डोंबा-याचा खेळ
कोल्हाटी समाजाचा ‘डोंबारी’ हा खेळ व नृत्यप्रकार या गटात मोडतो. एक लहान मुलगी हाता काठी घेउन या टोकावरून त्या टोकाला जाते. हा खेळ पाहताना श्वास टांगणीला लागायचा. वेडयावाकडया उडया मारत समोरच्यांची प्रशंसा करत पोटाची खळगी भरणं, या संकुचित मानसिकतेत गेली कित्येक वर्षे हा समाज खितपत पडलाय. या पैशातूनच कसंबसं दोन वेळंच खाणं निभावून नेणा-या कोल्हाटी जमातीनं ही कला नावारूपाला आणली. दोरीवरून चालणं, नाचणं, उडय़ा मारणं वगैरे कसरतींचे खेळ करणं आणि भिक्षा मागणं हा कोल्हाटी जमातीचा पारंपरिक व्यवसाय. विकास आणि आधुनिकतेचा स्पर्शही न झालेला असा हा डोंबारी समाज.. कितीही संकटं आली तरी (प्रसंगी उपाशी पोटी) ‘नाचतो हा डोंबारी’..
१९६५ ला उषा चव्हाण यांनी गायलेल्या ह्या ओळी मनाला स्पर्षून जातात
उद्याच्या पोटाची काळजी कशाला,
आभाळ पांघरु दगड उशाला,
गाळुनी घाम आता मागु या भाकरी।
नाचतो डोंबारी गं
नाचतो डोंबारी।।
वरील ओळी या डोंबारी समाजाचं वास्तव चित्र सांगणाऱ्या.
डोंबारी ही जमात आंध्रप्रदेश,कर्नाटक,तेलंगना,राजस्थान,तामीळनाडु,ओरीसा,हिमाचल प्रदेश,बांग्लादेश व महाराष्ट्रात आढळते.डोंबाऱ्याच्या घरी मूल जन्मल्यानंतर त्याला लहानपणापासून खेळांचे प्रशिक्षण दिले जाते.प्रशिक्षण म्हणजे ६’ इंचाच्या गोल रिंगमधुन संपुर्ण शरीर आत टाकणे व बाहेर काढणे . हा खेळ प्रकार करताना त्या चिमुकल्या जिवाला असह्य वेदना होतात .रस्त्यावरच्या एका कोप-यात, रश्शीवरच्या उडया, कोंबडयाप्रमाणं उडय़ा, मध्येच ढोलकीच्या तालावर ठेका धरत एखादी कसरत दाखवणारी टोळी दिसली की, हा डोंबा-याचा खेळ बघायला येणा-या-जाणाऱ्यांची पावलं आपसूकच थांबतात. नाच व खेळ यांचा सुरेख संगम साधत मनोरंजन या उद्दिष्टापासून थोडी फारकत घेत, केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी जन्माला आलेली कला म्हणजे ‘डोंबारी कला’. खरं तर डोंबारी नृत्य हे रंजकप्रधान नृत्यप्रकारात मोडतं. महाराष्ट्र आणि कर्नाटकात आढळणा-या कोल्हाटी या भटक्या जातीचं प्रतिनिधित्व करणारी ही लोककला कसरतींसह सादर होणा-या नृत्यासाठी ओळखली जाते. बार्शी तालुक्यातील माणकेश्वर हे कोल्हाटयांचं मूळ गाव.
मुळात ही भटकी जमात असल्यानं जिथं-जिथं जत्रा होतात, त्या गावात त्यांचा तात्पुरता मुक्काम करत. त्यानंतर मैलोन्मैल पायी प्रवास करताना काही माणसांची टोळी आढळली, की आसपास पुन्हा तात्पुरता मुक्काम करत डोंबारी नाच करतात आणि त्यांचा पुढील प्रवास सुरू होतो. मात्र अशा भटक्या जीवनातूनच या कोल्हाटी समाज लावणी या नृत्यकलेकडे वळला. आपल्या नृत्यकलेला अधिक व्यापक, काहीसं ठसकेबाज स्वरूप द्यावं, यासाठी काही जणांनी या लावणी कलेचा स्वीकार केला. मात्र काही डोंबारी कलेवर खिळून राहिले होते.
अनेकांनी गावा-खेड्यात डोंबा-यांचा खेळ पाहिला असेल….पण आता ते खेळ क्वचितच बघायला मिळतो .राहण्यासाठी ना पक्क घर, शिक्षणाचा अभाव, अविकासाच्या दारिद्रयात लोटल्या गेलेल्या या जमातीपुढे आता कोणता पर्याय निवडावा, याचं उत्तर अनुत्तरितच आहे. माञ आजही हा समाज न्यायापासुन वंचीत आहे. समाज म्हणुन आपणचं येथुन पुढं त्यांना मदत करायला हवी. हा समाज सुधरलाच पाहिजे.