घनगड

मुळशीच्या पश्चिमेला एक मावळ भाग आहे यालाच ‘कोरसबारस’ मावळ म्हणतात.याच मावळात येणारा हा घनगड.आड बाजूला असलेला हा किल्ला मात्र आपल्यासारख्या ट्रेकर्सला नेहमीच खुणावत राहतो.येथील जनजीवन शहरी सुखसोयींपासून दुरावलेले.

इतिहास : किल्ल्याच्या बद्दल इतिहासात फारसा उल्लेख आढळत नाही.मात्र किल्ला कोळी सामंताकडून निजामशहाकडे आणि पुढे आदिलशहाकडे आणि नंतर मराठ्यांकडे आला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे : किल्ल्यावर प्रवेश केल्यावर डाव्या हाताला असणारी टेकडीवर जाणारी वाट पकडावी. या वाटेने वर जातांना एका पडक्या दरवाजातून आपण गडमाथ्यावर प्रवेश करतो.गडावर पडक्या घरांचे अवशेष आहेत.पाण्याची एक ते दोन टाकी आहेत आजमितिस मात्र ती फुटलेली आहेत.बाकी किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत.किल्ल्यावरून सुधागड, सरसगड अणि तैलबैला ची भिंत हा परिसर दिसतो.तसेच नाणदांड घाट ,सव्वष्णीचा घाट ,भोरप्याची नाळ या कोकणातील घाटवाटा सुध्दा दिसतात.

गडावर जाण्याच्या वाटा :
ऐकोलेमार्गे : किल्ल्यावर जाण्यासाठी एकच वाट आहे अणि ती ऐकोले गावातूनच वर जाते.मुंबईकरानी अणि पुणेकरांनी लोणावळा गाठावे.लोणावळ्याहून भाबुर्डेकडे जाणारी एस टी पकडावी.लोणावळा ते भांबुर्डेहे अंतर ४० कि.मी चे आहे. भांबुर्डेगावातून थेट ऐकोले गावात यावे . भांबुर्डेते ऐकोले हे साधारणतः अंतर २० मिनिटाचे आहे. ऐकोले गावातूनच किल्ल्यावर जाण्याचा रस्ता आहे. गावातून बाहेर पडल्यावर डावीकडची वाट पकडावी.ही वाट थेट किल्ल्यावर जाते.यावाटेने पुढे जातांना गारजाई देवीचे मंदिर लागते.या मंदिरात ”श्री गारआई महाराजाची व किले घनगडाची ” असा शिलालेख कोरलेला आहे. मंदिराच्या समोरच एक तोफगोळा पडलेला आहे. या मंदिराच्या डाव्या बाजूनेच किल्ल्यावर जाणारी वाट आहे. येथून थोडाच वेळात आपण एका कातळकडापाशी येऊन पोहचतो. गडावर जाणारी वाट इग्रजांनी सुरुंग लावून चिणून काढली आहे. १५ फुटाच्या ह्या कडावर थोडे प्रस्तरारोहण करून चढून जावे लागते. आवश्यक असल्यास १५ फुटाचा दोर लावावा. हा कडा पार केला की आपण थेट किल्ल्यातच प्रवेश करतो.

राहण्याची सोय : वर राहण्याची सोय नाही मात्र गारजाई च्या मंदिरात २० लोकांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय : आपण स्वतः करावी.
पाण्याची सोय : किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही
जाण्यासाठी लागणारा वेळ : ऐकोले गावातून अर्धातास,
जाण्यासाठी उत्तम कालावधी : सर्व ऋतुत