जायकवाडी पक्षी अभयारण्य

पैठण

पैठणची स्वत:ची अशी एक ओळख आहे. शालीवाहन राजाची राजधानी म्हणून पैठण शहराचे महत्व वेगळे आहे. राजा रामदेवरायच्या काळात ज्या शहराला दक्षिण काशी म्हणून ओळख मिळाली ते हेच पैठण. औरंगाबाद पासून दक्षिणेकडे 50 कि.मी अंतरावर असलेला पैठण तालुका गोदावरी नदीच्या तीरावर वसला आहे. पैठण तालुक्याला मराठवाड्याचं प्रवेशद्वार असंही म्हणतात. संतश्रेष्ठ एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ याच शहरात आहे. नाथषष्टीच्या निमित्ताने येथे मोठी यात्रा भरते. लाखोच्या संख्येने वारकरी या यात्रेत सहभागी होतात. येथेच संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखातून वेद वदवून घेतल्याची आख्यायिका सांगितली जाते.

पदरावरती नाचरा मोर विणणाऱ्या गर्भ रेशमी पैठणीचं शहर पैठण. या शहराची आणखी एक ओळख आहे. ती म्हणजे रंगी-बेरंगी पक्षांचं आश्रयस्थान असलेलं जायकवाडी पक्षी अभयारण्य. हजारो स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांनाही नाथसागराच्या जलाशयाचं आकर्षण आहे.

दक्षिण गंगा म्हणून ज्या गोदावरीला मान मिळाला, त्या गोदावरीवर बांधलेला प्रकल्प मराठवाड्याच्या विकासाला संजीवन देणारा ठरला. सुमारे 55 कि.मी लांब आणि 27 कि.मी रुंद असा अथांग जलाशय सपाट जमिनीवर पसरलेला असल्याने त्याला उथळ बशीसारखं रुप मिळालं आहे.

प्रकल्पासाठी संपादित जमीन

औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर, पैठण, अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव व नेवासे तालुक्यातील मिळून 118 गावातील 34105 हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. जलाशय क्षेत्रात झाडोरा कमी असला तरी जलाशयाच्या बाहेरच्या बाजूने लिंब, आंबा, जांभूळ, चिंच, वड, ऊंबर, शिसम, सुबाभूळ, आमलतारा चंदन यासारखी झाडं आहेत. 10 ऑक्टोबर 1986 रोजी हे क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले.

नाथसागर जलाशयात माशांच्या 50 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. पाणपक्ष्यांना प्रिय असणारी दलदल, शेवाळ, पानवनस्पती, छोटे मासे, कीटक या खाद्य पदार्थांची आणि वैविध्यपूर्ण जलीय अधिवासाची विपुलता यामुळे नाथसागराचा जलाशय देशी-विदेशी पक्ष्यांचे माहेरघरच बनला आहे.

स्थलांतरीत पक्षी

कायम वास्तव्यास असलेल्या 200 प्रजातींच्या पक्षांशिवाय हिवाळ्याची चाहूल लागताच विविधरंगी मनोहरी पक्षी नाथसागर जलाशयाच्या आश्रयास येतात. दक्षिण आफ्रिका, नेपाळ, तिबेट, चीन, रशिया येथून दरवर्षी येणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांच्या 70 च्या आसपास प्रजाती इथं पहायला मिळतात.. फ्लेमिंगो, पिनटेल, शॉवेलर, व्हीजन, कॉमन टिल, ब्ल्यू विंगटिग, सॅडपायपर, स्टील करल्यू, रफ अॅन्ड रिव्ह असे अनेक प्रजातीचे पक्षी जायकवाडी जलाशयावर पहायला मिळातात. त्याशिवाय राखी बदक, काळा शेराटी, पांढरा शेराटी, पाणडुबा, पाणकावळे, वंचक, जांभळा, बगळा, कठेरी, चिलावा, मुग्धबलाक, रंगीत चमचा, सागरी घार, करकोचे, रोहित, तुतारी, गरुड, मैना, पोपट, दयाळ, खाटिक, कोकिळ, शिंपी, सुतार, तांबट, भारद्वाज, सातभाई, सुर्यपक्षी सारखे अनेक पक्षी आपल्याला इथे दिसतात. पाणमांजर, भेकर, मुंगूस, ससे, उदमांजर, काळवीट यासारख्या अन्य वन्यजीवांचे दर्शनही आपल्याला होते. इथे फुलांच्याही 37 प्रकारच्या प्रजाती आहेत.

ऑक्टोबर ते फेब्रुवारी अखेर पर्यंत वास्तव्यास असलेले हे पक्षी आपल्या लकबी आणि लक्षवेधी हालचालींनी पक्षीप्रेमींना आपल्याकडे आकृष्ट करतात. एक संतपीठ म्हणून पैठण शहरात भक्तगणांची नेहमीच वर्दळ असते. त्या आणि खास पक्षीदर्शनासाठी येणाऱ्या पर्यटकांनी हा परिसर नेहमीच गर्दीने फुललेला दिसतो. संत ज्ञानेश्वर उद्यानात रात्री सूर्यास्तानंतर संगीत आणि प्रकाशाच्या रोषणाईवर पाण्याचे होणारे जलनृत्य आपल्याला मोहून टाकते.

खरं तर आपण जेंव्हा पर्यटनाला जायचा विचार करतो तेंव्हा कमी वेळेत जास्तीत जास्त स्थळं कशी पाहाता येतील असा आपला प्रयत्न असतो. पण तुम्ही जर औरंगाबादला पर्यटनाला जाण्याचा विचार करत असाल तर भरपूर निवांत वेळ काढून जा असंच मी म्हणेन… केवळ एक किंवा दोन दिवसात इथल्या सगळ्याच गोष्टी पाहाता येत नाहीत इतका हा जिल्हा पर्यटनाच्यादृष्टीने समृद्ध आहे. हिवाळा हा पर्यटनासाठी आणि जायकवाडी पक्षी अभयारण्याला भेट देण्यासाठी उत्तम ऋतू आहे. औरंगाबादसह पैठणमध्ये खाजगी-सरकारी निवास व्यवस्था उपलब्ध आहे. जायकवाडी पक्षी अभयारण्याला जाण्यासाठी पैठणला जावे लागते. पैठण शहर औरंगाबाद हून 50 कि.मी आणि अहमदनगरहून 75 कि.मी अंतरावर आहे.

नरनाळा वन्यजीव अभयारण्य

गिरीभ्रमण आणि वनपर्यटनाचा एकत्र आनंद घ्यायचा असेल तर हा दुग्धशर्करा योग आपल्याला नरनाळा अभयारण्य आणि किल्ल्याला भेट दिल्यानंतर अनुभवायला मिळतो. भारतीय पुरातत्त्व खात्याने संरक्षित केलेला नरनाळा किल्ला स्थापत्यकलेचा उत्तम नमूना आहे. अकोला जिल्ह्यापासून 60 कि.मी अंतरावरचं हे ठिकाण सातपूडा पर्वतरांगेत वसलेलं असून ते मेळघाट आणि वान अभयारण्याचा मधला दुवा आहे किंवा मेळघाट अभयारण्याचं दक्षिणेकडंचं प्रवेशद्वार आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. अकोला जिल्ह्यात नरनाळा, अकोला, अकोट आणि बाळापूर असे किल्ले असून नरनाळा हे अभयारण्य आहे.

नरनाळा किल्ला

समुद्र सपाटीपासून हजार मीटर ऊंचीवरच्या किल्ल्याला पर्यटक वर्षभर भेट देतात. हा किल्ला गोंड राजाने बांधल्याचे सांगितले जाते किल्ल्याचा ताबा वेगवेगळ्या राजवटींकडे राहिल्याने त्या त्या राजवटीचा स्थापत्य कलेचा प्रभाव किल्ल्यावरील बांधकामात पाहण्यास मिळतो. त्यातल्या शहानूर (वाघ दरवाजा), मेहंदी, महाकाली (नक्षी दरवाजा), अकोट, आणि दिल्ली दरवाजा यावर बहमनी स्थापत्य शैलीचा प्रभाव पडलेला प्रकर्षाने जाणवतो. महाकाली (नक्षी दरवाजा) दरवाजाच्या वरच्या भागात बहमनी काळातील दोन शिलालेख कोरलेले दिसतात. त्यातल्या वरच्या शिलालेखात तो दरवाजा घडविल्याची तारीख हिजरी सन ८९२ (इ.स.१४९७) असा उल्लेख आहे तर खालच्या लेखात गाझी सुलतान शहाब-उद-दुनिया वाद-दिन महमूद शाह याच्यासाठी आशीर्वचन लिहिलेले आहे.

किल्ल्यावरील महत्त्वाच्या बांधकामांमधे गजशाळा, अंबर महाल, जनानखाना, जामा मशिद, तेलाचे आणि तुपाचे टाके, नगारखाना, खुनी बुरुज, कारखाना यांचा समावेश होतो.. किल्ल्यावर काही नवगज तोफा पडलेल्या आढळतात. त्यांची शैली आणि घडविण्याचे तंत्र वैशिष्ट्यपूर्ण असल्याचे जाणवते.

हा किल्ला 392 एकर जमिनीवर वसला आहे. त्याला 36 कि.मी.ची तटबंदी आहे. 22 दरवाजे आहेत आणि 36 बुरूज आहेत. पावसाच्या पाण्याची साठवण करण्याची आणि ड्रेनेजची उत्तम व्यवस्था इथे दिसून येते. एकूण 22 मोठ्या टाक्या अशा पद्धतीने बांधल्या आणि एकमेकांना जोडल्या गेल्या आहेत की ज्यामुळे ऊंचावरच्या टाकीतले पाणी खालच्या ऊंचीवरील टाकीत आपणहून पडत राहाते, साठते. पावसाच्या पाण्याचा थेंबही वाया जाणार नाही अशी रचना इथे करण्यात आली आहे जी खूप कौतुकास्पद आहे.

अकोला गावच्या सान्निध्यामुळे मुंबई, नागपूर तसेच देशाच्या कानाकोपऱ्यातून येणारे पर्यटक सुखावून जातात. अकोट आणि अकोल्यापासून बस आणि टॅक्सी सेवा उपलब्ध आहे. अभयारण्यात जाण्यासाठी शहानूर हे प्रवेशद्वार ७ कि.मी. अंतरावर आहे. शहानूर हे अकोट-हर्सील राज्य महामार्गावरच्या पोपकोहेडाशी (६ कि.मी.) जोडलेले आहे. राहण्यासाठी वन विभागाची निवास व्यवस्था आहे. त्याचे आरक्षण उप वनसंरक्षक अभयारण्ये विभाग, अकोट यांच्याकडून होते.

मुंबईपासून अंतर

मुंबईपासून अंतर ६१० कि.मी. जवळचा विमानतळ नागपूर इथे आहे.

रेल्वे

जवळचे रेल्वे स्थानक ४५ कि.मी. वरील अकोला हे आहे.

रस्ते

अकोट आणि अकोला हे नागपूर तसेच राज्यातील इतर गावांशी बस सेवेने जोडलेले ठिकाण आहे. राज्य परिवहनाच्या बस अकोला ते नरनाळा नियमित धावतात.

नरनाळा किल्ल्याला भेट देणाऱ्या पर्यटकांना खूप सारे वन्यजीव विश्व जवळून पाहता येते. त्यात सांबर, हरीण, काळवीट, जंगली मांजर या आणि अशा अनेक प्राण्यांचा समावेश आहे. तसेच या प्रदेशात जवळजवळ १५० प्रजातींच्या पक्षांची नोंद घेतली गेली आहे ज्यात गरुड, शिकार, घुबड, मैना, खंड्या, वेडा राघू असे असंख्य पक्षी आहेत. या ठिकाणी विविध दुर्मिळ जातीचे सरपटणारे जीवसुद्धा पहायला मिळतात, जसे की सरडे, घोरपडी, वाळवीचे वारूळ, इ. त्याचबरोबर अनेक औषधी वनस्पती ज्यात हिरडा, लाजवंती, सफेद मोस्ती, कोरफड, अश्वगंधा, शतावरी, बेहडा, धोड यांचा समावेश आहे. या ठिकाणी भेट देण्यास उत्तम कालावधी हा ऑक्टोबर ते मे असा आहे.

जवळ भेट देता येईल असे

फिरण्यासाठी भरपूर वेळ असेल तर जवळच्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला, गावीलगड किल्ल्याला आणि चिखलदऱ्याला भेट देता येते. नरनाळा या ठिकाणापासून शेगाव फक्त सुमारे ८१ कि.मी अंतरावर आहे. संत गजानन महाराजांच्या भक्तांना आपल्या आराध्याच्या दर्शनाबरोबर वन आणि नरनाळा गिरी भ्रमण नक्कीच आवडेल इतकं हे पर्यटनस्थळ निसर्गरम्य आहे.

लेखक: डॉ. सुरेखा म. मुळे,

मयुरेश्वर अभयारण्य

अभयारण्याविषयी

चिंकारा हा काळवीटापेक्षा लहान, अंगाने नाजूक पण तितकाच चपळ आणि देखणा प्राणी आहे. नराची ऊंची खांद्यापाशी 2 फुट असते आणि शिंगे दहा अकरा इंचापर्यंत वाढतात. काही माद्यांना शिंगे असतात काहींना नसतात. पाण्याशिवाय खुप दिवस काढू शकत असल्याने उजाड – वाळवंटी प्रदेशातही याचा आढळ आहे. चिंकाऱ्याचे कळप काळवीटापेक्षा लहान असतात. चिंकाऱ्यांचा सर्वात मोठा कळप 10 ते 20 जणांचा असतो तर सर्वात छोटा 3 ते 4 जणांचा. आपल्या प्रदेशाची सीमा निश्चित करण्यासाठी नर ठराविक जागी लेंड्या टाकून प्रदेशनिश्चिती करतो असं म्हटलं जातं.

