कडकलक्ष्मी

देवीचे सोंग घेऊन भिक्षा मागणारा भिक्षेकरी.यांच्या हातात लांब आसून असून ते त्‍याच्या कडकड असा मोठा आवाज करतात.

महाराष्ट्रातील काही जमातींत ‘कडकलक्ष्मी’, ‘भगत’, ‘वीर’ अशी विशिष्ट धार्मिक विधींशी निगडित लोकनृत्ये आहेत. त्यांचे स्वरूप ओबडधोबड आणि रानटी असते. या तिन्ही प्रकारांत नर्तकांच्या अंगात विशिष्ट देवतांचा संचार होतो व झपाटल्याप्रमाणे अंगविक्षेप करीत ते नाचू लागतात.

कडक लक्ष्मी हा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या भक्तांमध्ये रूढ असलेला प्रकार होय. त्यात एक स्त्री व पुरुष भाग घेतात. पुरुष लांब केस राखतो व कमरेभोवती घागऱ्याप्रमाणे लुगडे गुंडाळतो. तो ढोलकी वाजवतो. स्त्रीच्या डोक्यावर देवीची घुमटी असते व उजव्या हातात मोरपिसांचा कुंचा असतो. ती ढोलाच्या आघातावर नाचते. पुरुष अंगावर आसूड ओढणे, दंडात दाभण खुपसणे अशा आत्मपीडनात्मक क्रिया करतो व नाचतो. स्त्री व पुरुष दोघेही अंगात देवीचा संचार झाल्याप्रमाणे, झपाटल्यासारखे अंगविक्षेप करतात.

भगत म्हणजे देवऋषी. तो वैद्य, ज्योतिषी व मांत्रिकही असतो. त्याच्याही अंगात देव संचारतात, अशी समजूत आहे. अंगात आले की केस पिंजारून तो तालावर नाचतो; किंवा उकिडवे बसून अंग घुसळत व मानेला झटके देत घुमू लागतो. त्याच्या मानेचे झटके सुरुवातीला संथ, पुढे वेगवान व अखेरीस प्रक्षोभक होत जातात. लोक त्याच्या घुमण्याला ‘डाक’ (नगारा) या वाद्याची साथ देतात व गाणीही म्हणतात.

वीर हे फाल्गुनात धुलिवंदनाच्या दिवशी वीर वेषधारण करून घरापासून देवळापर्यंत नाचत जातात. त्यांच्या एका हातात लिंबू खोचलेली तलवार व दुसऱ्या हातात कुलदैवताचा टाक असलेली वाटी वा करवंटी असते. त्यांच्या नृत्य हालचाली द्वंद्वयुद्धातील पवित्र्यांप्रमाणे असतात. देवळाकडे जात असताना काही वीरांच्या अंगात येते व ते बेभान होऊन अंगविक्षेप करू लागतात. युद्धात मरण पावलेल्या आपल्या वीरपूर्वजांचे गौरवपूर्वक स्मरण करणे, हा या विधीयुक्त नृत्याचा उद्देश आहे.