आजचं जग स्पर्धेचं आहे ज्यात ना दयामाया ना भावभावना असतात. असतो तो फक्त लक्ष्याचा पाठपुरावा. या जगात तुमची किंमत तुमच्याकडे काय आहे यावर ठरत नसून तुम्ही काय साध्य करून दाखवतात यावर जास्त अवलंबून असते. तुमची ओळख तुमच्या कार्यउत्पादनाने ठरते. हे जग विचित्र नि निर्दयी आहे असं तुम्ही म्हणाल – शक्य आहे. पण जग हे असचं आहे. नि तुम्हाला जर या जगात यशस्वी व्हायचं असेल तर हे जाणून घेणं आवश्यक आहे.

कंपन्या-ज्यामध्ये आपण नोकरी करून जगाच्या विचारसरणीहून भिन्न नाहीत. कंपन्यांच्या प्रगतीसाठी त्यांची उत्पादनक्षमता, कार्यगती, धंद्यातील वार्षिक वाढ, फायद्याचे प्रमाण या गोष्टी अत्यावश्यक असतात म्हणूनच त्याचं लक्ष अंतिम ध्येय, अंतत: परिणाम याच्यावर जडलेला असते.

साध्यपूर्तीसाठी प्रयत्न जरूरी आहेत पण ज्या प्रयत्नांनी साध्यपूर्ती होत नाही त्यांना किंमत नसते. तुम्ही किती ढोर मेहनत घेतली याला तुमच्यामते महत्व असेल, पण त्याने जर तुम्हाला दिलेल्या ध्येयाची पूर्ती झाली नाही तर कंपनीसाठी ते कार्य आहेत. निव्वळ मेहनतीसाठी हल्ली कुणी कुणाला श्रेय देत नाही.

महाभारतातील अर्जुनाच्या लक्षवेधाची गोष्ट तुम्हाला ठाऊक असेलच. गुरू द्रोणाच्रार्यांनी शिष्याची परीक्षा घेतली तेव्हा केवळ अर्जुनाचाच बाण झाडावरच्या पक्ष्याच्या डोळयाचा वेध घेऊ शकला – कारण केवळ अर्जुनाचंच आपल्या लक्ष्यावर संपूर्ण एकाग्र चित्त होतं. आपल्या देशात बुध्दीचा-विचारक्षमतेचा सुकाळ आहे. ती आपली शक्ती आहे-दुर्देवाने ती आपल्या प्रगतीलाही अडसरही आहे. आपली विचारशक्ती – आपल्याकडे इतरांपेक्षा जास्त आहे या भावनेने आपल्याला प्रगतीसाठी जणूकाही इतर कुठल्याही बाबींची जरूर नाही. (घरबसल्या प्रगती होणार) असा भ्रम निर्माण करते नि आपल्याला ध्येयपूर्तीसाठी आवश्यक असलेल्या मेहनतीपासून परावृत्त करते. म्हणून एक सल्लागार म्हणून आपण चोख कामगिरी पार पाडू शकलो तरीही एक जबाबदार Manager ची भूमिका – गोष्ट पूर्णत्वाला नेण्याची भूमिका पार पाडू शकण्यात आपण कमी पडतो. कमतरता असणं हा गुन्हा नाही पण ती आपल्याला माहित नसणं व आपण ती सुधारण्याचा प्रयत्न न करणं हा खचित गुन्हा आहे.
एका यशस्वी कंपनीच्या यशातील यशस्वी भागीदार जर आपल्याला व्हायचं असेल तर अर्जूनासारखंच या लोकांसाठी काम, मग अर्थहीन यांत्रिकता बनते -निव्वळ ‘पाटया टाकणे’ आपण काम का करतो आहे हयाने कंपनीचं काय साध्य आहे हे संपूर्णपणे लुप्त होऊन कामाच्या कृती हेच जणू अंतिम साध्य होत. अशा लोकांसाठी कामातील अडथळे दूर करणं – प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं हे महत्वाचं नसून आपल्या कोर्टमधील बॉल दुस-याच्या कोर्टमध्ये कसा ढकलता येईल, एकमेकांवर (ई मेल द्वारे) प्रत्युत्तराचे हल्ले कसे करता येईल हेच मुख्य उद्दिष्ट असते-मग त्याचा कंपनीच्या हिताशी मेलचा काही संबंध नसतो. अर्थातच त्यांच्या कर्तव्यशून्यतेचा कंपनीच्या प्रगतीशी काही अन्योन्य संबंध नसतो. त्यांची प्रगती होणं अशक्य आहे. आयुष्यभर ते पाटयाच टाकत राहणार.

