महाराष्ट्राचे खरे वैभव म्हणजे पर्वत रांगांमध्ये वसलेले किल्ले. या किल्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात महत्वाची भूमिका बजावली. हे दुर्गम व सागरी किल्लेच शिवरायांची खरी सेना होती. या किल्यांमुळे शिवाजीराज्यांनी चारही पातशाह्यांना झूंजवले. या ऐतिहासिक किल्ल्यांची थोडक्यात माहिती

 • रायगड

छत्रपती शिवाजीराजे यांच्या स्वराज्याची राजधानी म्हणून रायगड हा डोंगरी किल्ला इतिहासकाळातच नव्हे तर आजही प्रसिध्द आहे. याच किल्ल्यात शिवाजीराजे यांचा राज्याभिषेक सोहळा झाला. एप्रिल, १६८० मध्ये त्यांचे अकाली निधन झाले तेसुध्दा याच गडावर ! अखेरची सात वर्षे त्यांनी या गडावरूनच कारभार पाहिला. तत्पूर्वीच्या इतिहासकाळात हा गड ‘रायरी’ या नावाने ओळखला जात असे.
मराठी दौलतीतील अत्यंत अवघड आणि म्हणूनच सुरक्षित असलेला हा किल्ला होय. संपर्काच्या दृष्टीने व कारभाराच्या दृष्टीने तो शिवरायांना इतर किल्ल्यांपेक्षा अधिक सोयीचा वाटला. रायगड येथे राजधानी असल्याने या किल्ल्यात सर्व सोयी-सुविधा होत्या. एक नगरीच तेथे वसवण्यात आली होती. समुद्र सपाटीपासून जवळपास ८५५ मीटर उंच असलेल्या रायगडावर जाण्यासाठी पायऱ्या असून त्याशिवाय असलेले अन्य मार्ग अतिशय कठीण आणि अवघड आहेत.
रायगड जिल्ह्यातील महाड या गावापासून उत्तरेला सुमारे २६ कि.मी. अंतरावर सह्याद्रीच्या माथ्यावर हा किल्ला उभा आहे. सभोवताली पर्वतराई, खोल दऱ्या आणि भुरळ घालणारा निसर्ग यामुळे हा किल्ला शोभिवंत दिसतो. या किल्ल्याचा भक्कमपणा, त्याची उंची, अवघड जागा आणि अजिंक्यता पाहून युरोपियन लोक त्यास ‘पूर्वेकडील जिब्रॉल्टर’ म्हणत.
आतील नगररचना चांगली व तंत्रशुध्द होती. आज या गोष्टींच्या फक्त खुणाच आहेत. पण या अवशेषावरूनही रायगड किल्ल्याचं मूळ स्वरूप किती बुलंद होतं, याची कल्पना येते. कुणी म्हणतात की, रायगडची खरी शोभा पाहायची असेल तर ती तोरणा किल्ल्यावरून पाहावी. लिंगाणा किल्ल्यावरूनही रायगड किल्ह्याचे मनोहारी दृष्य दिसते. हे दोन्ही किल्ले रायगडाच्या अगदी दृष्टिपथात आहेत. रायगड, प्रतापगडही येथून दूरवर दिसतात. विशेष म्हणजे रायगड किल्ला मुंबई-पुणे-सातारा येथपासून सारख्या अंतरावर आहे. किल्ल्यावर आजही गंगासागर तलाव, बालेकिल्ला, नगारखाना, राजदरबार, रंगमहाल, जगदीश्वर मंदिर या वास्तू आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर महाराष्ट्र शासनातर्फे उभारलेली मेघडंबरी उत्कृष्ट आहे. महाराजांचे समाधीस्थळ ही तर रायगडावरील एक पवित्र निशाणी होय.
गंगासागर हा एक विशाल तलाव असून त्याचा उपयोग गडावरील पाण्याची गरज भागविण्यासाठी केला जात असे. या तलावाचे पाणी आजही चांगले आहे. असं म्हणतात की, या तलावात शिवकालीन संपत्तीचा खजिनाच दडलेला आहे. बालेकिल्ला म्हणजे बचावासाठी मोठी भक्कम तटबंदी आहे.
रायगडला जाण्यासाठी महाडमार्गे प्रवास करणे श्रेयस्कर आहे. महाड ते पाचाड हे अंतर जवळपास २४-२५ कि.मी. आहे. पाचाड हे रायगडाच्या पायथ्याशी असलेले गाव. महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचा महाल या ठिकाणी आहे. त्याची मात्र पडझड झाली आहे. पाचाडपासून रायगडाचा चढ सुरू होतो. मार्गात महा दरवाजा, हिरकणी बुरुज, टकमक टोक ही ठिकाणं लागतात. पाचाडपर्यंत वाहनांनी प्रवास करता येतो.

