी हा विमा घेतला आहे. या माध्यमातून आतापर्यंत ५ कोटी २८ लाख ६१ हजार रुपयांची मदत देण्यात आली आहे.
*रुग्णशुश्रुषा : रुग्णांच्या निवासापासून रुग्णालयापर्यंत वाहतूक व्यवस्था, लहान मुलांसाठी प्लेग्रुप, कृत्रिम अवयवही देण्यात येतात. संस्थेचे कार्यकर्ते सर्व प्रमुख रुग्णालयात नियमित जातात. तिथे येणाऱ्या रुग्णांना आजाराबाबतची माहिती देणे, त्यांना आवश्यक असलेली मदत करणे तसेच वस्तू किंवा सेवेच्या मदतीसाठी संस्थेशी समन्वय साधण्याचे काम केले जाते. इतर संस्थांमधून मदतीसाठी मार्गदर्शन, निवासाची व्यवस्था, अन्न पुरवण्यात येते.
*पुनर्वसन केंद्र : कौशल्याचा वापर करत तसेच विविध प्रशिक्षण देऊन वस्तू उत्पादनांच्या कामात रुग्णांची मदत घेतली जाते. शैक्षणिक साहित्य, ज्यूटच्या पिशव्या, दिवे तसेच शिलाईकाम केले जाते. या संस्थेच्या पुनर्वसन केंद्रात तयार झालेल्या वस्तू ताज हॉटेलची साखळी, सिटी बँक, वेस्टसाइड, सॅण्डोज, नीलकमल प्लास्टिक, बॉम्बे स्टोअर्स आदींमध्ये ठेवल्या जातात. या कामासाठी मासिक उत्पन्न दिले जाते.
कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन’

विख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, अभिनेत्री वर्षां उसगांवकर, जुही चावला, गीतकार प्रसून जोशी यांच्यासारख्या अनेकांनीही ‘सीपीएए’ संस्थेच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे. मात्र देशातील कर्करोगग्रस्तांचा वाढता आकडा, त्यांच्यावरील उपचारांचा वाढता खर्च आणि रुग्णांच्या अन्य गरजा विचारात घेता संस्थेला भक्कम आर्थिक पाठबळाची निश्चितच गरज आहे.
“कर्करोगासाठी पैसे, अन्न आणि औषधे यांचा अधिकाधिक पुरवठा करताना मला जाणीव झाली की, कर्करोगाचा परीणाम हा केवळ वैद्यकीय उपचारांपुरता मर्यादित नाही. तो भीती पसरवतो. कर्करोगविरोधी सर्वागीण लढाईचे उद्दिष्ट ठेवून सीपीएए सुरू करण्यात आली. देशातील अनेक संस्थांसाठी ही संस्था प्रेरणादायी ठरली.”
वाय.के.सप्रू, संस्थापक-अध्यक्ष, सीपीएए

 • पत्रव्यवहारासाठी पत्ता

  5,Malhotra House, Opp. GPO, Mumbai – 400 001 ,
  Smt. Panadevi Dalmia Cancer Management Centre
  King George V Memorial, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai – 400 011

 • दूरध्वनी

  +91 22 22698964 | +91 22 22693790

  Fax: +91 22 22697255

  +91 22 24924000 | +91 22 24928775 |

  +91 22 24921856