खारेपाटणचा किल्ला

खारेपाटण हे इतिहासप्रसिद्ध गाव आहे. वाघोटण नदीच्या दक्षिणतीरावर खारेपाटण वसलेले आहे. इतिहासकाळात महत्त्वाचे स्थान मिळवलेले खारेपाटण हे पुर्वी देवगड तालुक्याचे मुख्यालय होते. इ.स. १८१८ ते इ.स. १८७५ पर्यंत मुख्य ठिकाण असलेल्या खारेपाटणाला एक किल्ला होता याची माहिती खुद्द खारेपाटणवासीयांनाही नाही याचे मात्र आश्चर्य वाटते.

 
खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधे आहे. मुंबई-पणजी हा महामार्ग खारेपाटण जवळून जातो. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांच्या सीमा वाघोटण नदीच्या तीरावर येवून मिळतात. मुंबईकडून निघाल्यावर वाघोटण नदी ओलांडताच पहीले गाव खारेपाटण आहे. महामार्गाच्या पश्चिमेकडे वसलेल्या खारेपाटणास कोल्हापूर गगनबावडा मार्गही येता येते.
 
महामार्गापासून दोन कि.मी. अंतरावर नदीच्या तीरावर असलेल्या लहानशा टेकडीवर किल्ल्याचे अवशेष आज आढळून येतात. कालौघात दुर्लक्षित झाल्यामुळे या किल्ल्याची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. साधारण १८५० च्या सुमारास किल्ल्याचे तट व बुरुज पाडून त्याची दगडी काढण्यात आली. ही घडवलेली दगडी वापरुन नदीच्या काठावर एक धक्का बांधण्यात आल्याची नोंद आहे. हा धक्का उतारु लोकांना तीरावर उतरण्यासाठी बांधला होता. सध्या तो ही निरुपयोगी ठरलेला आहे.
 
खारेपाटण ही चांगली बाजारपेठ आहे. बाजारपेठेतूनच किल्ल्याकडे रस्ता जातो. किल्ला म्हणून विचारल्यास अनेकांना तो माहित नाही. दुर्गामातेचे मंदिर म्हणून विचारल्यास लोक सांगू शकतात, हे मंदिर किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात आहे. किल्ल्याच्या खालच्या भागातील उतारावर सध्या शासकिय विश्रामधाम आहे. या विश्रामधामधून किल्ल्यावर जाता येते हाच मार्ग सोयीचा आहे. येथपर्यंत गाडीमार्गही आहे. स्वत:चे वाहन नसल्यास महामार्गापासून अर्ध्यातासात चालत इथपर्यंत पोहोचता येते.
 
शासकीय विश्रामधामाच्या पायर्‍या चढायला लागल्यावर डावीकडे लगेच फाटा फुटतो. या फाटय़ालाही काही पायर्‍या आहेत. त्या चढून आपण एका घराच्या अंगणातून पुढे चढून गेल्यावर एक शाळा लागते. येथे गावातून येणारा रस्ता मिळतो. इथेच उजवीकडे बालेकिल्ल्याच्या तटबंदीचे अवशेष दिसायला लागतात.
 
बालेकिल्ल्याच्या मार्गावर डावीकडे पाच एक फुट उंचीची तटबंदी शिल्लक राहिली आहे. या आयताक.ती माथ्याच्या चारही बाजुंना असलेल्या तटबंदीची अवस्था सध्या मातीच्या ढिगार्‍यात झालेली दिसते. तीन कोपर्‍यावरचे तीन बुरुज कसेबसे उभे आहेत. मध्यभागी मोठय़ा झाडाखाली दुर्गामातेचे नव्याने जीर्णोध्दारित मंदिर बांधलेले आहे. शासकीय विश्रामगृहामधून पाण्याची सोय केल्यास येथे मुक्काम करता येवू शकतो.
 
मंदिराच्या बाजुच्या तटबंदीमधे दिंडी दरवाजा आहे. दरवाजा लहान असला तरी तो वळणदार मार्गावर बांधलेला आहे. या दरवाजातून बाहेरच्या खंदकात जाता येते. खंदक झाडी आणि गवताने पुर्ण भरलेला आहे. त्यामुळे या परिसरामधे जपूनच फिरावे लागते. खरेतर कोकणातील हे झाडीभरलेले किल्ले मार्च ते मे महिन्यात पाहिल्यास गवताचा फारसा त्रास जाणवत नाही. बालेकिल्ल्याच्या पश्चिम बाजूला मोठी घळ आहे. घळीच्या पलीकडे एका स्मारकाचा चौथरा पहायला मिळतो.
 
मुस्लीम आमदनीच्या काळात हा किल्ला बराच काळ त्यांच्या ताब्यात होता. पुढे १७ व्या शतकाच्या अखेरीस कान्होजी आंग्रे यांनी तो जिंकुन घेतला. इ.स.१७१३ मधे कान्होजी आंग्रे आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यामध्ये झालेल्या सलोख्यात इतर १६ किल्ल्यांबरोबर खारेपाटणचा ताबाही आंग्रेकडे राहीला.
 
पुढे आंग्रे आणि पेशवे यांच्यात मोठा तंटा निर्माण झाला. पेशव्यानी इंग्रजांची मदत घेऊन आंग्य्रांचा मुलुख मारला. त्यात खारेपाटण पेशव्यांकडे आले. १८१८ मधे इंग्रजांनी खारेपाटणचा ताबा मिळवला. असा मोठा इतिहास असताना खारेपाटणचा किल्ला इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. वेळीच दखल नाही घेतली तर किल्ला कालौघात नष्ट झाल्याशिवाय रहाणार नाही हे मात्र खरे.
 
खारेपाटणमधे कपिलेश्वर मंदिर आहे. नव्या बांधणीच्या या मंदिरात मात्र सूर्यनारायणाची सुबक मुर्ती आवर्जुन पहावी अशीच आहे.