पब्लिक लिमिटेड कंपनी व प्रायवेट लिमिटेड कंपनी
पब्लिक लिमिटेड कंपनी व प्रायवेट लिमिटेड कंपनी असे कंपन्यांचे दोन प्रकार आहेत. कंपनी कलम
३(१) (iv) अन्वये जी कंपनी नोंदणीकृत असून किमान सात सदस्य असलेली कंपनी “पब्लिक” ठरू
शकते. लोकांनी या कंपनीचे समभाग किंवा कर्जरोखे किती घ्यावेत यावर निर्बंध नसतात. हे समभाग
किंवा कर्जरोखे शेअर बाजारात नोंदले जाऊ शकतात. त्या त्या शेअर बाजारावर या पब्लिक लिमिटेड
कंपन्यांच्या शेअर्सची नोंदणी ठराविक शुल्क भरून करताना त्या शेअरबाजाराशी कंपन्यांचे करार केले
जातात. त्यामुळेच या पब्लिक लिमिटेड कंपन्यांच्या समभागांची व कर्जरोख्यांची खरेदी-विक्री
शेअरबाजारात / रोखेबाजारात[डेब्ट मार्केट] मुक्तपणे होत असते. यापैकी कोणतीच गोष्ट खाजगी
कंपन्यांच्या ( प्रायवेट लिमिटेड) बाबतीत होत नसते. मुळात प्रायवेट लिमिटेड कंपन्यांच्या
भागधारकांच्या संख्येवर मर्यादा आहे. प्रायवेट लिमिटेड कंपनीतील भागधारक कर्मचार्यांव्यतिरिक्त
पन्नासहून अधिक भागधारक असता कामा नये.
पब्लिक लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापन भागधारकांनी किंवा त्यांनी नामनिर्देशित केलेल्या व्यक्तींनी
निवडून दिलेलं संचालक मंडळ करतं. या संचालक मंडळात सरकार, बँका व वित्तसंस्थांच्या
नामनिर्देशित व्यक्तीही काही वेळा नेमलेल्या असतात. या कंपन्या, आपले शेअर्स किंवा कर्जरोख्यांची
लोकांना विक्री करून किंवा वित्तसंस्था व बँकांकडून कर्ज घेऊन किंवा मुदत ठेवी घेऊन निधी उभा
करतात. जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे भागधारक असता त्या वेळी तुमच्या असलेलेल्या भागाइतके
(शेअर्सच्या दर्शनी मूल्याइतके) तुम्ही त्या कंपनीचे हक्कदार असतं. त्या कंपनीच्या नफा-तोट्यातही
तुमचं वाटा असतो. पब्लिक लिमिटेड कंपनी आपले शेअर्स किंवा डिबेंचर्स लोकांसाठी सार्वजनिक
विक्रीस काढून भांडवल गोळा करते. यालाच “पब्लिक इश्यू” म्हणतात. हा पब्लिक इश्यू समभाग
(इक्विटी शेअर्स), परिवर्तनीय कर्जरोखे(कन्व्हरटीबल डिबेंचर्स), अंशतःपरिवर्तनीय कर्जरोखे (पार्टली
कन्व्हरटीबल डिबेंचर्स) आणि अपर्रिवर्तनीय कर्जरोखे (नॉन कन्व्हरटीबल डिबेंचर्स ) यांच्या विक्रीचा
असू शकतो. परिवर्तनीय कर्जरोखे त्यावर नमूद केलेल्या तारखेस पूर्णतः समभागात रूपांतरित होतात.
अंशतः परिवर्तनीय रोखे त्यावर नमूद केलेल्या तारखेस अंशतः समभागात रूपांतरित होतात. व
उर्वरित हिस्सा तसाच अपरिवर्तनीय कर्जरोख्यात राहतो. अपरिवर्तनीय कर्जरोखे समभागात रूपांतरित
होत नाहीत.