स्थापना

अशा या चिंकारा हरणासाठी महाराष्ट्र शासनाने दि. 19 ऑगस्ट 1997 रोजी पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्याच्या सुपे गावातील 514.55 हेक्टरचे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित केलं. सुपे हे ऐतिहासिक पाऊलखुणा जपणारं गाव आहे. मालोजीराव भोसले यांची सुपे ही जहांगिरी.

पाऊस

या प्रदेशात फक्त 300 ते 350 मि.मि पाऊस पडतो. त्यामुळे येथे दक्षिण उष्णकटिबंधीय शुष्क काटेरी झुडपी वने आढळतात. वन विभागाने येथे मागील काही वर्षांपासून मृद व जलसंधारणाची कामे केल्यामुळे वन्यजीवांसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे.

मयुरेश्वरमधील चिंकाऱ्यांची संख्या वाढली

मयुरेश्वर अभयारण्यात इतर प्राण्यांसोबतच चिंकारा जातीच्या हरणांची संख्याही लक्षणीयरित्या वाढल्याचे प्राणी प्रगणनेतून दिसून आले आहे. वनविभागाच्या उपाययोजना तसेच स्थानिकांच्या जागरुकतेमुळे हे शक्य झाले आहे.

तालुक्याचा काही भाग अवर्षण प्रवण असला तरी या भागात गवताची मैदाने आहेत. ही गवताची मैदानेच चिंकारा हरणांची नैसर्गिक अधिवासाची ठिकाणे आहेत. बारामती शहरानजीकच्या एमआयडीसी परिसरात तांदुळवाडी गावच्या हद्दीत चिंकारा वन उद्यान व सावळ गावच्या हद्दीत पक्षीनिरीक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. चिंकारा उद्यानामध्ये चिंकारा जातीच्या हरणांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. त्याचबरोबर या उद्यानात औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये आवळा, कांचन, बेहडा, हिरडा, फणस, कोकम, करवंद, कण्हेर याचा समावेश आहे.

मयुरेश्वर अभयारण्यात सन 2015 मध्ये झालेल्या प्राणी प्रगणनेत 257 चिंकारांची नोंद झाली आहे. यामध्ये 138 माद्या, 92 नर तर 27 पाडसांचा समावेश आहे. त्या आधीच्या प्रगणनेपेक्षा ही संख्या सुमारे 70 टक्क्यांनी जास्त असल्याची माहिती येथील वनाधिकारी देतात. चिंकारा हरणांची संख्या वाढण्यासाठी येथे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.

या परिसरात ससे, खोकड, खार, लांडगा, तरस, घोरपड यासारखे प्राणीही आढळून आले आहेत. त्याचबरोबर गरूड, वेडा राघू, गांधारी, कापशी, तुरेवाला चंडोल, मोर, कावळा, चिमणी, तितर, खाटीक, टिटवी, पाणकोंबडी, कोतवाल हे पक्षीही मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत.

मयुरेश्वर अभयारण्यालगत असणाऱ्या तालुक्यातील वडाणे, शिर्सुफळ, कानडवाडी येथेही स्वतंत्र प्राणी प्रगणना करण्यात आली. येथे 30 चिंकारांसह इतर प्राण्यांची नोंद करण्यात आल्याची माहिती वनाधिकारी यांनी दिली आहे.

मयूरेश्वर अभयारण्याचे क्षेत्र हे काटवनाचे क्षेत्र आहे. अभयारण्यात शिरताच बाभळीची आणि थोडं पुढं गेल्यास बोरांची खुरटी झाडं दिसू लागतात. मातीच्या रस्त्यावरून जातांना वन विभागाच्या पाणवठ्यावर सकाळी विविध पक्षी दिसतात. निम, सिसू, खैर, हिवर, बोर, बाभूळ कुसळी वृक्षांबरोबर माखेल, पवन्या, प्रजातीचे गवतही येथे पहायला मिळते. ऑगस्ट ते मार्च हा कालावधी अभयारण्यास भेट देण्याचा उत्तम कालावधी आहे.

जेजुरीचा खंडोबा येथून 25 कि.मी अंतरावर आहे. भूलेश्वर मंदिर 7 कि.मी, पुरंदर किल्ला 35 कि.मी तर मोरगावचा गणपती 8 कि.मी अंतरावर आहे. मोरगावच्या मयुरेश्वर गणपतीचेच नाव या अभयारण्याला नाव देण्यात आले आहे. दुर्मिळ चिंकारा पाहायचा असेल तर एकदा तरी या अभयारण्याला भेट द्यायलाच हवी.

कसे जाल ?

पुण्यापासून पुणे-सोलापूर राज्यमार्गाने 72 कि.मी., बारामतीपासून मोरगाव मार्गे 43 कि.मी.

राधानगरी वन्यजीव अभयारण्य

अभयारण्याविषयी

हिरव्या रंगाच्या नाना छटा, फुलांचे विविध रंग आणि आकार पाहात निसर्गाच्या सान्निध्यात मनसोक्त भटकायचं आहे? मग कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यात जायलाच हवे. गवा हा इथला बघण्यासारखा प्राणी आहे. राधानगरी अभयारण्याचा समावेश जागतिक वारसास्थळामध्ये करण्यात आला आहे. जगातील 34 अतिसंवेदनशील ठिकाणांपैकी पश्चिम घाटात राधानगरी अभयारण्य येते.

दक्षिण व उत्तरेकडील पश्चिम घाटाला जोडणारा सह्याद्रीमधील हा महत्वाचा जंगलपट्टा आहे. याचा निमसदाहरित जंगलात समावेश होतो. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिमेस असणाऱ्या राधानगरी अभयारण्याचा परिसर 351 चौ.कि.मी.चा आहे. याची समुद्रसपाटीपासूनची ऊंची 900 ते 1 हजार फूट असून येथे सरासरी पर्जन्यमान 400 ते 500 मि.मी आहे. दाजीपूरचे जंगल हे राधानगरी अभयारण्याचाच एक भाग आहे. कोल्हापूर संस्थानचे महाराष्ट्र राज्यात विलीनीकरण झाल्यानंतर 1958 ला दाजीपूर जंगलाची दाजीपूर गवा अभयारण्य म्हणून नोंद करण्यात आली. हे महाराष्ट्रातील सर्वात जुने आणि पहिले अभयारण्य आहे. राधानगरी आणि काळम्मावाडी धरणाच्या भोवतीच्या जंगल परिसराला 1985 ला राधानगरी अभयारण्याचा दर्जा देण्यात आला. येथील घनदाट जंगलाचे पट्टे डंग या नावाने ओळखले जातात. येथील डोंगरमाथ्यावर जांभ्या खडकांचे मोठे सडे आहेत. सड्यांवर व सड्यांच्या भोवताली असणाऱ्या दाट जंगलामधील जैवविविधता प्रचंड संपन्न अशी आहे.

वनसंपदा

निमसदाहरित व पानगळीच्या मिश्र जंगल प्रकारामुळे हे वन असंख्य प्रजातींचे आश्रयस्थान झाले आहे. डोंगरातील दऱ्याखोऱ्यात घनदाट जंगल, विस्तीर्ण सडे आणि गवताळ कुरणात असंख्य प्रजातीचे वृक्ष, वेली, झुडपे, बुरशी आढळून येते. अभयारण्यात 1500 पेक्षा जास्त फुलझाडांच्या प्रजाती आहेत. भारताच्या द्विपकल्पामधील प्रदेशनिष्ठ 200 प्रजाती या भागात असून 300 पेक्षा जास्त औषधी वनस्पती इथे आहेत. येथे 36 प्रकारच्या वन्यप्राण्यांची नोंद झालेली आहे. वाघ, बिबळ्या, लहान हरिण, रानकुवा, अस्वल, गवा, सांबर, भेकर, चौसिंगा, रानडुक्कर, साळिंदर, उजमांजर, खवले मांजर, लंगूर याबरोबरच वटवाघळाच्या तीन प्रजातीही येथे आढळतात.

पक्षी व प्राणी

पक्षी निरीक्षणासाठी राधानगरी अभयारण्य अप्रतिम ठिकाण आहे. येथे 235 प्रकारच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. तीन प्रकारची गिधाडे येथे वास्तव्यास आहेत. जगात फक्त पश्चिम घाटात आढळणाऱ्या पक्ष्यांपैकी 10 प्रजातींचे पक्षी येथे आढळतात. अभयारण्यातील सांबरकोड, कोकण दर्शन पाँईट, सावदें, काळम्मावाडी धरण, उगवाई देवी मंदिर, ही स्थळे पक्षी निरीक्षणासाठी उत्तम आहेत. 121 प्रजातींच्या फुलपाखारांची नोंद राधानगरीत झाली आहे. सदर्न बर्डविंग हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू (190 मी.मी.) असून ग्रास ज्येवेल हे सर्वात लहान फुलपाखरू (15 मी.मी.) आहे हे दोन्ही फुलपाखरू राधानगरी अभयारण्यात आढळतात. हजारोंच्या संख्येने एकत्र जमून स्थलांतर करणारी ब्ल्यू टायगर, ग्लोसी टायगर, स्ट्राईप टायगर ही फुलपाखरे याठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये येतात.

सरिसृप गटात राधानगरी अभयारण्यात वेगवेगळ्या जातींच्या पाली, सरडे, साप-सुरळी, देवगांडूळ, उभयचर प्राण्यांमध्ये वेगवेगळ्या प्रजातींचे बेडूक आपल्याला इथे भेटतात. पालीच्या नव्या प्रजातीची पहिली नोंद राधानगरीत झाली असून तिचे नामकरण Cnemaspis Kolhapurensis असे करण्यात आले आहे. अभयारण्यात 33 प्रकारच्या सापांची नोंद आहे. ऑलिव्ह फॉरेस्ट स्नेक, एरिक्स व्हिटेकरी, पाईडबेली शिल्डटेड या सापांची नोंद येथे झाली आहे. गोवा आणि कर्नाटकच्या संरक्षित भागाला लागून असलेले हे अभयारण्य ट्रेकर्सच्या पसंतीचे ठिकाण आहे. दाजीपूरला शासनाचे रिसॉर्ट आहे.

पोचण्याचा मार्ग

कोल्हापूर सिंधुदूर्ग जिल्ह्याच्या सीमेवर राधानगरी तालुक्यामध्ये कोल्हापूरपासून साधारणत: 80 कि.मी. अंतरावर हे अभयारण्य वसले आहे. जवळचे विमानतळ कोल्हापूर आणि बेळगाव आहे तर जवळचे रेल्वेस्टेशन कणकवली आणि कोल्हापूर आहे. कोल्हापूर-राधानगरी-दाजीपूर हे अंतर 80 कि.मी चे असून निपाणी –राधानगरी-दाजीपूर हे अंतर 70 कि.मी.चे आहे. कणकवली- दाजीपूर-राधानगरी हे अंतर 60 कि.मी.चे आहे.

जवळ भेट देण्यासारखे

दाजीपूर, राधानगरीला भेट दिल्यानंतर जवळ बिसन राष्ट्रीय उद्यान, स्वामी गगनगिरी महाराज मठ, राधानगरी धरण, फोंडा घाट आणि शिवगड किल्लाही आपण पाहू शकतो. महाराष्ट्रातील सर्वात पहिले असलेले हे अभयारण्य अनेक नद्यांनी वेढलेले आहे. भोगावती, दूधगंगा, तुळशी, कळमा, दिर्बा या नद्या अभयारण्यातून वाहतात. नंतर हे सर्व प्रवाह कृष्णेला जाऊन मिळतात. अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा, पिसा, ऐन, किंजळ, आंबा, कुंभ, कटक, उंबर, गेळा, बिब्बा यासारखे वृ्क्ष तर कारवी, शिकेकाई, गारंबी, धायटी, मुरूडशेंग, करवंद, बेगाटी, रानमिरी, नरक्या अशा काही वेली आणि झुडुपांसह औषधी वनस्पतींची येथे रेलचेल आहे. अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी नोव्हेंबर ते मार्च असा आहे. तर मग कधी जाताय राधानगरी अभयारण्य पाहायला ?

भयारण्य

रामलिंगला जायचं ठरलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच उस्मानाबादच्या दिशेने रवाना झालो. पहाटेचा गार वारा मन प्रसन्न करत होता. रामलिंगला जाण्याआधी येडेश्वरीचं दर्शन घ्यायचं ठरलं. देवीचं मंदिर लांबूनच दिसलं… हिरवागार डोंगर आणि झाडांच्या गर्दीतून मंदिराचा डोकावणारा कळस खूप छान दिसत होता. 200 पायऱ्या चढायच्या होत्या. ‘गार डोंगराची हवा अन् आईला सोसना गारवा’… आराधी लोकांचं गाणं आणि त्याला संबळाची जोड, व्वा ! मन आनंदून गेलं. देवीचं दर्शन घेतलं आणि आम्ही रामलिंगला जायला निघालो.पोचण्याचा मार्ग

रामलिंग, उस्मानाबादपासून 20 कि.मी तर बीडपासून 95 कि.मी अंतरावरचं ठिकाण. अतिशय सुंदर वनपर्यटन स्थळ. पूर्ण परिसर गर्द हिरवाईने नटलेला.. येडेश्वरीच्या मंदिराला पायऱ्या चढाव्या लागल्या.. इथं पायऱ्या उतरायच्या होत्या. दरीत उतरून जातांनाच माकडांचा झुंड समोर आला… तिथल्या लोकांनी पहिल्यांदाच सांगितलं होतं.. खाद्यपदार्थ, प्रसाद हातात उघडा नेऊ नका… माकडं ओढून नेतात… ती सावधानता बाळगतच आम्ही पायऱ्या उतरायला सुरुवात केली. सुरुवातीला वाटलं फक्त महादेवाचं मंदिर आहे… पण तसं नव्हतं.

