अलीकडच्या काळात वृद्धाश्रमांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याचं दिसून येतं. पण तिथे दाखल होणाऱ्या वृद्धांची मुलं किंवा जवळच्या नातेवाईकांनी त्यांना तिथे आणून ठेवलेलं असतं आणि त्यांच्या भोजन-निवास, तसंच अन्य देखभालीसाठी दरमहा विशिष्ट शुल्क आकारलं जातं. पुण्या-मुंबईसारख्या शहरात तर उत्तम आर्थिक स्थिती असलेल्या, पण मुलं परदेशी असल्यामुळे एकाकी झालेल्या वृद्ध दांपत्यांसाठी खास ‘अपार्टमेंट’ उभ्या राहिल्या आहेत. मात्र, जीवन आनंद संस्था संचालित संविता आश्रमामध्ये आलेले वृद्ध मात्र शब्दश: निराधार असतात.
तसा तो चार-चौघांसारखाच एक साधा तरुण. वडील मुंबईत गिरणी कामगार. आई लौकिकार्थाने अशिक्षित, पण सुसंस्कृत, संवेदनशील. गिरणी कामगारांच्या संपामध्ये वडिलांची नोकरी सुटली आणि ते कुटुंबासह सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या आपल्या मूळ गावी परत आले. तिथेच तो शिकत मोठा झाला आणि कोकणातल्या तरुणांच्या शिरस्त्यानुसार पोटा-पाण्यासाठी त्याने मुंबईची वाट धरली. पण त्या मायानगरीतही आईच्या संस्कारांवर जोपासलेलं संवेदनशील मन मरू दिलं नाही. उलट, त्या महानगरीत आधार नसलेल्या रस्त्यावरच्या मुलांमध्ये तो रमायला लागला. प्रसंगी त्यांच्याबरोबर रस्त्यावरच राहू लागला. त्यांचे प्रश्न, त्यांची सुख-दु:खं समजावून घेऊ लागला. हे करत असतानाच त्याला समाजातल्या निराधार वृद्धांची अवस्था अतिशय बिकट असल्याचं प्रत्यक्ष अनुभवातून ध्यानात आलं. मग त्याने त्यांच्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला. एक मन मुंबईत असलं तरी दुसरं मन कोकणातल्या मातीमध्ये घट्ट रुतलेलं होतं. त्यामुळे त्याने अपंग, अनाथ वृद्धांना आधार देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात अणाव इथे बबन परब या काकांसह वृद्धाश्रम सुरू केला. पहिल्या दोन-तीन वषार्ंतच या निराधार वृद्धांप्रमाणेच समाजातल्या अपंग, मतिमंद, मनोरुग्ण इत्यादी घटकांचेही गुंतागुंतीचे प्रश्न त्याला सतावू लागले. मात्र त्यांच्याकडे पाठ फिरवण्यापेक्षा त्यांना थेट भिडण्याचा पर्याय या तरुणाने स्वीकारला. त्याचं नाव संदीप परब. अशा तऱ्हेचं काम करायचं म्हटल्यावर संस्थात्मक स्वरूप देणं गरजेचं होतं. त्यामुळे संदीपने संस्था स्थापन केली आणि तिचं नाव ठेवलं- ‘जीवन आनंद’!
अणावच्या वृद्धाश्रमापाठोपाठ मुंबई-गोवा महामार्गावर कणकवलीपासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर असलेल्या पणदूर या गावी २ ऑक्टोबर २०१३ रोजी संस्थेतर्फे ‘संविता आश्रम’ हे केंद्र सुरू करण्यात आलं आणि त्यानंतर गेल्या अवघ्या दोन वर्षांच्या काळात या ठिकाणी केवळ सिंधुदुर्ग नव्हे, तर रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर इथूनही निरनिराळ्या समस्यांनी ग्रासलेले ५२ निराधार वृद्ध, भिन्न वयोगटाचे स्त्री-पुरुष आणि बालकं दाखल झाली आहेत. प्रत्यक्ष तिथे भेट देऊन या दुर्दैवी माणसांना भेटल्यावर जाणवतं की, प्रत्येकाचं जीवन म्हणजे एक स्वतंत्र शोकात्म कथा आहे आणि तरीही हिंमत न हारता, संदीपसह १५-२० कार्यकर्ते त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचा प्रयत्न करत आहेत.
संविता आश्रमामध्ये आलेले वृद्ध शब्दश: निराधार असतात. त्यापैकी काही संदीप किंवा त्याच्या कार्यकर्त्यांना रस्त्याच्या कडेला असाहाय्य अवस्थेत सापडलेले, तर काहीजणांना गावातल्या कोणीतरी व्यक्तीने किंवा प्रसंगी पोलिसांनी आणून सोडलेलं. त्यामुळे त्यांचा सर्व आर्थिक भार संस्थाच उचलते. गरजेनुसार औषधोपचार किंवा शस्त्रक्रियेचा खर्च केला जातो आणि वार्धक्यामुळे मरण पावणाऱ्या ‘आजी-आजोबां’वर अंत्यसंस्कार करून त्यांना सद्गती देण्याचीही जबाबदारी हे कार्यकर्तेच पार पाडतात. इथल्या मनोरुग्णांची अवस्था कोणत्याही मनोरुग्णालयात भेटणाऱ्या रुग्णांसारखीच