संयुक्त महाराष्ट्राचे एक शिल्पकार असलेल्या आचार्य अत्र्यांनी ‘माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे!’, असे उद्गार काढले होते. आज एकविसाव्या शतकाच्या प्रारंभी सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक स्थित्यंतरं वेगाने घडत असताना महाराष्ट्र व मराठी या दोहोंच्या भविष्याची आखणी करणं गरजेचं झालं आहे. मात्र भविष्याचा वेध घेताना भूतकाळ तपासून बघणं आवश्यक ठरतं. आचार्य अत्र्यांनी उल्लेखलेल्या इतिहासाचा वेध हा महाराष्ट्राच्या व मराठीच्या भूतकाळाचा प्रवासच आहे.

महाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती

‘महाराष्ट्र’ शब्दाच्या आरंभकालात डोकावल्यास आढळते की इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञांनी अनेकानेक मते मांडली आहेत.

लेखक कृ. पां. कुलकर्णी यांच्या ‘मराठी भाषा उद्गम आणि विकास’ या पुस्तकातईल लिखाअणाच्या सारंशानुसार महाराष्ट्र हे नाव तसं फार जुनं नाही. वराहमिहिराच्या ग्रंथात (इ.स. ५०५) आणि सत्याश्रय पुलकेशी याच्या इ.स. ६११ सालातील बदामीच्या शिलालेखात महाराष्ट्राचा प्रथम उल्लेख सापडतो. आपण हल्ली ज्या प्रदेशाला महाराष्ट्र म्हणतो, तो पूर्वी दक्षिणापथ या नावानं ओळखला जात असे. दक्षिणापथ म्हणजे दक्षिणेकडील मार्ग व दक्षिणेच्या मार्गावरील प्रदेश. दक्षिणेकडील प्रदेशाची नीटशी कल्पना उत्तरेकडील आर्यावर्तांत राहणार्‍या आर्यांना नसल्यामुळे त्यांनी या अज्ञात प्रदेशाला दिशादर्शक असं मोघम नाव दिलं.

दक्षिणापथ हे नाव तसं पुरातन आहे आणि ते विंध्यपर्वताच्या दक्षिण परिसराच्या खालच्या प्रदेशास लावण्याचा प्रघात होता. ख्रिस्तपूर्व काळातील पेरिप्लुस (सागरी मार्गाचे नकाशे) या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात. त्यांत दक्षिणापथ या देशास Dakhinabhades असं नाव देऊन त्यांत भडोचपासून (Bargaza) द्रविड देशातील (Damiriea) व्यापारी पेठेच्या शहरांपर्यंतचा अंतर्भाव केलेला आहे. हे जे दामिरिच म्हणून शहर पेरिप्लुसांत लिहिले आहे, ते मार्कंडेय पुराणात सांगितलेलं दामरह नावाचं शहर असावं. इ. स. ३३०च्या सुमारास राज्य करणारा समुद्रगुप्त राजा आपल्या शिलालेखांत दक्षिणापथ म्हणजे नर्मदा नदीपासून थेट कन्याकुमारीचा प्रदेश असं म्हणतो. याच्या पुढचा ६०० वर्षांनंतरचा राजशेखर (इ.स. ९००-९४०) नावाचा ग्रंथकार हा आर्यावर्त आणि दक्षिणापथ या दोन प्रदेशांच्यामधील मर्यादा रेवा नदी असल्याचं सांगतो. याच काळातला चालुक्य कुळातील पहिला राजरज (इ. स. ९८५) हा दक्षिणापथाची मर्यादा नर्मदेपासून रामाच्या सेतूपर्यंत नेऊन या दोन्हींमधील प्रदेश पहिल्या विष्णुवर्धनाने (इ.स.६००) जिंकल्याचं सांगतो.

ह. श्री. शेणोलीकर यांनी अनेक मतमतांतरे लक्षात घेऊन जी माहिती दिली आहे त्यानुसार ‘महावंश’ नावाच्या बौद्ध ग्रंथात ‘थेरो महाधम्मरखिता’ यास मोगलिपुत्त तिष्याने ‘महारट्टा’स पाठविल्याचा उल्लेख आहे. सदर ग्रंथ इ. स. 500 च्या सुमाराचा आहे. हाच महाराष्ट्राचा देशवाचक असा प्राचीनतम उल्लेख आहे. महार आणि रठ्ठ (राष्ट्रिक) या दोन जातिनामांचा संयोग होऊन बनलेल्या लोकवाचक नामावरून ‘महारट्ट’ हे देशवाचक नाम तयार झाले, असा एक मतप्रवाह आहे. ‘महारांचे राष्ट्र’ ते ‘महाराष्ट्र’ अशी मोल्सवर्थ व डॉ. विल्सन यांनी सुचवलेली उपपत्ती आहे. डॉ. केतकरांनी याच उपपत्तीचा पुरस्कार केला आहे; कारण म्हार-माग; गोंड, भिल्ल, कातोडी, वारली हेच या भूभागाचे आद्य वसाहतकार होते, असे प्राचीन महाराष्ट्राचा इतिहास सांगतो.

दक्षिणेत घुसलेल्या आर्यांनी या भागात गोप, मल्ल, पांडु, अपरान्त, विदर्भ, अश्मक अशी सहा राष्ट्रे वसवली, या सर्वांचे मिळून एकत्रित पुढे महाराष्ट्र बनले,  असाही एक मतप्रवाह आहे. ‘महंत राष्त्ड़ म्हणौनी महाराष्ट्र’ ही गुर्जर शिवबासांची व्युत्पत्ती सदर घटनेस अनुलक्षून असावी असा सदर मतप्रवाह मानतो.

नाणेघाट, भाजे, कार्ले, कान्हेरी येथील शिलालेखांत ‘महारठि’ (महारथी), ‘महारठिनी’ अशी विशेषणे आढळतात. त्यावरून या भूमीतील लोक शूर व महारथी असल्याने ‘महारटि’ या गुणवाचक शब्दावरून ‘महाराष्ट्र’ हे नाव सिद्ध झाले, अशी देखील कल्पना मांडली जाते.