आपल्या घरामध्यें नवें बाळ जन्माला येणें ही मोठी भाग्याची गोष्ट आहे असें सर्वत्र मानण्यांत येतें . बाळाचा जन्म म्हणजे दोन्ही घराण्यांचा आनंद . बाळ म्हणजे जणुं कुलदीपक . त्याचें स्वागत करावयाचें ही अभिमानाची गोष्ट .
साधारणपणें सहा महिने संपले आणि सातवा उजाडला म्हणजे मुलीला चांगला मुहूर्त बघूण माहेरीं आणण्याची चाल आहे . अशा वेळीं सासरची मंडळी मुलगी पाठविण्यापूर्वी ‘डोहाळजेवाणा ‘ चा समारंभ करतात . गणगोतांतील स्त्रिया आणि शेजारच्या आयाबाया बोलावून सवाष्णींच्याकडून समारंभानें मुलीची ओटी भरण्यांत येते . त्याचबरोबर सर्वांना ऐपतीप्रमाणें थाटामाटाचें जेवणहि देण्यांत येतें , म्हणजे य निमित्तानें गर्भार्शीच्या आवडीचे पदार्थ सर्वांच्या सहवासांत तिला जेवूं घालणें आणि तिला उत्तेजन देणें ही या मागची भूमिका असते .

माहेरीं देखील याच प्रकारें ‘डोहाळ जेवण ‘ करण्याचा प्रघात आहे . परंतु त्यांतहि प्रकार असतात . मुलीला बागेंत नेऊन , नावेंत बसवून , झुल्यावरचोपळ्यावर बसवून , मखरांत बसवून आणि फुलांनीं सजवून ज्याच्या त्याच्या राजीखुशीप्रमाणें जेवूं घालण्यांत येतें . हेतु एवढाच कीं , त्या गर्भार्शीचें मानसिक आरोग्य सुधारावें आणि तिला उत्साह वाटावा . अर्थात दोन्ही घरच्या मंडळींना तेवढेंच कौतुक .
ओटीभरणाच्या दरम्यान गायल्या जाणार्‍या गीतांना डोहाळ्याची गीते संबोधले जाते.

पैल्यांदां गरभार

पैल्यांदां गरभार कांत विचारी आडभिंती

पांची प्रकाराचं ताट रानी म्हईन झाल किती

पैल्यांदा गरभार कांत विचारी गोठ्यायांत

हौशा माज्या कांता घाला अंजीर वट्यायांत

पैल्यांदां गरभार डोळे लागले जिन्नसाचे

माजा ग बाळराज गरे करीतो फणसाचे

पैल्यांदां गरभार डोळे लागले ताकायाचे

माजी ती सूनबाळ हाये लक्षन पुत्रायाचे

पैल्यांदां गरभार डोळे लागले कारल्याचे

माजा ग बाळराज मळे धुंडितो मैतराचे

पैल्यांदां गरभार डोळे लागले कशायाचे

माजा बाळ आणीयीतो आंबे शेंदरी पाडायाचे

पैल्यांदा गरभार तिला सारकी येती घीरी

चांफा चंदन माज्या दारीं बसूं सावलीं त्येच्या नारी

पैल्यांदां गरभार तिला अन्नाची येती घान

हौशा ग भरतार देतो सुपारी कातरून

हिरव्या चोळीला ग बंदा रुपाया सारीयीला

माज्या त्या भैनाईला चोळी गर्भार नारीयीला

पांची प्रकाराचं ताट वर केळाची केळफणी

माज्या त्या भैनाईची वटी भरीती सवाशीनी

पैल्या मासीं... दुसर्‍या मासीं...

