शंभर एक वर्षांपूर्वीचा काळ असा होता की महाराष्ट्रात वनसंपदेच्या आश्रयाने राहणारे पक्षी, वन्यप्राणी असंख्य आणि विविध प्रकारचे होते. परंतु अलीकडच्या काळात झपाट्याने वाढलेले बेसुमार नागरीकरण, सतत ओस पडत चाललेली खेडी, बेकायदेशीर होणारी जंगलतोड आणि वन्य प्राण्यांची शिकार यामुळे महाराष्ट्रातील वनसंपदा झपाट्याने घटत असून वन्य प्राणीपक्षीही संख्येने कमी होत आहेत. ही आपत्ती टाळण्यासाठी सरकारने काही जंगले आणि वने राखीव म्हणून घोषित केली असून त्याना कायदेशीर संरक्षण दिले आहे. वृक्ष लागवडीचे उपक्रम जाणीवपूर्वक राबविले जात आहेत, परंतु जंगलतोड करण्यापेक्षा जंगल लागवडीचे काम खूप कठीण व वेळकाढू असते. या उपक्रमांना यश मिळण्यासाठी बराच काळ लागणार आहे यात शंका नाही. परंतु जंगलतोड करून नष्ट करणं किती अघोरी कृत्य आहे याची जाणीव प्रत्यक्ष जंगलाचं सौंदर्य अनुभवल्याशिवाय येणार नाही म्हणून जंगलातील फेरफटका मारणं आवश्यक आहे. यादृष्टीने महाराष्ट्रातील काही जंगले, अभयारण्य यांची माहिती, सर्वसामान्य माणसाला झेपेल असा प्रवास व प्रवासखर्च, राहण्याची सोय, अशा गोष्टींचा विचार करून येथे दिलेली आहे.

  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

मुंबईसारख्या अतिशय दाट वस्तीच्या व मानवी धावपळीने दिवस-रात्र गजबजलेल्या शहरात पश्चिम उपनगरातील बोरीवली या ठिकाणी असलेले हे राष्ट्रीय उद्यान मुंबईकरांना तर प्रिय आहेच, परंतु मुंबईला भेट देणाऱ्या देशी-विदेशी पाहुण्यांनाही त्याचे आकर्षण आहे. हे आकर्षण आहे मुख्यत: या अभयारण्यातील कान्हेरी गुंफा, तुळशी तलावाभोवतालचा सुरम्य परिसर, लायन्स सफारी पार्क, फिल्मसिटी यासारख्या प्रेक्षणीय स्थळांचे. जवळपास ९० चौ.कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या विस्तृत उद्यानाचा काही भाग घनदाट वृक्षराजीने व्यापलेला असून त्यातील तुळशी-विहार तलावाचा परिसर तर अतिशय रम्य आहे.
येथील लायन सफारी पार्कमधील बंद गाडीतून केलेली छोटीशी सफर लहान मुलांनाच नव्हे तर सर्व वयोगटातील पर्यटकांना हवीहवीशी वाटते. बंद मोटर वाहनात बसून लायन पार्कमध्ये मुक्तपणे संचार करणारे सिंह पाहताना कधीकधी काळीज धडधडते. या जंगलात बिबट्यांची संख्याही खूप आहे. याशिवाय या परिसरात माकडं, रानडुकरं तसेच सांबर यांचाही मुक्त संचार पाहायला मिळतो. या परिसरात असलेली चित्रनगरी, आरे दुग्धशाळा आणि कान्हेरी गुंफा ही स्थळेही लोकप्रिय आहेत. उद्यानात खंड्या पक्षी, बगळे अथवा दयाळ पक्षी तसेच भारद्वाज, कोकीळ, बुलबुल कोतवाल अशा अनेक जातींचे पक्षी मोठ्या संख्येने आढळतात. दरवर्षी या परिसराला सुमारे २५ ते ३० लाखाहूनही अधिक पर्यटक भेट देतात यातच या उद्यानाची लोकप्रियता स्पष्ट होते.

नजीकचे रेल्वे स्थानक : बोरीवली (मुंबई)

  • भीमाशंकर अभयारण्य

भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग म्हणून जसे भाविकांना प्रिय आहे तसेच ते एक सुरम्य अभयारण्य म्हणूनही पर्यटकांना प्रिय आहे. भीमाशंकर हे निसर्गसंपदा, समुद्र सपाटीपासूनची उंची यामुळे थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे.
भीमाशंकर येथील अभयारण्याचं क्षेत्र सुमारे १३१ चौ.कि.मी. इतके आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील राजगुरू तालुका, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका अशा तीन तालुकयातील भूप्रदेश समाविष्ट आहे. समुद्रसपाटीपासून हा परिसर उंच असल्याने येथील हवा तशी पावसाळी असते. जून ते सप्टेंबर दरम्यान तर धुकं आणि पावसाची संततधार असं संमिश्र वातावरण असतं.
अभयारण्यातील वनसंपदा मात्र विविध प्रकारची आहे. रान आंबा, जांभुळ, उंबर, अशा विविध जातींची झाडे या ठिकाणी विपुल आहेत. कार्वी, कढेलिंब आणि अनेक वनऔषधी इथे मुबलक आढळतात. भीमा नदीचा उगम येथेच होतो.
घनदाट वनराईमुळे वन्यप्राण्यांचा येथे मुक्त संचार असतो. विशेषकरून चित्ते, हरणं, सांबर, ससे, साळू, रानडुकरं, माकडं तसेच रानमांजर, पट्टेरी तरस आदी वन्यप्राणी या अभयारण्यात आढळतात. खार किंवा चानी हा प्राणी तर विपुल प्रमाणात येथे आढळतो. वन्यप्राण्यांबरोबर विविध जातीचे लहान-मोठे पक्षीही या अभयारण्यात आढळतात. सुदैवाने या अभयारण्यात अजूनही माणसाने फारसं अतिक्रमण केलेलं दिसत नाही.