असते. कोणी गुडघ्यात मान घालून बसलेलं, तर कोणी जमिनीवर लोळत असलेलं, तर कोणी मोठमोठय़ाने स्वत:शीच बडबडणारं. पण तरीही हे रुग्णालय वाटत नाही. एखादं एकाच छपराखाली राहत असलेलं मोठं एकत्र कुटुंब वाटतं. कारण इथले आशीष कांबळी, कल्पना ठुमरे, नीता गावडे, राजू यादव यांच्यासारखे कार्यकर्ते त्यांच्याशी कौटुंबिक जिव्हाळ्याच्या भावनेने बोलत-वागत असतात. प्रसंगी त्यांच्या अपशब्दांचा मार झेलत त्यांच्या बेभानपणाला आवर घालत असतात. कार्यकर्त्यांच्या या अथक प्रयत्नांमुळेच काहीजणांचं भरकटलेलं आयुष्य थाऱ्यावर येतं. गरोदर असतानाच पतीचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे प्रचंड मानसिक धक्का बसलेल्या कुडाळ तालुक्यातील एका पदवीधर महिलेनं अन्न-पाणी सोडलं. पतिवियोगाने खचून जाऊन ती वेळी अवेळी उपाशीपोटी रस्त्यावर भटकू लागली. अशा परिस्थितीत तिला सावरणं जवळच्या नातेवाईकांनाही अशक्य होऊन बसलं. अखेर त्यांनी तिला संविता आश्रमामध्ये दाखल केलं. कुडाळचे मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रुपेश धुरी, स्त्री रोगतज्ज्ञ डॉ. विशाखा पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकर्त्यां दर्शना गवस इत्यादींनी या नाजूक काळात तिचा घरच्या मायेने सांभाळ केला. त्यामुळे पती निधनाच्या धक्क्यातून सावरत त्या महिलेने दोन गोंडस जुळ्या मुलींना जन्म दिला. आता त्यांच्यासह ती या आश्रमाची कायमची सदस्य बनली आहे. मानसिक आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या पाच रुग्णांचं समाजात पुनर्वसन करण्यातही संस्थेने यश मिळवलं आहे. जन्मत:च व्यंग असलेल्या किंवा बालपणी दुर्धर आजाराने पछाडलेल्या मुलांमुळे त्या कुटुंबाच्या सुखाला जणू दृष्ट लागते. अशा मुलांचं हरपलेलं बाल्य पुन्हा मिळवून देण्यासाठीही संविता आश्रम कार्यरत आहे. मग तो मेंदूच्या गंभीर दुखापतीमुळे त्रस्त झालेला दुष्यंत लाड असो किंवा हृदयरोगग्रस्त बालकं असोत, संदीप व त्याच्या सहकाऱ्यांनी प्रसंगी पदरमोड करून त्यांच्यावरील अवघड शस्त्रक्रिया तज्ज्ञ डॉक्टरांकडून यशस्वीपणे करून घेतल्या आणि असाहाय्य वेदनेतून त्यांची मुक्तता झाली.
संस्थेच्या कामाचं स्वरूपच असं आहे की, इथे विविध प्रकारच्या तज्ज्ञ डॉक्टरांचं सतत सहकार्य लागतं. त्या दृष्टीने डॉ. कौस्तुभ लेले (सावंतवाडी), मुंबईच्या मानसशास्त्रज्ञ स्मिता आकळे, त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय रुग्णालयातील सर्व डॉक्टरमंडळी सेवाभावी वृत्तीने सहकार्य करत असतात.पणदूरचे निवृत्त वनाधिकारी संजय सावंत यांनी भाडेतत्त्वावर दिलेल्या बंगल्यात आणि गावात संस्थेने स्वत: घेतलेल्या जागेत उभारलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सध्या सर्वाच्या निवासाची सोय करण्यात आली आहे. पण तिथल्या गैरसोयी लक्षात घेता संस्थेची स्वतंत्र वास्तू उभी करण्याचं काम सुरू झालं आहे. त्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची गरज आहे. कोणत्याही प्रकारच्या सरकारी अनुदानासाठी करावा लागणारा खटाटोप आणि कागद रंगवण्याची किचकट प्रक्रिया शक्य नसल्यामुळे जनताजनार्दनाच्या साहाय्याच्या आधारेच हे कार्य चालवण्याचा संदीप व त्याच्या सहकाऱ्यांचा निर्धार आहे.
संस्थेचे काम करत असताना मला वेळोवेळी अनेक देवमाणसं भेटत गेली. त्यांनी दिलेल्या बळाच्या आधारेच कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधीलकी न ठेवता आणि धार्मिक वा जातीय भेदभाव न करता आम्ही पुढे चाललो आहोत. ही वाटचाल यापुढेही अशीच अखंड सुरू राही. त्यासाठी फक्त वेळोवेळी देवमाणसं भेटत राहावी हीच इच्छा असल्याचे संदीप परब नमूद करतो.

  • पत्रव्यवहारासाठी पत्ता

    New Bmc Colony, 2nd Hasanabad Lane, Near Bmc School, Khar (W)

    Mumbai, Maharashtra 400052

  • दूरध्वनी

    +91 98676 24939