कै. डॉ. देवदत्त गोरे यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एचआयव्हीबाधितांसाठी काम करण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरीच्या टिळक आळीमध्ये डॉ. गोरे वैद्यकीय व्यवसाय करत असत. स्वाभाविकपणे विविध प्रकारच्या रुग्णांशी त्यांचा सतत संबंध येत असे. त्यापैकी काही या आजाराने ग्रस्त होते. मात्र त्यावरील औषधोपचार काहीसे खर्चीक होते. शिवाय रोगाची लागण झाल्यापासून अखेपर्यंत ही औषधं घेणं गरजेचं असतं. अनेकांची तशी आर्थिक परिस्थिती नसायची. या आजाराला असलेले हे आर्थिक-सामाजिक पदर लक्षात घेऊन डॉक्टरांनी या संदर्भात केवळ व्यक्तिगत पातळीवर व्यावसायिक उपचार करण्यापुरतं स्वत:ला मर्यादित न ठेवता २००३ मध्ये गुरुप्रसाद ट्रस्ट या नावाने स्वयंसेवी संस्था स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्य़ात एचआयव्हीबाधितांसाठी काम सुरू केलं. दुर्दैवाने त्यानंतर आठ वर्षांनी, २०१० मध्ये डॉ. गोरेंचं निधन झालं. पण मिलिंद राजवाडे, राजेश आंबर्डेकर, प्रेरणा गोवेकर, मीरा चव्हाण, मनोज गमरे इत्यादी त्यांचे जणू उत्तराधिकारी असलेली मंडळी हे अवघड कार्य नेटाने पुढे चालवत आहेत. या सर्वानी डॉक्टरांबरोबर काम केलं असल्यामुळे त्यांचा दृष्टिकोन आणि कामाची पद्धत या कार्यकर्त्यांमध्येही चांगली उतरली आहे.

सध्या संस्थेकडे रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या २ हजार ३६५ एचआयव्हीबाधित व्यक्तींची नोंदणी झाली असून त्यामध्ये सुमारे पन्नास टक्के महिला आहेत आणि त्यांच्यापैकी बहुसंख्य विधवा आहेत. ही परिस्थिती अतिशय भयानक आहे. स्वत:चा कोणताही अपराध नसताना केवळ नवऱ्याकडून हा आजार संक्रमित झालेल्या ग्रामीण भागातल्या स्त्रियांच्या नशिबी अनेकदा परित्यक्तेचं जिणं येतं. अशा महिलांना उपचारांबरोबरच मानसिक, कौटुंबिक, सामाजिक आधार देण्याचं अतिशय अवघड काम हे कार्यकर्ते करत आहेत. दुर्दैवाने या कार्यकर्त्यांपैकी काही जण स्वत:ही एचआयव्हीबाधित आहेत. पण म्हणूनच ते या रुग्णांच्या आजाराचीअवस्था, मानसिक ताण-तणाव आणि वेदना जास्त चांगल्या प्रकारे जाणू शकतात आणि ते कमी करण्यासाठी जास्त परिणामकारक पद्धतीने काम करू शकतात. एचआयव्हीग्रस्त प्रौढ स्त्री-पुरुषांपेक्षाही या आजाराचे अकारण बळी ठरलेल्या बालकांचं पुनर्वसन हे या संस्थेपुढे असलेलं सर्वात आव्हानात्मक काम आहे. या आजाराची लागण झालेल्या पुरुषामुळे अशी मुले जन्माला येण्याचा धोका सर्वात जास्त संभवतो. पण काहीही गुन्हा नसताना ही कमनशिबी बालकं नियतीच्या निर्दय खेळीचा बळी ठरलेली असतात. सध्या अशा १६५ मुलांची ‘गुरुप्रसाद’तर्फे घेतली जात आहे. त्यापैकी काही मुलांचं पंढरपूर किंवा गोव्यात काम करत असलेल्या संस्थांच्या मदतीने पुनर्वसन केलं जातं. पण भविष्यात त्यांच्यासाठी संस्थेचं स्वतंत्र वसतिगृह बांधण्याची योजना आहे. रत्नागिरीपासून सुमारे वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या करबुडे या ठिकाणी त्यासाठी आवश्यक जमीन संस्थेला देणगीदाखल मिळाली आहे. तिथे हे वसतिगृह बांधण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी एकूण सुमारे एक कोटी रुपये निधीची गरज आहे. याचबरोबर सध्या संस्थेचे कर्मचारी, स्वयंसेवकांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. पण तो कराराने विशिष्ट कालावधीपुरता आहे. त्यापुढे जाऊन संस्थेला आर्थिक आघाडीवर स्थर्य येण्यासाठी कायमस्वरूपी निधीचीही गरज आहे.

‘गुरुप्रसाद’चे  कार्यकर्ते एक दशकापेक्षा जास्त काळ अबोलपणे करत आले आहेत.. पण ‘वैष्णव जन तो तेणे रे कहिये जो..’ या भावनेने कमालीची संवेदना आणि समवेदनाही बाळगून ते पुढे चालत राहिले आहेत,त्यासाठी त्यांना साथ हवी आहे उदारमनस्क हितचिंतकांची!

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    मिलिंद राजवाडेगुरुप्रसाद ट्रस्टरत्नागिरी

  • दूरध्वनी

    ९४२२८३८८३९

  • संकेतस्थळ

    www.guruprasadtrust.org/