महाराष्ट्रात स्त्रियांची  पारंपारिक लोकनृत्ये- फुगडी

महाराष्ट्रात मुली व स्त्रिया यांच्यात लोकप्रिय असलेला खेळ म्हणजे फुगडी दोन ते जास्तीत जास्त आठ मुली किवा स्त्रिया एकत्र येवुन फुगड्या म्हणतात, किंवा उखाणे घेतात किंवा पिंगा घालतात. किंवा पक पक असा आवाज पण काढतात याला पकवा असे म्हणतात्. मुली, स्त्रिया मंगळागौर, गौरी- गणपतीवेळी फुगड्या – उखाणे उत्साहाने खेळतात. बस फुगडी, कासव फुगडी, भुई फुगडी, दंड फुगडी, एकहाती फुगडी, नखुल्या असे एक एक फुगड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत.

फुगड्या मधील उखाणे

१) चांदीचा हार माणकांनी भरा ।
फुगड्या खेळायला सुरवात करा ॥
२) सासुने दिली सोन्याची बांगडी ।
तुझी नी माझी पहीली फुगडी ॥
३) आम्ही दोघी मैत्रीणी माडीवर-माडीवर ।
फोटो काढू साडीवर -साडीवर ॥
४) बटाट्याची भाजी आंबली कशी – आंबली कशी ।
माझी मैत्रीण दमली कशी – दमली कशी ॥
५) खोल – खोल विहीरीला उंच उंच चिरे ।
तुझी नी माझी फुगडी गरा गरा फिरे ॥
६) तुझी माझी फुगडी गिरकेदार ।
सगळ्यानां आवडे फारच – फार ॥
फुगड्या खेळताना अशा प्रकारे उखाणे घेतले जातात. गाणी म्हटली जातात.

 फेर

चोरटी सुनबाय कशी कशी गेली ओ,
कशी कशी गेली ।
सासुबाय तुमच्या मागुन आली हो,
मागून आली ।
चुलीवरचं खोबरं कोणी सुने खाल्लं गं,
कोणी सुने खाल्लं ।
तुमच्या पायाच्यान, गणोबाच्या देवाच्यान,
मी सून भली हो, मी सून भली हो ।
चोरटी सुनबाय कशी कशी गेली ओ,
कशी कशी गेली ।
सासुबाय तुमच्या मागून आली हो,
मागुन आली ।
डब्यातलं गूळ कोणी सूने खाल्लं ग,
कोणी सुने खाल्लं ।
तुमच्या पायाच्यान, गणोबाच्या देवाच्यान,
मी सून भली हो, मी सुन भली।।

गौरी गणपतीची गाणी

माळयाच्या मळ्यामध्ये गोफन काठी,
वांगी लागलीत देठान देठी ।
वांगी तोडून भरीला हारा त्यावर झाकला साखरशेला ।
साखरशेला वा-याने गेला ।
जाने तू फुगडी फू…. जाने तू फुगडी फू ॥
माळयाच्या मळ्यामध्ये गोफन काठी,
दोडकी लागलीत देठान देठी ।
दोडकी तोडून भरीला हारा त्यावर झाकला साखरशेला ।
साखरशेला वा-याने गेला ।
जाने तू फुगडी फू…. जाने तू फुगडी फू ॥
माळयाच्या मळ्यामध्ये गोफन काठी,
कारली लागलीत देठान देठी ।
कारली तोडून भरीला हारा त्यावर झाकला साखरशेला ।
साखरशेला वा-याने गेला ।
जाने तू फुगडी फू…. जाने तू फुगडी फू ॥
माळयाच्या मळ्यामध्ये गोफन काठी,
पडवळ लागलीत देठान देठी ।
पडवळ तोडून भरीला हारा त्यावर झाकला साखरशेला ।
साखरशेला वा-याने गेला ।
जाने तू फुगडी फू…. जाने तू फुगडी फू ॥

किस बाई किस

किस बाई किस, दोडका किस।
दोड्क्याची फोड, लागते गोड।
आणिक तोड, बाई आणि तोड ॥
किस बाई किस, दोडका किस।
माझ्याने दोडका किसवेना ।
दादाला बायको गवसेना।
केली होती पांगळी।
तिचं नि त्याचं जमेना।
किस बाई किस, दोडका किस।।

खजिन्याची पेटी सासूपाशी त्याच्या किल्ल्या नणंदेपाशी ।
जाईन म्हणते सोनारवाड्या, सोनारबाई, सोनारदादा ।
बाळाच्या बिंदल्या झाल्या की नाही ?
खजिन्याची पेटी सासूपाशी त्याच्या किल्ल्या नणंदेपाशी ।
जाईन म्हणते सोनारवाड्या, सोनारबाई, सोनारदादा ।
बाळाची चेन झाली की नाही ?
खजिन्याची पेटी सासूपाशी त्याच्या किल्ल्या नणंदेपाशी ।।

झिबडा

मध्यान रातीच्या भालू गो ।
तांदूळ किती घालू गो ।
तांदूळ घातले शेरभर ।
पावणे इले घरभर ।
तांदूळ आमचे रटमटले ।
पावणे आमचे गडबडले ।
तांदूळ आमचे शिजले ।
पावणे आमचे निजले ।

कोंबडा

अक्काबाईचा कोंबडा,
शेजीबाईचा कोंबडा।
आला माझ्या दारी,
पाजीन त्याला पाणी ।
घालीन त्याला चारा
पाजीन त्याला पाणी ।
कोंबडा गेला उडून
शेजीबाई बसली रूसून ।
कु कुच कू बाई कु कुच कू ।

अक्कण माती चिक्कण माती

अश्शी माती सुरेख बाई ओटा तो करावा ।
अस्सा ओटा सुरेख बाई जातं ते रोवावं ।
अस्सं जातं सुरेख बाई सोजी ती काढावी ।
अश्शी सोजी सूरेख बाई करंज्या त्या कराव्या ।
अश्शा करंज्या सुरेख बाई दुरडी ती भरावी ।
अश्शी दुरडी सुरेख बाई शेल्यानं झाकावी ।
अस्सा शेला सुरेख बाई पालखी ठेवावा ।
अश्शी पालखी सुरेख बाई माहेरी धाडावी ।
अस्सं माहेर सुरेख बाई खेळाया धाडीतं ।
अस्सं सासर द्वाड बाई कोंडूनी मारीतं ।

आड बाई आडवणी

आडाचे पाणी खारवणी ।
आडांत होता गणोबा ।
गणोबा आमचा सत्याचा ।
पाऊस पडला मोत्यांचा ।
आड बाई आडवणी ॥
आडाचे पाणी खारवणी ।
आडांत पडला शिंपला ।
आमचा भोंडला संपला ।