या सा-याचा संबंध शेवटी माणसाच्या मानसिकतेशी आहे. विचार पध्दती, मनोप्रकृती, कामाकडे बघण्याची दृष्टी, आपल्या प्रगतीचा ध्यास या सा-यांचा आपण कसं काम करतो याच्याशी संबंध आहे. नाहीतर शिक्षण, अनुभव पहायला गेलं तर खंडीने माणसे मिळतील पण तरीही सारख्या परिस्थितील एखादा माणूस प्रगती का करतो-दुसरा का नाही याचं गणित त्या त्या माणसाच्या मानसिकतेशी असते. आपल्याला आपल्या कंपनीच्या ध्येयांवर लक्ष एकाग्रतेने केंद्रित केलं पाहिजे. आपल्याला नेमून दिलेलं कुठलही काम असेल, त्याचा पाठपुरावा करताना – कंपनीचं अंतिम ध्येय त्याच्यां केद्रस्थानी असलं पाहिजे. हे जे काही मी करतो आहे त्याने माझ्या कंपनीचा कितपत फायदा होणार आहे किंवा कंपनीच्या ध्येयपूर्तीला त्याने कशी मदत होणार आहे हाच विचार आपल्याला कामाच्या केंद्रस्थानी असला पाहिजे. जर आपल्या कामाने, आपण कंपनीला ध्येयपूर्तीच्या दिशेने नेऊ शकलो नाही तर-त्या कामाने आपल्याला कितीही समाधान मिळत असेल – तुमच्या कामाचा – किंवा दुस-या अर्थाने तुमच्या असण्या-नसण्याने कंपनीला काहीच फरक पडत नाही. याउलट आपल्या प्रत्येक कृतीने कंपनीच्या ध्येयपूर्तीच्या दिशेने पावलं कशी पडतील याबद्दल जर तुम्ही सतर्क असाल तर तुमची गणना कंपनीच्या महत्वाच्या एम्प्लॉई मध्ये होण्याची शक्यता आहे. अगदी जरी तसचं काही नाही झालं तरी यायोगे आपल्या अस्तित्वाचं नि आपल्या कार्याचं तुम्हाला अधिक सार्थक समाधान मिळेल.

बरीच नोकरदार मंडळी आपल्या कामात समरस होत नाहीत. त्यांच्यासाठी न टाळता येणार, महिनाअखेर पगार हातात येण्याच निव्वळ साधन आहे. काम करण्यामध्ये रस नसल्याने हेतूही नसतो. जर तुम्हाला तुमच्या प्रगतीचा ध्यास असेल तर तुम्ही जे काम करता ते मन:पूर्वक व संपूर्ण समरसतेने करण्यात नि अंतिम ध्येयाशी तुमची कृती निगडीत ठेवण्यातच तुमचं हित आहे. नाहीतरी गीतेत तरी काय वेगळं सांगितलं आहे?

आपल्या देशात उपदेश/ योग्य सल्ले अगदी किलोने रस्त्या रस्त्यावर सहज मिळतात. आपली विचारक्षमता उत्तम आहे. गरज आहे ती चिकाटीने काम ध्येयाच्या दिशेने पूर्णत्वाला नेणा-या माणसांची. आईनस्टाईनने आपल्याला पूर्वीच सांगितलं आहे. sucess is 1% inspiration and 99% perspiration आपण उगीचच १ टक्याला १०० टक्के समजून आपला वेळ मोफत घालवतो.

म्हणूनच आज कंपनीला उपयोगी नि निरूपयोगी लोकांमध्ये फरक करायचा असेल तर तो बुध्दीचा नाही तर कार्यरत – कार्यप्रणणतेचा आहे. ‘Result Orientation’ चा आहे. आज अशा प्रवृत्तीची नि अशा लोकांची अनेक नोकरदारांच्या गर्दीमध्ये वानवा आहे. मला जेव्हा नवीन नेमणूक करायची असेल तेव्हा मी तरी ‘Application Value’/ Result Orientation अशा बाबींना, बुध्दीचातुर्य, ज्ञान या साऱ्या गोष्टीपेक्षा जास्त प्राधान्य देईल हे निश्चित!.

यतीन सामंत