डॉ. अनिल काकोडकर

डॉ. अनिल काकोडकर (११ नोव्हेंबर, इ.स. १९४३:बारावनी, मध्य प्रदेश, भारत – ) हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुखपदाच्या आधी ते इ.स. १९९६ ते २०००च्या दरम्यान, होमी भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक होते.
भारतातील अनेक महत्त्वाची वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुचाचणीतील मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त, डॉ. काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात.

डॉ. काकोडकर यांच्या मातोश्री श्रीमती कमला काकोडकर आणि वडील पुरुषोत्तम काकोडकर हे गांधीवादी स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण स्थानिक शाळेत, तर माध्यमिक शिक्षण खारगाव येथे झाले. मॅट्रिकनंतर ते मुंबई येथे शिक्षणासाठी आले.डॉ. काकोडकर हे मुंबईच्या रूपारेल कॉलेज मध्ये बारावीपर्यंत होते. त्यानंतर त्यांनी यंत्रशास्त्रीय (मेकॅनिकल) तंत्रज्ञानाची पदवी व्ही.जे.टी.आय.,मुंबई विद्यापीठ येथून १९६३ मध्ये मिळवली. भाभा अणुसंशोधन केंद्रात ते १९६४ साली रुजू झाले. पुढे त्यांनी नॉटिंगहॅम विद्यापीठातून १९६९ साली पदव्युत्तर पदवी मिळवली.
पुढे त्यांनी भाभा संशोधन केंद्रात प्रक्रिया अभियांत्रिकी (रिॲक्टर इंजिनियरिंग) विभागात बनणाऱ्या “ध्रुव रिॲक्टर”मध्ये, पूर्णतया नवीन आणि उच्च तंत्रज्ञान वापरून मोलाची भर टाकली. ते भारताच्या १९७४ आणि १९९८ च्या अणुचाचणीच्या मुख्य चमूचे सभासद होते. पुढे त्यांनी भारताच्या स्वयंपूर्ण अशा जड पाण्याच्या रिॲक्टरच्या चमूचे नेतृत्व केले. कल्पकम आणि रावतभट्ट या जवळजवळ मोडकळीस आलेल्या अणुभट्ट्यांचे पुनरुज्जीवन हे त्यांच्या तांत्रिक कौशल्याचे महत्त्वाचे उदाहरण आहे.
आतापर्यंत त्यांनी जवळजवळ २५०च्यावर शास्त्रीय संशोधनपर लेख लिहिले आहेत.

भारताला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्यासाठी, थोरियमसारख्या स्वस्त आणि भारतात सहज उपलब्ध अशा स्रोतापासून ऊर्जा बनवण्याचे स्वप्न काकोडकर यांनी पाहिले आणि त्या दिशेने बरीच ठोस प्रगती केली आहे. सध्या ते प्रगत अशा जड पाण्याच्या भट्टीवर काम करत आहेत. ह्या भट्टीत थोरियम-युरेनिअम२३३ याचा मूळ ऊर्जास्त्रोत म्हणून वापर होईल, तर प्लुटोनियम केवळ सुरुवातीचे ऊर्जापूरक इंधन म्हणून वापरले जाईल. अशा प्रकारच्या भट्टीमुळे, भारताची ७५% ऊर्जेची गरज तर दूर होईलच पण एक ऊर्जा मिळवण्याचा सोपा आणि सुरक्षित मार्ग उपलब्ध होईल.

हायड्रोजन बॉम्ब बनविण्यासाठी तर उच्च दाबाची यंत्रणा आणि अचूक इंजिनीअरिंगची आवश्यकता असते. शिवाय बॉम्बच्या चाचण्या च्या खोलवर खणलेल्या विहिरीत होतात त्या हायड्रोजन बाँबच्या धक्क्याने कोसळू नयेत आजूबाजूंच्या खेड्यांना धक्के बसू नयेत किरणोत्सार जमिनीच्या वर येवू नये ही सर्व काळजी घ्यावी लागते. काकोडकरांमधल्या अलौकिक व अचुक इंजिनीअरिंग कौशल्यांचा अशा वेळी प्रत्ययच यायचा. प्रचंड उर्जा व असामान्य कार्यक्षमता हेदेखील त्यांच्या व्यक्तिमत्वामधील सर्वांना परिचीत असलेले विशेष पैलु आहेत.

डॉ. काकोडकर (सन २०११)नंतर “भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई” (भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई) याचे अध्यक्ष होते.
राष्ट्रीय तंत्रज्ञान अकादमीचे (इंडियन नॅशनल अकॅडमी ऑफ इंजिनियरिंग) ते १९९९-२००० या दरम्यान अध्यक्ष होते.
ते जागतिक अणुऊर्जा महामंडळाचे सभासद आहेत. तसेच त्यांना जागतिक नवतंत्रज्ञान संस्थेने मानाचे सभासदत्व दिले आहे.
ते न्यूक्लियर्स सप्लाय ग्रुप(एन.एस.जी. ग्रुप)चे १९९९ ते २००२ या दरम्यान सभासद होते.

बदलत्या भारताची वेगाने वाढणारी ऊर्जेची गरज अणुशक्तीच पुरी करू शकेल, असा दृढ विश्वास असणारा हा शास्त्रज्ञ. डॉ. काकोडकर हे भारताच्या अणु-कार्यक्रमाचे आघाडीचे शिलेदार. ते भारताच्या अणुशक्ती आयोगाचे दहा वर्षांहून अधिक काळ अध्यक्ष होते. काकोडकर अजूनही दिवसातील बारा तास अणुकोशात राहून भारताच्या अणुऊर्जा विषयक समस्यांची उकल करण्यात मग्न असतात.

वयम् ह्या किशोरवयीन मुलांसाठीच्या दर्जेदार मराठी वाचन साहित्याच्या सल्लागार मंडळातही त्यांचा सक्रिय सहभाग आहे

पद्मश्री (१९९८),पद्मभूषण(१९९९),पद्मविभूषण (२००९) अश्या राष्ट्रीय पुरस्कारांबरोबरच ,हरी ओम आश्रम प्रेरित विक्रम साराभाई पुरस्कार (१९८८),एच. के. फिरोदिया पुरस्कार (१९९७),रॉकवेल पदक (१९९७),फिक्की पुरस्कार, त्यांच्या अणुऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या योगदानाबद्दल (१९९७-९८),ॲनकॉन जीवनगौरव पुरस्कार (१९९८),एच. जे भाभा स्मृतिपुरस्कार (१९९९-२०००),गोदावरी गौरव पुरस्कार (२०००) असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत.

Click here to add your own text