पैल्या मासीं रुक्मिनीशीं आली शिसारी अन्नाची

बाग केळी नारळीची त्रिपन केळी बकुळीची

केली ताकीत माळ्याला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

दुसर्‍या मासीं भिमकतनया चढलीसे गर्भ छाया

हर्षयुक्त यादवराया पालटली सर्व काया

प्रमु हर्ष मनीं झाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

तिसर्‍या मासीं भिमकबाळी घालितसे चीर चोळी

पाट समया रांगूयीळी भोजनाला गूळपोळी

भोजनाशी उशीर झाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

चवथ्या मासीं उभी द्वारी पुशी द्वारकिच्या नारी

विनोद करी नानापरी लाजे रुक्मिनी सुंदरी

गजरा येनीमंदी घाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

पांचव्या ग महिन्यांत दिला मंडप बागेंत

पांची पक्वान्नांचा थाट पंक्ति बसल्यात आचाट

मधिं बसवा रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूस रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

सहा महिन्यांची सोहाळी किष्ण पूशीतो डोहाळी

आंबे पाडाचे पिवळे रुक्मिनीचें वय कवळें

वारा विंझनांनीं घाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

सातव्या महिन्याच्या परी आंबुळी ग वेळा खिरी

अंगीं चोळी भरजरी पिवळं पातळ केशरी

वारा विंझनाचा घाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

आठव्या महिन्या आठुंगूळ हार गजरे ग गोकूळ

माळ उंबराची घाला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पुसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

नऊ महिने नऊ दिवस झाली रुक्मिनी प्रसूत

बाळ जन्मलें मदन जैसें सूरव्याचे किरन

चांद लाजूयिनी गेला दिवस सोनीयाचा आला

किष्ण पूसे रुक्मिनीला दिवस सोनीयाचा आला

गर्भिणी रुक्मिणी नारी । डोहाळे पुसे श्रीहरी

हा मास प्रथम भिमकीचा नुमजे कुणाला । वदनेंदु सुखला । चालता गज . गति होती श्रम पदकमला । धन्यता होय धरणीला । घामानें तनु डबडबली । तोंडावरि दिसली लाली । गर्भाची छाया पडली । नेसली नवी हिरवी जरतारी । गर्भिणी रुक्मिणी नारी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

दुसर्‍यांत समवया सख्या मिळुनी येती । बहुपरीचा विनोद करिती । विंझण घेऊनि हातीं । चवरंगी उपचार सुशोभित करिती । लाविली उटी वाळ्याची । गुंफिली वेणी चांफ्याची । घातिली माळ सुमनांची । घनदाट वास सुगंध सुटला भारी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

तिसर्‍यांत बहु डोहाळे होती । सोहाळे द्राक्षाचे मंडप देती । लाविली बाग केळीची वृक्ष पालवले । फलभार तरुवर आले । पुष्पांची बागशाही । शेवंती मोगरा जाई । अंब्यांची घनदाट आंबराई । झोपाळे बांधुनी बसवी त्यावरी । डोहाळे पसे श्रीहरी ॥

चवथ्यांत कळे गोतास आला विश्वास । लागला पांचवा मास । गुंफिली फुलांची जाळी । मेंदी नखास माखिली । पक्वान्नें नानापरीचीं केलीं । कांद्याची भाकरी शिळी । चांदणें रात्र अंधेरी । थंडीत गुलाबी कोवळ्या उन्हाच्या लहरीं । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

लागला सहावा मास पसरलें तेज । अवतरती मकरध्वज । नेसुनी हिरवा शालु हिरवाच साज । पाहुनिया खूष हो यदुराज । बसुनि पति शेजारीं ओटी भरी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

लागला सातवा मास । पोट नारळी महालामधिं केली आरास । नगरीच्या नारी गातीं मंजूळ गाणीं । कुणीं चेष्टा करिती मिळुनी । वाटिती हळदकुंकूं पानसुपारी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

आठव्यांत शास्त्र संस्कार अठांगूळ करिती । गोतास आमंत्रण देती । कुणी आणिती चिरकंचुकी आहेर करिती । देवीचे आशीर्वाद घेती । सुस्वर वाद्य वाजंत्री चौघडा भेरी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

नऊमास नऊ दिवस । झाली प्रसूत बहु आनंद द्वारकेस । वाटीती नगरी शर्करा भरूनिया रथ । जन्मासि ये रतिकांत । हर्षले मनीं श्रीरंग । भक्तासि करूणा मेघ गंगेस लागला छंद । आवडीनें गातीं गुणगान जमुनीया नारी । डोहाळे पुसे श्रीहरी ॥

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला...