खाली उतरून गेलो.. महादेव मंदिराचा जिर्णोद्धार नव्याने झालेला.. त्याचं कोरीव बांधकाम आणि भिंतीवरील देवदेवतांच्या मूर्ती लक्ष वेधत होत्या. महादेव मंदिराकडे तोंड करून एक पितळेचा सुंदर नक्षीकाम केलेला नंदी आहे. शांत वातावरणात महादेवाचं दर्शन घेतलं आणि आमची पाऊलं पुन्हा हिरव्या वाटांकडे वळाली. मंदिराला वळसा घालून धावणारी नदी आम्हाला खूप आवडून गेली. तिच्या पाण्यात पाय टाकून बसण्याचा आनंद काय सांगावा? छोटीशी नदी पण नितळ पाणी… लहान मुलं पाण्यात खेळत होती.. आम्ही ही लहान होऊन थोडीशी आणखी मजा घेतली.. मला वाटलं रामलिंग पाहून झालं… पण तसं नव्हतं… महादेवाच्या मंदिरासमोर, नंदीच्या पाठीमागे एक समाधी आहे. त्यावर एका पक्षाला दोन पुरुष हातात धरून उभे असल्याचे चित्र कोरले आहे. मी विचारलं ही समाधी कोणाची आहे… त्यावर पुजाऱी म्हणाले, रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर जटायू पक्ष्याने त्याला अडवलं.. त्या दोघात युद्ध झालं. त्यात जटायू जखमी होऊन इथे खाली कोसळला… रावण निघून गेला. पुढे सीतेच्या शोधात राम इथून जात असतांना त्यांना जटायू जखमी अवस्थेत येथे पडलेला दिसला.. या जटायूला पाणी पाजण्यासाठी रामाने इथे एक बाण मारला… त्यामुळे तिथे एक गुहा तयार झाली आणि तिथून पाण्याची धार वाहू लागली… रामाने पाणी आणून जटायूला पाजलं, इथेच जटायूचा मृत्यू झाला… ही समाधी जटायू पक्षाची आहे…

रामायणातील प्रसंग जशाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहिला. नदीजवळ वाटेत मध्येच आम्हाला एक तपकिरी रंगाचा, त्यावर पांढरे ठिपके असलेला साप आडवा गेला, पुढे जाऊन त्याने नदीच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरलेल्या माणसाच्या काढून ठेवलेल्या कपड्यामध्ये आश्रय घेतला. आम्ही त्या माणसाला तसं सांगितलं… मग काठीनं डिवचून कपडे हलवले तेंव्हा तो साप तेथून सळसळत बाहेर निघून गेला.. कोणी त्याला मारलं नाही. पर्यटनाला जातांना सततची सावधानता बाळगायला हवी हे शिकवणारा हा अनुभव होता.

रामानं जिथं बाण मारून पाणी काढलं त्या परिसराला रामबाण असं देखील म्हटलं जातं. उन्हाळ्यात या पाण्याची धार लहान होत जाते. पण पावसाळ्यात याच रामबाणातून पाण्याचा मोठा प्रपात कोसळत राहातो. या धबधब्याला पाहण्यासाठी, येथील महादेवाचं आणि जटायूचं दर्शन घेण्यासाठी भक्तगण मोठ्यासंख्येने येथे येत असतात.

स्थापना

हा परिसर खुप हिरवागार आणि जैवविविधतेने संपन्न आहे. त्याचे रक्षण व्हावे म्हणून शासनाने 1997 मध्ये 2237.46 हे. आर क्षेत्राला ‘रामलिंग घाट’ अभयारण्य म्हणून घोषित केले. उस्मानाबाद जिल्ह्यातलं हे स्थळ पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचं स्थळ आहे. येथे पक्षांच्या 100 पेक्षा अधिक प्रजाती आढळतात. दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पाणगळीचे वने व काटेरी वने या प्रकारात हे वन मोडतं.

वनस्पती व प्राणी

वन विभागाने विविध योजनेअंतर्गत इथे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली आहे. यात प्रामुख्याने ग्लिरीसीडीया, सुबाभूळ, सिरस, शिसू, बोर यासारख्या झाडांचा समावेश आहे. या झाडांबरोबर नैसर्गिकरित्या आढळून येणाऱ्या खैर, धावडा, सालई, बोर, बाभूळ, सीताफळ, धामण, आपटा, हिवर, अजंन, साग, चंदन, अर्जून, सादडा, बेल, मेहसिंग, मोहा, बेहडा या वृक्षप्रजातीही येथे आढळतात. करवंद आणि घाणेरीची जाळी येथे मोठ्या प्रमाणात पहावयास मिळते. अभयारण्यात कोल्हा, लांडगा, तरस, सायाळ, खोकड, रानमांजर, काळवीट, ससे, रानडुक्कर, लाल तोंडाची माकडे, मोर असे वन्यजीव आपण पाहू शकतो.

उस्मानाबाद जिल्हा अवर्षपणप्रवण क्षेत्रात येतो. असे असले तरी पर्जन्यराजाची कृपा झाल्या क्षणी हा परिसर कात टाकतो. हिरवाईची चादर ओढून झाडांच्या खोप्यातून असंख्य निर्झर खळाळत राहतात. महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते. मंदिराला वळसा घालुन वाहणारी नदी, मंदिराच्या पाठीमागील बाजूस कोसळणारा धबधबा आणि डोंगराच्या अंगा खांद्यावर असलेल्या झाडीमध्ये इकडून तिकडे उड्या मारणारी माकडे असं सुंदर वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं येथे सार्वजनिक बांधकाम विभागाचं विश्रामगृह आहे. अभयारण्याच्या मध्यभागी असलेल्या दुर्गादेवी टेकडीवर रेल्वेचे विश्रामगृह आहे. त्याशिवाय वन्यजीव विभागाची निरिक्षण कुटी देखील पर्यटकांना उपलब्ध आहे. अभयारण्य पाहण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते जून असा आहे. जवळ तुळजापूरची तुळजाभवानी आहे. येडेश्वरी देवीचं जागृत देवस्थान आहे. नळदुर्गचा किल्ला आहे. नळदुर्ग किल्ल्यापासून जवळच आंदूरचा खंडोबा आहे. सगळंच पहायचं असेल तर किमान दोन-तीन दिवसाचा निवांत वेळ हवा… तो काढायलाच हवा… इतकं हे पर्यटनस्थळ सुंदर आहे.

बोरगड संवर्धन राखीव

बोरगड राखीव वनाविषयी

वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं म्हणून वृक्षांशी नातं जोडणाऱ्या वृक्षप्रेमींनी आपल्या हातांनी झाडं लावून वाढवली आणि आपल्या आसपास सुंदर पर्यावरण निर्माण केलं. यातून राखीव वनक्षेत्राची निर्मिती झाली. बोरगड संवर्धन राखीव हे असेच लोकसहभागातून उभे राहिलेले वन. नाशिक शहराच्या अगदी जवळ असलेल्या बोरगड किल्ला समूहाच्या पोटात बोरगड संवर्धन राखीव हे 350 हेक्टरचं विस्तृत राखीव वन पसरलं आहे. वन विभाग आणि नेचर कन्झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक या संस्थेच्या अविरत प्रयत्नांनी, लोकसहभागातून हा भाग घनदाट अरण्यात रुपांतरीत झाला. झाडे आली की फुल, पान, पशु-पक्षी, फुलपाखरं आणि इतर वन्यजीवही आले. वनपर्यटकांची पावलंही आपोआप तिकडे वळू लागली.

या संवर्धन राखीव क्षेत्रात बिबट्या, कोल्हा, लांडगा, तरस, रान मांजर, उदमांजर, ससा, वानर, मुंगूस, या प्राण्यांची रेलचेल आहे. येथे विविध प्रकारच्या सर्प प्रजातीही नजरेस पडतात. राष्ट्रीय पक्षी मोरापासून गवताळ प्रदेशातील पक्ष्यांपर्यंत साधारणत: 60 प्रकारच्या जातीचे पक्षी इथे बघायला मिळतात. शेजारी असलेल्या रामशेज किल्ल्याच्या कड्यांमध्ये घर करून राहणारे गिधाड पक्षी, जे नामशेष होण्याच्या मार्गावर होते ते आता इथे पुन्हा नव्याने वास्तव्यास आलेले दिसून येतात. काळटोप कस्तूर हा विणीसाठी जोडीने येणारा स्थलांतरीत पक्षी बोरगड राखीव वनात अधिवास करून राहताना दिसतो. सवान रातवा या महत्वाच्या पक्षाचे जोडपेही येथे प्रजनन करतांना आढळते. 5 मार्च 2008 मध्ये या वनक्षेत्राला राखीव वनक्षेत्राचा दर्जा मिळाला.

पक्षी

बोरगड संवर्धन राखीव क्षेत्रात कायमचा अधिवास असणाऱ्या पक्ष्यात शृंगी घुबड, विशालकाय आकाराचा बोनोलीचा, गरूड, देव ससाणा, वेगवेगळ्या प्रकारच्या वटवट्या, विविध रंगाचा सातभाई, नारंगी डोक्याचा कस्तूर, पांढऱ्या पोटाचा अंगारक, पहायला भेटतो. ऊंच उडणाऱ्या स्थलांतरीत पक्ष्यांमधला अमूर ससाणा इथून जातांना आढळतो. स्थलांतरित छोट्या आकाराच्या वटवट्या पक्ष्यांच्या तीन चार जाती इथे आहेत. यात मोठ्या चोचींचा पर्ण वटवट्या, साईक्स वटवट्या, काळटोप वटवट्या, टिकेलचा पर्ण वटवट्या दिसून येतो.

वनस्पती

समृद्ध प्राणी आणि पक्षी जीवनाचा अधिवास असलेल्या या जंगलात जवळपास 76 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती आढळतात. त्याचबरोबर रिठा, शिवान, खैर, आवळा, साग, जांभूळ, पळस, यासारख्या झाडांनीही इथलं वन समृद्ध झालं आहे. या वनात विविध ऋतूत फुलणाऱ्या 42 प्रकारच्या फुलांच्या जातींचा ताटवा बहरलेला असतो.

काय बघाल ? कसे जाल ?

बोरगड संवर्धन राखीव हे भोरकडा या डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं वन आहे. पायथ्याशी तुंगलदरा ही दिंडोरी तालुक्यात येणारी वाडी आहे. संयुक्त वन व्यवस्थापन समितीअंतर्गत येथे ऱ्हाडबंदी, चराई बंदी सारखे आदर्श उर्त्स्फुतपणे घातले गेले आहेत. स्थानिक लोकांमधून येथे वनसंरक्षक दलही सज्ज करण्यात आले आहे. स्थानिक लोक या वनाचं अगदी स्वत:च्या मुलाप्रमाणे संरक्षण करतात, सांभाळतात. बोरगड डोंगरावर भारतीय हवाईदलाचे प्रतिबंधित क्षेत्र असल्यामुळे सुरक्षिततेच्यादृष्टीने माथ्यावर जाण्यास मनाई आहे. पण पायथ्याशी असलेल्या तुंगलदरा वाडीपासून खाली पसरलेल्या विस्तृत अशा बोरगड राखीव संवर्धन प्रकल्पाला आपण भेट देऊ शकतो. ऋतूचक्रानुसार इथलं वातावरण विविध रंगांच्या छटा दाखवतं. पावसाळ्यात हे वन हिरवकंच असतं तर उन्हाळ्यात त्यावर सोनेरी मुलामा चढतो. विविध ऋतूत फुलणारी फुलं, गवताळ प्रदेश आणि बहरलेले डेरेदार वृक्ष आपल्याला साद घालत राहातात. अगदी शांत आणि प्रदुषणमुक्त अशा या निसर्गरम्य स्थळाला भेट देऊन मिळालेला आनंद अवर्णनीय आहे.

किल्ल्याची ऊंची समुद्रसपाटीपासून 998 मीटर

किल्ला चढण्यास सोपा, डोंगर रांग नाशिक वायव्येला असून तुंगलदरा हे पायथ्याचे गाव आहे. मराठी आणि हिंदी ही इथली बोलीभाषा आहे.

जवळचे विमानतळ : मुंबई

जवळचे रेल्वेस्टेशन : नाशिक रोड

नाशिक ते बोरगड अंतर : 16 कि.मी

नाशिक ते तुंगलदरा अंतर : 14 किमी.

मुंबई ते बोरगड अंतर : 195 किमी

राहण्याची व्यवस्था : नाशिक शहरातील खाजगी निवास व्यवस्था पर्यटकांचे स्वागत करते. शिवाय शासकीय विश्रामगृहही आहेतच.

जवळचे काय पाहाल?

बोरगड शेजारी असलेला देहेरी किल्ला. रामशेज किल्ला. निसर्ग पर्यटन स्थळ, पंचवटी नाशिक, पांडवलेणी- नाशिक, चामराजलेणी- नाशिक

यत्र व्याघ्र : तत्र अरण्य निरामय: असं म्हटलं जातं. म्हणजे जिथे वाघ आहे तिथे समृद्ध असं वन आहे आणि जिथे समृद्ध वन आहे तिथे वाघ. वन्यजीवांनी आणि पशुपक्ष्यांनी समृद्ध असलेलं वन हे तिथल्या जैवविविधतेचे आरोग्य कसं आहे हे सांगतं आणि माणसानं प्रयत्न केला तर माणूस एकमेकांच्या सहकार्यातून अरण्य ही उभं करू शकतो हे बोरगडकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं.. बघूया आपल्या सर्वांच्या हातातून असे किती बोरगड उभे राहातात ते…

ममदापूर संवर्धन राखीव

ममदापूर संवर्धन राखीव वनक्षेत्राविषयी

नाशिकपासून 127 कि.मी. अंतरावर 54.46 चौ.कि.मी चे ममदापूर संवर्धन राखीव काळवीटांसाठी विकसित करण्यात आले आहे. भारतीय उपखंडाचं प्रतीक म्हणून ज्या काळवीटांकडे पाहिलं जातं त्या काळवीटांना या संवर्धन राखीवमध्ये विस्तृत स्वरूपात नैसर्गिक अधिवास मिळाला आहे. नाशिक जिल्ह्याच्या येवला तालुक्यातील ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, सोमठाणजोश या परिसरात हे संवर्धन राखीव पसरलेले आहे. काळवीट हा फार लाजाळू, चपळ आणि देखणा प्राणी आहे. शुष्क मोकळी माळरानं आणि खडकाळ जमीन हेच काळवीटांचं आवडतं अधिवासाचं ठिकाण आहे.