बुल, बेअर की स्टॅग
जर एखाद्या कंपनीनं आपल्या निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात काही समभागांचं वाटप केलं असेल
आणि दुस-या टप्प्यात जर कंपनी समभाग विक्रीस काढणार असेल तर पहिल्या टप्प्यातील
भागदारकांना हक्काचे समभाग[Rights Shares] मिळतात. हे समभाग आधी बाळगलेल्या समभागांच्या
संख्येप्रमाणे संचालक मंडळानं जाहीर केलेल्या प्रमाणात हक्काचे म्हणून मिळतात. अर्थात, संचालक
मंडळाला हा ठराव सर्वसाधारण भागदारकांच्या सभेत संमत करून घ्यावा लागतो.
हे हक्काचे समभाग भागधारक स्वतःसाठी ठेवू शकतो किंवा दुस-याच्या नावे बदलू शकतो. हे
हक्कभाग घेतलेच पाहिजेत असं कोणतंही बंधन भागधारकावर नसतं. हे हक्कभाग घेताना संचालक
मंडळानं ठरवलेली समभागांच्या संख्येप्रमाणे किंमत भागधारकला भरावी लागते. दुसर्यांच्या नावे हे
हक्कभाग करताना (रिनाउन्सिएशन) ती दुसरी व्यक्ति त्याची किंमत भरते. पब्लिक इश्यूत
लॉटरीप्रमाणे शेअर्स न मिळण्याची शक्यता असते.
शेअर्स बाजारात तीन प्रकारचे गुंतवणूकदार असतात.त्यापैकी एकाला “बैल” (Bull) म्हणतात तर
दुस-याला“अस्वल” (Bear) म्हणतात,तर तिस-याला हरण (Stag) म्हणतात. समजा ‘अ’गटातील
कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढतील असं गृहीत धरून हे बुल्स शेअर्सची भराभर खरेदी करतात. हे
बुल्स तेजीच्या व्यवहारात भरपूर कमावतात म्हणून त्यांना ‘तेजीवाले’ असं म्हंटलं जातं. तर बेअर्स
म्हणजे मंदीवाले.‘अ’गटातील कंपन्यांचे शेअर्स भाव खाली उतरतील या आशेनं ते भराभर विक्री
करायला सुरवात करतात. जेव्हा ही विक्री परिणामकारक ठरते तेव्हा मंदीवाले फॉर्मात असतात. बुल्स
आणि बेअर्समधील चढाओढ सौद्याच्या दिवशी चालूच असते. स्टॅग्स प्रवाहातील गुंतवणूकदार
प्राथमिक बाजारातील पब्लिक इश्यूमधील शेअर्समध्ये गुंतवणूक करून ज्यावेळी हे शेअर्स बाजारात
नोंदले जातात त्याच क्षणाला विक्री करून नफा पदरात पाडून घेतात.
शेअर्सच्या चढ उतारामागील कारणे
शेअर्सच्या दरातील चढउतार हाच शेअर बाजाराचा मोठा गुणधर्म आहे. शेअर्सच्या दरात चढउतार
होण्यामागे त्या त्या कंपनीची आर्थिक कामगिरी जितकी महत्वाची ठरते तितकीच राजकीय परिस्थिति
महत्वाची असते. सरकारची त्या कंपनीकडे ‘मेहेरनजर’असेल तर ठीकच, परंतु ‘वक्रदृष्टी’असेल तर मात्र
शेअर्सचा भाव खाली येण्यास वेळ लागत नाही. राजकीय लागेबांधे प्रवर्तक कसे सांभाळतात यावरच
त्या कंपनीचे भविष्यातील उपक्रम अवलंबून असतात. देशाची राजकीय परिस्थिति, विशेषतः सत्ताधारी
पक्षाचं शासन व मताधिक्य चांगलं असेल तर शेअर बाजारात तेजीचे वारे येण्यास वेळ लागत नाही.