श्री वशिष्ट गुरूची आज्ञा वंदुनी आला

तो राजा दशरथ कौसल्येच्या महाला

स्थुल देह ओसरीवरती नृपवर चढला

देह सूक्ष्म माजघरीं संशयांत पडला

याला कारण कोठडींत पाहे नृप तो

महाकारण माडीवरी जाय त्वरीत तो

ही द्वारीं नच राहे उभी म्हणत तो

शोधितां परस्पर परसीं पाहुनि तिजला

म्हणे रुसून बसलि का निर्विकल्प छायेला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

जे योगिजनांना योग सांधितां न मिळे

तें कौसल्येन पूर्ण ब्रह्म सांठविलें

तिज जवळी बसूनी राजा दशरथ बोले

पुरवीन कामना इच्छित वद या वेळे

ती नीजानंद आनंदीं रंगली

ती द्वैतपणाची बोली विसरली

तिशीं गोष्ट विचारित राजा मागली

आठवतें तुला का वर्‍हाद बुडवूनि गेला

पौलस्त्य तनय तो मत्स्यमुखीं दे तुजला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

बोलतो कुठें रावण भुज आपटोनी

ती उठली शत्रूचें नाम ऐकतां श्रवणीं

म्हणे चापबाण दे दाहि शिरें उडवोनी

मी क्षणांत टाकिन कुंभकर्ण मारूनी

त्या इंद्रजिताला बाणें जर्जर करुनी

धाडीन यमपूरा बंधूसाह्य घेवोनी

मम भक्त बिभीषण लंके स्थापूनी

बंधमुक्त करीन सूर सारे या क्षणीं

धाडीन स्वर्गीं सन्मानें त्या झणीं

हें कार्य करीन मी पाळुनी ताताज्ञेला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

घे शशांक वदनें नवरत्‍नांची माळा

मी चाप भंगितां घालिल भूमीबाला

घे अननस आंबे द्राक्षें ह्या वेळा

मीं प्रिया शोधितां देईल शबरी मजला

घे दास दासी रथ घोडे गे सुंदरी

हनुमंत दास तो माझा महिवरी

नौकेंत बैसूनि जलक्रिडा तूं ग करी

प्रियभक्त गुहक मज नेईल परतीराला

ही लाल पैठणी पांघर भरजरी शेला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

झडपिली भुतांनीं पंचाक्षरीं कुणी आणा

इज नेऊनि दाखवा वैद्य बघुनिया शहाणा

तव उदरीं येईल वैकुंठीचा राणा

आशीर्वाद दिले मज श्रेष्ठीं नमितां चरणा

हे द्वारपाल गुरुजींना सांगित मम गोष्ट प्रियेची

तूं सांग कहाणी करुनि बहु सायास प्रीतीची

मम गोष्ट ऐकुनी दुत तो शीघ्र घेऊनि आला

त्या ब्रह्मसुताच्या वंदित नृप पदकमला

डोहाळे दशरथ पुसतो कौसल्येला

हे राजकुमारी काय आवडे तुजला

बाई मी पहिल्या माशीं उभी ग अंगणांत

बाई मी पहिल्या माशीं उभी ग अंगणांत

मशी पावला रघुनाथ

बाई मी दुसर्‍या माशीं उभी ग वृंदावनीं

डाव्या कुशीला चक्रपाणी

बाई तिसर्‍या माशीं मुखावर दिसती लाली

भैना कोणत्या महिन्यांत न्हाली

बाई चवथ्या माशीं वर्णांचा येतो वास

माझ्या भैनाला गेले दिवस

बाई पांचव्या माशीं निरीबाई उंच दिस

तिचा भ्रतार एकांतीं पुस

बाई सहाव्या माशीं खाऊशी वाटे बहु

चल अंजनी बागत जाऊं

बाई सातव्या माशीं इच्छा झाली डाळींबाची

मला शिवा चोळी रेशमाची

बाई आठव्या माशीं मुलीनं ग घेतला छंद

मायबापांशीं झाला आनंद

बाई नवव्या माशीं नऊ महिने झाले पूर्ण

पोटीं जन्मलें श्री भगवान

बाई दहाव्या माशीं आणा दाई बोलवून

साडी चोळीची करा ग बोळवन

बाई पैल्या दिवशीं... बाई दुसर्‍या दिवशीं...

