• तिथी :

भाद्रपद शुध्द चतुर्थी

  • पार्श्वभूमी :

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी, या दिवशी गणेश उत्सवाची सुरवात होते. घराघरात पार्थिव गणेश मूर्तींची वाजतगाजत आणून स्थापना केली जाते. या दिवसाची पारंपारिक कथा – एकदा पार्वती स्नान करत होती, तेव्हा तिच्या अंगावरच्या मळापासून तिने गणपती बनविले आणि प्रवेशद्वारावर उभे करून त्याला सांगितलं कि कुणालाही महालात प्रवेश करायची अनुमती देऊ नकोस. नंतर ती स्नान करायला महालात निघून गेली, थोड्याच वेळाने भगवान शंकर आले, त्यांना आत प्रवेश करायचा होता परंतु बाळ गणेश त्यांना आत जाऊ देईना, तेव्हा शंकरांनी गणपतीचे मुख धडावेगळे केले कारण त्यांना माहित नव्हता कि हा आपलाच मुलगा आहे , जेव्हा ही बातमी पार्वतीला माहित पडली तेव्हा ती क्रोधीत आणि दुखी झाली. तेव्हा भगवान शंकरांनी तिचे सांत्वन केले आणि आपल्या गणांना आदेश दिला, कि तुम्ही पृथ्वीतलावर जा आणि जो कुणी प्राणी तुम्हाला सर्वात पहिले उत्तरेकडे तोंड करून झोपलेल्या अवस्थेत सापडेल, त्याचे शीर घेऊन या, तेव्हा गणाना हत्ती सापडला. तेव्हा देवांनी हत्तीचे ते शीर गणपतीला जोडले, व गणपती गजमुख झाला. गणेशाची स्थापना हे जुन्याकाळी व्रत होते पुढे त्याला सणाचे स्वरूप प्राप्त झाले. गणेश उत्सवाची समाप्ती भाद्रपद वद्य चतुर्दशीला होते, पण अनेक परिवारात दीड दिवसांचा ५ दिवसांचे, १० दिवसांचे, गणपती असतात.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

शाडूच्या मातीची गणरायाची मूर्ती घरी आणली जाते. मूर्तीचे आगमन होताना गणपतीचे तोंड आपल्याकडे येईल असे पहातात व मूर्ती झाकून आणण्याची प्रथाअ आहे. घराच्या दाराबाहेर गणपतीस ओवाळून, औक्षण करून पाटावर तांदूळ पसरून त्यावर मूर्तीची स्थापना करतात. स्थापना करण्यापूर्वी सुपारीच्या गणपतीची स्थापना करून त्याची पूजा करण्यात येते. त्यानंतर गणपतीच्या मुर्तीची अथर्वशीर्षाची सहस्त्रावर्तने, यथासंगा पूजा व विधीवत आरती करून प्रतिष्ठापना केली जाते.

गणपती विसर्जनापर्यंत रोज सकाळी – सायंकाळी विधीवत पूजा – आरती करून नैवेद्य दाखविला जातो. गणपतीच्या पूजेत दूर्वांचा, जास्वंदीच्या फुलांचा, मोदकांचा विशेष मान असतो तसेच एकवीस दूर्वा, एकवीस नारळ आदी एकवीस संख्येत घेण्याचा प्रघात आहे.

सार्वजनिक गणपतींचे विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दिवशी करतात. काही लोकांकडे दीड दिवसांचा गणपती असतो तर काही जणांकडे पाच दिवस असतो. तर काहीजणांचा गणपती गौरींबरोबर सातव्या दिवशी जातो. सार्वजनिक गणपती उत्सवामधे गणेशाच्या भव्य मूर्ती चौकाचौकातून बसवितात व त्याची भव्य आरास करतात. लोक रात्रीच्या वेळी हे देखावे पहाण्यासाठी रस्तोरस्ती हिंडतात. संगीत, नृत्य, पाककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नाटके वगैरे करमणुकीचे कार्यक्रम आखले जातात.

विसर्जनाच्या दिवशी विधीवत पूजा करून, आरती करून गणेशनामाच्या गजरांत गणपतीची मूर्ती आधी थोडी हलवली जाते. त्यानंतर मूर्तीचे विहिरीवर, तळ्यावर, नदीवर किंवा समुद्रावर विसर्जन केले जाते. विसर्जनापूर्वी उत्तरपूजा केली जाते. विसर्जनाच्या समयी गणपतीची मूर्ती दोन वेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिस-या वेळी पाण्यात सोडतात.

गणपती विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी नेहेमीप्रमाणे गणपतीची पूजा करतात. गणपतीच्या हातांत गूळ-खोबरे व तिळाचा लाडू देऊन आरती करातात. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरांत गणपती मूळच्या जागेवरून हलवून ताम्हणात ठेवतात. वरील पूजा सोवळयाने करतात. नंतर गणपतीचे तोंड घरातील दाराकडे करून गणपतीची पाठ आपल्याकडे करून गणपती विहीरीवर, तळयावर, नदीवर, समुद्रावर विसर्जनाकरीता नेतात. झांज घेऊन ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असे म्हणत विसर्जनाच्या ठिकाणापर्यंत जातात. तिथे परत गणपतीची पूजा केली जाते. गणपतीला दुर्वा वाहतात, आरती करतात. यास उत्तरपूजा म्हणतात. विसर्जनाच्या वेळी गणपती दोन वेळा पाण्यातून बाहेर काढतात व तिस-या वेळी पाण्यात सोडतात.

गणपतीची स्थापना केलेल्या ठिकाणी कलश – नारळ ठेवुन, विसर्जनानंतर घरी आल्यावर कलशाची पूजा करण्याची देखील पद्धत आहे. विसर्जनानंतर सर्वांना प्रसाद व खिरापत वाटण्याची पद्धत आहे.

  • वैशिष्ट्य :

घरामधुन साजर्‍या होणार्‍या उत्सवास ईस १८९३ मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक स्वरूप दिले, या उत्सवाचे आता लोकत्सवात रुपांतर झाले आहे.

  • खाद्यपदार्थ :

नारळ व गूळ यांच्या सारणाचे, तांदुळाच्या उकडीचे मोदक

.