पेय/सार

टोमॅटोचा सार

साहित्य:-

टोमॅटो 300 ग्रॅम
ओल्या नारळाचा किस 1 वाटी
जीरे 1 चमचा
हिरवी मिरची 5-6 नग
तूप 1 चमचा
मीठ, साखर चवीनुसार

कृती:-

टोमॅटो धुऊन मिक्सरवर बारीक करुन घ्या. गाळू नका. पातेल्यात तूप घालून त्यात जीरे, बारीक चिरलेली मिरवी मिरची घालून टोमॅटोची प्युरी घालावी. त्याच बरोबर नारळाचा किस, चवीनुसार मीठ, साखर घालून वरुन कोथिंबीर घालून गरमगरम सर्व्ह करा.
टीप:- आंबट कमी वाटल्यास थोडं लिंबू पिळावे. स्वादही छान (वेगळा येईल)

सोलकढी

साहित्य:-

नारळाचे दूध 4 ते 5 वाटया,
आमसुलचा गर अर्धी वाटी
लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीर 2 चमचे
(वाटून तयार केलेली चटणी)
जीरे पूड 1 चमचा
मीठ, साखर चवीनुसार

कृती:-

2 ते 3 नारळ खवून त्याचे दूध काढून घेणे. आमसुलं भिजवून थोडे चोळून त्याचे पाणी काढून घेणे. नंतर हिरवी चटणी 2 ते 3 चमचे, दूध, आमसुलचे पाणी एकत्र करुन ठेवणे. चवीनुसार मीठ, साखर व जीरे पूड घालून सर्व्ह करणे.

कोकम सरबत (आमसूल) –

1 वाटी आमसूलात 2 वाटया पाणी घालून हातानी मिसळून पाणी गाळून घ्या. त्यानंतर आमसूल सुद्धा पिळून घ्या. नंतर यामध्ये 3 चमचे साखर घालून सरबत ढवळून घ्या. थंड करुन प्यायला दया.

लिंबाचे सरबत –

5 कप पाण्यात 1 लिंबू पिळून त्यामध्ये 7 चमचे साखर व पाव चमचा मीठ घालून चांगले ढवळून थंड करुन प्यायला दया. यामध्ये वेगळा फ्लेवर येण्याकरीता चिमूटभर खाण्याचा चुना पूर्वीच्या मिसळायचे. जेणेकरुन आपल्या शरीरात कॅल्शियम जायचे. तसेच सरबताला सुद्धा छान चव यायची.

 गरम शरबत

साहित्य:-

आलं 50 ग्रॅम
पुदीन्याची पाने 1 वाटी
तुळशीची पाने अर्धी वाटी
काळे मीठ चवीनुसार
साखर चवीनुसार
पाणी –
लिंबू 1 नग

कृती:-

सर्व प्रथम 4 ग्लास पाणी घ्या. आले किसून पाण्यात टाका. त्यातच पुदीन्याची पाने व तुळशीची पाने स्वच्छ धुऊन टाका. मीठ व साखर आवडीप्रमाणे घाला. व हे पाणी चांगले 10 ते 15 मिनिटे उकळू दया. म्हणजे त्यात मसाल्याचा अर्क पूर्ण उतरेल नंतर गॅस बंद करा. नंतर त्यात अर्ध्या लिंबाचा रस पिळा. नंतर सरबत गाळून घेऊन ग्लासमध्ये ओता. मधे सजावटीकरीता पुदीन्याची पाने टाका व वरती लिंबाची पातळ फोड लावा व गरमा गरम सर्व्ह करा.

मठ्ठा

साहित्य –

दही 2 वाटया
पाणी 2 वाटया
हिरवी चटणी 2 चमचे
जीरे पावडर अर्धा चमचा
मीठ, साखर चवीनुसार
कोथिंबीर 2 चमचे

कृती –

दही, पाणी, मीठ, साखर एकत्र घुसळून त्यात हिरवी चटणी, जीरे पावडर व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

कढी

साहित्य:-

दही 1 लिटर
पाणी 3 लिटर
बेसन 150 ग्रॅम
साखर 50 ग्रॅम
मेथीदाणा 1 चमचा
आलं अर्धी वाटी
मोहरी 4 चमचे
हिंग 1 चमचा
कढीपत्ता 1 वाटी
तेल 100 ग्रॅम
जीरे 2 चमचे
हिरवी मिरची अर्धी वाटी

कृती:-

पातेल्यात तेल गरम झाल्यावर जीरे मोहरीची फोडणी घालून त्यात हिरवी मिरची, कढीपत्ता व हिंग घालावे. दही मिक्सरमधे घोटून घ्यावे व त्यात बेसन घालावे. नंतर हे मिश्रण फोडणीत घालून वर पाणी घालावे. कढीला उकळी आल्यावर, मीठ, साखर, किसलेलं आलं व कोथिंबीर घालून सर्व्ह करा.