उन्हापासून दिलासा देणारी महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे – थोडक्यात माहिती

  • माथेरान

मुंबईनजीक असलेले हे थंड हवेचे ठिकाण प्रसिध्द आहे. सह्याद्रीच्या कुशीत ८०० मीटर उंचीवर ते असल्याने येथील वातावरण व परिसर निसर्गरम्य आहेच आणि हवाही निर्मळ आहे.
माथेरानला रेल्वे किंवा बस अशा दोन्ही मार्गांनी जाता येते. रेल्वेने जायचे असल्यास मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील नेरळ या स्थानकावर उतरून तेथून माथेरानपर्यंत छोटेखानी मीटरगेज रेल्वेने जावे लागते. हा प्रवास अतिशय सुखद असतो. घाटात वळणं घेत जाणाऱ्या या गाडीतून बाहेरची निसर्गदृष्ये पाहताना मन थक्क होते. नेरळपासून पायी प्रवास केला तर माथेरान अवघे ११ कि.मी. दूर आहे. हा प्रवास चढणीचा आहे. सभोवतालच्या निसर्गरम्यतेमुळे मात्र थकवा येत नाही. एस्.टी. किंवा खाजगी बसने थेट माथेरानला जाता येते, परंतु खुद्द गावात मात्र वाहनांना प्रवेश नाही.
माथेरानचा शोध १८५० मध्ये ब्रिटीश पर्यटकांनी लावला. त्यानंतर या ठिकाणी ब्रिटिशांनी व पारशी धनवंतांनी बंगले बांधून गाव वसवलं. अश्वारोहण, गिरीकंदरातील मनमुराद भटकंती, गिर्यारोहण तसेच खरेदी अशा अनेक हेतूने पर्यटक मोठ्या संख्येने या ठिकाणी येतात. दृष्टीसुख देणारे ३३ पाईंटस् माथेरानच्या परिसरात आहेत. हार्ट पॉईंट, पे मास्टर पार्क, पॅनोरमा, एकोहार्ट, वन ट्री हिल, मंकी असे पॉईंटस् प्रसिध्द आहेत. या ठिकाणी राहण्याची व जेवण्याची उत्कृष्ट सोय आहे. एम.टी.डी.सी. तर्फेसुध्दा या ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

नजीकचे रेल्वे स्थानक : नेरळ (म.रेल्वे-मुंबई-पुणे मार्ग)
मुंबई-नेरळ-माथेरान (रेल्वे मार्गे) : १०८ कि.मी.
पुणे- नेरळ माथेरान : १४१ कि.मी.

  • लोणावळाखंडाळा

मुंबई-पुणे महामार्गावर ६२५ मीटर उंचीवरील सह्याद्रीच्या ऐन घाटमाथ्यावरील ही दोन्ही ठिकाणे थंड हवेसाठी प्रसिध्द आहेत. या दोहोत केवळ पाच कि.मी. इतकेच अंतर आहे. विपुल वनराई, हिरवीगार निसर्गशोभा, वनश्रींने भरगच्च असलेले डोंगरमाथे व दऱ्या, पावसाळ्यात कडेलोट होऊन कोसळणारे धबधबे हे सारं काही मनाला खूपखूप सुखद वाटतं. म्हणूनच या ठिकाणी पर्यटकांची नेहमी गर्दी असते.
पावसाळ्याच्या दिवसात पावसाच्या सरी अंगावर झेलत व ढगांच्या ओलसर धुकट वातावरणात हरवून जाण्यात खूप मजा वाटते. हिवाळ्यात तर धुकं लपेटूनच फिरावं लागतं. उन्हाळ्यात जांभळं आणि करवंदाची लायलूट असते.
मुंबई व पुणे या दोन्ही शहरांपासून ही ठिकाणे अगदी जवळ असल्याने सुटीच्या दिवसात येथे खूपच गर्दी लोटते. मुंबईहून अवघ्या तीन-चार तासात तर पुण्याहून केवळ दीड-दोन तासात येथे पोहोचता येते.
राहण्या-जेवणाची विपुल सोय हे या ठिकाणांचे आगळे वैशिष्ट्य होय. या दोन्ही ठिकाणांपासून जवळच पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. राजमाची पॉईंट, वळवण धरण, टायगर्स लिप, ड्युक्स अँड डचेस नोज, कार्ला-भाजा येथील लेण्या, लोहगड, विसापूर ही त्यापैकी ठळक ठिकाणे होत. हवामान चांगले असल्याने या परिसरात अनेक सॅनेटोरियम्स आहेत. लोणावळा येथील चिक्की तर सर्वदूर प्रसिध्द आहे. एम.टी.डी.सी. तर्फेसुध्दा या ठिकाणी निवास व्यवस्था उपलब्ध आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : लोणावळा-खंडाळा (म.रे.)
मुंबई-लोणावळा (रेल्वे मार्गे) : १२८ कि.मी., मुंबई-लोणावळा रस्त्याने : १०४ कि.मी
पुणे-लोणावळा (रेल्वे मार्गे) : ६४ कि.मी.