‘सामाजिक परिस्थिति’ हा दूसरा महत्वाचा घटक शेअर बाजारावर वर्चस्व गाजवतो.जातीय दंगली,
नैसर्गिक आपत्ति (भूकंप, पूर, दुष्काळ) व काही वर्षापूर्वी अनुभवास आलेली प्लेगसारख्या रोगांची साथ
यांचा परिणाम शेअर बाजारावर प्रकर्षाने जाणवतो. आंतरराज्य संबंध इथेही महत्वाचे ठरतात.
तिसरं महत्वाच कारण म्हणजे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांची (अर्थात यात शेअर दलालही आलेच)
मानसिकता. यालाच शेअर बाजारात ‘मार्केट सेंटिमेंट्स ‘म्हणतात. खरेदी-विक्रीच्या मनोवृत्तीत अचानक
बदल दिसून आला तर शेअर बाजारात मागणी व पुरवठा यांच्यातील समतोल बिघडतो. याचाच
परिणाम शेअर बाजार कोसळण्याकडे होतो. तेजीची लाट असो किंवा मंदीची लाट असो, काही वेळा
अकल्पनीय परिस्थिति उदभवते. उदाहरण घ्यायचे तर हर्षद मेहताची तेजी किती कृत्रिम आणि
अवास्तव होती. ते भ्रमाचा भोपळा फुटल्यावर कळलं. त्यानंतर २००८ मध्ये अमेरिकतील सबप्राइम
लेंडिंगमुळे आलेली मंदीही बराच काळ संशयाच्या जाळ्यात अडकलेली होती. त्यातून बाहेर यायला
भारतीय शेअर बाजाराला दोन वर्षे लागली.
केंद्र सरकारची बदलणारी व्यापारी-आर्थिक धोरणे, अर्थसंकल्प, अर्थ मंत्रालयातर्फे जारी केली जाणारी
कर धोरणे आणि रिझर्व बँकेचे पतधोरण तसेच व्याज धोरण शेअर बाजारांवर मोठं परिणामकारी
ठरतात. आंतरराष्ट्रीय शेअर बाजारात आणि एकूणच बाजारपेठेत जर मंदीचे वातावरण असेल तर
त्याचे पडसादही भारतीय शेअर बाजारांवर उमटतात. शेअर्सच्या चढउतारामागे अशी अनेक कारणे
असतात. या सर्व घटकांवर लक्ष ठेवून किंवा अभ्यास करून शेअर्सच्या कामगिरीचा अंदाज घेता येतो.
परंतु सर्व सकारात्मक घटना घडून सुद्धा शेअरबाजार जेव्हा घसरतो तेव्हाच शेअर बाजाराच्या
अशाश्वत गुणधर्माची अनुभूति मिळते.
औद्योगिक जीवनचक्राचे स्तर
कोणत्याही कंपनीच्या शेअर्सची खरेदी करण्याआधी कंपनी ज्या औद्योगिक क्षेत्रात आहे त्या क्षेत्राचे
जीवनचक्र बघितले जाते. औद्योगिक जीवनचक्राच्या विश्लेषणात चार स्तरांवरून विचार केला जातो.
मूळ शोधकाचा पहिला स्तर असतो. यात नवीन प्रकारचं तंत्रज्ञान आणि किंवा नवीन उत्पादनं यांचा
समावेश असतो. यातील उत्पादनाच्या आशादायक मागणीला भुलून बरेच उद्योजक या क्षेत्रात
उतरतात. स्पर्धेला तोंड देण्यास समर्थ असलेलेच या स्तरावर तरु शकतात तर उर्वरित त्या क्षेत्रातून
बाहेर फेकले जातात.प्राथमिक स्तरावरील गोंधळ संपुष्टात आला की शीघ्र वाढीस वाव असतो.
प्राथमिक स्तरातील तीव्र स्पर्धेतून तावूनसुलाखून निघाल्यावरच विक्री आणि नफ्यातील लक्षणीय वाढ
दर्शवत असते.