काळवीटांचं आवडतं अधिवासाचं ठिकाण

काळवीट ही अतिशय धोक्यात असलेल्या 26 प्रजातींपैकी एक प्रजात. नामशेष होण्याच्या स्थितीत असलेल्या या प्राण्याचे संरक्षण होऊन त्यात वृद्धी व्हावी म्हणूनच वन विभागाने पाच गावातील काही क्षेत्र राखीव घोषित केले आहे. अहमदनगर जिल्ह्यात रेहकूरी येथे हे काळवीट अभयारण्य आहे. पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, बारामती, शिरूर या तालुक्यात तसेच सोलापूर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, गुजरात आणि हरियाणातही काळवीटांचे अस्तित्त्व आढळते. या सर्वांमध्ये येवला तालुक्यातील ममदापूर- राजापूर क्षेत्र हे काळवीटांसाठी योग्य असं ठिकाण आहे. इथे काळवीटांचा अगदी स्वच्छंद वावर आहे.

येथे 25 पेक्षा अधिक कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. सोलर बोअरवेल, गणवेशधारी वन कर्मचारी, पर्यटनासाठी पूरक सायकल अशा अनेक सुविधांनी हे अभयारण्य सुसज्ज करण्यात आले आहे. यातून स्थानिकांना रोजगार देखील मिळाला आहे. या परिसरात काळवीटाबरोबर लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, रानमांजर, उदमांजर, ससा, मुंगूस, साळींदर अशा इतर वन्यजीवांची रेलचेल आहे.

नुकत्याच झालेल्या प्राणी गणनेमध्ये इथल्या काळवीटांच्या संख्येत पंधरा ते वीस टक्क्यांनी वाढ झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हे एक शुभवर्तमान आहे. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने काळवीटांचे जंगलातून बाहेर जाण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

कुरंगवर्णिय (ॲन्टीलोप) प्राणी

संपूर्ण भारतात सहा प्रकारचे कुरंगवर्णिय (ॲन्टीलोप) प्राणी आढळतात. त्यापैकी महाराष्ट्रात चार जातींचा वावर आहे. या चार जाती म्हणजे नीलगाय, चौशिंगा, चिंकारा आणि काळवीट. काळवीटाचे नर पिल्लू एक वर्षाचे झाले की त्याला शिंगे फुटतात. दुसऱ्या वर्षापासून तो जसा प्रौढ होत जाईल तस तसा त्याच्या शिंगांना गोलाकार पीळ पडत जातो. तिसऱ्या वर्षानंतर त्याला प्रौढ समजण्यात येते. त्याचा सुरुवातीचा गडद तपकीरी रंग नंतर अगदी काळा होतो. मात्र मानेचा आणि पोटाचा भाग पांढराच राहातो. मादी जन्मापासून फिकट तपकिरी रंगाची असते तिच्या रंगात बदल होत नाही. काळवीट हा कळपाने राहणारा प्राणी, एका कळपात साधारणत: पंधरा ते तीस अशी संख्या असते. त्यांच्या कुटुंबकबिल्यात नर-मादी, पिल्लू असे सगळेजण गुण्यागोविंदाने राहातात. असं असलं तरी नर आपलं क्षेत्र राखून ठेवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावून संघर्ष करतांनाही दिसून येतो. मादी 20 ते 22 महिन्यांची झाली की ती प्रजोत्पादनक्षम होते. कळपात राहून सतत सावध राहणारे, हलकी चाहूल लागताच ऊंच झेप घेत धुम्म ठोकणारे आणि चुटूचुटू गवत खाणारे काळे मृग (काळवीट) ममदापूर संवर्धन राखीवमध्ये आपल्याला सहज पहायला भेटतात.

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य, रेणूका देवी मंदिर, चांदवडचा रंगमहाल, शिर्डी, येवल्याचे पैठणी केंद्र, नस्तनापूरचे शनिपीठ, कोटमगावचे जगदंब देवी मंदिर, तात्या टोपेंची जन्मभूमी, अंकाई-टंकाई लेणी व किल्ला, माणिकपूंज धरण, सावरगाव-धानोऱ्याचा उभा हनुमान, लोहशिंगचे शाकंभरीमाता मंदिर ही काही जवळची प्रेक्षणीय स्थळं आहेत, त्यांनाही आपण वेळात वेळ काढून भेट देऊ शकतो. नांदगावला वन विभागाचे तर येवल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह आहे. नांदगाव, मनमाड, येवला येथे खासगी हॉटेल्सही उपलब्ध आहेत.

कसे जाल?

जवळचे रेल्वेस्टेशन मनमाड – 35 किमी., नांदगाव 25 कि.मी, नगरसूल 15 कि.मी, शिर्डी 52 कि.मी.

राजापूरपर्यंत रस्त्याने अंतर- नाशिक 110 कि.मी, औरंगाबाद 110 कि.मी. नांदगाव 25 कि.मी, मुंबई 300 कि.मी, शिर्डी 52 कि.मी, पुणे 245 कि.मी, गौताळा औटामघाट 110 कि.मी, त्र्यंबकेश्वर- 140 कि.मी, वणी (सप्तशृंगी गड)- 170 कि.मी

काळवीटांची बारमाही वस्ती असल्याने येथे केंव्हाही जाता येते. निरीक्षणासाठी सकाळ आणि संध्याकाळची वेळ उत्तम. ज्याला ब्लॅकबग सफारीचा अनुभव घ्यायचा आहे त्यांनी ममदापूर संवर्धन राखीवला जायलाच हवे.

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कृष्णा नदीच्या खोऱ्यात सागरोबा डोंगरावर यशवंतराव चव्हाण सागरेश्वर वन्यजीव अभयारण्य वसले आहे. १९८५ मध्ये या वनक्षेत्राला अभयारण्याचा दर्जा मिळाला. महाराष्ट्रातील लहान अभयारण्यापैकी एक असलेल्या सागरेश्वर वन्यजीव अभयारण्याचे क्षेत्रफळ १०.८७ चौ.कि.मी इतके आहे. हे मानवनिर्मित अभयारण्य आहे. धो.म. मोहिते या वृक्ष आणि वन्यजीव प्रेमीच्या ध्यासातून साकारलेलं आणि लोकसहभागातून आकाराला आलेले हे अभयारण्य त्यामुळेच वेगळं आहे. लोकांनी ठरवलं तर शासनासोबत राहून किती उत्तम काम करता येऊ शकतं याचं सुंदर उदाहरण म्हणजे सागरेश्वर अभयारण्य. भरपूर पाऊस, धुक्याची दाटी, गार वारा आणि हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करून टाकतो. विविध पक्षांचा कुंजारव, डोंगरमाथ्यावरून कोसळणारे छोटे मोठे धबधबे आणि चिंब भिजण्यासाठी आतुरलेली माणसं… मनातल्या ओढीला तृप्तीचा समृद्ध अनुभव देणाऱ्या या अभयारण्यात सागरेश्वर महादेवाचं मंदिर आहे. येथे प्राचीन मंदिराचा समूह आहे. एकूण 47 मंदिरे व 13 ओवऱ्या आहेत. आंघोळीचे आणि पिण्याचे कुंड वेगवेगळे आहेत. या कुंडात वर्षभर पाणी असतं ते केव्हाच आटत नाही.

प्रवेश

सागरेश्वर मंदिरापासून पुढे एक – दीडकिलोमीटरचा यशवंत घाट ओलांडल्या‍नंतर सागरेश्वर अभयारण्याची सीमा सुरू होते. सागरेश्वर अभयारण्य हे कडेगाव, वाळवा व पलूस या तालुक्यांच्या सीमा जोडणाऱ्‍या सह्याद्रीच्या सागरेश्वर पर्वताच्या माथ्यावर आहे. देवराष्ट्र गावात पोचल्यानंतर डाव्या हाताला अभयारण्याचे प्रवेशद्वार लागते. तेथे शुल्क आकारून आत प्रवेश दिला जातो.

जैवविविधता

सागरेश्वर अभयारण्याच्या परिसरात विपुल वनसंपदा आहे. तेथे उष्ण-कोरड्या हवामानातील पानझडी, काटेरी वनस्पती जास्त प्रमाणात आढळतात. धावडा, चंदन, बाभूळ, सुबाभूळ, कशिद, गुलमोहर, अंजन, निलगिरी, आपटा, सीताफळ तसेच धायटी, घाणेरी आदी वृक्ष आणि झुडपे यासोबत अभयारण्यात करवंद, बोर या रानमेव्याच्या जाळी जागोजागी आहेत. वृक्षसंपदेत साग, वड, पिंपळ, लिंब, चेरी, औंदुबर सारख्या अनेक वनौषधी आहेत. सांबर, चितळ, काळवीट, ससा, खार, साळींदर, हनुमान लंगूर, खोकड, कोल्हा, लांडगा, तरस असे वन्यजीव आपण इथे पाहू शकतो. हे पक्षांचं नंदनवन आहे. पक्षी निरीक्षणाची हौस असलेल्यांसाठी हे एक उत्तम स्थळ आहे. शुष्क गवताळ झुडपी टेकड्यांचा अधिवास असलेल्या या छोटेखानी अभयारण्यात १४२ प्रजातींच्या पक्षांची नोंद करण्यात आली आहे. कोतवाल, हळद्या, साळुंखी, मैना, सुगरण, चष्मेवाला, मुनिया, सुर्यपक्षी, नाचण, सातभाई, राखी वटवट्या, दयाळ, सुभग, बुलबूल, भिंगरी, चंडोल, सुतारपक्षी, तांबट, राखी धनेश, वेडा राघू निलपंख, रातवा, पिंगळा, गव्हाणी घुबड, भारद्वाज, पावश्या, पोपट, कोकिळ, हरियाल, मोर, गाय बगळा अशा विविध रंगी पक्ष्यांचं मनोहारी दर्शन आपल्याला खूप आनंद देऊन जातं. भारतात आढळणारे सर्वात लहान फुलपाखरू ग्रास ज्यूवेल या अभयारण्यात निवांत विहार करतं. जगात स्थलांतरासाठी प्रसिद्ध असलेलं पेंटेड लेडी हे फुलपाखरू आपल्याला येथे भेटून जातं. हे अभयारण्य विविध प्रकारचे साप, बेडूक, पाली, सरडे, यांचा हक्काचा निवारा आहे.

वन्य प्राण्यांपासून होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी अभयारण्याभोवती तारेचे कुंपण लावण्यात आले आहे तर वन्यजीवांसाठी ठिकठिकाणी पाणवठे निर्माण करण्यात आले आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी बांबू हट, निसर्ग माहिती केंद्र, ओपन ॲम्पी थिएटर, लहान मुलांसाठी बगीचा, खेळणीचीही येथे व्यवस्था आहे. वन्यजीव आणि पशु-पक्ष्यांची माहिती देणारे फलक आपलं लक्ष वेधून घेतात.

यशवंतराव चव्हाण सागरेश्वर अभयारण्यात वन्यप्राण्यांना एक सुंदर अधिवास मिळाला आहे. बारमाही पाण्याची व्यवस्था अभयारण्यातच झाल्याने वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी बाहेर वावर होतांना आढळत नाही.

बघण्यासारखे

अभयारण्यातील किर्लोस्कर पॉइंटवरून नजर फिरवली तर वाळवा, पलूस, खानापूर आणि कडेगाव तालुक्यातील विहंगम परिसर दिसतो. खालून नागमोडी वळणे घेत वाहणारी कृष्णा नदी दिसते. त्‍या पॉईंटजवळ एक गुहा आहे. काही अंतर पुढे गेल्यानंतर अभयारण्याच्या मध्यभागी काळभैरवाचे मंदिर लागते. डोंगरपायथ्याशी असलेल्या ताकारी गावाचे ते ग्रामदैवत आहे. त्यापुढे लागणारा रणशूळ पॉईंट हे अभयारण्यातील सर्वांत उंच ठिकाण आहे. सागरेश्वर अभयारण्य मिरज रेल्वे स्थानकापासून साठ किलोमीटर, कराडपासून तीस किलोमीटर तर ताकारी रेल्वे स्थानकापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. कराड हे पुणे – बंगळुरू महामार्गावर असून तेथून सागरेश्वर येथे पोहोचण्यासाठी बस सेवा उपलब्ध आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी पावसाळा उत्तम कालावधी आहे. वर्षा सहलीचा आनंद लुटायचा असेल तर हे अतिशय निसर्गरम्य ठिकाण आहे. खरी गरज आहे घराबाहेर पडण्याची

सुधागड वन्यजीव अभयारण्य

सुधागड हा एक ऐतिहासिक किल्ला आहे. पूर्वी या गडाला भोरपगड असेही म्हणत. सुधागड आणि सभोवतालचे 76.88 चौ.कि.मी. क्षेत्र 27 ऑगस्ट 2014 रोजी अभयारण्य म्हणून घोषीत करण्यात आले. पुण्यापासून साधारणत: 115 ते 135 कि.मी अंतरावर रायगड आणि पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात हे अभयारण्य वसले आहे. सुधागडचा परिसर दाट वनश्रीने नटलेला आहे. गडाची समुद्र सपाटीपासून ऊंची 619 मीटर आहे. सुधागड परिसरात 2200 वर्षांपूर्वीची ठाणाळे लेणी आहेत. गडावर अनेक तलाव आहेत पंत सचिवांचा वाडा, भोराई देवी तसेच भोरेश्वराचे मंदिर आहे. पाच्छापूर दरवाजा, दिंडी दरवाजा, धान्य कोठारे, भांड्याचे टाके, हवालदार तळे, हत्तीमाळ अशी बरीच ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत. गडाच्या सभोवताली अनेक औषधी वनस्पती आणि वन्यजीवांचा वावर आहे. गडावर टकमक टोक आहे. या टोकावर उभे राहिल्यावर समोर उभा असणारा धनगड, कोरीगड तेलबैला दिसतो. एकूणच दुर्गप्रेमी आणि वनवाटांवर प्रेम असणाऱ्यांसाठी सुधागड हे नेहमीच आकर्षणाचे ठिकाण राहिले आहे.