नजीकचे स्टेशन : पुणे
पुणे -रायगड : १२६ कि.मी., मुंबई- रायगड : महाडमार्ग २१० कि.मी.
महाड-रायगड: २७ कि.मी.

 • कर्नाळा किल्ला

रायगड जिल्ह्यातील पाहण्यासारखा असलेला हा दुसरा किल्ला मुंबईपासून अवघ्या ५५ कि.मी. अंतरावर आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पनवेल-पेण दरम्यान, पनवेलपासून सुमारे १५ कि.मी. पण पेणच्या अलीकडे १०-१२ कि.मी. अंतरावर हा जुना किल्ला आहे. हा डोंगरी किल्ला असून ज्या डोंगरावर तो बांधण्यात आला आहे तो अगदी नजरेत भरणारा आहे.
किल्ल्याचा परिसर अतिशय रम्य असून घनदाट झाडीने व्यापलेला आहे. सभोवतालीसुध्दा दाट वनराई आहे. किल्ल्याच्या परिसरातील या वनश्रीमुळेच या परिसरात अनेक प्रकारची झाडं, वनस्पती तसेच तऱ्हेतऱ्हेचे पक्षी व प्राणी पाहायला मिळतात. रंगीबेरंगी पक्षी आणि त्यांचा कर्णमधुर कलरव ऐकून मन खरोखरीच प्रसन्न होते. या रमणीय परिसरातून किल्ल्यावर जाण्याचा मार्ग आहे. किल्ल्याचा माथा समुद्रसपाटीपासून १५०० फूट उंच आहे. किल्ल्यावरील इतिहासकालीन दरवाजे, रसद ठेवण्याचे गोदाम, अशा वेगवेगळ्या वास्तू भग्नावस्थेत आहेत. किल्ल्याभोवतालचा परिसर प्राणी, पक्षी व वेगवेगळ्या वनस्पतींनी गच्च भरलेला असल्याने हा परिसर अभयारण्य म्हणून घोषित केला आहे.

नजीकचे स्टेशन : पनवेल
मुंबई-पनवेल अंतर : ६९ कि.मी.
ठाणे व दादर-सी.एस.टी. पासून पनवेलपर्यंत जाता येते.