शीघ्र वाढीचा दूसरा स्तर काही कालावधीपर्यंत अनुभवल्यानंतर कंपनी पूर्ततेच्या आणि स्थिरतेच्या
पातळीला पोचते. या तिस-या स्तरावर कमी अधिक प्रमाणात उद्योग विकसित झालेला असला तरी
वृद्धीदर अर्थव्यवस्थेच्या तुलनेत स्थिर होतो.
चौथ्या स्तरात, घसरणारी मागणी, नवीन उत्पादकांचं अतिक्रमण आणि ग्राहकांची बदलणारी आवड
उद्योगक्षेत्रास उतरती कळा आणतात.
याच चार स्तरांतून प्रत्येक उद्योगक्षेत्र जात असतं. ज्यावेळी पहिला स्तर सुरू असतो, त्यावेळी
गुंतवणुकीसाठी त्या क्षेत्रातील कंपन्यांची निवडप्रक्रिया सुरू करावी. दुसर्या स्तरावरील उद्योगक्षेत्रात
त्वरित गुंतवणूक करून त्वरित कृती करणं आवश्यक ठरतं. तिसर्या स्तरावर उद्योग आला की
गुंतवणूक माफक प्रमाणात ठेऊन, चौथ्या स्तराच्या वेळी शेअर्सची विक्री करून गुंतवणूक निधि परत
घेणं इष्ट ठरतं.
उद्योग क्षेत्राची निवड
उद्योगाच्या रचनेच्या व गुणवैशिष्ट्याचा व्यवस्थित अभ्यास करणं हा गुंतवणूक निर्णयाचाच
सयुक्तिक भाग ठरतो. उद्योगाची संरचना आणि स्पर्धेचं स्वरूप बघताना त्या उद्योगातील एकूण
कंपन्या आणि बाजारपेठेतील अधिक हिस्सा राखून असलेल्या या उद्योगातील प्रमुख कंपन्या
शोधाव्यात. सरकारचं परवाना धोरण,उद्योग क्षेत्रात प्रवेश करताना येणारे अडथळे, कंपनीचे किंमत
धोरण, इतर कंपन्यांच्या उत्पादंनांमधील साधर्म्य किंवा फरक दर्शवणारी पातळी, परदेशी कंपन्यांकडून
होणारी स्पर्धा आणि पर्यायी उत्पादंनांची गुणवत्ता, किंमत, जाहिरात आणि प्रत्यक्ष कामगिरी या
मुद्द्यांवर होणारी तुलना या सर्व घटकांचा विचार महत्वाचा ठरतो.
उत्पादनाना असलेल्या मागणीचे स्वरूप आणि भवितव्य अजमावताना मुख्य ग्राहक व त्यांच्या गरजा,
मागणीच्या कालचक्रातील पातळी आणि भविष्यातील अपेक्षित वृद्धीचा दर यांचा अभ्यास उपयुक्त
ठरणार असतो. किंमत, उत्पादकता आणि नफ्याचं प्रमाण यांच्यातील संबंध स्पष्ट करावे लागतात.
कच्चा माल,कामगार ,साधनं आणि इंधन यांच्यातील मुख्य घटकांच किंमतप्रमाण, कामगारांद्वारे केली
जाणारी उत्पादकता, स्थावर मालमत्ता, मालाची उलाढाल, खरेदी व विक्री केलेल्या मालांवरील
किमतीबाबत असलेलं नियंत्रण आणि चलनवाढीसंबंधित येणारा दबाव इत्यादी सर्व घटकांचा विचार
करतानाच एकंदरीत नफा आणि निव्वळ नफा, मालमत्तेवरील उत्पन्न, इतर उत्पन्न मिळवू शकणारी
कंपनीची शक्ती आणि समभागांवरील उत्पन्न याही मुद्दयाचा विचार करणं महत्वाच ठरतं. तंत्रज्ञान
आणि संशोधनाचा औद्येगिक विश्लेषणात प्रामुख्याने विचार होतो. महत्वाच्या तंत्रज्ञानात्मक बदलानं
त्या उद्योगात घडवलेला आमुलाग्र बदल आणि त्याची उपयुक्तता महत्वाची ठरते. संशोधनामुळे व
अत्याधुनिक विकसित तंत्रज्ञानानं त्या उद्योगक्षेत्रातील सद्य विक्रीचं वाढीव प्रमाण आणि नवीन
उत्पादनाच्या विक्रीतील तुलनात्मक वाढीव प्रमाण स्पष्ट होतं.