वन्यजीव-वृक्ष संपदा

पंच सचिवांचा वाडा व भोराई देवी मंदिरात साधारणत: 50 ते 60 लोकांची निवास व्यवस्था आहे. साग, खैर, काटेसावर, बीजा, कुंभा, आष्टा, अंजनी, जांभूळ, पिसा, वारस, आसाना, ऐन, बेहडा, पारजांभूळ, नाना यासारखे वृक्ष वैभव, कारवी, करवंद, धायटी, रामेठा, मुरूडशेंग, फापट, कुडा, दिंडा सारखी झुडूप प्रजाती येथे मोठ्या प्रमाणात आहेत. वेली आणि वानस प्रकारात उक्षी, पिळुकी, मालकांगोणी, खाज कोयली, वाटोळी, ओंबळ, पहाडवेल, घोटवेल, कडुकारंदा, आंबगुळी, तोरण, कुसर, बेडकीचा पाला, करटूली अशा वेली तर सोनकी, निचुरडी, काळीमुसळी, भुई आमरी, पांगळी, खुळखुळा, कचोरा, पानतेरडा, पंद, बृम्बी वाघचौरा ही वानसे ही येथे विपूल प्रमाणात आहेत.

हे वन निम्न सदाहरित, सदाहरित, वन आणि आर्द्र पानझडीचे वन या प्रकारात मोडते. येथे बिबट्या, भेकर, उदमांजर, रानमांजर, खवल्या मांजर, मुंगूस, साळींदर, वानर, शेकरू हे वन्यजीव आपल्याला पहायला भेटतात. अजगर, नाग, धामण, चापडा, हरणटोळ, कवड्या दिवड, व घोरपड हे सरपटणारे प्राणीही येथे आहेत. पर्वतकस्तूर, युवराज, स्वर्गीयनर्तक, चंडोल, सर्पगरूड, मोरघार, हळद्या, कुरटूक, निखार, शमा, नवरंग, टकाचोर, असे विविध मनमोहक पक्षी या वनात स्वच्छंद विहार करतांना दिसतात. महाराष्ट्र राज्याचे मानचिन्ह असलेल्या ब्ल्यू मॉरमॉन फुलपाखराबरोबर अनेकप्रकारची रंगीबेरंगी फुलपाखरं इथे आहेत.

गडाचा इतिहास

हा गड म्हणजे भोर संस्थांनचे वैभव. झाडांमध्ये लपलेला हा गड विस्ताराने फारच मोठा आहे. या गडाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला आणि त्यांनी या गडाचे नाव सुधागड असे ठेवले. पुराणात भृगु ऋषींनी येथे वास्तव्य केल्याचे अनेक उल्लेख आढळतात. याच ऋषींनी भोराई देवीची स्थापना या डोंगरावर केली अशीही आख्यायिका येथे सांगितली जाते.. गडावर वाड्याच्या मागील बाजूस चोरवाट विहीर आहे. त्याच्यात एक भुयार असून. संकटाच्या वेळी गडावरून खाली जाण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा अशी माहिती येथे मिळते. भोराई देवीच्या मंदिराच्या मागील बाजूस अनेक समाध्या आहेत. त्यांवर सुबक नक्षीकाम आहे.

भरपूर चालण्याची तयारी ठेऊन या गडकिल्ल्याची सफर करता येते. पैज लावून गड चढणाऱ्यांची संख्याही कमी नाही. अस असतांनाही तुम्ही थकत नाही कारण सभोवतालचा हिरवागार निसर्ग तुम्हाला ऑक्सीजन तर पुरवतोच पण आनंदही देतो. अशी ही आनंददायी गिरीदुर्गाची सफर करायची असेल तर सुधागड मुंबई- पुणेकरांसाठी फार लांब नाही. त्यांनी तर जावच पण इतर सर्व पर्यटकांनीही जावं… कारण तिथं जाणं आणि वनसौंदर्य पाहतांना गिरीभ्रमण करणं खरच खुप आनंददायी आहे.

कसे जाणार?

गडावर बहिरामपाडा किंवा धोंडसे गावातून महादरवाज्यामार्गे आत जाता येते.

तेलबैलावरून घोडजिन्याने महादरवाजामार्गे, धोंडसे गावातून चोरदरवाजामार्गे पाच्छापूर गावातून पाच्छापूर दरवाजामार्गे, ठाकूरवाडीतून पाच्छापूर दरवाजामार्गे (शिडीची वाट), ठाकूरवाडीतून बोलत्या कड्यांमधील घळीमार्गेही गडावर जाता येते.

गौताळा अभयारण्य

औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य

गौताळा अभयारण्य हे औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य आहे. औरंगाबादपासून 65 कि.मी अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्यादृष्टीने अतिशय श्रीमंत आहे. विविध प्रजातींची वृक्षराजी, प्राणी आणि पक्ष्यांचा अधिवास असलेले 261 चौ.कि.मी.चे हे क्षेत्र महाराष्ट्र शासनाने दि. 25 फेब्रुवारी 1986 रोजी अभयारण्य म्हणून घोषीत केले. या अभयारण्याच्या राखीव वनक्षेत्रात औरंगाबाद जिल्ह्याचे 19706 हेक्टर तर जळगावचे 6355 हेक्टर क्षेत्र समाविष्ट आहे.

गौताळा औटराम घाट अभयारण्य कन्नड गावापासून 15 कि.मी अंतरावर आहे तर चाळीसगाव पासून 20 कि.मी अंतरावर. औरंगाबादपासून कन्नड 65 कि.मी अंतरावर आहे. हाच रस्ता पुढे चाळीसगावला जातो. कन्नडहून 2 कि.मी पुढे गेल्यानंतर एक फाटा लागतो. या फाट्याने आपण सरळ गौताळा अभयारण्याच्या प्रवेशद्वाराजवळ जातो. अभयारण्यात वाहनाने फिरता येते. तळ्याभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडुनिंब, चिंच असे वृक्ष आहेत तर तळ्यात पाणडुबा, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. तळ्याशेजारी एक निरीक्षण मनोरा आहे. या मनोऱ्यावरून गौताळा परिसरातील निसर्ग अनुभवता येतो. तेथून आपण साग, चंदन, खैर, सिरस, शिसे, धावडा, पिंपळ, पळस, करवंद, बोर, सीताफळ, अंजन, शेवग्याची झाडं, प्राणी, पक्षी पाहू शकतो.

अभयारण्यात बिबट्या, लांडगे, चितळ, तरस, कोल्हे, काळवीट, रानडुकरे, सांबर, गवे, भेकर यासह इतर 54 प्रजातींचे प्राणी तर 230 प्रजातींचे पक्षी असल्याची नोंद झाली आहे.

प्रसिद्ध गणितज्ज्ञ भास्कराचार्यांची कुटी, पुरातन मंदिरे, लेणी, महादेव मंदिर, हेमाडपंथी पाटणदेवी मंदिर, केदारकूंड, सीताखोरे आणि धवल तीर्थ धबधबा अशा विविध स्थळांनी पर्यटकांना भूरळ घातल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असते.

सातमाळ्याचा डोंगर

गौताळा तलावाच्या डाव्या बाजूला सातमाळ्याचा डोंगर दिसतो. या डोंगरातून नागद नदी उगम पावते ती उजवीकडे भेळदरीत उतरते. तेथे नदीवर नागद तलाव बांधलेला आहे. सातमाळ्याच्या पलिकडे मांजरमाळ डोंगर दिसतो.

भास्काराचार्यांचे पीठ

या अभयारण्याजवळ पाटणा येथे निकूंभ राजवंशानी बांधलेले 12 व्या शतकातील पुरातन मंदिर आहे. चंडिकादेवी मंदिरापासून काही मीटर अंतरावर गणित आणि खगोल तज्ज्ञ भास्काराचार्यांचे पीठ आहे. जिथे बसून त्यांनी सिद्धांत शिरोमणी या ग्रंथात अनेक गणिती सिद्धांत मांडल्याचे बोलले जाते.

पाटणदेवीच्या हिवरखेडा प्रवेशद्वारातून पर्यटक अभयारण्यात प्रवेश करू शकतात. पुरणवाडी आणि पाटणादेवी येथे वन विभागाची विश्रांतीगृहेही पर्यटकांच्या सोईसाठी उपलब्ध आहेत. गौताळा औट्रमघाट अभयारण्य हे मराठवाड्यातील सर्वात मोठे अभयारण्य आहे.

हे वन मंदिरे आणि पुरातत्वीय संपदेने समृद्ध आहे. कन्नडजवळच्या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर चंदन नाला लागतो. तिथे मोर पोपट यासह सातभाई, सुगरण, दयाळ, बुलबूल, कोतवाल, चंडोल असे विविध रंगाचे पशुपक्षी दिसतात. या नाल्यानंतर दाट जंगल सुरू होते. पुढे एक मारूतीचे मंदिर आहे. या मंदिरासमोर गौताळा तलाव आहे. तलावाचा सारा परिसर गवताळ आहे. या परिसरात पूर्वी गवळी लोक रहायचे, त्यांच्या गायी या परिसरात चरायच्या त्यावरून या तलावाला गौताळा तलाव असे नाव पडले पुढे हेच नाव या अभयारण्यालाही मिळाले.

गौतम टेकडी

औरंगाबाद-कन्नड रोडला डावीकडे पितळखोऱ्याच्या लेण्या आहेत. सह्याद्री पर्वताच्या सातमाळ डोंगररांगात कोरलेल्या या लेण्याही पर्यटकांना आकर्षित करतात. गौताळा तलावाच्या पुढे एक ऊंच टेकडी आहे. या टेकडीवर एक गुहा आहे. त्यात एक पाण्याची टाकी आहे. गुहेत गौतम ऋषींची दगडी मूर्ती आहे. या गुहेत गौतम ऋषींनी तप केले असे म्हटले जाते. यामुळेच या टेकडीला गौतम टेकडी असं देखील म्हणतात. येथे मोठ्याप्रमाणात वनौषधी सापडतात. पवण्या, लव्हाळी, हरळी, कुसळी, नागरमोथा, सफेद मुसळी, शतावरी, अमरवेल, जंगली लवंग, गौळणा, हरणखुरी, रानकेळी, मनचंदी म्हाळू, गोमिळ्या, धोळ, म्हाकोडी, दौडी, तामूलकंद, खरबुरी, हामण, वढदावा, सुलेकंद अशा आयुर्वेदाला उपयुक्त वनस्पती अभयारण्यात विपुल प्रमाणात आहेत. पर्यटनाच्या सर्वांगाना स्पर्श करणारे हे ठिकाण त्यामुळेच खुप महत्वाचे आहे. औरंगाबाद-धुळे या रस्त्याला जोडणारा राज्य महामार्ग क्रमांक 211 याच अभयारण्यातून जातो. अभयारण्याला भेट देण्याचा सर्वोत्तम कालावधी जूलै ते जानेवारी असा आहे.

पोचाल कसे ?

जवळचे शहर- चाळीस गाव- 20 कि.मी, कन्नड- 15 किमी

विमानतळ- औरंगाबाद- 75 कि.मी

रेल्वेस्थानक- चाळीसगाव – 20 कि.मी, औरंगाबाद- 65 कि.मी

इतर प्रेक्षणीय स्थळे- औरंगाबाद-मकबरा, पाणचक्की, खुलताबाद. दौलताबाद, अजिंठा वेरुळ, भद्रामारूती, औरंगाबाद लेणी, सोनेरी महल

रायगडमधील फणसाड अभयारण्य

निळाशार समुद्र, लाटांचे आक्रमण परतवून लावत निर्धाराने सागरात पाय रोवून उभा असलेला मुरूड जंजिऱ्यासारखा किल्ला आणि असंख्य निर्झरांना अंगाखांद्यावर खेळवत चिंब भिजून गेलेल्या आणि हिरव्याकंच झालेल्या रानवाटा हा रायगडचा आकर्षणाचा भाग. त्यात घनदाट जंगलात वनपर्यटनाची साद घालणारं फणसाड अभयारण्य…

फणसाड हे रायगड जिल्ह्यातील मुरूड आणि रोहा तालुक्यात आहे. बारशिव, काशीद, चिकनी, सर्वा दांडा, नांदगाव, मजगाव वळास्ते, कोकबन, सुपेगाव या अडतीस गावांनी ते वेढले आहे.

पावसाळा सुरु झाला की आपोआप पाऊल वर्षा सहलीसाठी तिकडे वळायला लागतात… अगदी मनसोक्त भिजण्यासाठी… रानवाटांवरून भटकंती करण्यासाठी. मुंबई ते फणसाड अभयारण्याचं अंतर साधारणत: 175 कि.मी.चं. निसर्गानं या भागाला भरभरून दान दिलं आहे. पूर्वी मुरुड जंजिरा संस्थांनचे नवाब सिद्दी यांच्या मालकीचे हे क्षेत्र शिकारीसाठी उपयोगात आणले जायचं. त्यावेळी नवाबांनी जंगलामध्ये जांभा दगडाचे वर्तुळाकार ओटे बनविले होते. स्थानिक भाषेत त्यांना ‘बारी’ असे म्हणतात ते आजही पाहता येतात.