 • मुरुडजंजिरा

रायगड जिल्ह्यातील हा आणखी एक इतिहास प्रसिध्द किल्ला होय. पण हा किल्ला भर समुद्रात बांधण्यात आला असून मराठी दौलतीच्या इतिहासात या किल्ल्याचा उल्लेख अनेकवार केलेला दिसतो. कोकण किनाऱ्याला लागूनच अलिबागच्या दक्षिणेकडे, अलिबागपासून जवळपास ५० कि.मी. अंतरावर मुरुड हे एक तालुक्याचे गाव असून ते इतिहास प्रसिध्द आहे. या गावाचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. नारळी-पोफळीच्या बागांनी या गावाचा आसमंत हिरवागार आहे. मुरुडच्या परिसरात काही इतिहासकालीन वास्तूंचे अवशेष अजूनही पाहायला मिळतात. या गावात असलेला इतिहासकालीन राजवाडा ‘नवाबाचा राजवाडा’ म्हणून प्रसिध्द आहे. हा वाडा तसा जुनाट असला तरी भग्नावस्थेतही त्याची भव्यता, बांधकामातील सौंदर्य आजही आपल्याला थक्क करते.
मुरुडपासून अवघ्या दोन कि.मी. अंतरावर भर समुद्रातील एका बेटावर जंजिरा किल्ला उभा आहे. मुळातच मुरुडचा समुद्र किनारा अतिशय सुंदर आहे. किनाऱ्यावरून दिसणारा हा भव्य किल्ला तर या सौंदर्यात आणखीनच भर टाकतो.
मुरुडचा जंजिरा किल्ला चहूबाजूंनी पाण्याने वेढला आहे. या किल्ल्यात जाण्यासाठी नावेने प्रवास करावा लागतो. किल्ल्यातील अंतर्भाग अजूनही चांगल्या स्थितीत आहे. पीर पंचायतन, सुरुलखानाचा वाडा, किल्ल्याची भक्क्म तटबंदी आणि या तटबंदीवर उभारण्यात आलेले अनेक भक्कम बुरुज आजही काळाशी टक्कर देत आहेत. किल्ल्यातील या बुरुजावर बसविलेल्या काही तोफा आजही इतिहासाची साक्ष देत आहेत.
३५० वर्षापूर्वी अहमदनगरचा राजा मलिक अंबरने या अभेद्य जलदुर्गाची उभारणी केली, असा इतिहासाचा दाखला आहे. कोकण किनाऱ्यावर उभ्या असलेल्या सर्व जलदुर्गात हा किल्ला अतिशय भक्कम आणि अभेद्य असल्याने तो सदैव अजिंक्य राहिला. छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच त्यानंतरही मराठ्यांनी हा किल्ला सर करण्याचे अनेकदा प्रयत्न केले, पण ते असफल झाले. या किल्ल्यातील सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. शिवाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच-सहा कि.मी. अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता, पण तरीही जंजिरा जिंकणं महाराजांना शक्य होऊ शकलं नाही.
पद्मदुर्ग किल्लाही नावेनेच जाऊन पाहावा लागतो. या ठिकाणी एम्.टी.डी.सी. तर्फे पर्यटकांसाठी निवास व्यवस्था आहे. मुंबई अथवा अलिबागहून मुरुड येथे जाण्यासाठी नियमितपणे बसेस असतात.

नजीकचे रेल्वे स्टेशन: रोहे (मुंबई-मंगलोर रेल्वे)
मुंबई-रोहे अंतर : १४४ कि.मी. (रेल्वेने), रोहे-मुरुड अंतर : १६ कि.मी.
मुंबई-मुरुड अंतर १६५ कि.मी (रस्त्याने)

 • कोरलई किल्ला

गणेशभक्त मोरया गोसावी यांनी स्थापन केलेल्या गणेशमूर्तीमुळे चिंचवड हे गाव पूर्वीपासूनच प्रसिध्द आहे. मोरया गोसावी यांची संजीवन समाधी येथेच आहे.
दक्षिणवाहिनी पवना नदीच्या काठी वसलेले व चिंच-वडांनी व्यापलेले हे शहर पुण्यापासून अवघ्या १५ कि.मी. अंतरावर आहे. आता ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कक्षेत आले आहे.
अत्यंत जागृत देवस्थान म्हणून प्रसिध्द असलेल्या या गणेशस्थानाशी तुकाराम महाराज, रामदास स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज तसेच त्यानंतरच्या मराठेशाहीतील कर्त्या पुरुषांचे निकटचे संबंध होते. पेशव्यांनी तर या स्थानासाठी उदारहस्ते खर्च केला.

नजीकचे स्टेशन: पुणे
पुणे-चिंचवड: १७ कि.मी. (रेल्वे लोकलने)

 • अलिबागचा किल्ले कुलाबा

मराठ्यांच्या इतिहासात या जलदुर्गाला असाधारण महत्त्व होते. ९०० फूट लांब, ३५० फूट रुंद आणि २५ फूट उंची असलेला हा किल्ला एक प्रमुख आरमारी तळ म्हणून कान्होजी आंग्रे यांनी विकासित केला होता. रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग शहरालगतच्या सागर किनाऱ्यावर हा किल्ला उभा असून तेथील हिराकोट किल्ला, चुंबकीय वेधशाळा, कान्होजी आंग्रे यांची समाधी ही स्थानं प्रेक्षणीय आहेत. अलिबागचा समुद्र किनाराही अतिशय रमणीय आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : पनवेल (६९ कि.मी.)
पनवेल-अलिबाग : ७१ कि.मी., मुंबई-अलिबाग : १०८ कि.मी.

