एखादे विशेष मूल आपल्या आजूबाजूला दिसले, तर साहजिकच त्याच्याबद्दल सहानुभूती वाटते, पण ती सहानुभूती अनेकदा दोन हात लांब राहूनच व्यक्त केली जाते, कारण सेरेब्रल पाल्सी (मेंदूचा पक्षाघात) किंवा मतिमंदतेने ग्रासलेले एखादे मूल व त्याच्या अनियंत्रित हालचाली पाहून अनेकांना नाहक भीती वाटत असते. सर्वसामान्य कुटुंबात घर व संसार सांभाळणाऱ्या एका गृहिणीच्या पदरी असं मूल आलं तर.. अशा क्षणी एखादी स्त्री कोलमडून जाण्याचीच शक्यता अधिक. परंतु नियतीचा हा आघात झेलून व्याधीग्रस्त मुलाच्या संगोपनाबरोबरच त्याच्याच सारख्या अन्य मुलांचीही ‘आई’ होण्याची जिद्द एका स्त्रीने दाखवली.. तिच्या या संघर्षमयी जीवनाच्या वाटचालीतला एक टप्पा म्हणजे ‘झेप पुनर्वसन केंद्र’. चिंचवडनजीकच्या ताथवडे गावातील हे केंद्र म्हणजे नेत्रा तेंडुलकर-पाटकर यांची जीवनगाथा!
सेरेब्रल पाल्सी (मेंदूचा पक्षाघात) हा आजार झालेल्या मुलांचे संगोपन करून त्यांना शिकवणे, त्यांच्यात बदल घडवून आणण्याचे मुख्य काम ‘झेप’ संस्थेतर्फे केले जाते. या विशेष मुलांविषयी समाजात अनेकांना सहानुभूती तर असते परंतु त्यांचा स्वीकार करण्याबाबत मात्र अजूनही उदासीनता दिसून येत असल्याचे संस्थेच्या आजवरच्या अनुभवातून स्पष्ट होते. नेत्रा तेंडुलकर-पाटकर यांच्या पुढाकारानेच ‘झेप’ची स्थापना झाली. त्यांनीच प्रशिक्षण देऊन शिक्षक तयार केले. मुंबईतील बालमोहन शाळेचे माजी प्राचार्य गोविंद दाभोलकर, समविचारी मैत्रिणी वर्षां तावडे, गीतांजली रानडे व अर्पिता देशमुख यांच्याशी नेत्राताईंनी विशेष मुलांसाठी एखादी संस्था उभी करण्याबाबत चर्चा केली. या सर्वानी ही कल्पना उचलून धरली व सहकार्य केले. त्यातून १६ जून २००८ मध्ये ‘झेप’ची स्थापना झाली.देणगीदारांच्या माध्यमातून मुलांसाठी एकेक साहित्य मिळविले. स्वत:ची जागा नसल्याने चिंचवडमध्येच भाडय़ाच्या दोन जागा बदलाव्या लागल्या. सध्या संस्था ताथवडेत कार्यरत आहे. मेंदूचा पक्षाघात, मतिमंदत्व, उशिरा येणारे शारीरिक व मानसिक विकार, आनुवंशिक आजार, स्वमग्नता, डाऊन सिन्ड्रोम, स्पास्टीकस अटेन्शन डेफिसिट, परवेझिव्ह डेव्हलपमेन्टल डिसऑर्डर आदी असलेल्या मुलांना पुनर्वसन केंद्रात प्रवेश दिला जातो. प्रत्येक मूल वेगळे व त्याच्या समस्या वेगळ्या असतात. त्यामुळे वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगळी प्रशिक्षण पद्धती वापरली जाते. त्यानुसार प्रत्येक मुलाचा वेगळा अभ्यासक्रम तयार होतो. काही मुलांना अधिक उपचार पद्धतीची गरज असल्याने विशेष प्रशिक्षक, फिजीओ थेरपिस्ट, ऑक्युपेशन थेरपिस्ट आदी तज्ज्ञ ही जबाबदारी पार पाडतात. शारीरिक विकास, हस्तकौशल्य विकास, संवेदन ग्रहण या महत्त्वाच्या उपचारांबरोबरच दृष्टी, स्पर्शज्ञानाबरोबरच मुलातील विविध कमतरता ओळखून त्यावर काम केले जाते. याशिवाय योगा, नृत्य व संगीत या कलांचेही प्रशिक्षण दिले जाते. उपचाराबरोबरच मुलांना स्वावलंबी करण्याच्या दृष्टीनेही काम होते. ११ ते १४ वयोगटातील मुलांना त्यांची क्षमता लक्षात घेऊन पणत्या रंगविणे, बागकाम करणे, घरघंटी चालविणे, स्वयंपाक करणे, स्वच्छता करणे आदी कामे शिकविली जातात. स्वत:ची कामे स्वत: करणे, प्राथमिक गरजांसाठी संवाद साधणे, आज्ञा पाळणे, दुसऱ्यांना मदत करणे या गोष्टी या मुलांना शिकविल्या तर ते इतरांना किंवा पुढच्या पिढीला अडचण वाटणार नाहीत, हा उद्देश ठेवून संस्थेकडून पालकांनाही मार्गदर्शन करण्यात येते. विशेष मुलांमध्ये सुधारणा होऊ शकते, हे पालकांना पटवून दिले जाते.सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीबरोबरच विविध कारणांनी विशेष मुलांची संख्या आता वाढते आहे. त्यामुळे हे कामही विस्तारावे लागणार आहे. संस्थेला हक्काच्या विस्तीर्ण जागेची गरज आहे.