नजीकचे रेल्वे स्थानक : पुणे
पुणे – भीमाशंकर : ९५ कि.मी., मुंबई – भीमाशंकर : २६५ कि.मी.

  • राधानगरी अभयारण्य

कोल्हापूर जिल्ह्यात भोगावती नदीच्या परिसरात हे अभयारण्य असून ते गव्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. कोल्हापूरहून कोकणात जाताना मध्ये फोंडाघाट लागतो. या फोंडाघाटच्या अलीकडे कोल्हापूरपासून सुमारे ७० कि.मी. अंतरावर हे अभयारण्य असून ते ३७५ चौ. कि.मी. इतके विस्तृत आहे. राधानगरी येथे धरण असून त्यावर जलविद्युत केंद्रही आहे. राधानगरी अभयारण्यातील जंगल घनदाट असून तेथे आढळणारे गवे खूपच उंचपुरे आणि देखणे असतात. गव्यांशिवाय बिबळ्या बाघ, चितळ, सांबर हे वन्यपशूही आढळतात. अनेक जातीचे रंगीबेरंगी पक्षीही येथे विपुल प्रमाणात आढळतात.
पर्यटन विकास महामंडळातर्फे एक अतिथीगृह आणि एक वसतिगृह येथे चालविले जाते. याशिवाय दांजीपूर येथे तंबू निवास उपलब्ध आहेत.
राधानगरीच्या पुढे आणि फोंडाघाटच्या अलीकडे सुमारे २० कि.मी. अंतरावर दाजीपूर अभयारण्य आहे. राधानगरीपेक्षा या अभयारण्याचे जंगलक्षेत्र लहान असले तरीही तेथे गव्यांची संख्या अधिक आहे. बिबळ्या वाघांची व रानडुकरांचीही येथे वर्दळ असते. दाजीपूरचे क्षेत्र समुद्रसपाटीपासून सुमारे २२०० फूट उंच असल्याने येथील हवामान थंड असते. पावसाचे प्रमाणही त्यामुळे अधिक आहे.

नजीकचे रेल्वे स्थानक : कोल्हापूर
कोल्हापूर – राधानगरी : ७० कि.मी.

  • नांदूरमधमेश्वर अभयारण्य

नाशिक जिल्ह्यात नाशिकपासून अवघ्या ५० कि.मी. अंतरावर गोदावरी नदीच्या परिसरात हे अभयारण्य असून तेथे अनेक जातीचे रंगीबेरंगी पक्षी पाहायला मिळतात. या पक्षीनगरात जसे देशी पक्षी आढळतात तसेच काही विदेशी स्थलांतरित पक्षीही विपुल प्रमाणात आढळतात. गोदावरी व कादवा या दोन नद्यांच्या संगमावर बांधण्यात आलेल्या मधमेश्वर धरणाच्या जलाशयामुळे या पक्षी अभयारण्यात पक्षी सुखनैव संचार करतात.
धरणाच्या परिसरात मधमेश्वराचे प्राचीन देवालय असून या देवालयाच्या नावामुळेच या अभयारण्याला नांदूर – मधमेश्वर असे नाव पडले आहे. या अभयारण्यात बगळे, करकोचे, टिटवी, सँड पायपर्स आदी पक्षी फार मोठ्या संख्येने आढळतात. याशिवाय हिरवे रावे, भारद्वाज, तांबट, धनेश आदी पक्षीही थव्याथव्याने येथे संचार करतात. या ठिकाणी निफाडमार्गेही जाता येते. निफाडपासून हे ठिकाण अवघ्या १३ कि.मी. अंतरावर आहे. नाशिक पाटबंधारे विभागाच्या पूर्व परवानगीने या ठिकाणी निवास व्यवस्था होते.

नजीकचे रेल्वे स्थानक : नाशिक किंवा निफाड (म.रेल्वे)
मुंबई-नाशिक : १८८ कि.मी., नाशिक ते मधमेश्वर: ५० कि.मी.
निफाड ते मधमेश्वर : १३ कि.मी.

  • अंबाखोरी अभयारण्य

पेंच अभयारण्यात तोतला डोह, राणी डोह, सिल्लारी अशी प्रमुख ठिकाणं आहेत. त्यातील तोतला डोह या स्थळापासून अगदी जवळ म्हणजे ४-५ कि.मी. अंतरावर अंबाखोरी नावाच्या टेकडीवर हे अभयारण्य आहे. येथील वनश्री घनदाट असून जवळच पेंच नदी आहे. हा संपूण परिसर अतिशय मनोहारी आहे. या जंगलात मुख्यत: सागाची झाडं विपुल आहेत. याशिवाय मोह, तेंदू, पळस, शिसव, बांबू अशी परिचित झाडंही असंख्य आहेत. अनेक प्रकारचे हिंस्त्र पशू व पक्षी या अभयारण्यात पाहायला मिळतात.

नजीकचे रेल्वे स्थानक : नागपूर
नागपूर-तोतला डोह : ८१ कि.मी.