 • रत्नागिरीचा किल्ला

रत्नागिरी येथील हा किल्ला १५ व्या शतकात बांधण्यात आला असून या किल्ल्यातून रत्नागिरी आणि भगवती बंदराची शोभा अतिशय रमणीय दिसते. भगवती बंदराचा किनारा अतिशय नयनरम्य असून किल्ल्यापासून हे बंदर अवघ्या ५ कि.मी. अंतरावर आहे. येथील थिबा पॅलेसही प्रसिध्द असून या राजवाड्यात ब्रिटिशांनी बर्मा देशाचा राजा थिबा यास नजरकैदेत ठेवले होते. इंग्रजांनी स्वा. सावरकरांना रत्नागिरी येथे बंदिवासात ठेवले होते. गणपतीपुळे हा सागर किनारा येथून अवघ्या २० कि.मी. अंतरावर आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : रत्नागिरी
मुंबई-रत्नागिरी : ३४९ कि.मी.

 • सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण नजीक शिवाजी महाराजांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग आजही पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. सागरी आरमाराचा भक्कम तळ म्हणूनच त्याचा लौकिक शिवाजी महाराजांच्या काळात होता.
मालवण समुद्र किनाऱ्यापासून समुद्रात साधारणपणे अर्धा-पाऊण कि.मी. अंतरावर असलेल्या खडकाळ बेटावर हा किला बांधण्यात आला आहे. इ.स. १६६५ मध्ये हा किल्ला शिवाजी महाराजांनी स्वतःच्या देखरेखीखाली बांधला. या बांधकामासाठी त्यांनी १०० पोर्तुगीज तज्ज्ञांचे सहाय्य घेतले होते. असं म्हणतात की, सुमारे ४८ एकर भूखंडावर बांधण्यात आलेल्या या जलदुर्गासाठी शेकडो कारागीर व कष्टकरी तीन वर्षे अहोरात्र झटत होते.
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या सभोवती सुमारे ९ मीटर उंच, ३.६ मीटर रुंद व सुमारे २ मैल परिघाचा कोट बांधण्यात आला आहे. किल्ल्यावर अनेक टेहळणी बुरुज असून तटाला लागून पन्नासहून अधिक विस्तृत बुरुज आहेत. शत्रुपक्षावर तोफांचा भडिमार करण्यासाठी या बुरुजांचा उपयोग केला जात असे. आजही ता बुरुजांवर जुन्या तोफा पाहायला मिळतात. पुढे इ.स.१९१२ मध्ये हा अजिंक्य किल्ला ब्रिटिशांनी हस्तगत केला.
किल्ल्यात शिवाजी महाराजांची वीरासनात बसलेली मूर्ती असलेले मंदिर असून आजही त्या मूर्तीची लोक पूजा करतात. हे मंदिर शिवाजी महाराजांचे सुपुत्र राजाराम यांनी बांधले.
बांधकामाच्या वेळी महाराजांच्या हाताचे व पायांचे ठसे असलेले चुन्याचे दगड या ठिकाणी जतन करून ठेवलेले आहेत. येथे एक भगवती मंदिरही आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याला लागून असलेला सागर किनारा खूपच मनोहर आहे.
या परिसरात राहण्याची व्यवस्था नाही, पण नजीकच्या अंतरावर असलेल्या तारकर्ली या पर्यटनस्थळी मात्र एम.टी.डी.सी. तर्फे निवासाची सोय आहे. तसेच एक उपाहारगृहही तेथे आहे. मालवणी पदार्थांचा स्वाद या उपाहारगृहात चवीने घेता येतो. मालवण येथेही खाजगी हॉटेल्समध्ये राहता येते.
सिंधुदुर्गाला बाहेरून संरक्षण देण्यासाठी समुद्रात अगदी नजीकच्या अंतरावर पद्मगड नावाचा दुसरा जलदुर्ग आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : कुडाळ (कोकण रेल्वे)
मुंबई-कुडाळ : ४८७ कि.मी., कोल्हापूर-सिंधुदुर्ग : १५२ कि.मी.
मुंबई-सिंधुदुर्ग : ५१० कि.मी. (गोवा हायवे मार्गे), रत्नागिरी-सिंधुदुर्ग : २२० कि.मी.

 • विजयदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर देवगडच्या वरील बाजूस हा किल्ला आहे. हा किल्ला सुध्दा शिवाजी महाराजांनीच बांधला आहे. शिवाजी महाराजांच्या काळात हा किल्ला महत्त्वाचा आरमारी तळ म्हणून गणला जात होता. किल्ला खूप भक्कम आहे. किल्ल्याच्या सभोवताली तिहेरी तटबंदी असून त्यावर २७ बुरुज आहेत. समुद्रातील भक्कम खडकाळ बेटावर तो बांधलेला आहे. मुरुड-जंजिरा हस्तगत करता यावा व तो लढवता यावा म्हणून शिवाजी महाराजांनी हा जलदुर्ग बांधला. पश्चिम किनारपट्टीवरील हा अतिशय मोक्याचा आणि भक्कम किल्ला आहे. आता तो उत्तम मासेमारी बंदर म्हणून प्रसिध्द आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : राजापूर
मुंबई – राजापूर : ४०१ कि.मी.

 • पन्हाळा किल्ला

मराठ्यांच्या इतिहासात या भुईकोट किल्ल्याचे महत्त्व फार मोठे आहे. एक तर तो अतिशय मोठा किल्ला आहे व शिवाजी महाराजांच्या जीवनाशी तो अगदी निगडित आहे. पन्हाळगडाला सिद्धी जोहरने दिलेला वेढा तर खूप प्रसिध्द आहे. हा वेढा तोडूनच शिवाजी महाराज पन्हाळ्याहून विशाळगडावर गेले होते. बाजी प्रभू देशपांडे यांनी या कामी जे शौर्य दाखविले ते तर अतुलनीय होते.
कोल्हापूरपासून अवघ्या २५ कि.मी. अंतरावर असलेला हा किल्ला तसा फार उंचीवर नाही. कोल्हापूरपासूनचे अंतर कमी असल्याने हा किल्ला आता कोल्हापूर शहराचाच अविभाज्य भाग झाला आहे. म्हणूनच कोल्हापूर ते पन्हाळा हे अंतर आता एस.टी. ने जाता येते. एस.टी. सेवाही नियमितपणे उपलब्ध असते.
अकराव्या शतकाच्या अखेरीस किंवा बाराव्या शतकाच्या प्रारंभी हा किल्ला बांधण्यात आला असावा. शिलाहार राजांनी ११९० पासून या किल्ल्यावर सत्ता प्रस्थापित केली. त्यानंतर यादवांनी व त्यानंतर बहामणी राजाने तो ताब्यात घेतला. असे असले तरीही पन्हाळा किल्ल्याशी शिवशाहीचे घनिष्ट संबंध होते. शिवाजी महाराजांनी बहुतांश काळ पन्हाळगडावर घालविला.
मराठीतील पंतकवी मोरोपंत यांचा जन्म पन्हाळा येथेच झाला. ताराराणीचा राजवाडा, सज्जाकोठी, वाघ दरवाजा, राजदिंडी, तीन दरवाजा, अंबरनाथ, सोमेश्वर मंदिर, तबक उद्यान, संभाजी मंदिर आदी ऐतिहासिक स्थळे पाहण्यासारखी आहेत.
पन्हाळा थंड हवेचे ठिकाण म्हणूनही प्रसिध्द आहे. समुद्रसपाटीपासून हे स्थान जवळपास ९७७ मीटर उंच असल्याने येथील हवामान अतिशय चांगले आहे. एमटीडीसीतर्फे येथे निवास व्यवस्था आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : कोल्हापूर
कोल्हापूर-पन्हाळा अंतर २० कि.मी.
मुंबई-कोल्हापूर-पन्हाळा अंतर ४२८ कि.मी.