काशिदच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यापासून फक्त 12 कि.मी अंतरावर असलेले हे वन मिश्र सदाहरित वने, शुष्क पानगळीचे वने, सदाहरित वने याप्रकारात मोडते. या जंगलाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रवारी 1986 रोजी या क्षेत्राला राखीव वनाचा दर्जा देत अभयारण्य म्हणून घोषित केले.

वनस्पती व वन्य जीव

अभयारण्याचे क्षेत्रफळ 69.790 चौ.कि.मी. आहे. जंगलात सुमारे 700 प्रकारच्या वृक्ष प्रजाती आहेत. 17 प्रकारचे प्राणी, 90 हून अधिक जातीची रंगीबेरंगी फुलपाखरं आणि 17 प्रकारचे साप आहेत. दुपारनंतर वेली-झुडपांवर फुलपाखरांची बाग फुललेली असते. अभयारण्यात 30 पाणस्थळे आहेत. त्यांना स्थानिक भाषेत ‘गाण’ म्हणतात. सकाळी आणि सायंकाळी येथे पक्षी संमेलन भरते. फणसाड अभयारण्य हे पक्षांचं नंदनवन आहे निसर्गाचं स्वत:चं असं एक संगीत असतं. सूर्योदय आणि सुर्यास्तादरम्यान पक्षी निरीक्षणासाठी गेल्यास निसर्गाचं हे अनोखं संगीत आपल्याला इथे विनासायास ऐकायला मिळतं.

निलगिरीची रोपवने, ऐन, किंजळ, जांभूळ, कुडा, गेळा, अंजनी, कांचन, सावर, अर्जन यारख्या वृक्षांबरोबर सर्पगंधा, कुरडू, नरक्या, सीता अशोक सारखी उपयुक्त वनौषधीही इथे विपूल प्रमाणात आहे. गारंबीची वेल हे इथलं वैशिष्ट्य. या वेलीच्या शेंगांमधील गर हा शेकरूचा आवडता खाद्यपदार्थ. या वेलीची लांबी 100 मीटर पेक्षा जास्त असते. राज्य शासनाने ज्या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा दिला आहे ते ब्ल्यू मॉरमानही इथे आनंदाने विहरतांना दिसतं. इथं रानससा, सांबर, भेकर, पिसोरी, सांळींदर, तरस, रानडुक्कर, मुंगूस, कोल्हा, वानर, माकड, रानमांजर व बिबट्या आणि महाराष्ट्राचं आणखी एक मानचिन्ह असलेलं ‘शेकरु’ हमखास दृष्टीस पडते. पिसोरी हे जगातील सर्वात लहान पण अतिशय चपळ हरीण आपण येथे पाहू शकतो. नाग, फुरस, घोणस, मण्यार, वायपर अशा विषारी तर हरणटोळ, तस्कर साररख्या बिनविषारी सापाचा इथे वावर आहे.

ब्राह्मणी घार, घुबड, तुरेवाला, सर्पगरुड, ससाणा, सफेद पाठीची गिधाडे यासारखे शिकारी पक्षी तर सातभाई, बुलबुल, रातवा, रानकोंबड्या, धनेश, कोतवाल यासह वेडाराघू, हळद्या, तांबट, खंड्या, खाटीक, सुभग, नीलपंख, स्वर्गीय नर्तक, सुतार, महाराष्ट्राचे मानचिन्ह असलेले हरीयाल, कोकीळ यासारखे गाणारे आणि आपल्या मोहमयी दुनियेत घेऊन जाणारे पक्षी आपलं अस्तित्त्वं विसरायला भाग पाडतात. या जंगलातील आणखी एक आकर्षक पक्षी म्हणजे धनेश. हा पक्षी याच्या वैशिष्ट्यपूर्ण चोचीमुळे सहज ओळखता येतो. रुबाबदार बिबट्याचं हमखास दर्शन ज्याला घ्यायचं त्याने इथे जरूर यावं.

व्हाईट हाऊस तंबू

सुपेगावचे वन विभागाचे व्हाईट हाऊस तंबू तुमच्या निवासाची सुंदर व्यवस्था करतात. सर्व गरजांनी परिपूर्ण असलेल्या या तंबूत राहणं ही एक आनंददायी गोष्ट आहे. शिवाय खाजगी निवास व्यवस्थाही आहेतच. बचतगटांमधील महिलांच्या हातचे जेवण तुम्हाला घरच्या जेवणाची उणीव भासू देत नाही. प्लास्टिक वापराला बंदी असल्याने परिसरात स्वच्छता आणि शांतता दोन्ही हातात हात घालून नांदतांना दिसतात. वन विभागाचे निसर्ग परिचय केंद्र आपली वनांबद्दलची माहिती परिपूर्ण करते. इथलं आणखी एक आकर्षणाचे ठिकाण म्हणजे फणसाड धबधबा. अलिबाग-मुरुड रोडवर बोर्ली येथे उतरायचे. तिथून तीन ते साडेतीन कि.मी.अंतरावर फणसाड धबधबा आहे. निसर्गाच्या कुशीत फेसाळत कोसळणारा हा पाण्याचा पांढरा शुभ्र प्रपात पाहणं खूपच उत्साहवर्धक ठरतं.

जवळचं रेल्वे स्टेशन

जवळचं रेल्वे स्टेशन रोहा आहे. जे सुपेगांव पासून 39 कि.मी वर आहे.

जवळचं बसस्थानक

जवळचं बसस्थानक – तळेखार, सुपेगाव, असरोली.

पोचाल कसे ?

मुरूड-अलिबाग-रेवदंडामार्गे फणसाडला जाता येतं. रोहा-मुरूड-रेवदंडामार्गे बसनं तळेखार किंवा असरोली फाट्यावर उतरायचं. तळेखारपासून ५ किमीवर अभयारण्य आहे. रेवदंड्याहून मुरूडला जाणाऱ्‍या बसनंही येथे जाता येतं. अभयारण्यात काही खाण्यास मिळत नाही. त्यामुळे बरोबर खाद्यपदार्थ घेऊन जाणं सोयीच ठरतं. मुंबईकरांना, ज्यांचा श्वास सिमेंटच्या जंगलात कोंडतो त्यांना संजय गांधी राष्ट्रीय उद्यानानंतर कर्नाळा, तुंगारेश्वर, तानसा अभयारण्याला जसे जाता येते तसेच आणखी थोड्या अंतरावर असलेल्या फणसाड अभयारण्यालाही सहजपणे भेट देता येईल. फणसाडगाण, चिखलगाण, धरणगाण असे इथले प्रमुख पाणवठे आहेत. या पाणवठ्याच्या आजुबाजूला वन्यजीवन अगदी सहजतने बघायला मिळतात. फणसाडच्या जंगलात गेलो आणि नवीन काही बघितले नाही असे होत नाही. त्यामुळे वेळ मिळताच कधीही जा आणि जंगल भ्रमंतीचा मनमुराद आनंद लुटा…

यावल अभयारण्य

सुकी, अनेर आणि मांजल या तीन नद्या आणि त्यांना मिळणारे छोटे मोठे नाले यामुळे यावल अभयारण्याचे क्षेत्र हिरवेगार आणि जैवविविधतेने समृद्ध झाले आहे. वनस्पती आणि प्राण्यांच्या अस्तित्त्वाने संपन्न असलेल्या या अभयारण्याची घोषणा शासनाने 21 फेब्रुवारी 1969 रोजी केली.

वनपर्यटनाचा मनमुराद आनंद घेणाऱ्यांसाठी हे क्षेत्र अतिशय सुंदर असून ज्यांना वन्यजीव पहायचे आहेत त्यांच्यासाठी, ज्यांना पक्षी पहायचे आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांना वाघ पहायचा आहे त्यांच्यासाठीही हे अभयारण्य एक आकर्षणाचे ठिकाण आहे. अनेर आणि सुकी धरणाच्या आसऱ्याला वन्यजीव येतात. रानपिंगळ्याबरोबर गरूड, सुतार या पक्ष्यांसह 200 हून अधिक प्रजातींचे पक्षी आपण येथे पाहू शकतो. पट्‌टेदार वाघाचा वावर आणि बिबट्याचे होणारे दर्शन अंगावर रोमांच उभे करतात. अस्वल, कोल्हा, लांडगा, रानकुत्रा, रानडुक्कर, रानमांजर, चिंकारा, हरिण, चितळ, चौशिंग्या, सांबर आणि नीलगायीही आपल्याला नजरेस पडतात. साग, अंजनासोबत ऐन, शिसव, तिवस, खैर, हिरडा, बेहडा, तंदूच्या झाडांची गर्दी मनाला सुखावून जाते. या वनामध्ये बांबूही मोठ्या प्रमाणात दिसून येतो. पावसाळ्यात तर पर्वतरांगांमध्ये विसावणाऱ्या ढगांनी सातपुड्यावर धुक्याची दुलई पांघरली आहे की काय असं वाटू लागतं.

वनस्पती

या अभयारण्यात मौल्यवान वृक्ष प्रजातींबरोबर असंख्य औषधी वनस्पती आढळतात. अभयारण्याचे क्षेत्र नैसर्गिक उच्च प्रतीचे वन याप्रकारात मोडते. अभयारण्याचे क्षेत्र 177.52 चौ.कि.मी असून या लगत प्रादेशिक यावल विभागाचे एकूण 995.39 चौ.कि.मी वनक्षेत्र आहे. अभयारण्यात सुकी धरण 1977 मध्ये पूर्ण करण्यात आले. हे धरण वन्यजीवांची तहान भागवते. क्षेत्रात विविध निरिक्षणस्थळे आहेत. यात चिंचाटी व्ह्यू पाँईट, पालोबा पाँईट, पाच पांडव ही ऊंच शिखरे असून तेथून परिसराचा रमणीय देखावा दिसून येतो.

अभयारण्यात गारबर्डी, जामन्या, गाड्या, उस्मळी, यासारखी गावं समाविष्ट असून तिथे प्रामुख्याने तडवी, पावरा, कोळी, भिल या आदिवासी समाजाचे वास्तव्य आहे. त्यांची पारंपरिक लोकसंस्कृतीही या जंगल भ्रमंतीत आनंद देऊन जाते. संत मुक्ताबाईचे दर्शन, संत चांगदेवांचे मंदिर आपण पाहू शकतो. मनुदेवीच्या दर्शनानंतर उनपदेव हे गरम पाण्याच्या झऱ्यासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पहायाला हरकत नाही. रानवाटांवरून ज्यांना जायला आवडतं त्यांच्यासाठी मध्यप्रदेश – महाराष्ट्राच्या सीमेवर खुपसदेव आणि ताजुद्दिन अवलियाचे दर्शन मन प्रसन्न करणारे आहे. त्यात शिरवेलचे महादेव आणि गोरक्षनाथाचे मंदिर आनंद द्विगुणित करतात.

अभयारण्यात वर्षभर फिरता येते. जळगाव जिल्ह्यातलं हे एकमेव अभयारण्य आहे. पाल हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. आसपासच्या क्षेत्रात थंड हवेचे ठिकाण नसल्याने पर्यटकांची शिवाय दुचाकीवर येणाऱ्या वनपर्यटकांची संख्याही हजारोंनी आहे.

धुळे वनवृत्तात संवेदनशील बिनतारी संदेश यंत्रणा ऑगस्ट 2000 पासून सुरु करण्यात आली. ती यावल अभयारण्यात जामन्या आणि लंगडाआंबा या दोन मुख्य ठिकाणी स्थापन करण्यात आली. सात हॅन्डसेट क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना देण्यात आले असून दोन मोबाईल सेट शासकीय जीपवर बसविण्यात आले आहेत. याशिवाय पाल, खिरोदा, यावल, लालमती, रावेर, वाघझिरा, देवझिरी या प्रादेशिक विभागाच्या नियंत्रणाखाली मुख्य ठाण्यांचा उपयोग केला जातो. अवैध चराई, वनवणवा, अवैध वृक्षतोड, अवैध वृक्षकटाई यावर नियंत्रण ठेवण्यासाठी या बिनतारी संदेश यंत्रणेचा खूप उपयोग होतो.

पर्यटनाचा उत्तम कालावधी

पर्यटनाचा उत्तम कालावधी हा सप्टेंबर ते फेब्रुवारी असा आहे. अभयारण्याला भेट देण्यासाठी जळगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे शासकीय विश्रामगृहाबरोबर खाजगी निवास व्यवस्थाही उपलब्ध आहे. पाल येथे वनउद्यान आणि विश्रामगृहाबरोबर एका युवक वसतिगृहाची देखील सोय आहे. याचे आरक्षण उपवनसंरक्षक, यावलस्थित जळगाव येथे होते.

जवळचे बस स्थानक व रेल्वे स्टेशन

जवळचे रावेर रेल्वेस्टेशन 25 कि.मी अंतरावर आहे. तर भूसावळ 50 कि.मी अंतरावर आहे. पाल, रावेर, सावदा, भुसावळ ही जवळची बसस्थानके आहेत. ज्यांना विमान प्रवास करावयाचा आहे त्यांना 260 कि.मी अंतरावर औरंगाबाद विमानतळ आहे.

जळगाव जिल्ह्यातील इको टुरिझमला गती देणारं हे अभयारण्य समृद्ध वनदर्शनाबरोबरच आदिवासी संस्कृतीची ओळख देणारे, त्यांचे जीवनमान आणि उत्सव यांचा मनमुराद आनंद देणारे असे स्थळ आहे. दाटीवाटीने उभी राहिलेली झाडं आणि खान्देशासाठी पाऊस अडवणारी सातपुडा पर्वत रांग डोळ्यांचे पारणे फेडत या वनसंपदेला अंगाखांद्यावर खेळवतांना दिसते.

