धोडप

नाशिक जिल्ह्याच्या मध्यभागातून जाणारी सह्याद्रीची पूर्वपश्चिम डोंगररांग म्हणजे अजंठा-सातमाळा ही होय. अजंठा-सातमाळा रांग म्हणजे गिरीदुर्गाची साखळी आहे. या साखळीमधील सर्वात उंच आणि बलदंड किल्ला म्हणजे धोडप हा होय. शिवलिंगासारख्या आकाराचा माथा असलेला धोडप या आकारामुळे दूरवरुन स्पष्टपणे ओळखू येतो.

धोडपला येण्यासाठी कळवणहून ओतूर गाव गाठल्यास उत्तरेकडील डोंगरदांडाने धोडपवर चढाई करता येते. डोंगराच्या पठारावर धोडपचा माथा उंचावलेला आहे. उत्तरेकडून अथवा दक्षिणेकडून आपण चढाई करुन प्रथम या पठारावर येतो. या विस्तृत पठारावर असलेल्या झाडीझाडोप्यामध्ये लपलेल्या अनेक वास्तू आपल्याला पहायला मिळतात. यामध्ये अनेक जोती, मंदिरे, पुष्करणी, मुर्ती, कबरी आढळतात.

या पठारावर सोनारवाडी नावाचे छोटेसे गाव म्हणण्यापेक्षा छोटीशी वस्ती आहे. या वस्तीच्या जवळूनच गडाच्या माथ्यावर जाणारी वाट आहे. काही कातळकोरीव पाय-या कड्यावर आहेत. एका बोगदेवजा मार्गाने आपण या बालेकिल्ल्यामध्ये प्रवेश करतो. या माथ्यावर सुळक्यासारखा भाग आहे. या सुळक्यावर चढाई करण्यासाठी गिर्यारोहणाच्या साधनांची तसेच कौशल्याची गरज आहे.
हा सुळका उजव्या बाजूला ठेवून आपण मळलेल्या वाटेने सुळक्याच्या खाली असलेल्या गुहेमध्ये पोहोचतो. यातील एका गुहेत पिण्यायोग्य पाणी आहे. दुस-या गुहेत एक मंदिर आहे. ही जागा मुक्कामाच्यादृष्टीने योग्य आहे. गुहेच्या पुढे सरळ गेल्यावर निमुळती होत जाणारी कातळभिंत आहे. या अरुंद भिंतीला मधेच तोडण्यात आले आहे. पन्नास फूट खोली आणि पस्तीस फुटांची लांबी असलेला मधला भाग छन्नीने कोरुन काढलेला आहे. त्यामुळे त्या बाजूने कोणी शत्रू येथपर्यंत पोहचू नये अशी ही व्यवस्था आहे. हा माचीसारखा भाग मोकळा असून उंचावर असल्यामुळे येथून गडाचा परिसर तसेच धोडपचा वरचा सुळका उत्तम प्रकारे दिसतो. येथून चांदवड, इंद्राई, साडेतीन रोडगा, राजदेहेट, कांचन मंचन, विखारा, कन्हेरा, खळ्याजवळ्या, सप्तशृंग, अहीवंतगड, अचला अशी सातमाळा रांग पहायला मिळते. दक्षिणेकडील विस्तृतप्रदेश न्याहाळता येतो. तसेच उत्तरेकडील साल्हेर सालोटा तसेच चौल्हेरचेही दर्शन होते. साधारण २५ किल्ले तरी धोडपवरुन दिसतात
 
इतिहास
 
राघोबा दादा आणि पेशवे यांच्यामध्ये झालेल्या संघर्षामध्ये धोडपचे स्थान महत्त्वाचे आहे. येथेच त्यांची दिलजमाई झाली होती. पुढे १८१८ मध्ये हा किल्ला इंग्रज अधिकारी ब्रिग्ज याने मराठ्याकडून जिंकून घेतला.

जाण्याची सोय
धोडप किल्ल्याच्या पायथ्याला धोडांबे नावाचे गाव आहे. हे किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला असून ते नाशिकला गाडीमार्गाने जोडलेले आहे. नाशिककडून धुळ्याकडे आग्रा महामार्ग क्र.३ जातो. या राष्ट्रीय महामार्गावर चांदवडच्या अलिकडे वडाळाभोईचा थांबा आहे. या वडाळाभोई मधून धोडांबेकडे जाण्यासाठी गाडीरस्ता आहे.