 • विशाळगड

कोल्हापूर जिल्ह्यातच शाहूवाडी तालुक्यातील हा डोंगरी किल्ला इतिहास प्रसिध्द आहे. पन्हाळगडला सिद्धी जोहरने वेढा दिला असता ठाणबंद झालेले शिवाजी महाराज हा वेढा फोडून विशाळगडावर गेले व तेथे सुखरूप पोहोचावेत म्हणून बाजीप्रभू देशपांडे यांनी पावनखिंड (घोडखिंड) लढवून त्यासाठी आपले प्राणही वेचले होते. विशाळगड व पन्हाळगड या दुर्गांशी राजनिष्ठा आणि पराक्रम यांचा मोठा इतिहास निगडित आहे.
हा गड समुद्रसपाटीपासून सुमारे १००३ मीटर उंचीवर असून गडाचे आवार सुमारे ३ कि.मी. लांब व १ कि.मी. रुंद आहे. पन्हाळ्यापासून हा किल्ला ५० कि.मी. लांब आहे.

मुंबई – कोल्हापूर अंतर : ३९४ कि.मी.
कोल्हापूर – पन्हाळा अंतर : ८८ कि.मी.

 • सिंहगड

पुणे शहरापासून २५ कि.मी. अंतरावर हा डोंगरी किल्ला आजही मोठ्या दिमाखात उभा आहे. गनिमी युध्दात सिंहगड हा अतिशय सुरक्षित किल्ला होता. छत्रपती शिवरायांनी इ. स. १६७० मध्ये तो मुस्लिम राजवटीकडून जिंकून घेतला. तोपर्यंत तो ‘कोंडाणा’ या नावाने ओळखला जात असे. परंतु किल्ला जिंकताना तानाजी मालुसरे या सिंहासारख्या शूर सेनापतीला वीरमरण आल्यामुळे त्याच्या स्मृत्यर्थ या किल्ल्याचे नाव ‘सिंहगड’ असे ठेवण्यात आले. शिवाजीराजांचे पुत्र राजाराम यांची येथे समाधी आहे. इ.स. १७०० मध्ये त्यांचे येथे निधन झाले.
दुर्दैवाने जुन्या इतिहासाची साक्ष देईल, असे एकही वास्तुशिल्प या गडावर अस्तित्वात नाही. इ.स. १८१८ मध्ये मराठ्यांचा पाडाव झाल्यानंतर पेशव्यांनी हा किल्ला इंग्रजांच्या स्वाधीन केला. पण पूर्वी बांधलेले भक्कम दरवाजे आजही किल्ल्याची मजबुती दर्शवितात. ठिकठिकाणी भंगलेले तट व भिंती दिसतात.
लोकमान्य टिळकांना याच किल्ल्यात ब्रिटिशांनी बंदिस्त करून नजरकैद केले होते. आर्य संस्कृतीवरील ग्रंथाचे लेखन त्यांनी येथील बंदिवासातच केले.
सिंहगडावरील ‘देवटाके’ हे जलाशय मात्र आजही शाबूत आहे. या तळ्यातील पाणी अतिशय चांगले आहे. कल्याण दरवाजा, तानाजी कडा, झुंजार बुरुज, कलावंतिणीचा बुरुज, किल्ल्याच्या मधोमध उभारलेले अमृतेश्वर मंदिर, किल्लेदार वाडा अशी काही ठिकाणं काळाच्या ओघात तग धरून आहेत.

नजीकचे स्टेशन : पुणे
पुणे – सिंहगड : २५ कि.मी., मुंबई – पुणे : १७२ कि.मी. (रस्त्याने)
मुंबई – पुणे : १९२ कि.मी. (रेल्वेने)