ताम्हिणी अभयारण्य

डोंगर कड्यांवर ओथंबून आलेली ढगांची गर्दी, दाटलेलं धुकं आणि सरींवर सरी… घेऊन कोसळणाऱ्या पावसाशी झिंगडझुम्मा करायचा असेल तर तुमच्या-माझ्या सारख्यांची पाऊलं आपणहूनच ताम्हिणी घाटाकडे वळतात. पावसाच्या अलौकिक स्पर्शानं दाटीवाटीने फुलून आलेला निसर्ग आणि आपला ताठरपणा बाजूला ठेवत अंगाखांद्यावर वृक्ष वेलींना आणि कोसळणाऱ्या धबधब्यांना घेऊन मायाळू झालेल्या डोंगररांगा यांचं वर्णन कसं करावं ? त्यासाठी शब्दही अपुरे पडतात. त्यामुळेच वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकांनी इथल्या डोंगररांगा आणि घाट रस्ता फुलून जातो. मुळशी धरणाचा नयनरम्य देखावा मन प्रसन्न करतो.

पुण्यापासून 70 कि.मी अंतरावर असलेल्या या घाटाचं निसर्गसौंदर्य मनाला भूरळ पाडणार आहे. मुंबई-गोवा मार्गाने कोलाडपर्यंत गेले की पुढे कुंडलिका नदी लागते. तिच्यावरचा पूल ओलांडला की डाव्या बाजूने मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाता येते. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात ताम्हिणी घाट आहे या घाटात ताम्हिणी वन्यजीव अभयारण्य वसलेलं आहे. 3 मे 2013 रोजी या अभयारण्याची घोषणा करण्यात आली. प्रामुख्याने पुणे आणि अंशत: रायगड जिल्ह्यात 49.62 चौ.कि.मी.च हे क्षेत्र अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आल. कडेकपाऱ्या, ऊंच कडे, खोल दऱ्यांमधील हे अभयारण्य सदाहरित व निमसदाहरित वनांनी वेढलेलं आहे. अभयारण्याची समुद्रसपाटीपासूनची ऊंची 550 ते 1050 मीटर एवढी आहे.

प्राणी व वनस्पती प्रजाती

शांतपणे जागोजाग खळाळणारे निर्झर, थेट डोंगरकड्यावरून उडी मारणारे भले मोठे धबधबे आणि खाच-खळग्यातून वाट काढत धावणारे पाणी हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. कोसळणारं पाणी अंगावर घेत चिंब भिजण्याचा, त्यासोबत गरम भाजलेलं मक्याचं कणिस खाण्याचा आनंद काय सांगावा ? तुम्हाला माहितीच आहे ? ताम्हिणी अभयारण्यात सस्तन प्राण्यांच्या 28 प्रजाती आहेत. स्थानिक पक्षांच्या 12 प्रजातींसह येथे 150 प्रकारचे पक्षी आपण पाहू शकतो. हे मोहमयी फुलपाखरांचंही निवासस्थान आहे. इथं 72 प्रकारची फुलपाखरं आहेत. 18 प्रकारचे सरपटणारे प्राणी आणि 33 प्रकारच्या दुर्मिळ वनस्पती देखील आहेत. वनांमधील श्रद्धेचा भाग म्हणून ज्या देवरायांकडे पाहिलं जातं अशा अनेक देवराया ताम्हिणी अभयारण्यात दिसून येतात. विशेष उल्लेखनीय म्हणजे येथील वरदानी आणि काळकाई देवराई. ताम्हिणी गावातच विंझाई ग्रामदेवतेचे भव्य मंदिर आहे. विपूल वनसंपदा आणि देवरायांमुळे ताम्हिणी केवळ पर्यटकांचच नाही तर अभ्यासक, संशोधक आणि गिर्यारोहकांचेही हक्काचे पर्यटनस्थळ बनले आहे.

शेकरू, पिसोरी, भेकर, सांबर, खवल्या मांजर, उदमांजर, जावडी मांजर, वाघाटी, बिबट्या रानमांजर, साळींदर रानडुक्कर आणि वानर हे वन्यजीव आपल्याला या अभयारण्यात पहायला भेटतात. अजगर, नाग, घोणस, चापडा, हरणटोळ, खापरखवल्या, दिवड, धामण, सापसुरळी, घोरपडीचा या अभयारण्यात वावर आहे. जमिनीवर, झाडावर आणि पाण्यात आढळणारे अनेक जातीचे बेडूक व भेग आपण इथे पाहू शकतो. नाना, भोमा, उंब, पारजांभूळ, अंजनी, रान जायफळ, काटेकुंबळ, पळस, गेळा, आंबा, काटेसावर, हिरडा, बेहडा, ऐन, कुंभा, उडाळी, बोक, घोळ, वारस यासारख्या वृक्ष प्रजातींबरोबर कारवी, करवंद, धायटी, रामेठा, दिंडा, फापट, भंडार, देवनाळ ही झुडप प्रजाती आणि वाटोळी, ओंबळ, गारंबी, ऐरण, पहाडवेल, घोटवेल, कडुकारंदा, पेंडकुळ, आंबगुळी, तोरण, कुसर, खरपूडी, बेडकीचा पाला, करटुली अशा अनेक वेली या परिसरात आहेत. सोनकी, निचुरडी, काळीमुसळी, भुई आमरी, पांगळी, खुळखुळा, कचोरा, पानतेरडा, पंद बृम्बी, यासह अत्यंत दुर्मिळ अशी शिंदळ माकोडी ही वानसे येथे आढळून येतात.

इतर वनस्पतींबरोबर शेवाळ, कवक, दगडफुलं व नेच्यांच्या अनेक जाती विपुल प्रमाणात दिसून येतात. पर्वत कस्तूर, रानकस्तूर, स्वर्गीय नर्तक, पाचुकवडा, हळद्या, कुरटुक, निखार, नारद बुलबूल, कोतवाल, शमा, नवरंग, सर्पगरूड, गिधाड, माळखरूचि, रातवा, धनेश टकाचोर, श्रृंगी घूबड असे अनेक पक्षी आणि प्राणी या अभयारण्यात आहेत. महाराष्ट्र शासनाने राज्य फुलपाखरु म्हणून घोषित केलेले  ‘ब्ल्यू मॉरमॉन’ हे फुलपाखरू आपल्याला येथे पाहाता येते.

आसमंत दरवळून टाकणारा मृदगंध, विविध वनस्पतींचे दर्प, डोंगररांगा आणि रानवाटांचे थ्रील अनुभवायाचे असेल, कोसळणाऱ्या अनेक मोठमोठ्या धबधब्यांचे पाणी अंगावर झेलायचे असेल तर माळशेज घाटा इतकाच सुंदर असलेला हा घाट आणि या घाटातल्या ताम्हिणी अभयारण्याला एकदा भेट द्यायलाच हवी. मुळशी धरणाकडे जाणाऱ्या रस्त्याने पुढे गेल की आपली पळसे येथील मोठ्या धबधब्याची भेट होते. कुंडलिका नदीच्या पाण्यात डुबता येतं. शुभ्र फेसाळणाऱ्या तिच्या पाण्यात साहसी खेळाचा अनुभव घेता येतो.

जाल कसे ?

जवळचे विमानतळ व रेल्वेस्टेशन : पुणे

मुळशी धरण तलावानजिक तसेच कोलाड येथे विश्रांतीगृह

मुंबईपासूनचे अंतर 140 कि.मी.

कर्नाळा पक्षी अभयारण्य

रायगड जिल्ह्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्य मुंबई-गोवा महामार्गावर पनवेलपासून अवघ्या 12 कि.मी. अंतरावर आहे. कर्नाळा किल्ला आणि आसपासचा परिसर पक्षी वैविध्याने संपन्न असल्याने महाराष्ट्र शासनाने त्यास राखीव वनक्षेत्र घोषित करून पक्षी अभयारण्याचा दर्जा दिला आहे. 12.155 चौ.कि.मी. च्या या परिसरात विविध प्रजातींच्या पक्ष्यांचं दिवस रात्र संम्मेलन भरलेलं दिसतं. स्थानिक आणि स्थलांतरीत पक्षांचे हे माहेरघर आहे. 147 प्रजातीचे पक्षी आपण येथे पाहू शकतो ज्यामध्ये 37 प्रकारचे पक्षी हे स्थलांतरीत किंवा प्रवासी पक्षी आहेत. मध्य आशिया, युरोप, ऊझ्बेकिस्तान, सायबेरियातून पक्षी येथे येतात कधी कधी काही प्रजातींच्या पक्ष्यांची संख्या 15 हजारांहून अधिक असते…

कर्नाळा हे मुंबईकरांच्या मनाच्या खूप जवळ कारण धकाधकीच्या आयुष्यात वेळ कमी असतांना ज्या काही गोष्टी मुंबईकरांच्या मनाला आनंद देऊन जातात त्यात या कर्नाळा पक्षी अभयारण्याचा समावेश होतो. भल्या पहाटे निघालं तर एका दिवसाच्या भटकंतीमध्ये या अभयारण्य भ्रमंतीचा आनंद घेता येतो. मुंबईप्रमाणे हे अभयारण्य सतत पक्षांच्या किलबिलाटानं जागं असल्याचं लक्षात येतं.

वृक्ष प्रजाती

कर्नाळा पक्षी अभयारण्याचा खूपसा भाग दक्षिण दमट मिश्र पानझडी वनांनी व्यापलेला आहे. तर दऱ्याखोऱ्यातील नाल्या लगतच्या खोलगट भागात अल्प प्रमाणात सदाहरीत नदीकाठची वने आहेत. यात विविध प्रकारच्या 642 वृक्ष प्रजाती, वेली, वनौषधी आणि दुर्मिळ वनस्पती अस्तित्त्वात आहेत. आपटा, आवळा, उंबर, ऐन, कोकम, खैर, चिंच, जांभूळ, बेल, मोह, यासारखे मोठे वृक्ष तर आवळा, कोकम, बेहडा, रिठा यासारख्या औषधी वनस्पती येथे आहेत. झुडूप वर्गीय वनस्पतींमध्ये अडुळसा, एरंड, करवंट, घाणेरी, निरगुडी या वनस्पती तर वेलींमध्ये गुळवेल, पळसवेल, मोरवेल, गारंबी या वेली आपण पाहू शकतो. अनंत प्रकारच्या पक्षांना येथील वातावरणाने भूरळ घातली आहे.

कर्नाळा किल्लापक्षी निरीक्षणाशिवाय या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे कर्नाळा किल्ला. किल्ल्याकडे जाणारी निसर्गवाट कठीण व खडकाळ जागेतून असल्याने ट्रेकर्स आणि गिर्यारोहकांसाठी हा किल्ला मोठे आकर्षण आहे. राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणाऱ्या हरियाल व मोरटाका या निसर्गवाटा (नेचर टेल) पक्षी निरक्षणाच्यादृष्टीने महत्वाच्या वाटा आहेत. अभयारण्याच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमाळ, या वाटेवर अनेक वैविध्यपूर्ण वनस्पती अस्तित्त्वात आहेत.

कर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासून 445 मीटर ऊंचीवर आहे दाट जंगलाची सावली आणि पक्ष्यांच्या मधुस्वरांचा मागोवा घेत डोंगररांगांवरून चढतांना तटबंदी लागते त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगठ्यासारखा दिसणाऱ्या सुळक्याची भव्यता आपल्याला जाणवू लागते. सुळक्यांच्या पोटात असलेली पाण्याची खोदीव टाकी आश्चर्यचकित करतात. नजरेच्या टप्‍प्यातील प्रबळगड, माथेरान, राजमाची, मलंगगड, माणिकगड न्याहाळीत आजही कर्नाळा किल्ला पक्षांचंच नाही तर पर्यटकांचेही आकर्षणाचे केंद्र बनून उभा आहे.

पावसाळ्यात अभयारण्यावर गर्द हिरवी मखमल पसरलेली दिसते. अनेक छोटे छोटे ओहळ इथे वाहत असतात. पावसाळ्यानंतरच्या काळातही अभयारण्य तितकंच मोहक दिसतं. अभयारण्यात प्रवेश करताच आपल्याला निसर्ग संवर्धन केंद्र दिसते. अभयारण्यात प्लास्टिकच्या बाटल्या, कप, पिशव्या व इतर वस्तू नेण्यास प्रतिबंध आहे. जंगल भटकंतीचे रंजक मार्ग आपल्याला इथे सांगितले जातात. जसे की हरियाल निसर्ग मार्ग हा जवळचा, सोपा मार्ग असला तरी पक्षांच्या मोहमयी दुनियेचं विस्मयकारक दर्शन घडवून आणतो. लांबवर चालत जाऊन ज्यांना रानवाटांचा अधिक आनंद लुटायचा आहे त्यांनी मोरटाक मार्गानं जावं. तो सरळ अभयारण्यातून 6 कि.मी लांबवर जातो. वेगवेगळ्या रंगांची भरपूर फुलपाखरं आपण इथं पाहू शकतो.

पक्षी

या ठिकाणी आपण केव्हाही गेलो तरी वेगवेगळे पक्षी आपण पाहू शकतो. तुरेवाला सर्पगरुड, खरूची, कापशी, शिक्रा असे शिकारी पक्षी, जंगली कोंबडा, भारद्वाज, धनेश, होले असे अनेक मोठे पक्षी, देखणा मोर, याठिकाणी पहायला मिळतो. लांब शेपटीचा स्वर्गीय नर्तक आणि शामा हे तर पक्षीप्रेमींसाठींचे इथले आकर्षणच. तिबोटी खंड्या, सुभग, चष्मेवाला कोतवाल, नाचण, दयाळ, चातक, पावश्या, राखी वटवट्या, तांबट, कुरटुक, शिंजीर, याबरोबरच रनकस्तूर, रक्ताभ सुतार, हरितांग, मिलिंद, सोनेरी पाठीचा सुतार, नवरंग, असे अनेक आकर्षक पक्षी याठिकाणी मनसोक्त बागडतांना दिसतात. नीलिमा, नीलमणी, शैल कस्तूर, सागर, पर्वत कस्तूर, निलांग, खंड्या पाचूकवडा असे अनेक येथे दिसणारे मनमोहक पक्षी म्हणजे जणू नीलरंगाची उधळणच.