  • जव्हार

ठाणे जिल्ह्यातील महाबळेश्वर, असा लौकिक जव्हारला प्राप्त झाला असून तेथील हवामान, निसर्गसौंदर्य पाहता हा लौकिक सार्थ वाटतो. जव्हार हे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी क्षेत्र असून या परिसरात वारली लोकांची संख्या अधिक आहे.
सह्याद्रीलाच संलग्न असलेल्या लहानमोठ्या डोंगर, टेकड्या आणि दऱ्याखोऱ्यांनी जव्हारचा परिसर व्यापलेला असून जव्हार हे समुद्रसपाटीपासून सुमारे ५०० मीटरपेक्षाही अधिक उंच आहे. जव्हारला लागूनच जवळपास मोखाडा, सूर्यमाळ, खोडाळा यासारखी लहान लहान हिल स्टेशन्स पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. पावसाळ्यात मात्र हा सारा परिसर हिरवागार व डोंगरातून कोसळणाऱ्या झऱ्यांनी व लहानमोठ्या धबधब्यांनी ओलाचिंब असतो.
जव्हारच्या परिसरात खूप काही पाहण्यासारखे आहे. उदा. पूर्वीच्या राजाचा राजवाडा-जयविलास पॅलेस, दादर-कोप्रा फॉल, हनुमान पॉईंट, सनसेट पॉईंट, भूपतगड, शिर्पा माळ ही ठिकाणं इतिहास प्रसिध्द असून याच ठिकाणी शिवाजी महाराजांनी सुरतेवरील स्वारीच्या वेळी तळ ठोकला होता. वारली लोकांची हस्तकला आणि चित्रकला यासाठी जव्हारचा परिसर प्रसिध्द आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : इगतपुरी किंवा नाशिक (म.रे.), डहाणू (प.रे.)
इगतपुरी-जव्हार : ६१ कि.मी.
नाशिक-जव्हार : ८० कि.मी., डहाणू-जव्हार : ६५ कि.मी.

  • महाबळेश्वर

सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रात खूपच मशहूर आहे. ब्रिटीश काळापासून महाबळेश्वरला लाभलेला उत्कृष्ट हिलस्टेशन हा लौकिक आजही कायम आहे. समुद्रसपाटीपासून १३७२ मीटर उंचीवर सह्याद्रीच्या पठारावर वसलेल्या या ठिकाणी चांगली घनदाट वनश्री आहे. महाबळेश्वर येथील महाबळेश्वर मंदिर, लागून असलेले जावळीचे खोरे आणि प्रतापगड या सर्व स्थळांना शिवरायांच्या नावाचा व कर्तृत्वाचा ऐतिहासिक संदर्भ आहे.
महाबळेश्वरला पावसाचे प्रमाण खूप असून येथील सदाबहार निसर्गसौंदर्य, खंडाळा-लोणावळा किंवा माथेरानप्रमाणे या ठिकाणी असलेले पॉईंटस् खूप आकर्षक आहेत. विल्सन पॉईंट, आर्थर सीट पॉईंट, लॉडनिग पॉईंट हे त्यापैकी प्रसिध्द डोंगरकडे होत.
येथील स्ट्रॉबेरीज, रासबेरीज, जांभळे, लाल रंगाचे मुळे प्रसिध्द आहेत. महाबळेश्वरचा मध तर खूपच चविष्ट आणि प्रसिध्द आहे. गुलकंदही येथे मोठ्या प्रमाणावर मिळतो.
राहण्या-जेवणाची येथे अत्यंत चांगली सोय आहे. एम्.टी.डी.सी. तर्फेही येथे निवास व्यवस्था आहे. मुंबई, पुणे, सातारा येथून थेट महाबळेश्वरला जाता येते. त्यासाठी तेथून खाजगी तसेच एस्.टी. बसेस नियमितपणे सेवा देतात. संपूर्ण महाबळेश्वर परिसर हिंडून पाहायचा असल्यास त्यासाठी किमान तीन-चार दिवस येथे मुक्काम करायला हवा.

नजीकचे रेल्वे स्टेशन : वाठार (पुणे-कोल्हापूर मार्ग)
मुंबई- महाबळेश्वर (पुणे मार्गे रस्त्याने) : २९० कि.मी.
मुंबई- महाबळेश्वर (महाड मार्गे रस्त्याने) : २४७ कि.मी.
पुणे- महाबळेश्वर अंतर : १२० कि.मी., सातारा- महाबळेश्वर अंतर : ७६ कि.मी.

  • पाचगणी

जवळपास महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक थंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि.मी अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिध्द आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. येथे राहण्या-जेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे. लोणावळा-खंडाळा ही ठिकाणं जशी एकमेकांपासून जवळ आहेत तसाच प्रकार महाबळेश्वर-पाचगणी यांच्या बाबतीत आहे. पाचगणीच्या विकासाला महाबळेश्वर हेच मुख्यतः कारणीभूत असले तरीही पाचगणीचं स्वतः असं वैशिष्ट्य आहेच. उत्कृष्ट हवामान आणि संपन्न निसर्ग हे पाचगणीचं वैशिष्ठ्य आहे. पाहताना काळजाचा ठोका चुकविणाऱ्या खोल दऱ्या, धबधबे, कमलगड किल्ला, टेबल लँड, किडीज पार्क, पाचगणीच्या गुंफा ही काही प्रेक्षणीय स्थळं आवर्जून पाहावी अशी आहेत.
सातारा, पुणे, वाई, महाबळेश्वर येथून पाचगणीला एस्.टी. बसने जाता येते.

मुंबई-पाचगणी अंतर: २९५ कि.मी. (पुणे मार्गे)