भारतात शंकराची एकूण १२ महत्त्वाची मंदिरे आहेत. त्यांना १२ (द्वादश) ज्योतिर्लिंगे म्हणतात. धर्मशास्त्राने या ज्योतिर्लिंगांच्या यात्रेचा क्रम सांगितला आहे, तो असा :

सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैले मल्लिकार्जुनम्। उज्जयिन्यां महाकालमोङ्कारममलेश्वरम् ॥१॥

परल्यां वैद्यनाथं च डाकिन्यां भीमशंकरम्। सेतुबन्धे तु रामेशं नागेशं दारुकावने ॥२॥

वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यम्बकं गौतमीतटे। हिमालये तु केदारं घृष्णेशं च शिवालये ॥३॥

एतानि ज्योतिर्लिङ्गानि सायं प्रातः पठेन्नरः। सप्तजन्मकृतं पापं स्मरणेन विनश्यति ॥४॥

हिंदु धर्मानुसार अस म्‍हणल जात की जी व्‍यक्ति “वरील बारा ज्‍योर्तिलिंगाचे नावानुरुप मंत्र” जर दररोज पहाटे व सायंकाळी जपन केला तर सात जन्‍मातील झालेला पाप ज्‍योर्तिलिंगाच्‍या स्‍मरणामुळे / जप केल्‍यामुळे सर्व पापांचा विनाश होतो.

 1. सोमनाथ (गुजरात – वेरावळ)
 2. मल्लिकार्जुन (आंध्रप्रदेश – श्रीशैल्य)
 3. महांकालेश्वर (मध्यप्रदेश – उज्जैन)
 4. ओंकारेश्वर (मध्यप्रदेश – ओंकारेश्वर)
 5. वैजनाथ (महाराष्ट्र – परळी)
 6. भीमाशंकर (महाराष्ट्र – भीमाशंकर)
 7. रामेश्वर (तामिळनाडु – रामेश्वर)
 8. नागनाथ (महाराष्ट्र – औंढा नागनाथ)
 9. विश्वेश्वर (उत्तर प्रदेश – वाराणसी)
 10. त्र्यंबकेश्वर (महाराष्ट्र – त्र्यंबकेश्वर)
 11. केदारनाथ (उत्तरांचल – केदारनाथ)
 12. घृष्णेश्वर (महाराष्ट्र – औरंगाबाद)
 • त्र्यंबकेश्वर

नाशिकपासून अवघ्या ३६ कि.मी. अंतरावर ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी हे स्थान आहे. दक्षिणेतील गंगा म्हणून ज्या नदीचा उल्लेख केला जातो ती गोदावरी नदी येथेच उगम पावते.
पुराणातील एका आख्यायिकेनुसार गौतम ऋषी यांनी येथील ब्रह्मगिरीवर शंकराची तपश्चर्या करून त्यास प्रसन्न केले होते. प्रसन्न झालेल्या शंकराने गौतम ऋषींच्या इच्छेनुसार गौतमी (गंगा) आणि गोदावरी या नद्यांना स्वर्गातून भूमीवर आणले. गोदावरीचा ओघ गौतम ऋषींनी कुशावर्तावर थोपविला म्हणून कुशावर्त कुंड हे यात्रेकरू भक्तांचं तीर्थस्थान झालं आहे. येथील गोदावरी जळात प्रथम तीर्थस्नान करून मगच यात्रेकरू त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करतात. त्र्यंबकेश्वर मंदिर हे शंकराचे मंदिर असून दर सोमवारी येथे त्र्यंबकेश्वराची पालखी मिरवली जाते. शिवरात्रीच्या दिवशी येथे यात्रेकरू फार मोठ्या संख्येने दर्शनासाठी येतात.
दर बारा वर्षांनी येथे कुंभमेळा भरतो. कुंभमेळा हा सर्वात पवित्र उत्सव मानला जातो व त्या वेळी संपूर्ण देशभरातील साधू, संन्यासी, संत-सत्पुरुष व सामान्य भक्त लाखोंच्या संख्येने त्र्यंबकेश्वर येथे येतात.
त्र्यंबकेश्वराचे मंदिर म्हणजे उत्कृष्ट स्थापत्य व शिल्पकलेचा सुंदर नमुना होय. पेशव्यांनी या मंदिराचा जीर्णोध्दार केला. मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात नीलपर्वत, अंजनेरी, निवृत्तीनाथांची समाधी गंगाद्वार आदी अनेक पवित्र स्थाने आहेत.

नजीकचे रेल्वे स्टेशन : नाशिक रोड (म. रेल्वे)
नाशिक रोड-त्र्यंबकेश्वर : ४५ कि.मी., मुंबई-नाशिक रोड : १८८ कि.मी.
मुंबई-त्र्यंबकेश्वर अंतर (रस्त्याने) : १८० कि.मी.