निवास

राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील अभयारण्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यास पुढे सुमारे 1 ते 2 कि.मी. अंतरावर मयूर आणि भारद्वाज ही वन विभागाची विश्रामगृहे आपल्या निवासासाठी उपलब्ध आहेत. तसेच पश्चिमेकडील भागात निसर्ग माहिती केंद्र, पर्यटक कुटी आणि हॉल आहे. या ठिकाणी पर्यटकांच्या मागणीनुसार राहण्याची उत्तम सोय होऊ शकते. बचतगटांच्या माध्यमातून खास घरगुती जेवणही आपल्याला येथे मिळते.

जवळचं विमानतळजवळचं विमानतळ- मुंबई, जवळचं रेल्वे स्टेशन- पनवेल

बससेवारस्ता- पनवेल पासून 12 कि.मी. एस.टी महामंडळाची मुंबई सेंट्रल ते कर्नाळा अशी नियमित बससेवा आहे.

भेट देण्याचा उत्तम कालावधी

ऑक्टोबर ते फेब्रुवारी

शहराच्या गजबजाटात तुमचा श्वास कोंडत असेल, थोडा मोकळा श्वास घ्यायचा असेल तर कर्नाळ्याला एकदा गेलंच पाहिजे. पक्ष्यांच्या किलबिलाटाने तुमचं मन प्रसन्न होतं. गरज आहे मनावरचे सगळे पोकळ पापुद्रे बाजूला काढत निर्मळ मनाने आनंद लुटायची… कर्नाळा तुम्हाला हा आनंद नक्कीच देईल.

चपराळा वन्यजीव अभयारण्य

चपराळा गावावरूनच चपराळा वन्यजीव अभयारण्याचे नाव पडले आहे. महाराष्ट्र शासनाने 25 फेब्रुवारी 1986 मध्ये या क्षेत्राला अभयारण्याचा दर्जा दिला. हे अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याच्या मूलचेरा आणि चार्मोशी या दोन तालुक्यांमध्ये वसले आहे. अभयारण्याचा भूभाग सामान्यत: मैदानी स्वरूपाचा आहे. चपराळा गावाजवळच वर्धा आणि वैनगंगा नद्यांचा संगम होऊन ती प्राणहिता नावाने पुढे जाते. प्राणहिता नदी चपराळा अभयारण्याच्या पश्चिमेला अगदी जवळ आहे. नदीचे पात्र विस्तीर्ण असून नदीच्या दोन्ही काठाला झाडांची तुंबळ गर्दी आहे.

तेलंगना राज्याला लागून असलेलं महाराष्ट्रातील हे अभयारण्य ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि छत्तीसगड राज्यातील इंद्रावती व्याघ्र प्रकल्पांना जोडणारा दुवा ‘कॉरीडोर’ म्हणून काम करतं. दक्षिण उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडीचे (सागवान) वन या प्रकारात हे वन मोडते.

वनसंपदा

चपराळा अभयारण्यात 69 प्रकारचे वृक्ष, 27 प्रकारच्या वेली आणि 31 प्रकारच्या गवत प्रजाती आढळतात. 15 झुडूप प्रजाती आणि 73 प्रकारच्या छोट्या मोठ्या वनस्पतींनी संपन्न असलेल्या या अभयारण्यात सागा व्यतिरिक्त अर्जुन, पळस, ऐन, हिबर, धावडा, तेंदू, मोह, चारोळी, आवळा, बेहडा, अंजन यासारखी मोठी झाडं आपण पाहू शकतो. तिखाडी, कुसळी, पवन्या, कुंदा सारखी गवत प्रजाती या अभयारण्यात मोठ्याप्रमाणात आहेत.

प्राणी व पक्षी

चपराळा अभयारण्यात बिबट्या, वाघ, अस्वल, रानमांजर, जंगली कुत्रे, चितळ, चौसिंगा, नीलगाय, तळस, रानडुक्कर, हनुमान लंगुर, शेकरू, कोल्हे यासारख्या प्राण्यांचे वास्तव्य आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांमध्ये नाग (कोब्रा), धामन, घोरपड, सरडे आहेत तर घुबड, मोर, पिंगळा, पोपट, खंड्या, कबुतर, पांढऱ्या पाठीचे गिधाड, चिरक अशा 193 पेक्षा जास्त पक्षांच्या जाती येथे आढळतात.

गिधाडांच्या प्रजाती

हिवाळ्यात लगाम तलाव, उर्शीकूंटा तलाव, अनखोडा तलाव, मुर्गीकूंटा तलाव यावर चक्रवाक, काळा थिरथिरा, गायबगळे, स्टॉर्क पक्षी भेट देतात. नष्ट होत चाललेल्या गिधाडांच्या तीन प्रजातींपैकी दोन प्रजाती चिपराळात सापडतात.

चपराळ्याला धार्मिकदृष्ट्याही महत्व आहे. वर्धा-वैनगंगेच्या संगमावर वसलेल्या प्रशांत धाममध्ये हनुमान शिव दैवत आहे. महाशिवरात्रीमध्ये येथे तेलंगना आणि महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने भाविक येतात. मंदिरासमोर आजुबाजूला सागवान आणि चंदनाच्या झाडांची दाटी आहे. घनदाट जंगल परिसरात मंदिर असल्याने भाविक आणि पर्यटकांचे ते आकर्षणाचे ठिकाण आहे.

चपराळा अभयारण्याच्या हद्दीत एकूण 6 गावं आहेत. चपराळा, चौडमपल्ली, चंदनखेडी, सिंगनपल्ली, धन्नूर व मार्कंडा ही ती गावं होत. याशिवाय 21 गावं अभयारण्याच्या अगदी लगतच्या जंगलात आहेत. गोंड, गोळकर, माळी हे इथले स्थानिक लोक आहेत. परंपरेने हे लोक दुधाचा, शेतीचा, भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. हंगामी तेंदूपत्ता आणि मोहफुले गोळा करून ते विकण्याचे कामही हे लोक करतात.

अभयारण्यास भेट देण्याचा योग्य कालावधी – 15 ऑक्टोबर ते 15 जुन असा आहे.

जवळचे बस स्थानक – अहेरी- 40 कि.मी, गोंडपिंपरी- 10 कि.मी, चंद्रपूर-चपराळा- 85 कि.मी

जवळचे रेल्वेस्टेशन – बल्लारपूर- 65 कि.मी

जवळचे विमानतळ – नागपूर

चपराळा येथे वन विभागाचे विश्रामगृह आहे. याप्रमाणेच आल्लापल्ली वन विभागाचे आल्लापली आणि मार्कंडा वन विभागाचे मार्कंडा वन विश्रामगृह पर्यटकांच्या सोयीसाठी उपलब्ध आहे.

वर्धा- वैनगंगा संगमावर 2 कि.मी ची निसर्ग पाऊलवाट तयार करण्यात आली आहे. निसर्ग परिचय केंद्रातून अभयारण्याची सविस्तर माहिती मिळते. लगाम तलाव, अनखोडा तलाव, उर्शीकुटा तलाव, मुर्गीकुटा तलाव, सीताबोडी तलाव हे येथील महत्वाचे पानस्थळे आहेत. हिवाळ्यात परदेशी पक्षी येथे आपण पाहू शकतो. चपराळा अभयारण्यात 5 पर्यटन मार्ग आहेत. चपराळा येथून वनवैभव- आलापल्ली, लोकबिरादरी प्रकल्प, हेमलकसा, मार्कंडेश्वर मंदीर, चार्मोशी, कालेश्वर मंदिर व सोमनूर (प्राणहिता, गोदावरी व इंद्रावती नदीचा त्रिवेणी संगम,) सिरोंचा, हत्ती कॅम्प, कमलापूर, कोलामार्का रानम्हशी संवर्धन राखीव क्षेत्र येथे पर्यटकांना जाता येते.

गडचिरोलीसारख्या जिल्ह्यात असलेलं आणि आपल्या पुण्या-मुंबईपासून बरचं लांब असलेलं हे अभयारण्य त्यामुळेच अजून पर्यटकांच्या गर्दीपासून थोडंस दूर आहे. असं असलं तरी ते महाराष्ट्राच्या वनवैभवात मोलाची भर टाकत आहे. आपण नेहमी त्याच त्या लोकप्रिय ठिकाणांना भेट देणं पसंत करतो. त्यामुळे तेथील गर्दीही आपल्याला बऱ्याचदा नकोशी वाटते… ज्यांना नीरव शांतता आणि खरं जंगल अनुभवायचं त्यांनी गडचिरोलीसारख्या जिल्हयातल्या या वनवैभवाला भेट द्यायला आणि त्याच्याबद्दल उर्वरित महाराष्ट्राला सांगायला हरकत नाही. त्यातूनच हे वनवैभव लोकांच्या मनात आणि नजरेत येईल आणि तेथील पर्यटनाला ही अधिक गती मिळू शकेल.

भामरागड अभयारण्य

चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. चंद्रपूर जिल्ह्यात वसलेल्या भामरागड अभयारण्याचे राखीव वनक्षेत्र १०४.३८ चौ.कि.मी इतके आहे. विविध प्रकारचे प्राणी, पक्षी आणि वन्यजीवांसाठी हे अभयारण्य म्हणजे एक स्वर्ग आहे. अभयारण्यातून पार्लोकोटा आणि पामलगौतम नद्या वाहतात. त्या अभयारण्यातील वन्यजीवांसाठी आणि इथे राहणाऱ्या गोंड आणि माडिया जातींच्या आदिवासी बांधवांसाठी पाण्याच्या प्रमुख स्रोत आहेत.

एकेकाळी शिकारीचे स्थळ ६ मे १९७७ रोजी संरक्षित वन झाले असून ते रानडुक्कर, बिबट्या, ससे, भुंकणारे हरीण, मुंगूस, अस्वल, खार, उडणारी खार, नीलगाय, जंगली कोंबडी, मोर अशा असंख्य वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासाचे ठिकाण झाले आहे. अनेक जातीचे सरपटणारे प्राणी आणि सस्तन प्राणी आपण इथे पाहू शकतो.

गोंड आणि माडिया जमातीचे आदिवासी लोक येथे राहत असून माडिया आणि गोंडी या स्थानिक भाषा येथे बोलल्या जातात. पारंपरिक जीवन जगणाऱ्या या आदिवासींचे जंगलावरचे अवलंबित्व कमी व्हावे तसेच त्यांना सुरक्षित आयुष्य जगता यावे या दृष्टीने त्यांना रोजगाराची पर्यायी साधने उपलब्ध करून देण्याचा शासन प्रयत्न करत आहे. यासाठी वन विभागाने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन योजना सुरू केली आहे. त्याचा फायदाही या स्थानिक लोकांना मिळत आहे. यामध्ये शेतीपूरक व्यवसायासह कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम सुरू आहे.

वन विभागाचे विश्रामगृह हा अभयारण्यात जेवणाचा एकमेव स्रोत असल्याने अभयारण्यात जाताना कोरडे अन्नपदार्थ सोबत नेणे केव्हाही उत्तम ठरते. आसपास पाहण्यासारखे अनेक प्रकल्प आहेत. यामध्ये वरोऱ्याचा आनंदवन आश्रम, चंद्रपूरच्या प्राचीन लेणी, चंद्रपूरचा किल्ला, माणिकगड किल्ला, बल्लारपूर किल्ला, हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प यांचा समावेश होतो. अभयारण्याची जशी आपल्याला ओढ लागते तशीच हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्प पाहण्याची इच्छा ही आपल्याला स्वस्थ बसू देत नाही.

कर्मयोगी बाबा आमटे यांनी हेमलकसा लोकबिरादरी प्रकल्पाची स्थापना केली. आरोग्य आणि शिक्षणाचा मूलमंत्र आदिवासींना मिळावा याकरिता हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला. आज ही समाजसेवेची धुरा त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश आमटे आणि सून मंदाकिनी आमटे यांनी यशस्वीरित्या पुढे नेली आहे. आदिवासी बांधवांना आरोग्य सेवा देताना त्यांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी या डॉक्टर दाम्पत्याने केलेला प्रयत्न जगभरात वाखाणला गेला, अनेक पुरस्कारांनीही ते सन्मानित झाले आहेत. मानवसेवा हीच ईश्वरसेवा मानून समर्पित वृत्तीने काम करणारे डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे हे दोघेही महाराष्ट्राचे भूषण आहेत. लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिल्यानंतर त्यांचा या आदिवासी बांधवांप्रतिचा समर्पित सेवाभाव तर दिसतोच, परंतु तो अनेकांना जगण्याची एक नवी प्रेरणाही देऊन जातो.

घनदाट जंगलासोबत, ज्याला समर्पित सेवेचा अनुभव जीवनाला कशी उत्तम दिशा देतो हे पाहायचे असेल त्यांनी एकदा तरी भामरागड अभयारण्याला, हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाला, आनंदवन आश्रमाला भेट द्यायाला हवी. गोंड आणि माडिया जातीच्या आदिवासी लोकांची लोकसंस्कृती ही मनावर गारूड टाकल्याशिवाय राहात नाही.

कसे जाल?

भामरागड अभयारण्य जवळपास सर्व राष्ट्रीय महामार्गानी जोडले गेले असल्याने अभयारण्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भेट देणे सहजशक्य होते. अहेरी हे सर्वात जवळचे बसस्थानक आहे. त्याचे अभयारण्यापासूनचे अंतर १०२ कि.मी आहे.