 • राजगड

सिंहगड ते राजगड हे अंतर फार नाही. कल्याण दरवाजाने सिंहगड उतरून कल्याण गाव मार्गे पुणे-वेल्हे रोड ओलांडला की राजगडावर जाता येतं. पुणे-वेल्हे बसने प्रवास करूनही मार्गासणी गावात उतरलं की पुढे गुंजवणे गावातून राजगडला जाता येतं. पण इतर गडांच्या मानाने हा गड सर्वसामान्य माणसाला चढणे तसे कठीण आहे. राजगडावर इतर सोयीही उपलब्ध नसल्याने पर्यटकांपेक्षाही दुर्गभ्रमण करणाऱ्या गिर्यारोहकांसाठी राजगडला जाणे अतिशय आनंददायी ठरते.
राजगड हा किल्ला पुण्यापासून जवळपास ४० कि.मी. अंतरावर आहे. त्याची उंची १३७६ मीटर इतकी आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होईपर्यंतच्या काळात सर्व कारभार याच गडावरून केला जात असे. एका अर्थाने रायगड हे राजधानीचे ठिकाण होण्यापूर्वी राजगड हीच शिवाजी महाराजांची राजधानी होती. यादृष्टीने मराठ्यांच्या इतिहासात रायगडाइतकेच राजगडाचे महत्त्व मोठे आहे. रायगडाला राजधानीचा दर्जा मिळाल्यानंतरही राजगडाचं महत्त्व मुळीच कमी झालं नव्हतं.
राजगडाच्या तिन्ही बाजूला अनुक्रमे सुवेळा माची, पद्मावती माची तसेच संजीवनी माची अशा तीन माच्या असून मध्यभागी बालेकिल्ला आहे. गडाला तीन दरवाजे आहेत. किल्ल्याच्या परिसरात एक मंदिर व एक तळे आहे. त्यांना पद्मावती तळे म्हणतात. किल्ल्याच्या परिसरात काही वाडेही भग्न अवस्थेत उभे आहेत. बालेकिल्ला चढायला अवघड असून त्याची उंची जवळपास १५० ते १६० मीटर इतकी असावी. राजगडावरून सभोवताली पसरलेला परिसर रम्य दिसतो. दूरवर बारकाईने पाहिलं तर मकरंदगड, रायगड, तोरणा, सिंहगड, पुरंदरे हे किल्ले नजरेस पडतात. इ. स. १७०४ मध्ये शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मात्र औरंगजेबाने हा किल्ला जिंकून घेतला.
नजीकचे स्टेशन : पुणे
पुणे-वेल्हे बसने विंझर या गावी उतरून पुढे साखर गावातून गडावर जाता येते. गडाच्या जवळची वाट मात्र थोडीफार चढणीची व बिकट आहे. चार तासात या वाटेने गडावर जाता येते. मात्र गडावर खाण्या-पिण्याची किंवा राहण्याची सोय नाही.

नजीकचे स्टेशन : पुणे
पुणे – सिंहगड : २५ कि.मी., मुंबई – पुणे : १७२ कि.मी. (रस्त्याने)
मुंबई – पुणे : १९२ कि.मी. (रेल्वेने)

 • तोरणा किल्ला

तोरणा किल्ला हाही इतिहास प्रसिध्द किल्ला असून तो पुणे जिल्ह्यातच वेल्हे या गावानजीक आहे. हा किल्ला जिंकूनच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर या किल्ल्याची त्यांनी डागडुजी करून तो भक्कम केला. हा किल्ला राजगडापेक्षाही उंच म्हणजे जवळपास १४०० मीटर उंच आहे. हा गड उंचीने व आकाराने मोठा असल्याने त्यास ‘प्रचंडगड’ या नावानेही संबोधले जात असे.
गडाला दोन दरवाजे आहेत. ‘तोरणजाई’ देवीचे मंदिर आहे. ‘तोरणेश्वर’ नावाचेही आणखी एक मंदिर आहे. दोन पाण्याची तळी असून त्यास तोरण टाके व खोकड टाके असे म्हणतात.
गडावर असलेली बुधला माची आकाराने खूप मोठी आहे. कदाचित या आकारामुळेच गडाला प्रचंडगड असे नाव पडले असावे. गडावरील झुंजार माचीही पाहण्यासारखी आहे. गडावरील बुरुज भक्कम आहेत. हनुमान बुरुज, भेल बुरुज, टकमक बुरुज अशी त्यांची नावे आहेत. राजगडाप्रमाणे हाही गड औरंगजेबाने इ.स. १७०४ मध्ये जिंकून घेतला.

नजीकचे स्टेशन : पुणे
पुणे-वेल्हे अंतर : ६० कि. मी.