कंपनीचा पूर्वेतिहास, विद्यमान कामगिरी, संचालक मंडळ, उत्पादनांची बाजारपेठ, कामगार
व्यवस्थापनातील संबंध इत्यादींचा अभ्यास त्या कंपनीच्या शेअरच्या खरेदी किंवा विक्रीसाठी कायमच
मार्गदर्शक ठरत असतो.
ई.पी.एस.आणि पी–ई रेशो
कंपनीचा करोत्तर नफा (प्रॉफिट आफ्टर टॅक्स)जितका जास्त तेवढी त्या कंपनीच्या शेअर बाजारातल्या
शेअरची किंमत वाढत जाते. प्रत्येक शेअरवर कंपनीनं किती उत्पन्न मिळवलं ते दर्शवणारं गुणोत्तर
म्हणजेच प्रति शेअर उत्पन्न-[Earnings Per Share] ई.पी.एस. कंपनी आपल्या नफ्याचं काही भाग
राखीव गंगाजळीत(रिझर्व) टाकते तर काही भाग लाभांशाच्या रुपानं भागधारकांना देते. प्रति शेअर
उत्पन्न म्हणजे निव्वळ नफा (नेट प्रॉफिट) भागिले एकूण समभागांची संख्या॰ निव्वळ नफ्याची
रक्कम अग्रहक्क समभागांवरील ( प्रेफरन्स शेअर्स ) लाभांश तसेच कर वगळून घेतलेली रक्कम
असते.
गेल्या चार-पाच वर्षातील प्रतिशेअर उत्पन्न जर स्थिर किंवा वाढत असेल तर ती कंपनी गुंतवणुकीस
योग्य ठरते॰ गुंतवणुकीनंतरही प्रति शेअर उत्पन्न किती येतं नियतकालिकातून तपासावं. नवीन
भागविक्रीच्या वेळी भागधारकांकडून किंवा लोकांकडून किती अधिमूल्य(प्रीमियम) समभागाच्या
दर्शनीमूल्यावर आकारावं याचा अंदाज कंपनीस या प्रति शेअर उत्पन्नावरून येतो. भागभांडवल वाढवले
म्हणजे समभागांची संख्या वाढते. त्यामुळे प्रति शेअर उत्पन्न कमी होतं. म्हणूनच भांडवल वाढलं की
निव्वळ नफ्यातही वृद्धी होण आवश्यक असतं .चागलं प्रति शेअर उत्पन्न कंपनीचं चांगलं भवितव्य
दर्शविते.
