वारली चित्रकला

वारली जमातीच्या लोकजीवनाचे व धार्मिक जीवनाचे प्रतिबिंब त्यांच्या विविध चित्राकृतींतून दिसते. या चित्रसंस्कृतीला एक धार्मिक परंपरा आहे. आणि ही परंपरा या समाजातील वृध्द महिला, धवलेरी आणि भगत या व्यक्तीरूपी संस्थांनी जतन केली आहे.कुडाच्या भींती लाल मातीने कींवा गेरूने सारवून तांदळाच्या पिठाने कढतात. त्यात पार्श्वभाग लालसरच असतो. त्रिकोण, चौकोन,वर्तुळ, रेषा, आणि बिंदू अशा साध्या भूमितीय आकृत्यांचा वापर करून आकर्षक पद्धतीने आदिवासींच्या जीवनशैलींची चित्रे रेखाटता येतात. दिसायला सोपी असलेली ही चित्र थेट निसर्गाकडे घेऊन जातात. एकमेकांच्या हातात हात गुंफलेली ती

आदिवासी माणसांची पांढरी चिन्हे जणू एकतेचा संदेशच देतात! वारलींच्या चित्रात मुख्यत्वे शेती,पिके,हवामान,ऋतु, विवाह, उत्सव, जन्म ह्या विषयांवरील चित्रे अधीक दिसतात. वारली समाजाची सरळ जीवनशैलीच ह्या चित्रातून उलगडते. वारलींच्या चित्रात विवाह हा प्रमूख विषय असतो. त्यात सण समारंभ,देव,पशूपक्षी,वृक्षवल्ली, स्त्री,पुरूष एकमेकांच्या हातात हात घालून फेर धरत एकमेकांच्या साथीने जगण्याचा मंत्रच जणू देत असतात. पाठीमागचा तो एकमेव तांबडा रंग सतत पायाखालच्या जमिनीची आठवण करून देतो.

वारली या आदिवासी जमातीच्या वैशिष्ठ्यपूर्ण चित्रकलेला ‘वारली चित्रकला’ अशी स्वतंत्र ओळख देत ,कला क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल भारत सरकारने ‘पद्मश्री’ व राष्ट्रपती पदक देऊन  कै.जिव्या सोमा यांना गौरविले होते.