 • भीमाशंकर

पुणे जिल्ह्यात पुणे शहरापासून सुमारे १०० कि.मी अंतरावर हे ज्योतिर्लिंग आहे. सह्याद्रीच्या कुशीत जवळपास १०३५ मीटर उंचीवर हे स्थान आहे. भीमा नदीचे हे उगमस्थान आहे. जेथे ती पावते त्यास मोक्षकुंड म्हणतात. उगमाजवळ भीमाशंकरचे ज्योतिर्लिंग आहे. मंदिरावर नक्षीकामही आहे. पेशवाईतील कर्तबगार पुरुष नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार करून ते नव्याने बांधले आहे.
मंदिराच्या बाहेर बांधलेली मोठी घंटा पोर्तुगीज बनवटीची असून ती बहुदा चिमाजी अप्पांनी वसई सर केल्यानंतर हस्तगत केलेली असावी. भीमाशंकरचा परिसर निसर्गसौंदर्यामुळे खूप विलोभनीय दिसतो. थंड हवेचे ठिकाण म्हणूनही भीमाशंकर प्रसिद्ध आहे. महाशिवरात्रीस तसेच त्रिपुरी पौर्णिमेस या ठिकाणी मोठी जत्रा भरते. वन्यप्राणी तसेच वनसंपदा यामुळे हा परिसर संपन्न दिसतो.
एम.टी.डी.सी.तर्फे येथे निवासाचीही व्यवस्था आहे. याशिवाय देवालयाच्या आवारात धर्मशाळासुध्दा आहेत. भीमाशंकरपर्यंत जाण्यासाठी थेट रस्ता आहे. मुंबईहून जायचे असल्यास पुण्याच्या अलीकडे तळेगावमार्गे तसेच कल्याण-मुरबाडमार्गे जुन्नरकडूनही या ठिकाणी जाता येते

नजीकचे रेल्वे स्टेशन : पुणे
पुणे-भीमाशंकर थेट अंतर : ९५ कि.मी
मुंबई-भीमाशंकर थेट अंतर : २६५ कि.मी.

 • घृष्णेश्वर

औरंगाबादपासून नजीक असलेल्या वेरुळच्या लेण्यांपासून अवघ्या एक कि.मी. अंतरावर हे देवस्थान आहे. घृष्णेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग असून येथील मंदिर १८व्या शतकात बांधलेले आहे. देवळाचे स्थापत्य तसेच त्यावरील कोरीव काम अतिशय देखणं आहे. या मंदिराजवळच होळकर मंदिरही आहे.

जवळच बारा ज्योतिर्लिंग कुंड आहे. गणेशाच्या २१ आद्यपीठांपैकी लक्षविनायक मंदिर जवळच असून घृष्णेश्वर मंदिराच्या जवळच शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांची गढी होती. ती आता भग्नावस्थेत आहे.

नजीकचे रेल्वे स्टेशन : औरंगाबाद
औरंगाबाद-घृष्णेश्वर : ३१ कि.मी.

 • औंढा नागनाथ

देशातील १२ ज्योतिर्लिंगात येथील मंदिर हे आद्य ज्योतिर्लिंग समजले जाते.  या ठिकाणीएक नागनाथ नावाचे प्राचीन मंदिर असून त्याची स्थापत्य आणि शिल्पकला आतिशय देखणी आहे. बांधणी हेमाडपंती शैलीची आहे. हे मंदिर पांडवांनी बांधले, असा समज आहे. ते द्वादशकोनी आहे. संत नामदेव कीर्तन करीत असताना हे देवालय फिरले अशी आख्यायिका आहे. संत नामदेव यांचे घराणे औंढा नागनाथपासून जवळच असलेल्या नरसी-बामणी या गावाचे. तसेच नामदेवांचे गुरू संत विसोबा खेचर हेही मूळ नागनाथ औंढा येथील होते. संत नामदेवांना याच देवळात गुरुकृपा झाली.

नजीकचे रेल्वे स्टेशन : परभणी
परभणी-औंढा अंतर (रस्त्याने) ४० कि.मी.
नांदेड-औंढा अंतर : ६४ कि.मी
औरंगाबाद-औंढा अंतर : २१० कि.मी.

 • परळी वैजनाथ

हे ज्योतिर्लिंग बीड जिल्ह्यात असून परळी वैजनाथ हे द.म. रेल्वेवरील एक स्टेशनही आहे. परंतु रेल्वेपेक्षा रस्त्याने या ठिकाणी जाणे अधिक सोयीचे आहे. मराठवाड्यात तसेच विदर्भातही रेल्वेचे मार्ग सर्वदूर जात नसल्याने या प्रदेशात एस.टी. बसने प्रवास करणेच श्रेयस्कर ठरते. विशेष म्हणजे एस.टी सेवाही या भागात अतिशय दूरवर व थेट पोहोचलेली आहे.
परळी वैजनाथ हे परळी वैजनाथ म्हणूनही ओळखले जाते. येथील मंदिर प्रशस्त असून ते जागृत देवस्थान आहे. मंदिर लहानशा डेकडीवर असून ते चिरेबंदी आहे. मंदिराला लांबच लांब भरपूर पायऱ्या आहेत. मंदिराचे प्रवेशद्वार अतिशय भव्य आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. मंदिराच्या सभोवताली तीन कुंड आहेत.
परळी येथील औष्णिक वीज केंद्र प्रसिद्ध असून बीड जिल्ह्यातील ते मोठे कॉटन मार्केट आहे. तंबाखूचा व्यापारही येथे मोठ्या प्रमाणावर चालतो. औरंगाबाद व नांदेड मार्गेही परळी वैजनाथला जाता येते.

औरंगाबाद-परळी वैजनाथ अंतर (बीड मार्गे) : २३० कि.मी.
नांदेड-परळी वैजनाथ : १२० कि.मी.
मुंबई-परळी वैजनाथ : ५१७ कि.मी.