बाजारभाव – उत्पन्न गुणोत्तर [Price-Earnings Ratio](पी–ई रेशो)
प्रत्येक शेअरच्या बाजारातील किमतीस प्रति शेअर उत्पन्नानं भागलं असता हे गुणोत्तर मिळतं. हे गुणोत्तर शेअर बाजारातील
शेअरची किंमत योग्य आहे की अवाजवी ते ओळखण्यास उपयोगी पडतं. कंपनीने कमावलेल्या निव्वळ
नफ्याच्या प्रत्येक रूपयासाठी गुंतवणूकदार किती किंमत देऊ इच्छितात ते किंमत-उत्पन्न गुणोत्तर
दर्शविते. अधिकतम असलेले हे गुणोत्तर शेअर्सची किंमत अधिकतम वाढवलेली दर्शविते. बाजाराची या
कंपनीच्या उत्पन्न वाढीबद्दलची अपेक्षा कळते. न्युंनतम किंमत-उत्पन्न गुणोत्तर शेअर्सची किंमत
कमी केली असल्याचे दर्शविते. बाजाराची या कंपनीच्या उत्पन्नात घट होण्याची अपेक्षा असते. तसेच,
एकाच क्षेत्रात कार्यरत असलेल्या चार-पाच कंपन्यांतून गुंतवणुकीसाठी एक कंपनी निवडायची असेल
तर प्रत्येक कंपनीचे बाजारभाव-उत्पन्न गुणोत्तर काढून निवड करता येते. शेअरची किंमत वाजवीपेक्षा
कमी आढळत असेल तर खरेदीसाठी पटकन निर्णय घेणं योग्य ठरतं. विविध उद्योगांच्या वेगवेगळ्या
वृद्धी दरांमुळे किंमत-उत्पन्न गुणोत्तरातही बदल दिसतो.
पुस्तकी मूल्य (बुक वॅल्यू)
पुस्तकी मूल्य (बुक वॅल्यू) ही संज्ञा प्रति शेअर उत्पन्न व बाजार भाव-उत्पन्न गुणोत्तर या दोन संज्ञा
एवढी महत्वाची नाही. तरीही ही संज्ञा गुंतवणुकीच्या निर्णयासाठी महत्वाची कामगिरी बजावते. त्या
त्या कंपनीनुसार प्रत्येक समभाग एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये किंवा शंभर रुपये दर्शनी
मूल्याचे असतात. त्या समभागांची शेअर बाजारातील किंमत बाजारमुल्य दर्शवते.,तर पुस्तकी किंमत
गुंतवणुकीचं सुरक्षा मूल्य दर्शवते. पुस्तकी किंमत समभागांच्या एकूण संख्येने भागधारकांच्या एकूण
निधीच्या रकमेस (नेट वर्थ) भागले असता मिळते.
भागधारकांच्या एकूण निधीच्या किमतीत, कंपनीचं एकूण भागभांडवल (टोटल शेअर कॅपिटल)
गंगाजळी वं संचयित नफा (क्युम्युलेटीव्ह प्रॉफीट) यांचा समावेश असतो. नेट वर्थ म्हणजेच निव्वळ
मोल काढताना समभाग भांडवल अग्रहक्क भांडवल आणि गंगाजळी यांची बेरीज केली जाते. पुस्तकी
मूल्य शेअर्सच्या खरेदी-विक्रीच्या निर्णयात फार महत्वाचं असतं. कंपनीची आर्थिक परिस्थिति किती
चांगली आहे हे पुस्तकी मूल्य दर्शवतं. ज्या कंपनीचे शेअर्स खरेदी करायचे असतील त्या कंपनीनं
मागील किती वर्ष लाभांश दिला आहे ते बघावं. त्याचबरोबर प्रत्येक वर्षी त्या शेअर्सची शेअर
बाजारातील भांडवली वृद्धी किती पटींनी झाली आहे ते बघावं.
शेअर्सची पुस्तकी किंमत (बुक वॅल्यू) अजमावण्यापेक्षा त्या कंपनीची उत्पन्न शक्ति किंवा उत्पन्न
देण्याची क्षमता किती आहे ते प्रथम बघावं. उत्पन्न देण्याची क्षमताही व्यवस्थापनाचा दर्जा,
भागधारकांचा एकूण निधी आणि इतर गोळा केलेला निधी,सुस्थितीतील व्यवसाय ,आर्थिक निर्बंध
आणि उत्पादनाची वाढीव मागणी या गोष्टींवरच संपूर्णपणे आधारलेली असल्यानं या गोष्टी नजरेआड
करता येत नाहीत.
विनायक कुलकर्णी, ” गोष्टी पैशांच्या ” लेखक
Click here to add your own text