बाई पैल्या दिवशीं रुक्मिनीला न्हान आलं

गोताला बोलावनं केलं

बाई दुसर्‍या दिवशीं रुक्मिनी तोंड धुती

चिमन्या पानी पितीः

बाई तिसर्‍या दिवशीं धाडा सोनाराला चिठ्ठी

मागा चांदीची ताटवाटी

बाई चवथ्या दिवशीं घाली सासू ऊनऊन पानी

हातीं आईच्या तेलफनी

बाई पांचव्या दिवशीं बागेंत गेला माळी

रुक्मिनीच्या मखराला केळी

बाई सहाव्या दिवशीं धाडा सोनाराला पत्र

मागा सोन्याचं फूलपात्र

बाई सहाव्या दिवशीं करा कासाराला बोलवनं

हातीं सोन्याचं कंगवान

बाई सातव्या दिवशीं वान्याला धाडा चिठ्ठी

नारळ घाला विटीं

बाई आठव्या दिवशीं खिडकीत उभी राही

गोताची वाट पाही

बाई नवव्या दिवशीं पुरन पोळीचं जेवायान

गनागोताला बोलवान

बाई दहाव्या दिवशीं हळदीकुंकवाचा केला काला

देव इट्टल शांत झाला

बाई अकराव्या दिवशीं धई भाताचा काला केला

देव इट्टल शांत शाला

बाई बाराव्या दिवशीं वाज चौघडा दारोदारीं

इट्टलरुक्मिनीला केला पोषाक भारी

श्री भवानी मातेनें वर हा दिधला....

श्री भवानी मातेनें वर हा दिधला म्हणूनिया दिवस हा आला

मज वाटतसे आज पासूनी आपुला भाग्योदय खचितचि आला

तव मुखचंद्र प्रिये अशा या समयाला बहु खिन्न कशानें झाला

तव मनीं काय आवडतें , तव चित्त कशावरि जडतें , जरि असें फार अवघडत

पुरवीन तरी सांग मला तव चित्तीं जे सर्व मनोरथ असती

निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती

म्हणे जिजाई आवड स्वातंत्र्याची मज नको बेडी पारतंत्र्याची

हा विप्रछळ मज पहावेना , पारतंत्र्य मला सहवेना , मृत अन्न गोड लागेना

परदास्यानें मिळविलेली संपत्ति मज वाटे केवळ माती

निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती

मज वाटतसे तलवार ढाल घेवोनी निज घोड्यावर बैसोनी

या कामीं मरण जरी येई , तरी मला सुखदचि होई , या खेरीज इच्छा नाहीं

हे डोहाळे ऐकुनि शहाजी म्हणती बाळ हे करील बहु कीर्ति

निज कांतेला डोहाळे अति प्रीती सरदार शहाजी पुसती

जुन्या काळात स्त्रिया आपल्या भावना गीतांच्या माध्यमातून व्यक्त करायच्या. सडा-रांगोळी, स्वयंपाक, जात्यावर दळणे इत्यादी नेमाची कामे करतांना पारंपारिक गाणी गायच्या त्यांची गोडी अवीट होती म्हणूनच बहिणाबाईंची ‘आधी हाताला चटके, तेव्हा मिळते भाकर’ आजच्या काळातही गुणगुणावेसे वाटते. सणवार, मंगळागौर, डोहाळेजेवण, बारसे, भोंडला इत्यादी प्रसंगांना सुध्दा पारंपारिक गाणी आहेत. ह्या गाण्यांचा शोध हा विभागाचा उद्देश. आपणही आपल्यालाला अशी गाणी माहिती असल्यास marathoglobalvillage@gmail.com वर जरूर पाठवा.