 • प्रतापगड

महाबळेश्वर या थंड हवेच्या शहरापासून प्रतापगड अवघ्या २०-२१ कि.मी. अंतरावर आहे. हा किल्ला स्वत: शिवाजी महाराजांनी इ.स. १६५७ मध्ये बांधला. अफझलखानाचा वध याच गडाच्या पायथ्याशी झाला. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील या थरारक घटनेमुळेच प्रतापगड हा मराठ्यांच्या इतिहासात मशहूर आहे. याच किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी भवानी देवीचे मंदिर बांधले आहे.
प्रतापगडाची उंची जवळपास ११०० मीटर इतकी आहे. गडावरील परिसरात टेहेळणी बुरुज, समर्थ रामदासांनी स्थापन केलेले हनुमानाचे मंदिर, बालेकिल्ल्याचा परिसर, त्यातील महाराजांचा वाडा आदी अवशेष पाहायला मिळतात. किल्ल्याला अनेक बुरुज असून ते आजही भक्कम आहेत. पाण्याचा पुरवठा करण्यासाठी काही तळीही बांधण्यात आलेली आहेत.
अलीकडच्या काळात या गडावरील परिसरात मोठ्या प्रमाणावर बागकाम करण्यात आले आहे. हा किल्ला पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असल्याने खाण्या-पिण्याच्या सोयी उपलब्ध आहेत. महाबळेश्वर येथे मुक्काम करून हा गड सावकाशपणे पाहता येतो व परत महाबळेश्वरला मुक्कामासाठी माघारी जाता येते. महाबळेश्वर ते प्रतापगड अशी बससेवाही एस्.टी. मार्फत उपलब्ध आहे.

नजीकचे ठिकाण : महाबळेश्वर
मुंबई – महाबळेश्वर : २८३ कि.मी.,
पुणे – महाबळेश्वर : १२० कि.मी.,
सातारा – वाई – महाबळेश्वर : ७६ कि.मी.

 • लोहगडविसापूर

मुंबई-पुणे मार्गावरून जाताना हे दोन्ही किल्ले दिसतात. सातवाहन काळात बांधलेले हे किल्ले एकमेकांपासून नजीक आहेत. मळवली या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील स्टेशनापासून हे दोन्ही किल्ले जवळ आहेत. मळवलीहून भाजा गावापर्यंत सुमारे ३-४ कि.मी. पायी प्रवास केल्यानंतर पुढे गायमुख खिंडीपर्यंत पायवाटेने प्रवास करावा लागतो. गायमुख खिंडीजवळ ही पायवाट दुतर्फा जाते. त्यापैकी एका वाटेने लोहगडला जाता येते तर दुसरी विसापूर गडाकडे नेते.
भाजे या गावापासून एक कि.मी. अंतरावर असलेल्या डोंगरात भाज्याच्या १८ बौध्द लेण्या आहेत. विसापूर किल्ल्याच्या परिसरात त्रिकोणी आकाराचा बेडशी डोंगर असून या डोंगरात बेडसे लेण्या आहेत. लोणावळ्याहूनही येथे जाता येते.
लोहगडाची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे १०३४ मीटर आहे तर विसापूर किल्ल्याची समुद्रसपाटीपासूनची उंची १०८१ मीटर इतकी आहे. लोहगडाच्या पायथ्याशीच लोहगडवाडी हे गाव आहे. गडावर जाताना गणेश दरवाजा, नारायण दरवाजा आणि हनुमान दरवाजा असे चार बुलंद दरवाजे ओलांडून जावे लागते. त्यानंतर मुख्य दरवाजा किंवा महादरवाजा आहे. गडाच्या अंतर्भागात दोन कोठीघरं, एक मशीद तसेच एक तलाव आहे. तटबंदी अजून सुस्थितीत आहे. येथून जवळच कार्ल्याच्या लेण्या आहेत. येथून नजीकच कार्ल्याचे पर्यटक निवास आहेत. खंडाळा व लोणावळा येथूनही या किल्ल्यांवर जाता येते.

नजीकचे रेल्वे स्टेशन : मळवली (मुंबई-पुणे रेल्वे)
मुंबई-मळवली : १२६ कि.मी.
मुंबई-लोणावळा : ११८ कि.मी. (रेल्वेने) १०४ (रस्त्याने)