• तिथी :

भाद्रपद शुद्ध तृतीया

  • पार्श्वभूमी :

पार्वतीने शंकर पती मिळावा या साठी हे व्रत केल्याचे मानले जाते. दक्षकन्या पार्वतीने आपल्याला मनाजोगता वर मिळवण्यासाठी केलेली उपासना म्हणजे हरतालिका व्रत होय. हिमालयाने आपल्या स्वरूपसुंदरी मुलीचा विवाह विष्णूशी करण्याचे योजिले होते. पण पार्वतीच्या मनात मात्र भोळा सांब वसला होता. त्यामुळे पार्वतीने आपल्या आराध्याचे वाळूचे शिवलिंग स्थापून पत्री, फूल फळांनी त्याचे पूजन केले व त्याला प्रसन्न करून घेतले याकामी तिला तिच्या सखीचे सहकार्य लाभले.

आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावे असा प्रघात आहे आणि लग्नानंतर अखंड सौभाग्य लाभावे म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात.

  • साजरा करण्याची पारंपारिक पद्धत :

दिवसभर उपवास करतात. काही जणी पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत., तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. देवघरा जवळ चौरंग ठेवतात. त्याला केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित करतात. चौरंगावर वाळूचे शिवलिंग तयार करतात शेजारी पार्वतीची मातीची मुर्ती ठेवतात. या पद्धतीने पुजेची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. निरांजन दाखविला जातो. पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणतात व कहाणी वाचतात. त्यादिवशी बायका कंदमुळाशिवाय काहीही खात नाहीत. दिवसभर पाणीसुध्दा पित नाहीत. रात्री बारा वाजता रूईच्या पानावर मध घालून चाटतात. दुसरे दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडतात. हरतालिकेच्या दिवशी बायका एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात खेळ, फुगडया, गाण्याच्या भेंडया खेळतात. या दिवशी स्त्रिया इतर स्त्रियांना सौभाग्यवाणे देतात. दुस-या दिवशी उत्तरपूजा करतात.