गुढीपाडवा

हिंदू पंचांगात येणारा पहिला महिना चैत्र आणि त्याचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. चैत्र शु.प्रतिपदेला हिंदू नवंवर्षाची सुरुवात होते. भारतीय संस्कृतीत ‘चैत्र शुद्ध प्रतिपदा’ हा दिवस ‘महापर्व’ म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे. महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण ‘गुढीपाडवा’ म्हणून साजरा करतो. या दिवशी घराच्या अंगणात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची डहाळी, आंब्याची पाने, सुगंधी फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर चांदीचा किंवा पितळेचा तांब्या (गडू) बसवून गुढी साकारली जाते. ही गुढी स्नेहाचे, मांगल्याचे आणि आनंदाचे प्रतिक मानली जाते. ती विजयाचा संदेशही देत असते. मात्र विजय कशाचा?

कोणत्या विजयाच्या आनंदात ही गुढी उभारली जाते? तर याच दिवशी म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. घरातून वालीचा, आसुरी शक्तींचा रामाने दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे. याच दिवशी प्रभू रामांचा चौदा वर्षांचा वनवासही संपला होता, म्हणून हा आनंदोत्सवाचा दिवस. ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस. भगवान विष्णूंनी मत्स्य रूप धारण करून शंकासुराचा वध केला, त्या मत्स्यरूपी विष्णूंचा जन्म चैत्र-शुद्ध प्रतिपदेचाच.

चैत्र शुद्ध प्रतीपदेपासूनच श्री शालिवाहन राजाने शके गणनेला सुरुवात केली. शालिवाहनाने मातीचे सैन्य तयार केले, त्यावर पाणी शिंपडून मातीच्या सैन्यात प्राण भरला. मग या सैन्यांच्या मदतीने त्याने प्रभावी शत्रूंचा पराभव केला, अशी आख्यायिका आहे. या विजयाप्रित्यर्थ शालिवाहन शके सुरु होऊन नवीन वर्षाची सुरुवात होते. शालिवाहनाने मातीच्या पुतळ्यांमध्ये चैतन्य निर्माण केले. त्यांच्यात पौरुष व पराक्रम जागृत झाला आणि त्यांनी शत्रूंचा पराजय झाला. आज आपणही दीन, हीन बनलो असून वाईट प्रवृतींशी लढण्यासाठी म्हणून गुढीपाडव्याच्या या पवित्र दिवशी पुरुषार्थ व पराक्रमी वीर बनण्याची प्रतीज्ञा करायची. भोगावर योगाचा विजय, वैभवावर विभूतीचा विजय आणि विकारावर विचारांचा विजय मिळविण्याची प्रतिज्ञा करायची. आपल्या मनातील चंचल, स्वार्थी वृत्ती नष्ट होऊन नवीन वर्षारंभापासून आपले मन शांत, स्थिर व सात्विक बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. हाच खरा विजय आणि तेव्हाच गुढी उभारणे हे खऱ्या अऱ्थाने होईल विजयपताका उभारण्यासारखे..

गुढीपाडव्याला अभ्यंगस्नान करावे व सूर्योदयापूर्वी गुढी उभारावी. गुढीला ‘ब्रह्मध्वज’ असेही म्हणतात. गुढी उभी करण्याच्या काठीला प्रथम गरम पाण्याने अंघोळ घालावी, तिला हळद – कुंकू, चंदन लावून सुशोभित करावे, तिच्यावर कोरे कापड -खण, (फुलांची माळ साखरेच्या गाठी, कडूनिंब, आंब्याची पाने ठेवून-ह्या वर्षी हे शक्य नाही )त्यावर एक चांदीचा किंवा तांब्याचा, गडू किंवा तांब्या पालथा बांधावा, आणि अशी सजलेली गुढी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत घरावर डौलाने उभी करावी. तिला नैवेद्य दाखवून प्रार्थना करावी.

ब्रह्मध्वज नमस्तेस्तु सर्वाभीष्ट फलप्रद ।
प्राप्तेस्मिन् वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु।।

सर्व उत्तम फल देणाऱ्या हे ब्रह्मध्वज देवता, तुला मी नमस्कार करतो. या नवीन वर्षामध्ये माझ्या घरात,जगात, नेहमी मंगलमय, म्हणजेच सर्व चांगलेच घडू दे.

ॐ सर्वे भवन्तु सुखिनः
सर्वे सन्तु निरामयाः ।
सर्वे भद्राणि पश्यन्तु
मा कश्चिद्दुःखभाग्भवेत् ।
ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

सगळे सुखी होवो, सगळे रोगमुक्त राहो, सगळे चांगल्या, मंगल घटनांचे साक्षिदार बनो, आणि कोणाच्या वाट्याला दुःख न येवो…
हीच आजच्या दिवशी प्रार्थना ..